आयुर्वेदाचा प्रसार हल्ली खूपच मोठय़ा प्रमाणावर होत आहे. भारतीय पुन्हा एकदा या पुरातन उपचार पद्धतीचा मोठय़ा प्रमाणात अंगीकार करताना दिसू लागले आहेत. याच आयुर्वेदातील नाडी परीक्षण पद्धतीची आरोग्य उपचार पद्धती भारतात सर्वप्रथम व्यवसाय स्तरावर विकसित करणाऱ्या आयुशक्ती समूहाच्या संस्थापक-अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका डॉ. स्मिता नरम. आयुर्वेदातून वेगळ्या वाटेवरच्या या त्यांच्या व्यवसाय प्रवासाविषयी..

नाडी परीक्षण करून रुग्णावर उपचार करण्याची पद्धती फारच पुरातन. केवळ या पद्धतीचा वापर करून देश-विदेशात चिकित्सालयं उभारणं, या चिकित्सेवर आधारित आयुर्वेद उत्पादनांची दालनं सुरू करणं ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट एका आयुर्वेदिक डॉक्टरने शक्यच नव्हे तर यशस्वी करून दाखवली आहे. आयुशक्ती! ‘आयुशक्ती आयुर्वेद प्रायव्हेट लिमिडेट’, ‘आयुशक्ती हेल्थ केअर प्रा.लि.’ आणि विदेशातील ‘आयुशक्ती बीव्ही’ असा तो एकूण पसारा. तो मांडलाय डॉ. स्मिता नरम यांनी.

success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

स्मिता या मूळच्या गुजरातच्या. मात्र शालेय, महाविद्यालयीन, वैद्यकीय असं सारं शिक्षण मुंबईतच झालेलं. आयुर्वेदाकडे आपण मुद्दामच वळल्याचं स्मिता सांगतात. त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या माहेरच्या चार पिढय़ा आयुर्वेद क्षेत्रातच होत्या. आमच्या चिखली (नवसारी, गुजरात) गावात तर माझे काका गुणकारी औषधांसाठी खूपच प्रसिद्ध होते. मी १० वर्षांची असताना मला पोटाचा त्रास झाला. अ‍ॅलोपॅथी डॉक्टरने शस्त्रक्रिया करायला सांगितली. वडिलांनी काकांना विचारलं. अवघ्या एका दिवसात कुठल्यातरी कडवट रसाने मी अगदी ठणठणीत बरी झाले. आयुर्वेदातील वैद्यक शिक्षण घेण्याचं मी कळत्या वयापासून ठरवलं होतंच. पण त्यातही वेगळं असं काही तरी करावं म्हणून मी नाडी परीक्षणाकडे वळले. त्यासाठी परदेशात जाऊन मी शिक्षण घेतलं.’’

आयुर्वेदातील व्यवसायाच्या सुरुवातीबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘माझं शिक्षण पूर्ण झालं, लग्न झाल्यानंतर १९८६ मध्ये पती डॉ. पंकज नरम यांच्याबरोबर मी सुरुवातीला आयुर्वेदिक प्रॅक्टिस सुरू केली. तब्बल १० वर्षे आम्ही दोघांनी एकत्र प्रॅक्टिस केली. पतीदेखील नाडी परीक्षा शिकले होते. त्यांच्याकडून मी ही विद्या शिकले. ते शिकल्यानंतर या क्षेत्रात स्वत:चं काहीतरी सुरू करायचं डोक्यात होतंच. व्यवसाय करायचा म्हटलं की जोखीम आलीच. ती घेण्याबाबत पती मात्र काहीसे सावध होते. माझा निश्चय मात्र ठाम होता. आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर आम्ही सुरुवातीची सर्व व्यावसायिक भागीदारी थांबवली. पंकज यांनी स्वत:ची प्रॅक्टिस सुरूच ठेवली होती. नव्या कंपनीत माझा पूर्णपणे हिस्सा निर्माण झाला. मग याच क्षेत्रातील विस्ताराकरिता पुढे पाऊल टाकलं.’’

स्मिता सांगतात, ‘‘आयुर्वेद आणि त्यातही नाडी परीक्षेतील अद्ययावत ज्ञानाकरिता मी जगभर फिरले. परदेशात जाऊन त्याचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं. ३५० प्रकारचे रोग केवळ नाडी परीक्षणाने कसे ओळखता येतात हे आता आमच्यामार्फत जगभरातील २०० डॉक्टर शिकले आहेत. याची एक साचेबद्ध उपचार पद्धती मी पाश्चिमात्य तज्ज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने तयार केली. सध्या आम्ही ही उपचार पद्धती रुग्णांवर उपचारासाठी वापरण्याबरोबरच आयुर्वेदिक डॉक्टरांनाही शिकवितो. मी जगभर फिरले. युरोप, ऑस्ट्रेलिया, स्वित्र्झलडमध्ये या क्षेत्रातील आवश्यक ते सर्व ज्ञान घेतलं. पण व्यवसायाला काहीतरी बेंचमार्क असावा म्हणून माझ्या सर्व सेवांसाठी तिथेच आयएसओ प्रमाणपत्रासाठी मी आग्रही राहिले. मी अमेरिकेत (नाडी परीक्षा) याच क्षेत्रातील अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले. व्यवसायाशी निगडित जाहिरात, विपणन विभागाचेही धडे मी घेतले.’’

आयुर्वेदाबद्दल स्मिता सांगतात, ‘‘आयुर्वेदाबाबत अनेकांच्या मनात शंका होती. ती नाहीशी करण्यासाठी त्याविषयीचं शिक्षण देणं आवश्यक होतं. आयुर्वेदामध्ये तुम्हाला वेगळे निकाल देता येतात. आयुर्वेदात अ‍ॅलर्जी, साइड इफेक्ट वगैरे असं काही नाही. पण नाडी परीक्षेसाठी मी एकटी किती पुरणार. मला भारताबरोबरच विदेशातही ही सेवा द्यायची होती. त्यासाठी व्यवसाय विस्तार जरुरीचा होताच आणि त्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणंही. जे आम्ही देतो आहोतच.’’

स्मिता त्यांच्या जीवनप्रवासाविषयी सांगत असताना एक यशस्वी व्यावसायिक नेतृत्वाबरोबरच त्यांचं कुटुंबवत्सल व्यक्तिमत्तत्वही समोर आलं. त्या सांगत होत्या, ‘‘मी स्वत:चा व्यवसाय सुरू केला तेव्हा माझा मुलगा १० वर्षांचा होता. पण सकाळी १० ते सायंकाळी ५ या कामाच्या वेळेव्यतिरिक्त मी पूर्णत: गृहिणी असे. कारण मुलाची शाळेची तयारी, त्याचं जेवण या गोष्टी कुणीही करू शकत होतं. पण त्याच्यावर योग्य ते संस्कार रुजविण्याची जबाबदारी माझीच होती.’’

व्यवसाय व घर हे एखाद्या स्त्रीकरिता स्वतंत्र कप्पे असले तरी त्यांचा समतोल साधता येतो, असं स्मिता मानतात. त्या सांगतात, ‘‘व्यवसाय म्हणा किंवा घरची बाजू. कोणत्याही गोष्टीसाठी पूर्वतयारी आवश्यक आहे. साधी रेसिपीचं बघा ना. सर्व वस्तू किती प्रमाणात घ्यायच्या यावर त्याची चव अवलंबून असते. आयुष्याचंही तसंच आहे. स्त्री म्हणून कुटुंबाकडे लक्ष द्यावंच लागतं. हल्ली तर स्त्रियांना कुटुंबाकडूनही पाठिंबा मिळतो. ‘तुम्ही जेव्हा द्याल तेव्हाच तुम्हाला मिळेल’, हे सूत्र मी बाळगलं.’’

यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर माझी एक चतु:सूत्री महत्त्वाची वाटते. एक म्हणजे, कर्म हे ज्ञानाच्या होडीत बसून करावं तरच तुम्ही यशस्वी किनारा गाठू शकाल. दुसरं, ज्ञान सतत घेत राहावं. त्याला वय, कालमर्यादा नसाव्यात. तिसरं, एक व्यावसायिक म्हणून विक्री आणि महसुलावर नेहमी स्वत: पाळत ठेवा आणि शेवटचं, व्यावसायिकाने ग्राहक आणि त्याची क्रयशक्ती याचा सतत अंदाज घेत राहावा.’’

ज्ञान विस्ताराबाबत स्मिता खूपच आग्रही असतात. खरं तर त्यांचं या क्षेत्रातील सारं काही शिकून झालं आहे. त्यांची ही विद्या आता भारताबरोबरच परदेशातील डॉक्टरांनीही अवगत केली आहे. पण हे शिक्षण आता अकादमी स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचं सांगत स्मिता नरम या व्यवसाय विस्ताराच्या भविष्यातील योजनाही उघड करतात.

 

व्यवसायाचा मूलमंत्र

उत्पादन आणि सेवा यांची गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न करा. एका ठरावीक वेळेनंतर छोटय़ा छोटय़ा गोष्टीत लक्ष घालणं सोडून द्या. नावीन्य आणि शिक्षण खूपच आवश्यक आहे. स्पर्धा खूप आहे. तुम्ही करत असलेल्या व्यवसायात अनेकजण असतात. तेव्हा तुमच्या व्यवसायात सतत नावीन्य हवं.

आयुष्याचा मूलमंत्र

आयुष्यात योग्य व्यक्ती मिळाली तर त्याचा उपयोग नक्की करून घ्या. सगळं काही मी एकटी करेन या भ्रमात राहू नका. तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही स्त्री असा वा पुरुष काहीही फरक पडत नाही. तुम्हाला जे करायचं त्यावर लक्ष केंद्रित करा. नेतृत्व करण्याची मनीषा बाळगा.

आयुशक्ती

आयुशक्ती समूहाची नाडी परीक्षेद्वारे

उपचार, पंचकर्म आणि नर्सिग होम अशी भारतीय आयुर्वेदिक व्यवसाय विभागणी

आहे. आयुशक्तीचे भारतात ३२ परिपूर्ण केंद्र तर जगभरात १५० ठिकाणी दालन, भागीदारी, फ्रेंचाईझी तत्त्वावर अस्तित्व

आहे. आयुशक्तीची ३०० हून अधिक उत्पादनं आहेत.

स्मिता नरम

भारतातून आयुर्वेदिक उपचार पद्धतीचं पदवी शिक्षण घेतल्यानंतर त्यातही नाडी परीक्षा या विशेष शाखेत स्मिता यांनी पदव्युत्तर ज्ञान प्राप्त केलं. नाडी परीक्षणाद्वारे निदान ते संपूर्ण उपचार पद्धती अशी एकत्रित शृंखला व्यावसायिक स्तरावर देशात सुरू करणाऱ्या स्मिता या एकमेव स्त्री उद्योजिका आहेत.

 

veerendra.talegaonkar@expressindia.com