घोरणे आणि स्लिप अ‍ॅप्नीया यामुळे केवळ शेजारी झोपलेल्या व्यक्तीला नव्हे,
तर स्वत:च्या शरीरातदेखील बदल होत असतात. वजन वाढणे, डोके दुखणे, ब्लड प्रेशर वाढणे, मधुमेह बळावणे यापासून ते हृदयविकार, पॅरालिसिस आणि झोपेत मृत्यूसारख्या भयंकर घटनांशी यांचा संबंध आहे.
रामायणामध्ये कुंभकर्णाची गोष्ट सर्वानाच चांगली परिचित आहे. सहा महिने सतत झोपणे अशी त्याची ख्याती! श्रीरामाच्या आणि वानरसेनेच्या चढाईमुळे चिंतित झालेल्या रावणाने कुंभकर्णाला उठवायचा निर्णय घेतला. वाल्मीकीने कुंभकर्णाच्या घोरण्याचे मोठे रंगतदार वर्णन केले आहे. त्याच्या घोरण्याच्या आवाजाने सर्व गुहा हादरत होती! उठवायला गेलेल्या राक्षसांना आपले पाऊल स्थिर ठेवणे कठीण झाले होते. कित्येक जण तर त्या आवाजामुळे बेशुद्ध झाले! अनेक कर्णे; भेटी, दुंदुभी इत्यादी वाजंत्र्यांचा आवाज त्या घोरण्यापुढे निष्प्रभ ठरत होता. पण या सर्व गोंधळामध्ये कुंभकर्ण मात्र गाढ झोपला होता.
एका शेतकऱ्याकडून घोरण्याबद्दल जुनी पण मार्मिक म्हण ऐकली होती, ‘गाय घोरेल तर गोठा भरून जाईल, पण बैल घोरेल तर मालक मरेल ’ या म्हणीचा मथितार्थ किती अचूक आहे हे पुढील लेख वाचताना लक्षात येईल.
घोरण्याबद्दल आणि त्याच्यामुळे असलेल्या गाढ (?) झोपेबद्दल आपल्या समाजात अनेक समज/गरसमज आहेत. १९९६ साली भारतात आलो असताना माझ्या मामाने प्रश्न विचारला: ‘काय अभिजीत, सध्या काय नवीन शिकतो आहेस?’ त्यावर स्लीप मेडिसिन नावाच्या नवीन शाखेत कशी फेलोशीप  करत आहे आणि यामध्ये किती रंगत आहे याचे मी थोडे वर्णन केले. त्यावर त्यांनी थंडपणे प्रतिक्रिया दिली. त्याच्या मते ही सगळी ‘वेस्टर्न फॅड’ आहेत. आम्हा भारतीयांना याची गरज नाही. कारण बरेच लोक कधीही / कुठेही झोपू शकतात! काही लोक तर लोकलमध्ये देखील घोरू लागतात! घोरणे आणि अतिनिद्रा ही सौख्याची लक्षणे आहेत असा त्याचाच नव्हे तर अनेकांचा गोड गरसमज असतो.
काही वेळेला घोरणाऱ्या व्यक्तीला आपण घोरतो यावरच विश्वास बसत नाही. नुकतेच बिग बॉस-७ च्या एका एपिसोडमध्ये सलमान खान याने शहारूख खानबद्दल गमतीने विधान केले. ‘करन अर्जुन’ सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान शहारूख, तो आणि त्याचे मित्र एका खोलीत झोपले असताना, शहारूखच्या घोरण्यामुळे त्रस्त होऊन त्याने लाथ मारून शहारूखला बेडवरून ढकलून दिले होते. लगेच शहारूखने वार्ताहर परिषद घेऊन आपण घोरत नाही, सलमानच कसा घोरतो वगरे वगरे असे वर्णन केले. भारतामध्ये एकंदरीत सहनशीलता जास्त आहे, पण पाश्चात्त्य देशांमध्ये घोरणे हे घटस्फोटाचे कारण न्यायसंस्थेनेदेखील ग्राह्य़ ठरवले आहे. एखाद्या व्यक्तीला तो किंवा ती घोरते हे पटवण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपल्या मोबाइलमध्ये त्यांचा आवाज आणि शक्य झाल्यास व्हिडीओ टेप करून ठेवणे. घोरणेच नव्हे तर एकंदरीत गाढ झोपेत झालेल्या अनेक गोष्टी आपल्या लक्षात राहात नाहीत. एखाद्या कारणामुळे आपण जागे झालो ही बाब दुसऱ्या दिवशी उठल्यावर स्मरणात राहण्यासाठी ती जागा कमीत कमी साठ सेकंदांची असावी लागते. तरच त्या बाबीची नोंद होते. या कारणामुळे आपण दहा ते वीस अथवा ३० सेकंद जागे असलो तरी त्याचे स्मरण राहणार नाही. थोडक्यात जर एखादा माणूस रात्रभरात शंभर वेळा जरी उठला पण साठ सेकंदांच्या आत झोपला तर सकाळी उठल्यावर त्याला फ्रेश, ताजेतवाने वाटणार नाही, पण रात्रभरात किती वेळेला उठलात? याचे उत्तर ‘एकदाही नाही’ असेच देईल. याच कारणामुळे निद्राविकारांचे शास्त्र (सोम्नोलॉजी) हे गेल्या चाळीस वर्षांतच विकसित झालेले शास्त्र आहे. तुलनेने हृदयाचे शास्त्र (काíडऑलॉजी) किडणीचे शास्त्र (नेफ्रॉलॉजी) ही गेल्या दीडशे वर्षांपासून अस्तित्वात आलेली शास्त्रे आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने कोण किती वेळेला उठला आणि कधी झोपला ह्य़ाचा हिशोब अगदी सेकंदापर्यंत अचूकतेने सांगता येतो.
समोरून वार करणारा शत्रू परवडला, पण पाठीत खंजीर खूपसणारा मित्र फारच धोकादायक! घोरणे आणि निद्राविकारांची प्रतही अशा मित्रांसारखीच असते. म्हणजे, घोरणाऱ्या व्यक्तीला पत्ताच नसतो की शरीरामध्ये काही घटना घडत आहेत, ज्यांचा शरीरस्वास्थ्यावर दूरगामी परिणाम होत असतो.
आयुर्वेदामध्ये चरक, अग्नीवेश, वाग्भट, सुश्रूत आदी थोर पुरुषांची मानवी शरीराबद्दलची सूक्ष्म निरीक्षणे आहेत. गोरखनाथांनी तर बीजांडापासून ते जन्मापर्यंत अवस्थावर्णन केलेले आहे. पण घोरणे आणि त्यातून होणारे शारीरिक दुष्परिणाम याबद्दल तुरळकच उल्लेख आढळतो. महर्षी आयुर्वेदानुसार कफप्रवृत्तीचे प्राबल्य वाढल्यानंतर घोरणे संभवते. प्राणवायू आणि ऊदानवायू यांच्या परस्पर अवरोधाने घोरणे होते असाही उल्लेख आढळतो. पण एकंदरीत घोरणे आणि त्या अनुषंगाने होणारा स्लिप अ‍ॅप्नीया याबद्दल आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये फारशी माहिती माझ्या अभ्यासात तरी आढळली नाही. अर्थात माझा आयुर्वेदाचा अभ्यास हा मर्यादित असल्यामुळे  तज्ज्ञांनी अधिक माहितीची भर जरूर घालावी.
घोरण्याचे प्रकार तसेच प्रत ठरवणे महत्त्वाचे असते. आवाज किती मोठा यावर मंद, मध्य आणि तीव्र घोरणे ठरते. आवाजाच्या तीव्रतेचे मापन हे डेसीबलमध्ये होते. साधारणत: घडय़ाळाची टिकटिक १० डेसीबल असते तर नॉर्मल आवाजातील संवाद हे ४० डेसीबल असतात. गाडीचा हॉर्न ९० डेसीबल इतका असतो. या तुलनेत मंद घोरणे हे १० डेसीबलचे, मध्यम घोरणे पन्नास डेसीबलचे तर प्रचंड घोरणे ७० डेसीबल आणि त्यापुढचे असते. खोलीचे दार बंद केल्यानंतर देखील थोडे घोरणे ऐकू येत असेल तर घोरण्याची प्रत तीव्र समजावी.
लहान मुलांमध्ये मध्यम ते तीव्र घोरणे हे निश्चितच अ‍ॅबनॉर्मल मानले जाते. बीयर अथवा वाईनच्या एका ग्लासानंतर जर घोरण्याची तीव्रता नेहमीपेक्षा जास्त असेल तर ते देखील रोगाचे द्योतक आहे.
मध्यम आणि तीव्र घोरण्यामुळे तुमच्या शरीरात फरक पडतोच, पण शेजारी झोपलेल्या व्यक्तीची झोपदेखील खराब होते! २००९ साली ब्लूमेन या फ्रेंचशास्त्रज्ञाने एक मजेदार प्रयोग केला. त्याने १६ अशा जोडप्यांची निवड केली की ज्यात घोरणारा नवरा होता. त्यांच्या बायकांची दोन रात्रीच्या झोपेच्या गुणवत्तेची पॉलीसोम्नोग्राम या पद्धतीने चाचणी करण्यात आली. एक रात्र नवरा आणि बायको एका खोलीत होते तर दुसऱ्या रात्री वेगळ्या खोलीत होते. या दोन्ही रात्रीच्या झोपेमध्ये एक महत्त्वाचा फरक म्हणजे घोरणाऱ्या आवाजाच्या खोलीत प्रत्येकाला सरासरी दर तासाला दोनदा जाग (जास्त वेळेला) येत होती.
 घोरणे नक्की कशामुळे होते?
याकरिता त्यामागच्या भौतिकशास्त्राची आणि शरीराच्या, विशेषत: घशाच्या संरचनेची जुजबी माहिती करून घेऊ या. घोरणे हा ध्वनी. म्हणजेच कंपनांमुळे (व्हायब्रेशन) तयार होणाऱ्या लहरी आहेत. कुठल्याही नळीमध्ये कंपन (व्हायब्रेशन) झाले म्हणजे ध्वनी निर्माण होतो. खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या नाकाच्या पाठच्या भागापासून ते पडजिभेच्या मागेपर्यंत एक स्नायूंची नळी असते. ज्याला फॅिरक्स असे म्हणतात. आपला घसा हा त्याचाच एक भाग आहे. ही नळी अस्थींची म्हणजे ताठर नसून स्नायूंची (लवचीक) असते हे लक्षात घेतले पाहिजे.
श्वासोच्छवास सुरू असतानाही नळी जेव्हा कंप (व्हायब्रेट) पावते तेव्हा आवाजाचा ऊगम होतो यालाच घोरणे म्हणतात. कुठल्याही कारणाने ही नळी जर अरुंद झाली तर कंपने अधिक वाढतात. म्हणजेच आवाजाची प्रत अथवा पातळी वाढते. भौतिकशास्त्रामध्ये याचे कारण बर्नोली प्रिन्सिपल या संकल्पनेने स्पष्ट केलेले आहे. या संकल्पनेनुसार त्या नळीचा व्यास (डायामीटर) जितका कमी तितकी ती नळी बंद होण्याची शक्यता वाढली! याच कारणामुळे घोरणे आणि घसा बंद होणे (स्लीफ अ‍ॅप्नीया) यांचा अन्योन्य संबंध स्पष्ट होतो.
घोरणे आणि स्लिप अ‍ॅप्नीया यामुळे केवळ शेजारी झोपलेल्या व्यक्तीला नव्हे, तर स्वतच्या शरीरात देखील बद्दल होत असतात. वजन वाढणे, डोके दुखणे, ब्लड प्रेशर वाढणे, मधुमेह बळावणे यापासून ते ह्रदयविकार, पॅरालिसिस आणि झोपेत मृत्यूसारख्या भयंकर घटनांशी यांचा संबंध आहे. याबद्दल विस्तृत माहिती पुढील (२६ एप्रिल) लेखात.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Story img Loader