डॉ. भूषण शुक्ल

सध्याच्या मुलांचे पालक अक्षरश: दोन आयुष्यं जगताहेत. या मधल्या पिढीला त्यांच्या दृष्टीनं ‘स्वप्नवत’ असलेले, मुलांचं ऐकून घेणारे, त्यांना भरपूर संधी देणारे आई-वडील मिळाले नाहीत. पण ही पिढी त्यांच्या मुलांसाठी मात्र ‘आदर्श’ पालक व्हायचा आटोकाट प्रयत्न करतेय. पाश्चिमात्यांनी अनेक पिढयांत पाहिलेले बदल आताच्या पालकांनी दोन दशकांत अनुभवलेत. त्याच्याशी जुळवून घेत अतिशय ‘आव्हानात्मक’ भासणाऱ्या पालकत्वाला ते समोर जाताहेत.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Laxman Dhoble is in the Pawar group and son abhijit dhoble in opposition role
मोहोळमध्ये ढोबळे पिता-पुत्राचे निराळे सूर!
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

लग्न, जेवणखाण आणि बालसंगोपन हे संस्कृतीचे तीन महत्त्वाचे घटक आहेत. या तिन्ही गोष्टींबद्दल असलेल्या प्रथा आणि प्रघात समाजाबद्दल महत्त्वाची माहिती देतात आणि इतर समाजांपासून वेगळी ओळख बनवतात. त्यांपैकी बालसंगोपनाबद्दल आपल्या भारतीय आणि मराठी समाजात काय बदल एका पिढीत घडले आहेत ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

लहानपणी आपल्याला जसं वागवलं आणि वाढवलं गेलं, ते पूर्णपणे आठवलं नाही तरी त्या भावना, विचार आणि अनुभव आपल्या स्वभावाचा भाग बनतात. आपले पुढचे नातेसंबंध आणि वागणं यावर कायमचा शिक्का मारून जातात. सध्या पालक असलेली पिढी कोणत्या मुशीत घडली आहे? सध्याचे तरुण आणि मध्यमवयीन पालक हे १९६० ते १९९० मध्ये जन्मले आणि वाढले. सगळे पालक २००० च्या आधी जन्माला आले आहेत. म्हणजे आपली अर्थव्यवस्था आणि समाज खऱ्या अर्थानं जागतिक होण्याच्या आधी. इंटरनेटनं संपूर्ण आयुष्य काबीज करण्याआधी. त्यामुळे त्यांच्यावर संस्कार करणारी पिढी हेच त्यांचं भावविश्व (निदान लहानपणी तरी) होतं. पालक, कुटुंब, शिक्षक, पुस्तकं आणि थोडाफार टीव्ही याच्यापलीकडे जग नव्हतं. त्यांचे पालक स्वातंत्र्यानंतरच्या १५-३० वर्षांत जन्माला आले आणि वाढले. शतकभराच्या संघर्षांतून आणि फाळणीच्या खोल जखमांमधून जन्माला आलेल्या, गरीब- दुबळया आणि स्वत:च्या पायांवर उभं राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका देशाची ही पहिली पिढी. हे आता आजी-आजोबा आहेत.

आणखी वाचा-‘एका’ मनात होती..! : ‘घरेलू’ म्हणून एकटीही?

या आजी-आजोबांची पिढी म्हणजे डॉक्टर, इंजिनीअर, वकील, सरकारी नोकर यांस आदर्श (म्हणजे सुरक्षित) व्यवसाय समजणारी पिढी. कमालीची काटकसरी, प्रत्येक गोष्ट जपून वापरण्याची गरज आणि मान वर न करता येणारी परिस्थिती हे त्यांचं वास्तव. देवभोळी, पुरुषप्रधान, जातीच्या चाकोरीत जगणारी ही पिढी. आपल्या मुलांचं लहानपण त्यांनी शिस्त, शिक्षण आणि श्रद्धा या त्रिसूत्रीमध्ये बांधलं. रोज शाळेत जायचं, अभ्यास करायचा, घरात कामात मदत करायची. आमची मान अजून खाली जाईल असं काही करू नका, अशा ठोक अपेक्षा ठेवून त्यांनी मुलं वाढवली. स्वत:च्या गरजा बाजूला ठेवून त्यांनी मुलांना शिक्षण आणि संधी देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. फारसा संवाद नाही, मोकळेपणा जेमतेम आणि सततची भीती/ चिंता/ काळजी हे वातावरण. समाज आणि बरोबरच्या लोकांबरोबर, पण एक पाऊल पुढे राहण्याची मनीषा. स्वत:पेक्षा मुलांचं आयुष्य चांगलं व्हावं हा ध्यास आणि त्यासाठी मोठा त्याग करायची तयारी. हे त्यांचं पालकत्व. शब्द आणि हात कठोरपणे वापरायला ही पिढी कचरली नाही. या ‘रोल मॉडेल’मध्ये आजचे पालक वाढले. ‘प्रेम आणि लाड’ यांचा बाऊ न करता वाढलेली आजच्या पालकांची पिढी आहे. त्यांना प्रेम व्यक्त करायला शिकावं लागलं. चित्रपट आणि पाश्चात्य जगाकडून ते अनेक गोष्टी शिकतात आणि चांगलं आयुष्य जगायचा प्रयत्न करतात.

सध्याच्या मुलांचे पालक त्यामुळेच अक्षरश: दोन आयुष्यं जगताहेत. त्यांच्या पालकांनी त्यांना जो मोकळेपणा दिला नाही त्याची त्यांना जाणीव आहे आणि विषादसुद्धा. आयुष्य जरा सहज, आनंदी, प्रेमाचं असू शकतं, असं त्यांना वाटतं. ‘दिल चाहता हैं’ आणि ‘थ्री इडियटस्’सारखे चित्रपट मनापासून भावलेली, पण हे आपल्या आयुष्यात झालं नाही याची किंचित खंत असलेले पालक आता मुलं वाढवत आहेत. त्यांचा ध्यास आहे मुलांना जास्त चांगलं आयुष्य मिळावं. त्यांना काळजीशिवाय मोकळेपणे मोठं होता यावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली मुलं सतत आनंदी असावीत! आपल्या मुलांच्या आयुष्याच्या प्रत्येक अनुभवात आपणही असावं, मुलांनी आपल्याला मित्र समजावं, अशी खोल इच्छा असलेली ही पिढी. मुलांना ‘अरे-तुरे’ करू देणारी, लाडानं मिरवणारी ही पिढी.

आणखी वाचा-सांधा बदलताना : समाधान!

आपल्या पालकांपेक्षा आपण वेगळे आहोत. आपण २१व्या शतकातले जागतिक नागरिक आहोत आणि या व्यापक जगात आपल्या मुलांनी मानाचं स्थान मिळवावं यासाठी त्यांना हवी ती मदत करायला तयार आहोत, असे निश्चय करून त्यासाठी लागेल तो पैसा खर्च करण्याची पालकांची तयारी आहे. छान बालपण, सर्वांगीण विकास, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुण हे शब्द वयाच्या पन्नाशीपर्यंत कोणत्याही शब्दकोशात नसलेल्या पिढीनं त्यांना वाढवलं. पण फक्त हेच शब्द वापरून बनवलेल्या जाहिराती त्यांना बेबी फूड (हासुद्धा नवीनच प्रकार) पासून आध्यात्मिक शिबिरांपर्यंत सर्व काही विकत घ्यायला भरीस पाडताहेत. हा चमत्कार कसा झाला? फक्त एका पिढीच्या कालखंडात हे बदल कसे घडले?

समाजमानसशास्त्राची दृष्टी वापरून जर या बदलाकडे बघितलं तर काही उत्तरं मिळू शकतात. आपण आपल्या मुलांना कसं वाढवतो यावर स्वामित्व गाजवणाऱ्या शक्ती कोण आहेत, याचा विचार करणं फायद्याचं आहे. निदान आपल्या पालकत्वाच्या प्रेरणा कुठून येत आहेत आणि आपण काय मिळवायचा प्रयत्न करतो आहोत हे थोडया तटस्थ दृष्टीनं बघता आलं तर मदत होईल. विचारपूर्वक वागता येईल.

त्यासाठी जरा मागे जाऊ.. गेली २५०-३०० वर्ष युरोप आणि १५० वर्ष उत्तर अमेरिका संपूर्ण जगाचे स्वामी आहेत. तंत्रज्ञान आणि निष्ठुर सत्ताप्रेम या जोरावर त्यांनी सर्व जगाचा जणू ताबाच घेतला आहे. त्यामुळे त्यांची समाजरचना, मानसिकता, संस्कृती आणि आयुष्याबद्दलची दृष्टी ही संपूर्ण जगासाठी प्रमाण झाली आहे. स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय ही त्यांची स्वत:ला आणि जगाला शिकवायची तत्त्वं आहेत; पण भांडवल आणि त्याच्या जोरावर काबीज केलेली जागतिक बाजारपेठ हातात ठेवणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. पण याचा आपल्या पालकत्वाशी काय संबंध?..

त्यांचा समाज सद्यपरिस्थितीत पोहोचायला २५०-३०० वर्ष लागली आहेत. १९१४-१९४५ या फक्त तीस वर्षांच्या काळात अक्षरश: कोटयवधी माणसं मारून, संपूर्ण जगाला चटका लावणारी दोन महाभयंकर विश्वयुद्धं करणारा हा समाज जगाचा नायक आहे. त्यांनी जी सामाजिक, वैज्ञानिक, न्यायिक आणि आर्थिक प्रगती २०० वर्षांत केली आणि त्यासाठी संपूर्ण जगाची संसाधनं वापरली, ती प्रगती एका पिढीत करण्याचा आपला मानस आहे. ती आपली गरज आहे. आपण मागास देश राहायचं नाही, हा आपला निश्चय आहे. समाजमाध्यमांवर सतत दिसणारं प्रगत जग आपल्याला हवं आहे. अमेरिकेपासून जपान-कोरियापर्यंतचा समाज किती ‘पुढे’ गेला आहे आणि ‘प्रगत’ आहे, हे प्रत्येक क्षणी दिसतं आहे. प्रचंड प्रमाणात जागतिकीकरण केल्याशिवाय आपलं खरं नाही, याची स्पष्ट जाणीव फक्त नेत्यांनाच नव्हे तर सामान्य नागरिकालासुद्धा आहे.

आणखी वाचा-इतिश्री: नाही म्हणण्याचं धाडस..

फक्त कळीची गोष्ट अशी आहे, की हा प्रगत समाज घडवायला त्यांना निदान १५० वर्ष मिळाली. पाच ते सात पिढयांत हा बदल घडला. त्यांच्या समाजाची भरपूर उलथापालथ झालीच, पण दर पिढीत होणारा बदल हा दृश्य आणि आवाक्यातला होता. भारत आणि चीनसारख्या प्राचीन आणि प्रचंड (लोकसंख्या आणि गरिबी दोन्ही) समाजांमध्ये हा बदल फक्त १-२ पिढयांमध्ये घडतो आहे. १८ व्या शतकातून एकदम २१ व्या शतकात जावं लागत आहे. अख्ख्या गल्लीत एक मोटार आणि एकाच घरात फोन, या परिस्थितीपासून घरटी २-३ गाडया आणि प्रत्येकाच्या हातात अत्याधुनिक स्मार्टफोन हा बदल फक्त २५-३० वर्षांत घडलाय.

स्कूटरसाठी २० वर्षांची ‘वेटिंग लिस्ट’ अनुभवलेले आजोबा आणि दर दोन वर्षांनी नवीन गाडीचं मॉडेल विकत घेऊ इच्छिणारा त्यांचा नातू एका घरात राहताहेत. ‘बीबीसी’वर दिवसातून एकदा जगाची खबर मिळणारे आजोबा, परदेशी कंपनीचं भारतातून काम करणारा त्यांचा मुलगा आणि इलॉन मस्क वा टेलर स्विफ्ट यांची क्षणोक्षण खबर ‘इन्स्टाग्राम’ वर घेणारी नातवंडं एकाच घराच्या तीन बेडरूम्समध्ये बसली आहेत! खूप मोठा प्रगतीचा टप्पा एका पिढीत काबीज करताना आपली दमछाक होते आहे.

आपल्या स्वत:च्या बालपणाचे अनुभव आपलीच मुलं वाढवताना तोकडे पडताहेत. जणू आपण एका वेगळया ग्रहावर मोठे झालो आणि आता एका वेगळयाच ग्रहावर येऊन हे जबाबदारीचं काम करावं लागतंय, असं पालकांना वाटतंय. आणि या शतकात जन्माला आलेल्या आपल्या मुलांना जग कसं दिसतं?..त्यांच्या दिवसाचा बहुतेक सर्व वेळ शाळा, शिकवण्या, छंद-खेळ वर्ग आणि या सर्व ठिकाणी जाण्यायेण्याचा प्रवास, यांत जातो आहे. सकाळची काही मिनिटं, दुपारची काही मिनिटं आणि रात्रीचे एक दोन तास सोडले, तर आई-वडील समोर दिसत नाहीयेत. प्रत्येक ठिकाणी वेगळे मुलांचे गट आणि वेगळे शिक्षक यांच्याशी जमवून घ्यावं लागतं आहे. वर्गातली, घराजवळची आणि विविध गटांमधली मुलं सतत बदलत आहेत. त्यामुळे एक वेगळीच अनिश्चितता आहे. अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा हव्याशा वाटतात, पालक ते बऱ्याचदा पुरवतातही; पण तेही वेगानं बदलतं आणि काल घेतलेली वस्तू, कपडे उद्या भंगार आणि जुनाट वाटतात. पालक कायम काळजीत असतात. त्याच्या वेळी कसं सगळं साधंसोपं होतं,’ असं सांगत राहतात..

आणखी वाचा-‘भय’भूती: भीतीच्या विवरात खोल खोल..

‘आई-बाबा त्यांच्या आई-बाबांचं आणि ‘टीचर्स’चं सगळं ऐकत होते म्हणे! असं कधी असतं का? त्यांना काहीच माहीत नाहीये. पैसे काय फक्त ‘जॉब’मध्ये मिळत नाहीत. मला ‘बिझनेस’ करायचंय, फेमस व्हायचंय, खूप श्रीमंत व्हायचंय.. जॉब नाही करायचा. पण हे आई-बाबांना फार ‘डेंजरस’ वाटतं. काही नवी आयडिया सांगायला गेलं की म्हणतात, ‘डिग्रीनंतर हे सगळं करायला खूप ‘स्कोप’ आहे. आधी खूप अभ्यास करून चांगली डिग्री मिळवा.. म्हणजे एक करियर तरी सेफ राहील.’ आता काय सांगणार यांना?.. जग कुठे गेलंय आणि हे कुठली काळजी करत बसले आहेत! फारच ‘बोरिंग’ आहेत हे!’ अशी स्वप्नं बघणाऱ्या आणि त्याच जगात राहणाऱ्या मुलांचे प्रेमळ पालक व्हायची जबाबदारी आपल्यावर आली आहे! आम्हाला ‘आदेश’ मिळत होते.. आम्ही मुलांना समजावून सांगतो.आमचे पालक हुकूमशाह होते.. आम्ही मित्र बनण्याची धडपड करतो आहोत. आम्ही ‘नाही’ एवढंच ऐकत होतो.. आम्ही सगळं ऐकून घेतो आणि ‘हो’ म्हणतो. आम्ही मुलांना ‘अरे-तुरे’, ‘ब्रो’, ‘डूड’ वगैरे म्हणू देतो. खांद्यावर हात ठेवू देतो. पण कुठे तरी असं वाटत राहतं, की यांना आपण आवडतो ना?.. मुलं आपल्या जवळ राहतील ना? दूर तर जातीलच, पण मनानं जवळ राहतील ना? आपल्या पालकांना पालक म्हणून जो आत्मविश्वास सहज होता, तो मला नाही; पण मी जे करायचा प्रयत्न करतो आहे तो सफल तर होईल ना? मुले हातातून सुटून हाताबाहेर तर जाणार नाहीत?.. आमच्या पालकांना ज्या गोष्टी स्वप्नातही दिसल्या नाहीत, त्या आम्हाला प्रत्यक्ष आणि रोज समोर येताहेत! पाश्चिमात्यांनी जे ५-६ पिढयांत मिळवलं ते एका पिढीत मिळवायची जबाबदारी आम्हा २१ व्या शतकातल्या पालकांना उचलावी लागते आहे!
Life is unfair…!

chaturang@expressindia.com