virendra_talegaokarहे सदर आहे, अधिकारी स्त्रियांविषयीचं. स्त्री बॉसचं. अनेक कंपन्यांच्या सीईओ, सीओओ पदावर, व्यवस्थापक, संचालकपदावर किंवा यशस्वी उद्योजिका म्हणूनही स्त्रियांची संख्या वाढायला लागली आहे. ते पद अनेकदा काटेरी सिंहासन असतं. कारण तुम्हाला सातत्याने ‘रिझल्टस्’ द्यावेच लागतात. सतत पुढचा, यशाचा विचार करत असताना व्यावसायिक गणिताचं भान ठेवायला लागतं. आणि सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनाही समजून घ्यावं लागतं शिवाय एक स्त्री म्हणून कुटुंबाची जबाबदारीही असतेच. एकाचवेळी अनेक व्यवधानं सांभाळणाऱ्या या अधिकारी स्त्रियांच्या अनुभवांचं हे सदर दर पंधरा दिवसांनी. आजच्या अंकात ‘एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’च्या कार्यकारी संचालक व मुख्य वित्तीय अधिकारी विभा पाडळकर.

माझा जन्म चेन्नईतला. तिथंच दहावीपर्यंतचं शिक्षण झालं. आई सरकारी खात्यात वरिष्ठ अधिकारी आणि वडील र्मचट नेव्हीमध्ये. त्यांच्या सारख्या बदल्या होत. त्यांची ब्रिटनच्या उच्चालयात नियुक्ती झाली आणि मग माझं दहावीपुढील सर्व शिक्षण तिथंच, ब्रिटनमध्ये झालं. इंग्लंड आणि वेल्समधून मी सी.ए. केलं. सातएक वर्ष माझं तिथंच वास्तव्य होतं. पीडब्ल्यूसीच्या पूर्वाश्रमीच्या कंपनीतही मी अनुभव घेतला.
भारतात परतले ते वित्तीय शिक्षण आणि त्याच्याशी संबंधित अनुभव घेऊनच. साहजिक नव्या मार्गावर चालण्याचा प्रश्नच नव्हता. ‘कोलगेट पामोलिव्ह’मध्ये मी सात वर्षे काम केलं. त्यानंतर विविध उत्पादनाशी निगडित कंपन्यांशी संबंध आला तोही त्यातील वित्तीय कार्यक्षेत्रातच. करिअरबाबत टर्निग पॉइंट असा माझ्यासाठी नव्हताच. ठरवून आले म्हणा ना मी या क्षेत्रात. आर्थिक विषयाचं शिक्षण मिळत गेलं, पुढे आवडही वाढली आणि स्थिरावलेही. मुळात घरात अधिकारीपदाच्या तेही सरकारी खात्यात, माझे आई-बाबा होतेच. तेव्हा वेगळा मार्ग म्हणून मी त्या दिशेला गेले नाही. मला कॉलेजमध्ये गणित चांगलं जमायचं. तुलनेत फिजिक्स नाही. बायोलॉजी तर मला बिलकूल आवडत नव्हतं. तेव्हा मेडिकलला जाण्याचा माझा मार्ग आपोआपच बंद झाला. माझे काका किर्लोस्कर कमिन्समध्ये वित्त विभागातच होते. त्या काळात ते नेमके काय करायचे हे कळत नव्हतं. पण या क्षेत्राने माझं लक्ष वेधलं, असं म्हणता येईल. शिवाय कॉर्पोरेट लाइफस्टाइलचं मला त्या वयात प्रचंड आकर्षण होतं. सी.ए. केलं आणि जाणूनबुजून वित्तीय क्षेत्रातच राहिले. एकदा कुटुंबातील एका लग्नाच्या निमित्ताने काही दिवसांसाठी भारतात आले आणि मग पक्कच केलं, हाच माझा मार्ग म्हणून.
‘एचडीएफसी’मध्येही माझी वित्तीय जबाबदारीसाठी (सीएफओ) निवड झाली तेव्हाही स्त्री म्हणूून या क्षेत्रातील अनोखी घटना म्हणून कॉर्पोरेट तसेच प्रसारमाध्यमांमध्येही गणली गेली. निश्चितच ती महत्त्वाची गोष्ट होती. एक स्त्री म्हणून मी मात्र तसं मानत नाही. मुळात घरी मला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वाढवण्यात आलं. त्यामुळे कुटुंबात असताना आणि करिअरमध्येही ‘मी एक स्त्री आहे’ हे कारण प्रगतीतील अडथळा वाटलं नाही. माझं स्त्रीत्व प्रगतीमध्ये अडथळा ठरू शकेल असा विचार कधीच मनाला शिवला नाही. मुळात घरच्या वातावरणानं मला तसं कधी भासू दिलं नाही. त्याबाबत माझे पालक आणि आजोबा हे माझे आदर्श होते.
कंपनीतही वरिष्ठ अधिकारी आणि तीही स्त्री असली म्हणून फरक पडू नये असं मला वाटतं. निर्णयाच्या वेळीही मी हृदय आणि मन दोन्हींचा समतोल साधूनच पाऊल उचलते. अर्थात, स्त्री असल्याचा फायदा होतोच. कारण एकाच वेळी अनेक कार्य आणि विचार करण्याची आपसूक वृत्ती स्त्रींमध्ये असतेच. कुटुंबाचा विचार करण्याची सवय असल्याने कामाच्या बाबतीत दृष्टिकोन व्यापक होतो. एक स्त्री म्हणून कोणतीही बिकट बाब हाताळणं तिला अधिक सोप्पं असतं. एखादं काम तडीस जाण्यासाठी मी सूचना देते, मार्गदर्शन करते. त्याचबरोबर ते अधिक क्षमतेने व गुणवत्तापूर्ण कसे होईल यासाठी संबंधितांना पुरेसा वावही देते.
वित्तीय क्षेत्रात- खास करून बँक क्षेत्रात तुम्हाला सर्वाधिक संख्या स्त्रियांची दिसते. गेल्या काही वर्षांमध्ये तर ती लक्षणीय वाढली आहे. अनेक सार्वजनिक तसेच खासगी बँकांचे प्रमुखपद तर हल्ली स्त्रियाच भूषवताना दिसतात. सी. ए.च्या माझ्या व्यावसायिक शिक्षणाने मला भागधारक, सेवाधारक यांना कसं हाताळावं हे शिकायला मिळालं. स्त्री म्हणून समोरच्याची ‘बॉडी लँग्वेज’ आणि त्यांचे मूड वाचणं याचा खूप उपयोग महत्त्वाच्या पदावरील निर्णय घेताना होतो. स्त्री बॉस म्हणून कधी कठोर आणि घेतलेल्या निर्णयांवर दृढ राहणंही ओघाने आलंच.
पण वरचं पद मिळाल्यावर काय टाळायला हवं याचं भान मात्र नक्की ठेवायला हवं.
– नोकरी, व्यवसायात कितीही मोठय़ा पदावरच्या तुम्ही व्यक्ती असू द्यात पुरेशी झोप महत्त्वाची आहे. त्या गोष्टीचा तुमच्या कामावर परिणाम होत असतो. तसंच ज्या कृतीमुळे तुमची झोप बिघडणार आहे, ते टाळणं याला नेहमीच प्राधान्य द्यावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. जबाबदारीच्या अथवा नोकरी/व्यवसायाच्या ठिकाणी, अनेकदा कुटुंब अथवा सामाजिक पातळीवर स्त्री म्हणून तुमचं अस्तित्व तुम्ही टाळत असता. वित्तीय नियोजनाप्रमाणेच याचंही नियोजन आवश्यकच आहे.
– तुम्ही बॉस झाला म्हणून पूर्णत: बरोबर आहात असं नाही. त्या पदावरचा तुमचा रुबाब तेवढाच महत्त्वाचा आहे; पण तुमच्या हातून झालेल्या चुकीचा स्वीकार ही नगण्य बाब नाहीच. ‘डाऊन टु अर्थ’ असणं आणि समोरच्याचं ऐकून घेणं हे बॉस म्हणूनही तुम्ही करणं आवश्यकच आहे. पण म्हणून अगदी तडजोडी करून जुळवाजुळव करणंही धोकादायक आहे. मी काय आणि कशासाठी करतेय हे जर तुम्ही मांडू शकलात तर ते सिद्धीस नेणं अधिक सुखकारक ठरू शकतं. मोठा अनुभव असला तरी दीर्घकालीन दृष्टिकोन हवाच.
अनेकांचे रिझुम्ये पाहिलं की लक्षात येतं मोठय़ा किंवा जबाबदारीच्या पदासाठी दोन वर्षांचा अनुभव लिहिलेला असतो. पण कुठलंही क्षेत्र असो किंवा कंपनी तुम्हाला ते माहीत करून घ्यायला सहा आणि शिकायला सहा महिने लागतातच. दोन वर्षांतील एक वर्ष असं गेलं आणि पुढच्या एक वर्षांचा असतो तो अनुभव! नोकरी बदलताना अनेकदा बढती-प्रमोशन मिळतात. पण अशा ठिसूळ अनुभवाच्या जोरावर ते फार काळ टिकत नाही. तेव्हा दीर्घकालीन दृष्टिकोन असावा, असं मला व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांना सुचवावंसं वाटतं. कुठल्या तरी कमकुवत आधारावर चढलेली पायरी कधीही तुम्हाला भक्कम स्थानावर पोहोचवत नाही. उलट मोठय़ा अनुभवाची शिदोरी कायम उपयोगी पडते. महत्त्वाच्या अथवा वरच्या पदावर निर्णय घेताना मग तुमची दोलायमान स्थिती होत नाही आणि घेतलेले निर्णय मार्गस्थ करण्याची तुमची क्षमता वृद्धिंगत होत जाते.
तुम्हाला ज्याप्रमाणे आईवडील निवडण्याचा पर्याय नसतो. नोकरीच्या ठिकाणी तसंच बॉसचंही आहे. उलट आपल्याला आव्हानं कशी स्वीकारता येतील, ते पाहणं गरजेचं आहे. त्याद्वारे मी कंपनी किंवा व्यवसायाच्या प्रगतीकरिता कसं योगदान देऊ शकेन, हा विचार महत्त्वाचा आहे आणि स्त्री म्हणून जरी ती सर्व व्यवधानं सांभाळत असली तरी ती जबाबदारी अधिक आणि मोठी आहे.
तुम्ही व्यवसाय करत असा किंवा नोकरी त्यासाठी तुमचा/तुमची जीवनसाथी आणि त्याचबरोबर कुटुंब यांचा पाठिंबा खूपच आवश्यक ठरतो. घरचं वातावरणही त्यासाठी अनेकदा पूरक ठरतं. कामाच्या ठिकाणची महत्त्वाची बाब कुटुंबात शेअर करा. आयुष्याच्या एकाच वळणावर कुटुंब आणि काम यांचा समतोल राखा. प्राधान्याने करावेच लागणाऱ्या कामांना न्याय द्या. स्वत:ला कधीच कमी लेखू घेऊ नका. ‘मी’बद्दल फारसे गंभीरही होऊ नका. आपले पद, कार्य यांचा आदर ठेवून त्यावर कार्य करणं उत्तम. सहयोगी, कनिष्ठ तसेच कामाच्या निमित्ताने संबंध येणारे यांच्यांबरोबर एखादी गोष्ट पटत नसेल तर ती विस्तृत करून त्यांच्यामधील गुंता कसा सोडविता येईल, याला प्राधान्य द्यायला हवं. त्यासाठी वैयक्तिक हेवेदावे, मानापमान यांना दूरच सारणं हिताचं.

* ब्रिटनची ‘स्टॅण्डर्ड लाइफ’ आणि भारतातील ‘एचडीएफसी’ समूह यांनी एकत्रितपणे २००० मध्ये स्थापन केलेली ‘एचडीएफसी लाइफ’ ही देशातील पहिली खासगी विमा कंपनी आहे.
* २०१३ च्या सुमारास भारतीय कॉर्पोरेट जगतात खासगी कंपनीतील पहिल्या
महिला (मराठीही) सीएफओ म्हणून विभा पाडळकर यांचे नाव झळकले.
* विविध कंपन्यांमध्ये केलेल्या वित्तविषयक कामगिरीमुळे अनेक पुरस्कार मिळवलेल्या विभा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विमा योजना तयार होत आहेत. दिवसागणिक संख्या वाढणारे आजार आणि विमा क्षेत्रातील विद्यमान छत्ररचना यांचा विचार करून वैशिष्टय़पूर्ण योजना कंपनी साकारत आहेत. यामध्ये स्त्रीवर्गासाठीच्या विशेष योजनाही आहेत.
* ‘एचडीएफसी लाइफ’मध्ये येण्यापूर्वी विभा या ‘डब्ल्यूएनएस ग्लोबल सव्‍‌र्हिसेस’मध्ये होत्या. तिथे अवघ्या सहा महिन्यांतच त्यांनी या कंपनीची भागविक्री प्रक्रिया (आयपीओ) राबविली. आणि ती न्यूयॉर्कच्या शेअर बाजारात झळकणारी भारतातील पहिली बीपीओ कंपनी ठरली.
* विभा यांचे पती शिक्षणाने अभियंता आहेत. जागतिक स्तरावरील आघाडीच्या ‘रोबोटिक्स’ सारख्या कंपनीत काम केल्यानंतर ते आता मनोरंजन क्षेत्राकडे वळले आहेत. विविध मालिका, चित्रपट यासाठी ते क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. तर मुलगा सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.

Story img Loader