तिबेटी बुद्धविचारांच्या आचार्य पेमा चॉड्रोन यांनी ‘टाँगलेन’ या ध्यानतंत्राविषयी सांगितलं आहे. त्याचा सराव करताना मला माझ्याच मनाची आणि आपल्यात सहज रुजणाऱ्या संकुचितपणाची ओळख पटली. कालांतरानं ‘मी’पासून वेगळं होऊन ज्ञानोबांच्या ‘विश्वभावा’पर्यंत पोहोचण्याचा अनुभव मला याच ध्यानानं दिला…’ सांगताहेत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, २३ मे रोजीच्या ‘बुद्ध पौर्णिमे’च्या निमित्तानं.
आचार्य पेमा चॉड्रोन… या बाई आज परिपक्व नव्वदीच्या काठावर आहेत. कॅनडामधल्या बौद्ध मॉनेस्ट्रीमध्ये शिकवतात. बुद्धविचारांचा रोजच्या जीवनात वापर कसा करायचा, यासंदर्भात त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं लोकप्रिय झाली. ‘व्हेन थिंग्ज फॉल अपार्ट’ आणि ‘वेलकमिंग द अनवेलकम’ ही त्यांची पुस्तकं मला खूप प्रभावी वाटली. त्यांच्या लिखाणामध्ये एका तंत्राबद्दल त्यांनी विस्तृतपणे लिहिलेलं आहे. त्या तंत्राचं नाव आहे ‘टाँगलेन’. तिबेटी बुद्धशाखेमधून जी ध्यानतंत्रं विकसित झाली, त्यातलं हे एक. मी या तंत्राचा सराव करायला सुरुवात केली आणि सुरुवातीलाच अडचणीत आलो… कसा ते सांगतो.
हेही वाचा : पाळी सुरूच झाली नाही तर?
इतर अनेक ध्यानतंत्रांप्रमाणे ही पद्धत श्वासाच्या भानापासून सुरू होते. स्वत:च्या आणि इतरांच्या दु:ख-वेदनांबरोबर समग्र अस्तित्वाला Connect- म्हणजे जोडणं, नव्हे तर एकजीव करणं, असा या पद्धतीचा हेतू. थोडं सोपं करून समजून घ्यायचं, तर अपरिहार्यपणे ज्या भावनेचा सामना करायला लागतो, त्याचं नाव दु:ख (Pain). पाय मुरगळला तरी आणि जवळच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे अपमान झाला, तरी दु:ख होतं. अनेक भावना मनात दाटून येतात. त्यामध्ये ‘आता पुढे काय होणार?’ ही भीती. या ‘सेटबॅक’मुळे माझी लय गेली, याचं नैराश्य. ज्याच्यामुळे ते घडलं त्याबद्दलचा संताप. पुन्हा या संतापाचे तीन पदर. स्वत:ची चूक, दुसऱ्यांचं वागणं आणि परिस्थितीतले त्रासदायक घटक, या सर्वांवरचा संताप. स्वत:च्या चुकीबद्दल स्वत:लाच गुन्हेगार मानताना वाटणारी खंत… या साऱ्यातून तयार होते ती वेदना ( Suffering). आपलं मन नेहमीच्या व्यावहारिक जगण्यात दु:ख आणि वेदना ही ‘जोडी’ वेगवेगळी करून पाहू शकत नाही. म्हणून ध्यानतंत्रामध्ये प्रथम पाहायचं असतं, की अटळपणे आलेलं दु:ख कोणतं आणि त्यावर आपल्या मनानं चढवलेले लेप कोणते. उदाहरणार्थ- माझ्या एकुलत्या एका भावंडाचा अचानक मृत्यू झाला, याबद्दल असतं, ते दु:ख. पण मी त्या भावंडाला योग्य वेळी, योग्य ती मदत करू शकलो नाही, याबद्दलची खंत म्हणजे वेदना! चिंतन काय करायचं, तर आपल्याला तेव्हा वाटणारी खंत ही भावना वास्तवाचा आधार असलेली आहे का, याबद्दलचं. आपण चूक केली, की चूक झाली?… केलेली चूक गंभीर असेल, पण तो गुन्हा होता का? आपण स्वत:ला गुन्हेगार ठरवून काय साधणार आहोत?… हा झाला वैचारिक भाग. त्याला म्हणतात Contemplation (अर्थात अभ्यासपूर्वक त्या घटनेबद्दल मत बनवणं)! पण हे Meditation- ध्यान नव्हे.
ध्यानामध्ये भर असतो, तो दु:ख आणि वेदनेच्या स्वीकारावर! म्हणूनच समुपदेशन नेहमी चिंतनाला आणि मेडिटेशन म्हणजे ध्यान हे स्वीकाराला मदत करतं. ध्यानामुळे स्वीकारासाठी मनानं घातलेल्या पूर्वअटी- (Conditions) गळून पडायला मदत होते. विनाअट (Unconditional) स्वीकाराचा अनुभव देण्यासाठी ध्यानामध्ये तंत्रं विकसित झाली, त्यातलंच एक ‘टाँगलेन’. या तंत्रामध्ये श्वासाबरोबर काही भावनांना आत घेण्याचा अनुभव घ्यायचा आहे. नि:श्वासाबरोबर काही भावनांना बाहेर पाठवायचा अनुभव रचायचा आहे. श्वास आहे Receiver आणि नि:श्वास आहे Transmitter. श्वास घेण्याच्या प्रक्रियेला आपण ‘आगमनक्रिया’ म्हणू आणि नि:श्वासाला ‘गमनक्रिया’ म्हणू. तर माझी अडचण सुरू झाली आगमनाच्या सूचनेपासून… (सोयीसाठी यापुढे फक्त आगमन-गमन इतकंच म्हणू.)
हेही वाचा : ‘शुभंकर’ रुग्णांचा आधार!
आपलं नेहमीचं ‘लॉजिक’ काय असतं?… त्रासदायक, नकारात्मक भावना काढून टाका, प्रेम-उत्साह-शांती श्वासाबरोबर आत घ्या! दिलासादायक भावनांचं रोपण करा. पण ‘टाँगलेन’ मध्ये काय सांगितलं जातंय, की समजा, मला भविष्यातल्या असुरक्षिततेबद्दल चिंता वाटतेय, तर त्या चिंतेला श्वासाबरोबर आत घ्या. अरे बापरे! आगमनाच्या उंबरठ्यावर पडलोच मी ठेच लागून! आणि विचार करायला लागलो, असं का सांगितलं असेल? चिंतेपासून (त्रासदायक भावनेपासून) दूर पळायचं नाही. तसं केलं, तर ती भावना अधिक प्रभावी ठरेल. आगमन म्हणजे या भावनांना सामोरं जाणं! परंतु त्यांना ‘React’ नाही व्हायचं. समजा चिंतेची भावना आत घेताना छातीचा ठोका चुकला किंवा छातीत थोडा त्रास झाला, तरी तो बदल फक्त मनात नोंदवायचा. मला हे दोन्ही झालं होतं. त्याचं कारण कोणत्या विचारात होतं?… चिंतेला आत घेतली आणि ती वाढली तर?… तिबेटियन बुद्धगुरू रिंपोंचे म्हणतात, ‘आकाश मोठं की त्यातले ढग? मन मोठं आहे. त्यात उमटणारा ढग कितीही मोठा असला, तरी तो आकाश गिळू शकणार नाही. मनाच्या आकाशात ढगांची ये-जा पाहायची सवय लाव. ढग आकाशात असतात. आकाश ढगात राहात नाही.’ माझं कोडं इथे उलगडलं. माझ्या लक्षात आलं, की मी तोवर सांभाळून आणि म्हणूनच अगदी वरवरचं आगमन-गमन करत होतो. पण आता मी सांगितलेली प्रतिमा वापरून ढगांना ‘न नाकारता’ पाहायला लागलो.
आता खरी गंमत आली. चिंतेचे ढग आले, संतापाचे, वैषम्याचे, नैराश्याचेही आले… दुसरी ट्यूब पेटली. मी जरी ‘माझ्या’ चिंतेला आत घ्यायला बिचकत होतो, तरी ती भावना फक्त माझी कुठे होती? म्हणजे मी ‘चिंता’ या भावनेला सामोरा जातो आहे. एका मानवी भावनेला. सर्वांनी जिचा अनुभव कधी ना कधी घेतला आहे अशा भावनेला. म्हणजे कधी आकाश ढगांनी व्याप्त असेल, कधी वादळ असेल, कधी वारं! वेदांतामधला शब्द, चिदाआकाश! तो हे ध्यान करताना पहिल्यांदा कळला. आणि अचानक, शिडातून हवा गेलेल्या गलबतासारखी ‘माझी’ चिंता मनात विसावली. ती पूर्वीसारखी भीषण वाटत नव्हती. मग मी हा प्रयोग ‘संताप-अपमान’ या भावनांसाठी केला. औदासिन्यासाठी केला. आणि होता होता, माझ्या विश्वासात नवी ऊर्जा यायला लागली. कशी?… ‘टाँगलेन’ तंत्र सांगतं, की नि:श्वासाबरोबर तुमच्यातला सारा सद्भाव एखाद्या कारंज्यासारखा जगासाठी बाहेर द्या. ज्या भावना ‘माझ्या’ म्हणून राखून ठेवण्याचा स्वभाव असेल, त्या द्या. तुमचे डोळे बंद असले तरी चेहऱ्यावर स्मित येईलच. तो चेहरा हळूहळू आगमनाच्या क्षणालाही हसरा राहील. माझ्या नि:श्वासाच्या वेळी मी प्रिय घटना आठवत राहिलो. माझ्या मुलीचं लग्न, नातवाचा जन्म, मुलाचं त्याच्या आवडत्या कोर्सला जाणं, माझ्या संस्थेच्या यशाचे टप्पे… आणि या सगळ्या प्रतिमांमधून जाणवणाऱ्या छान भावनांना वैयक्तिक ठेवायचं नाही. सर्वांबरोबर ‘शेअर’ करायचं. नि:श्वासाच्या माध्यमातून.
हेही वाचा : सांदीत सापडलेले : प्रेमाची थेरं!
हे करताना मला एक ‘व्हेरिएशन’ मिळालं. एकदा ‘टाँगलेन’ तंत्राप्रमाणे श्वास-नि:श्वास करायचा. त्यानंतर काही नेहमीचे श्वास-नि:श्वास. त्यामुळे मनाला स्वत:चा ‘फीडबॅक’ घेता येतो. पण नंतर नंतर मला प्रत्येक श्वासाला ‘टाँगलेन’ जमू लागलं. श्वासाचा दमदारपणा आणि स्थिरताही वाढली. आगमनाबरोबर मनातली मुक्तीची- म्हणजे ‘सुटल्या’सारखी भावना मला जाणवत होती. गमनाबरोबर माझ्यातली समाधानी वृत्ती वाढत होती.
बुद्धविचारांमध्ये ‘Non- Rejection’ म्हणजेच ‘न-नकार’ याकडून स्वीकाराकडे जाण्याचं हे तंत्र आहे. त्या पद्धतीनं आपण मनाच्या सर्व लाभदायक भावना आणि त्रासदायक भावना, यांचं संतुलन पाहू शकतो. आपल्या सगळ्यांमध्ये दु:खदायक भावनांचा चिखल आहे आणि सुंदर, सद्भावनांचं कमळ आहे. बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये कमळाचं प्रतीक खूप महत्त्वाचं मानलं आहे. चिखलातूनच कमळ फुलतं, त्यातच ते राहतं. पण स्वत:च्या गुणांचा सुगंध आणि सौंदर्याचा आस्वाद ते सर्वांना देत राहतं.
‘टाँगलेन’ तंत्राचा सराव का करायचा? आचार्य पेमा म्हणतात, की आपल्या सभोवती असणाऱ्या इतरांच्या वेदनेबरोबर आपलं नातं जुळावं म्हणून. ‘माझ्या जगण्यामध्ये दु:ख आणि वेदनेला स्थानच नाही,’ हा अविवेकी अट्टहास दूर व्हावा म्हणून! आपलं व्यक्ती म्हणूनचं दु:ख आणि ‘माणूस’ म्हणूनचं दु:ख, यातलं नातं समजून घेण्यासाठी ‘टाँगलेन’ मदत करतं.
हेही वाचा : मनातलं कागदावर : रंगीत जादूचा खेळ!
मी हे तंत्र दोन्ही बाजूंनी वापरायचा सराव करायला लागलो. म्हणजे माझ्या भावनांसाठी आणि इतरांना समजून घेण्यासाठी. हे तंत्र ‘रेकी’सारखं नाही. त्यामध्ये तुमची ‘एनर्जी’- ऊर्जा ‘ट्रान्सफर’ होते असा कोणताही दावा नाही. तुम्ही ‘टाँगलेन’ फक्त स्वत:साठी करता. दुसऱ्यांबद्दल तुम्हाला प्रेम आणि आस्था आहे, पण तुम्ही फक्त स्वत:च्या आतमध्ये ही प्रक्रिया जागवता. त्यामध्ये ‘हीलिंग’चा (बरं करण्याचा) कोणताही दावा नाही आणि माझ्यासाठी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. कोणत्याही ध्यानपद्धतीनं कोणताही दावा करू नये. ध्यान ही प्रक्रिया स्वत:साठी आहे. वैयक्तिक अस्तित्वातलं संकुचितपण जर मला विस्तारायचं असेल, तर माझ्या जवळच्या माणसांच्या वेदनेबद्दलची एकजीव सहवेदना अनुभवण्यासाठी मी ध्यानसराव करत असतो.
बुद्धविचार आपल्याला सांगतो, की वैयक्तिक दु:खाचं नातं संपूर्ण मानवतेच्या दु:खाबरोबर आहे हे लक्षात घ्या. त्या सगळ्यांसाठी तुमचा सद्भाव विस्तारित करा आणि करत राहा. या ध्यानाचा त्यांच्यावर काय परिणाम होणार हा मुद्दाच नाहीये. तुम्ही काय स्वत:ला मोठे ‘हीलर’ समजताय! समजत असाल, तर फक्त स्वत:च्या त्रासदायक भावनांची मलमपट्टी करा. तिकडे व्रण राहणार नाहीत असं पाहा. आणि ते करताना लक्षात घ्या, की ‘माझं दु:ख’ नावाचा प्रकार तुमच्या आत्मभावातून आलाय! तुमच्या ‘अहम्’ म्हणजे ‘मी’पणापासून आलाय. तो संकुचित, खुराड्यातला ‘मी’पणा तुमच्यात उत्क्रांतीच्या प्रवासात आला आहे खरा… आचार्य पेमा म्हणतात- ‘Very ancient patterns of selfishness…’ तो मोडायला सुरुवात करू या. आपलं वास्तवाचं भानच आपण विस्तारित करू.
हेही वाचा : माझी मैत्रीण’ : सुमी!
पेमा सांगतात, ‘तुम्ही हे ध्यानतंत्र स्वत:साठी विकसित करा. जवळच्या नात्यांसाठी करा. हळूहळू ओळखीच्या आणि अनोळखी अशा अनेकांच्या वेदनेला आपल्या मनात जागा द्या. आणि तुमचा सद्भाव तुमच्या मनानं वाटत जा… विस्तारत जा.’
त्याअर्थी असं तुम्ही करत राहिलात, तर ज्ञानेश्वरांचा ‘विश्वभाव’ तुमच्या अनुभवाला येईल. दु:ख आणि वेदनेचे वैयक्तिक भाग तुटत जातील आणि सद्भावना आणि आस्थेचा विस्तार हळूहळू पर्यावरणापर्यंत पोहोचेल. म्हणजे ‘टाँगलेन’चं ध्यान करायचं आणि नंतर ज्ञानोबांचं पसायदान मनातल्या मनात म्हणायचं. काय छान वाटतं म्हणून सांगू… एकदा नाही, अनेकदा करून पाहा. सवय लागेपर्यंत! पसायदानाच्या शेवटच्या शब्दांचा अनुभव मला या ‘कॉम्बो’मधून आला…
सुखिया जाला! ‘सुखिया जाला! सुखिया जाला!’
anandiph@gmail.com