समारंभामध्ये सर्वसाधारणपणे घरातील वयस्कर माणसांना एकदम पुढे सोफ्यावर आणून बसवले जाते.  आम्ही दोघी सोफ्यावर बसून गप्पा मारत बसलो. भाचेकंपनी, जावईसुना मध्येमध्ये येऊन आमच्यासमोर नमस्कारासाठी वाकत होत्या. बऱ्याच वेळाने लक्षात आलं सोफ्यावर बसायला आमच्या मागच्या पिढीचे (माझ्या मावशा, आत्या, मामी, काकू) कोणीच नव्हते. सोफे आमच्याच पिढीने व्यापले होते. आम्ही ‘मोठे’ झालो होतो. मोठेपणाच्या जाणिवेने एक अनामिक हुरहुर दिवसभर मनाला चिकटून बसली होती..
कधीतरी अशी गंमत होते, की एकाच विषयाभोवती घुटमळणाऱ्या, एकच मुद्दा घोळवणाऱ्या, एकच विचार पक्का करणाऱ्या किंवा एकाच वस्तुस्थितीची जाणीव करून देणाऱ्या घटना जणू ठरवल्याप्रमाणे पाठोपाठ घडत राहतात. मधलं अंतर सोडलं, तर सगळ्यामागचं सूत्र एकच असतं.. माझ्याही बाबतीत हेच घडलं.
झालं असं, की त्या दिवशी रात्री आठ-सव्वाआठच्या सुमारास दारावरची बेल वाजली. दार उघडलं तर एक परिचित लग्नाचे आमंत्रण करायला सपत्नीक आले होते. खरं तर लग्नाला अजून दीड-दोन महिने होते. बहुतेक माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह त्यांना समजलं होतं. ‘‘अहो काकू, लेकीच्या लग्नाला वेळ आहे पण आम्ही ठरवलंच होतं की तुमच्या घरापासून आमंत्रणांना मुहूर्त करायचा. साधारण जे जवळचे आहेत, वाटतात, त्यात तुम्ही मोठय़ा ना!’’ दोघांच्याही आईवडिलांपैकी एक जवळ नव्हते, दुसरे हयात नव्हते. साहजिकच वयाच्या ज्येष्ठतेच्या यादीत आमचा नंबर सापशिडीतल्या शिडीवरून सरकन वर जावे तसा टॉपला जाऊन विसावला होता, ‘अजून यौवनात मी’ असा मनाचा कल असताना हे वयाचं ‘भान’ जाणवून दिल्यामुळे किंवा आल्यामुळे म्हणा जरा जबाबदारीचे ओझे आल्यासारखे वाटले. ‘मोठेपणाची’ ही झूल पांघरली गेल्यामुळे मी त्या क्षणी पत्रिकेतील ‘अहेर वा पुष्पगुच्छ नाही’ या तळटीपेकडे दुर्लक्ष करून दोघांच्या हातात पाकीट सरकवत मोठेपणाचा हक्क बजावला. त्यांनीही काही न बोलता माझा, नव्हे माझ्या मोठेपणाचा मान राखला.
    या मोठेपणात मी मश्गूल झालेली असतानाच माझ्या नणंदेचा फोन आला. ‘‘वहिनी, माझ्या लेकाचं लग्न ठरलंय. सगळं कार्य व्यवस्थित रीतीने व्हायला हवं. तेव्हा काय काय करायचं असतं? मुहूर्त काढणं, याद्या, देणं-घेणं, मानपान, धार्मिक विधी याची सगळी माहिती सांगा. लग्नाच्या तयारीसाठी तुम्ही मला आधीपासून हव्या आहात. तुम्ही सगळं केलेलं आहे. तेव्हा सगळी जबाबदारी तुमच्यावरच. आई-बाबांच्या जागी आता तुम्हीच आहात.’’ नणंदेची आज्ञा शिरसावंद्य मानून मला लग्नात उभं राहणं भागच होतं. स्मरणशक्तीला ताण देत मार्गदर्शक पुस्तिकांचा आधार घेत नोंदी करत गेल्यामुळे ‘लग्नाची तयारी. कॉम’ अशी माहिती तयार झाली. कार्य अगदी टापटिपीत पार पडलं. कोणालाही काही हवं असलं, प्रश्न पडला, की माझ्याकडे बोट दाखवलं जाई. या ‘बोटाची’ धास्तीच बसली. वयानं आणि नात्यानं आलेला मोठेपणा मी चांगलाच मिरवला. वयाबरोबर मार्गदर्शन करण्याची जबाबदारी वाढते याचा धडाही घेतला. जणू ‘ज्येष्ठ’ पदवी मिळाल्यावर माझा पदव्युत्तर परीक्षांचा हा सिलसिला सुरू झाला. फरक एवढाच, की प्रश्नपत्रिका माहिती असल्यामुळे उत्तर शोधणे सोपे गेले.
आलेला ताण थोडा कमी झाला असतानाच एका घरगुती स्नेहसंमेलनाला जाण्याचा योग आला. लांबच्या नात्यातल्या बहिणीच्या नातवाचा वाढदिवस होता. समारंभस्थानी नेहमीच्या प्रथेप्रमाणे पुढच्या बाजूला मोठे सोफे होते. जरा निवांतपणे बहिणीशी बोलता येईल, म्हणून जरा लवकरच निघाले होते. सर्वसाधारणपणे घरातील वयस्कर माणसांना सोफ्यावर आणून बसवले जाते. तिथून त्यांना रंगमंचावरील सर्व दिसते ही आणि अति महत्त्वाच्या वस्तू त्यांच्याजवळ ठेवल्या की सुरक्षित राहतात आणि हव्या तेव्हा सहज घेता येतात. कोणीच आलेले नव्हते. म्हणून आम्ही दोघी सोफ्यावर बसून गप्पा मारत बसलो. कोणीही मोठं आलं की पटकन उठायची मनाची तयारी होती. ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे’ हा बाणा होता आणि सोफा आपल्यासाठी नाही, आपण अजून लहान आहोत ही खूणगाठ पक्की होती. भाचेकंपनी, जावईसुना मध्येमध्ये येऊन आमच्यासमोर नमस्कारासाठी वाकत होत्या. आम्हीही चांगला घसघशीत आशीर्वाद देत होतो. बऱ्याच वेळाने माझ्या लक्षात आलं. सोफ्यावर बसायला वयस्कर सदरातील कोणी आलंच नाही, जे होते ते आमच्या पिढीतले, एकाच वयोगटातले. आमच्या मागच्या पिढीचे (माझ्या मावशा, आत्या, मामी, काकू) कोणीच नव्हते. जवळजवळ ती पिढी नामशेष होण्याच्या मार्गावरच होती. एखादं कोणी असलं तरी प्रवास, तब्येत अशी ‘कारणं’ पुढे करणारी होती. असं आजपर्यंत कधी झालं नव्हतं. उलट कुठल्याही कार्याला गेलं, की सोफ्यावर बसलेल्या वृद्ध व्यक्तींपर्यंत पोहोचायचं, त्यांची हालचाल विचारायची, आवर्जून तब्येतीची चौकशी करायची. नमस्कार करायचा, आपलं एखादं कर्तृत्व सांगायचं आणि पाठीवर शाबासकीची थाप अनुभवायची. आल्याची तिथे नोंद करून स्पर्शातून भेटीचा आनंद घ्यायचा. पण आज यापैकी काहीच घडलं नाही. सोफे आमच्याच पिढीने व्यापले होते. आम्हाला ‘प्रमोशन’ मिळाल्यामुळे भूमिकांची अदलाबदल झाली होती. आम्ही ‘मोठे’ झालो होतो. मोठेपणाच्या जाणिवेने एक अनामिक हुरहुर दिवसभर मनाला चिकटून बसली होती.
अशातच एका मैत्रिणीच्या नातवाच्या बारशाचे आमंत्रण आले. माझ्या ओळखीचे कोणी नव्हते म्हणून जरा आरामातच गेले. अगदी शेवटी बसून रंगमंचावरील सजावट, महिला मंडळाच्या साडय़ा, दागिने निरखत होते. केस पांढरे झाले तरी साडय़ा, दागिने याबाबत वृत्तीची निवृत्ती होत नव्हती. मला पाहिल्याबरोबर मैत्रिणीने अगत्याने खुशाली विचारून चहापाण्याचा आग्रह केला होता. रंगमंचावर फुगे लावले होते. मागच्या पडद्यावर मधोमध बाळाच्या नावाचा आत्ता झाकून ठेवलेला फलक होता. पाळणा फुलांनी सजवलेला होता. पण बाकी तयारी काही दिसत नव्हती. इतक्यात मैत्रीण माझ्या दिशेने हात करताना दिसली. तरी नेमकं तिला कोण हवंय याचा अर्थबोध होईना! दोघी-तिघींनी ‘अहो, तुम्हाला त्या बोलवताहेत’ असं म्हणत थेट माझ्याकडे मोर्चा वळवला, तेव्हा मी जरा बुचकळ्यात पडले. ‘माझं काय काम आहे आता’ मनाशी विचार करतच मी पुढे सरकले. ‘‘अगं, काय काय करायचं असतं. सांग ना. इथे कोणालाच धड माहिती नाही. म्हटलं तुलाच बोलवावं, तू मोठी आहेस, तुला आजी होण्याचा अनुभव आहे. तेव्हा तू बरोबर सांगशील.’’ मैत्रीण कानात कुजबुजली. त्या क्षणी बॉम्बगोळाच पडला माझ्या अंगावर. माझ्या लेकीचं बाळंतपण होऊन एक दशक उलटलं होतं. त्या वेळी माझ्या सासूबाई, माझ्या मागे उभ्या होत्या. काहीही डोकं न चालवता, सांगतील तसं करायचं, एवढंच माझं काम. त्यामुळे अचानक आलेल्या या जबाबदारीने मी गांगरलेच. आजकाल ‘हम दो हमारा एक’च्या जमान्यात घरात पुन:पुन्हा असे प्रसंग येतात कुठे. त्यामुळे काय करायचं याचा क्रम पुन:पुन्हा करून लक्षात राहील असे होतच नाही. दुसरीकडे गेल्यावर धार्मिक विधीकडे लक्ष देण्यापेक्षा आपापसात गप्पाष्टक रंगवण्यातच सगळं लक्ष. त्यामुळे आधी काय, मग काय हे नेमकं माहीतच नसतं. आता वेळ तर निभावून न्यायला हवी असा विचार करत पाळण्याखाली रांगोळीच्या दोन रेघा ओढायला लागले. पाळण्याखाली ठेवायला लागणाऱ्या दिव्यांची आठवण झाली. मग वरवंटय़ाचा गुंडाप्पा, औक्षण, ओटी, एक एक गाठ सुटत निरगाठ सुटावी तसं आठवत गेलं. कुर्र्रऽऽ करत आत्याने नाव ठेवलं. बाळाच्या आईने उखाणा घेतला. जमेल तसा पाळणा म्हटला, स्मरणशक्तीने वय दाखवलं नाही आणि नामकरणविधी साजरा झाला. पेपर अगदी सोपा निघाल्यामुळे परीक्षा विनासायास पार पडली.
सहज घडलेल्या या घटनांनी मला शहाणं केलं. ‘वयं मोठं खोटं’ नाही तर वयाबरोबर माहितीचं मायाजाल पक्क करावं लागतं. अचूक मार्गदर्शनाची अवघड जबाबदारी पार पाडावी लागते, उजळणी करावी लागते. आता कुठंही जायचं झालं तर मी एकदम सावध होते. अभ्यास उजळणी करायला लागते. कारण आता मी ‘मोठी’ झाले आहे ना! ‘जया अंगी मोठेपण’ तया परीक्षा कठीण, असं सावधपण मी अंगीकारलेले आहे.

Story img Loader