आजचे पालक अगदी पाळण्यातल्या बाळासमोरही टी.व्ही. लावून ठेवतात आणि घरातली कामं उरकतात. तसंच, दीड-दोन वर्षांची मुलं सतत दंगा करतात म्हणून काही पालक नसती कटकट नको, म्हणून टी.व्ही. लावून देतात. मुलांचा तोपर्यंत ‘चालू’ (active) असलेला मेंदू  ‘शांत’ (passive) होतो. आपण स्वत: काहीतरी करावं, ही ऊर्मी जाते आणि दुसरा करतोय ते आपलं नुसतं बघावं, हे मनात सुरू होतं.
‘मेंदूची मशागत’ हे सदर सुरू झाल्यापासून कित्येकांनी ई-मेलवरून संवाद साधला, विविध प्रकारचे प्रश्न विचारले. अनेकांनी एकाच पद्धतीचे प्रश्न विचारले होते. उदा. टी.व्ही, मुलांमधली वाढती बेफिकिरी, अभ्यासाशी संबंधित तर बरेच प्रश्न होते. अशा प्रश्नांची उत्तरं ‘लोकसत्ता’च्या सर्वच वाचकांसमोर जावीत असं वाटलं. यातल्या काही प्रश्नांची उत्तरं या सदराच्या मागील भागात दिली होती. उर्वरित काही प्रश्नांची उत्तरं या भागात देत आहे.
लहान वयात मुलं टी.व्ही.समोर वेळ घालवतात, हे योग्य आहे का?
लहान वयातच काय; पण कोणत्याच वयात टी.व्ही.समोर जास्त वेळ घालवणं योग्य नाही. टी.व्ही.समोर जास्त वेळ घालवण्याचे शारीरिक-मानसिक परिणाम आता जगजाहीर आहेत.
* सध्याचे पालक अगदी पाळण्यातल्या बाळासमोरही टी.व्ही. लावून ठेवतात आणि घरातली माणसं कामं उरकतात. दीड-दोन वर्षांची मुलं सतत धावपळ, दंगा करतात, वस्तूंचा पसारा घालून ठेवतात, सतत प्रश्न विचारतात. काही पालकांना याचा खूप त्रास होतो. नसती कटकट नको, म्हणून हे पालक मुलांना टी.व्ही. लावून देतात. मुलांचा तोपर्यंत ‘चालू’ (active) असलेला मेंदू  ‘शांत’ (passive)  होतो. टी.व्ही.वर अवलंबून राहतो. आपण स्वत: काहीतरी करावं, ही ऊर्मी जाते आणि दुसरा करतोय ते आपलं नुसतं बघावं, हे मनात सुरू होतं.
मुलांचा मेंदू उपजतच शिकण्यासाठी, नवे नवे अनुभव घेण्यासाठी उत्सुक असतो. तो मग टीव्ही जे शिकवतो, तेच ऐकतो, नीट लक्षात ठेवतो. टीव्हीतून मुलं बरंच काही चांगलं-वाईट शिकतात. टीव्ही बघायची सवय- व्यसन यातूनच लागतं. आत्ता आपणच चालू करून दिलेला टीव्ही पुढे आपलीच डोकेदुखी होतो. म्हणून अगदी लहान वयात आपण टीव्हीची सवय लावून देणं हे योग्य नाहीच.
* वाढत्या वयातही आपल्याला हवा तो कार्यक्रम बघावा आणि त्यानंतर तो बंद करावा, हे त्यांना शिकवणं जास्त गरजेचं आहे. अर्थातच त्यांना सांगण्याआधी पालकांनी संयम राखावा. तर मुलं ते शिकतील. पालकच रिमोट हातात ठेवायचा प्रयत्न करू लागले, तर मुलं त्यांच्याकडून तेच शिकणार. अशा वेळी घराची युद्धभूमी कशी होते, हे आपण अनुभवलं असेलच.
* टी.व्ही.कडे शैक्षणिक माध्यम म्हणून बघावं, असं अनेक जण सुचवतात. केवळ शैक्षणिक उद्देशाने सुरू केलेला टी.व्ही. त्याच उद्देशाने राहतो का, हा एक प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचं टीव्हीचं स्वरूप हे केवळ प्रौढांचं मनोरंजन करणारा- असं झालं आहे. त्यात ठरावीक एक-दोन कार्यक्रम सोडले, तर मुलांसाठी काहीही नसतं.   
टीव्ही समोर जास्त काळ घालवण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे आपला मेंदू बंद करणं हेच होय आणि हे कोणत्याही वयात होऊ नये.    
मुलं वाचत नाहीत. काय करावं?
वाचनाची प्रत्येकाची आवड वेगळी असते. मोठय़ा माणसांना विचारलं की तुम्हाला काय वाचायला आवडतं, तर ते सांगतात की मला कथा आवडतात, काही जण म्हणतील की मी कथा-कादंबऱ्या वाचत नाही, केवळ वैचारिक वाचतो. तसं मुलांना ठरवता येतं का? मुलांनी हे ठरवण्यासाठी त्यांच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असायला हवीत. त्यांच्यासमोर पाठय़पुस्तकं आणि बोधपर पुस्तकंच असतील तर मुलांना यातलं काय आवडेल? काहींना विनोदी गोष्टी आवडतील, काहींना शास्त्रज्ञांच्या गोष्टी आवडत असतील, तर काहींना जादूच्या गोष्टी आवडत असतील. विविध पुस्तकं वाचली तर मुलांना त्यांची वैयक्तिक आवड कळू शकेल.
एखादं मूल एखादं पुस्तक वाचायचं की नाही हे कधी ठरवतो? नाव, त्यातली चित्रं, अक्षर हे बघतो. हे पसंत पडलं तर वाचायचे कष्ट घेतो. सुरुवातीच्या ओळीत काही ‘मस्त’, चांगलं वाटलं तरच तो पुढे वाचन चालू ठेवतो. अन्यथा पुस्तक बाजूला ठेवतो.
पूर्वी पुस्तकांना काहीच स्पर्धा नव्हती. आता तसं नाही. पुस्तकांमधून मिळणाऱ्या  मनोरंजनाला टीव्हीची, सीडीची -एकूणच इलेक्ट्रॉनिक मीडियाची जबरदस्त स्पर्धा आहे. हे लक्षात घेऊन पुस्तकं लिहिली / तयार केली तर मुलं वाचतीलही.
मुलांना अभ्यासाची आवडच नाही. किती मागे लागायचं?
जे मनाला भावतं, जिथे सुरक्षित, आपलंसं वाटतं, तिथे आवड निर्माण होते. सध्याचा ‘अभ्यास’ बघितला तर त्यात असं काय आहे, जे आवडेल? मात्र कोणत्याही वर्गातली दहा ते पंधरा मुलं-मुली अशी असतात, ज्यांना मनापासून अभ्यास आवडतो.
*  एरवी, मुलं अभ्यास का करत नाहीत याची वयोगटानुसार कित्येक कारणं देता येतील. यातली काही ‘नवी’ कारणं बघू. – मुलांना सध्या खूप लहान वयापासून म्हणजे वय र्वष ४ किंवा त्या आधीपासूनच लेखन सुरू होतं. अशा मुलांच्या मनगटाच्या स्नायूंचा योग्य विकास अद्याप झालेला नसल्याने त्यांच्या मनगटावर लवकरच ताण येतो. अशी मुलं लेखनाला आणि पर्यायाने अभ्यासालाच कुरकुर करतात.
– लहान वयात अभ्यासाला बसवल्यामुळे आणि त्याचा ताण दिल्यामुळे अभ्यास नकोसा होतो.
– अभ्यास केला नाही तर शिक्षा, असं असल्यामुळे जबरदस्तीने अभ्यास करावा लागतो. जी गोष्ट जबरदस्तीने करावी लागते, त्याचा ओढा कमी होतो, जे साहजिकच आहे.
– शिकवलेलं न कळल्यामुळे मेंदूत रिकाम्या जागा तयार होतात, त्यात अपेक्षांचं ओझं असतं. ‘आपल्याला येत नाही’ ही भावना काही संवेदनशील मुला-मुलींच्या मनात घर करून बसते. इथे प्रश्न अभ्यासाचा नसतो, तो भावनिक असतो. अशा भावनिक समस्या सुटायला बराच काळ जावा लागतो.   
आपल्या मुलाची / मुलीची नेमकी समस्या कोणती, हे समजायला पाहिजे. त्यांना दोष न देता, प्रश्न कसा सुटेल याकडे लक्ष द्यायला हवं. मुलांवर विश्वास ठेवला तर प्रश्न सुटू शकतो.  
१. शिकलेलं समजून घेण्याची, लक्षात ठेवण्याची म्हणजेच प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. आपण मात्र सर्व मुलांना एकाच पद्धतीने शिकवतो. एकाच पद्धतीने त्यांना अभ्यास करायला सांगतो. एकाच वेळेस अभ्यास करायला सांगतो.
साधारणत: चौथी-पाचवीच्या टप्प्यापर्यंत मुलांची अभ्यासाची नसíगक शैली कोणती आहे, हे समजून येतं. आपण त्याची स्वत:ची पद्धत शोधून त्याला मदत करायला हवी. याला ‘लìनग स्टाइल्स’ असं संबोधलं जातं. काही मुलं ऐकलेलं समजून घेऊन अभ्यास करतात. काही मुलांना वाचून समजतं. या मुलांना चित्रं-आकृत्या यातूनही समजतं. तर काही मुलं हालचालीतून शिकतात. म्हणजेच स्वत: कृती करून, प्रयोग करून, दुसऱ्याला शिकवून, नाटक करून, इ. आपल्या मुलांमधल्या लìनग स्टाइल्स समजल्या पाहिजेत.
२. अभ्यास म्हणजे वाचन-लेखन ही काही प्रत्येकाची उपजत आवड नसते. याच सदरातल्या एका लेखामध्ये डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी मांडलेल्या ‘मल्टिपल इंटेलिजन्सेस’ (बहुआयामी बुद्धिमत्ता) या सिद्धांताविषयी सविस्तर सांगितलं आहे. या नसíगक आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. १. संगीतविषयक, २. भाषिक ३. निसर्गविषयक ४. गणिती ५. दृश्य / अवकाशीय ६. आंतरव्यक्ती ७. शरीरविषयक ८. व्यक्तीअंतर्गत. यापकी आपल्या मुलांमध्ये कोणत्या बुद्धिमत्ता प्राधान्याने आहेत याचा शोध पालकांनी घ्यावा व नसíगक बुद्धिमत्तेकडे मूल कसं वळेल, हे बघावं.
त्यांना कशाची आवड नाही, हे लक्षात घ्यावं. त्याचप्रमाणे कशाची आवड आहे, हे बघावं.
सध्या शाळांमध्ये माहीत झालेला ज्ञानरचनावाद ही अभ्यासाची सर्वात योग्य आणि सर्वाना सामावून घेणारी अशी पद्धत आहे. ती चांगल्या पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचली तर त्यांचा फायदाच होईल.
‘मेंदूची मशागत’ या सदरातील हा अंतिम लेख. वाचकांनी दिलेला अभ्यासू प्रतिसाद, विचारलेले प्रश्न, सांगितलेले अनुभव आणि आवर्जून घेतलेल्या भेटी -यामुळे लेखनाला आणि अभ्यासाला गती आली, तशी रंगतही आली. मुलांचे प्रश्न, मेंदूविषयक अभ्यास – संशोधन याविषयी आस्था दाखवली गेली त्यामुळे हा विषय मराठीतून मांडता आला. जास्तीत जास्त शिक्षक-पालकांपर्यंत पोहोचला. हेच समाधान.
(समाप्त)    

Story img Loader