दुपारचं रणरणतं ऊन. चौकात चारी दिशांनी धो धो वाहणारं ट्रॅफिक. सिग्नल गेले सहा महिने बंद, कारण मुख्य केबल ‘मोनो रेल’साठी पाया खणताना तुटलेली. तक्रार करून उपयोग नाही. पादचाऱ्यांच्या गैरसोयीची कुणाला पर्वा नाही. वाहनांच्या ‘हॉर्नस्’चं मुक्त ध्वनिप्रदूषण.. अन् चाकरमान्या ‘ट्रॅफिकवाल्यांचे’ हाल! क्रॉस करून पलीकडे जाण्यासाठी वाढत चाललेला घोळका. त्यात पुढं असणाऱ्या ‘मावशीबाई’ ट्रॅफिकवाल्याला म्हणाल्या, ‘‘अरं दादा, बंद कर की ‘ट्रॉपीक’ तुझं. किती वेळ उन्हात उभं राहायचं रस्ता वलांडायला? डोकं निस्तं तापलंय बघ!’’
‘‘मावशी, मीसुद्धा उन्हातच उभं राहून काम करतोय नां? आता ट्रॅफिक संपंना, पलीकडे ट्रॅफिक थांबंना.. मी तर काय करू, वाईच दम धरा!’’
‘‘खरं हाय दादा, उन्हात उभा हायस इंग्रजावानी टोपी घालून, त्याचं तुला पैसंबी मिळत्यात. आम्हाला न्हाय मिळत, बिनटोपीचं उन्हात उभं राव्हं लागतंय. विद्या.. माझी नात, शाळेत वाट पाहात असेल माझी, अजून का येईना आजी..’’ ‘ट्रॉपीक’ थांबल्यावर माणसं इकडून तिकडं, लगबगा आली गेली. तसे ‘ट्रॅफिकवाले’ नेहमीच्या येण्या-जाण्यामुळे तोंडओळखीचे. युनिफॉर्मवरील पट्टीवर नाव ‘विश्वनाथ जगताप’. कपाळी ‘नामाचा’ टिळा. अधनंमधनं घटका- दोन घटका गप्पा व्हायच्या. तो ‘संवाद’ ऐकल्यामुळे मी थांबलो. जगतापच बोलू लागले,
‘‘मावशी एकदम सॉलिड आहेत. बोलण्यात हार नाही जाणार. पंधरा-वीस मिनिटांनी नातीला घेऊन परत येईल. ती असेल पाच-सहा वर्षांचीच, ती एकदम फटाकडीच. पहिला ‘सॅल्यूट’ ठोकणार अन् म्हणणार, ‘पोलीसदादा, साहेबाची गाडी येतेय, नीट काम करा.’..नाहीतर ‘पोलीसदादा, आता काम खूप झालं, डबा खाऊन घ्या.. वॉटरबॅग देऊ माझी?’ एकदम गोड पोरगी आहे.. पोरींची माया वेगळीच. पोरं नुसतीच टगेगिरी करतात!’’ ‘‘खरं आहे बुवा,’ असं म्हणत मी क्रॉस केला. विचारचक्र चालू..
ही मावशी म्हणजे मीनाची सासू अन् नात म्हणजे तिची मुलगी. मीना म्हणजे आमच्या घरची केर-वारे, कपडे-भांडी करणारी मदतनीस. तिला कधी गोडा-धोडाचं केलेलं वा आंबा-जांभळं वगैरे दिलं तर स्वत: न खाता घरी घेऊन जाणार.. म्हणणार, ‘‘धाकटीला, विद्याला हे असलं खाणं खूप आवडतं. थोरली वीणा मात्र गोळ्या- चॉकलेटवाली आहे. त्यांची आजी खूप लाड करते दोघी नातींचे. त्यांना आवडणारं कुठनं कुठनं आणते. बोलायला एकदम कडक, पण मनाने फणसावाणी. घरी सासू आहे म्हणून मी चार घरची कामं करते, घरखर्चाला मदत होते. नाहीतर शाळेतल्या शिपायाच्या नोकरीच्या नवऱ्याच्या पगारात कसलं भागतंय या महागाईत? सासू म्हणते! दोन्ही पोरींना शिकवा भरपूर.. दोघींची शाळेत नेण्याआणण्याची- डब्याची जबाबदारी माझी! एवढंच नाही, तर धाकटीच्या जन्मानंतर स्वत:च्या मुलाला स्पष्ट सांगितलं, ‘दोन पोरी
आठवडय़ाभरातच ‘ट्रॅफिकवाले’ जगताप रेलिंगला टेकून निवांत उभे दिसले. दोन ‘लेडी कॉन्स्टेबल्स’ ट्रॅफिक कंट्रोल करीत होत्या. त्यांचं ट्रेनिंग चालू असावं बहुतेक. ‘जगाचा ताप सहन करणारे विश्वनाथ, आज निवांत?’ प्रश्नातील अर्थ कळून ते हसून म्हणाले, ‘‘कसलं जग अन् कसलं विश्व.. आमचं विश्व या जंक्शनपुरतं. अठ्ठावीस वर्षांच्या सव्र्हिसमध्ये ही जंक्शन्स बदलली हाच काय तो बदल. एवढय़ा काळात मुंबई किती बदलली. गाडय़ा बेसुमार वाढल्या. रोज चार-पाचशे गाडय़ांची भर पडतेय मुंबईत. रस्ते अपुरे म्हणून फ्लायओव्हर्स बांधले; त्यावरही ट्रॅफिक जॅम होऊ लागलं.. कुठे थांबणार हे.. जमानाच बदललाय. आता नव्या लेडी कॉन्स्टेबल्स येत आहेत, त्यांना ट्रेनिंग द्यायचंय.’’
‘‘आता सगळ्याच क्षेत्रांत मुली येताहेत की.’’
‘‘खरं आहे.. चांगलंच आहे. पोरं काही कामाची नाहीत!’’
‘‘का बुवा, पोरांना एकदम निकालात काढलंत, होलसेलमध्ये?’’
‘‘तर काय.. शिक्षण नको, वागणूक चांगली नाही, टपोरीगिरी करण्यात पटाईत! खोटं नाही सांगत, अनुभवाचं बोलतोय.’’
‘‘अनुभव मुलांचा की मुलींचा?’’
‘‘दोघांचा. तीन मुलींनंतर.. मुलगा झाला आम्हाला.’’
‘‘मग तक्रार कसली?’’
‘‘मुलाची वाट पाहाता पाहाता तीन मुली झाल्या की राव! आजच्या महागाईच्या दिवसात वाढत गेलेला पसारा कसा परवडणार?’’
‘‘पण पसारा थांबवता येतोच की!’’
‘‘पण मुलगा तर पाहिजेच ना? हातपाय हलेनासे झाल्यावर कोण करणार आपलं? अग्नी कोण देणार नंतर? वंश तर चालला पाहिजे?’’
‘‘तरी पोरं काही कामाची नाहीत म्हणालात मगाशी?’’
‘‘खोटं नाहीच ते. पोरी तिन्ही हुशार. मोठय़ा दोघी ग्रॅज्युएट होऊन लग्नदेखील झालं थोरलीचं. तिसरी कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षांला आहे, नव्या मुंबईत. मेरिटवर अॅडमिशन झाली. दिडकीचा खर्च नाही.. पण हे शिक्षणच इतकं महाग झालंय, बघा.’’
‘‘अन् मुलगा?’’
‘‘काय सांगावं.. दहावीदेखील पास होत नाहीय. दोनदा आपटला.. त्यातून वाईट संगत! तीन पोरींवर पोरगा झाला म्हणून भरपूर लाड झाले. हट्ट पुरवले.. आता म्हणतो, ‘बाबा, शिकून काय होणार?’ ‘वरच्या पैशाला तुम्ही हात नाही लावला कधी.. नाहीतर धंदा केला असता मी!’ हे कुठला वंश चालविणार? काही खरं नाही..’’
‘‘तसे मुलींचेदेखील लाड केले असतीलच की!’’
‘‘मुलींचे कसले लाड? मुलाची वाट पाहाता पाहाता झालेल्या मुली.. त्यांनीच कधी हट्ट केला नाही, इतक्या जन्मजात शहाण्या. नाही म्हणायला धाकटीनं इंजिनीअरींगचा हट्ट धरला.. कर्ज काढलं ते शिक्षणासाठी, ते वाया नाही जाणार याची खात्री आहे, अन् मुलगा ‘वरच्या पैशा’विषयी सुनावतो! आमच्याच खात्यात भरती हो म्हणण्याचंदेखील धाडस नाही होत.. आणखी भर नको! एकूण गणित चुकलंच बघा संसाराचं. तिघी मुली शिकल्या हेच काय ते समाधान..!’’
‘‘तुम्हाला रोज भेटणाऱ्या मावशींनी मात्र गणित बरोबर मांडलं, शिक्षण नसताना.’’
‘‘कोण मावशी? विद्याच्या आजी? त्यांचं काय?’’
मी थोडक्यात ‘लक्ष्मीबाईंचा’ किस्सा सांगितला.
तेवढय़ात एका अॅम्ब्युलन्सला वाट करून द्यायला लेडी कॉन्स्टेबल्सना मदत करायला पुढे सरसावलेले जगताप, थोडय़ा वेळाने परत येत हसतच म्हणाले, ‘‘झाशीची राणीच म्हटलं पाहिजे मावशींना. अशी झाशीची राणी आम्हाला वीस-वर्षांपूर्वीच भेटायला हवी होती, म्हणजे आमचा पसारा असा वाढला नसता, मुलाच्या नावापायी. ‘मुलगा हवा’च्या चौकटीचे आम्ही गुलामच राहिलो!..’’
तेवढय़ात तिथं लक्ष्मीबाई हजर झाल्या! आल्या आल्याच म्हणाल्या, ‘‘काय दादा, आज पोरी काम करतायत म्हणून तुम्ही निवांत दिसताय!’’
‘‘तुमची नातदेखील आज नाही दिसत.. शाळेला सुट्टी मग कसली डय़ुटी? तरी कुठं निघाल्या भर उन्हाच्या?’’
‘‘सुट्टी शाळेला, पोटाला नाही.. रेशन कोण आणणार?’’ असं म्हणत, ट्रॅफिक थांबल्यामुळे मावशी चटाचटा चालत पलीकडे गेल्या. ट्रॅफिक पुन्हा धो-धो वाहू लागलं. जगताप हसत म्हणाले, ‘‘ट्रॅफिक कंट्रोल करण्यात आयुष्य गेलं, पण आयुष्यात ‘मुलगा हवा’च्या नादात सिग्नल सिस्टीमच बंद पडल्यामुळे भरकटत गेलो.. खरं ना?’’
‘‘सिस्टीम सुधारली की होईल सारं व्यवस्थित!’’
ट्रॅफिक सिग्नल
ट्रॅफिक थांबल्यामुळे मावशी चटाचटा चालत पलीकडे गेल्या. ट्रॅफिक पुन्हा धो-धो वाहू लागलं. जगताप हसत म्हणाले, ‘‘ट्रॅफिक कंट्रोल करण्यात आयुष्य गेलं, पण आयुष्यात ‘मुलगा हवा’च्या नादात सिग्नल सिस्टीमच बंद पडल्यामुळे भरकटत गेलो..’’
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 15-06-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic signal