विवाहपूर्व समुपदेशन हे इतर कोणत्याही समुपदेशनापेक्षा निराळे आहे. वर-वधू यांच्या विचारधारेला स्पष्टता यावी, यासाठी हे समुपदेशन असते. शिवाय जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा ठरवतानासुद्धा याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे निर्णय घेण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. कधी कधी जिव्हाळ्याच्या गोष्टी मनाशी जपलेल्या असतात. त्याबद्दलही लग्नाआधीच बोलणे गरजेचे असते, लग्नापूर्वीच अनेक गोष्टीत पारदर्शक असणं पुढच्या नात्यासाठी महत्त्वाचं ठरतं.
‘आज संपदा येणार आहे तुमच्याकडे. तिला जरा चांगलं समजून सांगा. अहो, जराही घाई नाही तिला लग्नाची. आणि प्रत्येक मुलाला नाकारायचं म्हणजे काय? माझी तर झोपच उडाली आहे. आणि तुम्ही जे लेखांमध्ये लिहिता ना म्हणजे अॅडजस्ट करायला पाहिजे वगरे ते सगळं झालंय हो सांगून. पण कसं असतं ना सोनारानं कान टोचलेले बरे असतात. शेवटी आमच्यापेक्षा तुम्ही असं वेगळं काय सांगणार आहात हो? आमची काय लग्नं झाली नाहीत की काय? आम्हालाही अनुभव आहेच आमच्या  एकुलत्या एका लग्नाचा! चांगली जादू घडली पाहिजे, तुमच्या समुपदेशनाने!  म्हणजे घरी येताक्षणीच लगेच स्थळांची यादीच टाकते तिच्या पुढय़ात आणि उडवून टाकते लग्नाचा बार पुढच्या महिन्यात! ’’
संपदाची आई बोलतच राहिली होती. माझ्या मनात आलं, माझ्याशीसुद्धा या बाई इतकं बोलतायत तर स्वत:च्या मुलीला या किती वैताग आणत असतील? समुपदेशनाच्या बाबतीत नेहमी जाणवणारी ही गोष्ट आहे. अनेकदा लोक सांगतात, की अमुक अमुक व्यक्तीला असं असं सांगा बरं का. त्यांना वाटतं की समुपदेशन म्हणजे जादूची कांडीच जणू! समुपदेशनासाठी जाऊन आला की माणूस आमूलाग्र बदलूनच जाणार असा विश्वास. वरच्या उदाहरणामध्येदेखील संपदाच्या आईने तिला काय सांगायचं ते मला सांगितलं आणि परत वर ऐकवलंसुद्धा की तसंही तुम्ही वेगळं काय सांगणार?
हा नेहमी येणारा अनुभव. आणि समुपदेशन म्हणजे सोनाराने टोचलेले कान असाही एक गरसमज आढळतो. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे, समुपदेशक पालकांपेक्षा काही वेगळा विचार करत असतील, काही वेगळी दिशा देऊ शकत असतील, असा विचारच अजून समाजात रुजायचा आहे.
खरं सांगायचं तर समुपदेशन म्हणजे ‘काही’ सांगणं नव्हे किंवा कोणता सल्ला देणं असंही नव्हे तर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणं, काही बाबतीतली माहिती देऊन त्यानुसार वागणं, निर्णय घेणं होय. समुपदेशनामध्ये कृतीला महत्त्व असतं. सल्ला आपण अशा गोष्टींसाठी घेतो की जिथे तांत्रिक गोष्टींचे ज्ञान आपल्याला नसते. पण वैवाहिक जीवन दोघांचं असतं. तांत्रिक बाबींना तिथं स्थान नसतं. या हळुवार नात्यामध्ये परंपरा, रीतीरिवाज, जीवनमूल्यं, स्वभाव, जीवनशैली, कामजीवन, दोघांची विचारधारा, भावनिक बंध, प्रायव्हसीच्या कल्पना अशा अनेक गोष्टी येतात. आणि या गोष्टी फक्त त्या दोघांच्या असतात. त्या कशा असाव्यात, कशा नसाव्यात, याचा निर्णय सर्वस्वी त्या दोघांचा असतो. अनेकदा मुलं-मुली ज्या गोष्टी कदाचित घडणारच नाहीत त्याबद्दलही चर्चा करताना दिसतात.
सुजय आणि कल्पना नुकतेच बाहेर भेटले होते. त्या आधी एकदा सुजयच्या घरी दोन्ही कुटुंबातली माणसं भेटली होती. आज त्यांची दुसरी भेट होती. बोलता बोलता सुजय म्हणाला, ‘‘जर घरी गरज भासली तर नोकरी सोडशील की नाही?’’
कल्पना म्हणाली, ‘‘नाही, मी नोकरी कधीच सोडणार नाही.’’
‘‘ अगं, पण शेवटी घर महत्त्वाचं नाही का?’’
‘‘ नाही, पण माझी नोकरी दुय्यम मानलेली मला नाही चालणार. मीच का सोडायची नोकरी?’’
‘‘अगं, पण घरात कदाचित कुणाचं आजारपण असेल तर शक्य नसेल तेव्हा नोकरीसाठी बाहेर जाणं, तर काय करशील? आणि असेच जर तुझे विचार असतील तर मलाही निराळा विचार करावा लागेल.’’
शेवटी त्यांचा हा वाद त्यांच्या घरापर्यंत पोचला आणि दोन्ही आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार दोघेही समुपदेशनासाठी माझ्यापर्यंत पोचले. त्यांच्याशी गप्पा मारता मारता मला त्यांच्यातला हा मतभेदाचा मुद्दा जाणवला. मी त्या दोघांना म्हटलं, अरे, कदाचित हा मुद्दा पुढे उद्भवणारसुद्धा नाही. आजारपण येईलच असं नाही. आणि आलं तर त्या वेळी बघता येईल ना? शिवाय कल्पना आणि सुजय, त्या वेळी कदाचित तुम्हाला दोघांनाही असं वाटू शकतं की काही दिवस आलटूनपालटून रजा घेऊन प्रश्न सोडवणं शक्य होईल. तुमच्यामध्ये तयार होणाऱ्या केमिस्ट्रीवर या गोष्टी अवलंबून आहेत बघा. कालांतराने एकमेकांना जपायला लागाल. आत्ता कुठे त्याबद्दल भांडताय?’’
विवाहपूर्व समुपदेशन हे इतर कोणत्याही समुपदेशनापेक्षा निराळं आहे. वर-वधू यांच्या विचारधारेला स्पष्टता यावी यासाठी हे समुपदेशन असते. शिवाय जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा ठरवतानासुद्धा याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे निर्णय घेण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. कधी कधी काही जिव्हाळ्याच्या गोष्टी मनाशी जपलेल्या असतात. त्याबद्दलही लग्नाआधीच बोलणं गरजेचं आहे, नाहीतर त्या गोष्टी भांडणाचे मुद्दे ठरू शकतात.
जयेशने असं ठरवलं होतं की नोकरी लागली की दर महिना पगाराच्या दोन टक्के रक्कम कुठल्या तरी सेवाभावी संस्थेला दान करायची. त्याप्रमाणे तो दर महिना  तसे करीत असे. सहा महिन्यांपूर्वी त्याचे सुरभीशी लग्न झालं. त्याला पगार होता सत्तर हजार रुपये. दोन टक्के रक्कम म्हटली तरी ती होत होती सुमारे १४०० रुपये. ही गोष्ट सुरभीला अजिबात मान्य नव्हती. तिचं म्हणणं १४०० रुपये फारच होतात. ३००-४०० रुपये ठीक आहे. पण त्याच्या आठवी-नववीपासून त्याने हे स्वप्न जपलं होतं. तो तिला म्हणाला, १५०० रुपये पगार कमी आहे मला असे समज. पण या गोष्टीवरून वाद वाढत गेले आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत आलं.
अशा जिव्हाळ्याच्या गोष्टी लग्नापूर्वीच आपल्या भावी जोडीदाराला सांगायला हव्यात. अनेक वधू-वरांशी बोलताना जाणवलेली महत्त्वाची गोष्ट अशी की धार्मिक बाबी किंवा आध्यात्मिक गुरू याबद्दलही आपल्या धारणा लग्नापूर्वीच एकमेकांना सांगायला हव्यात. अद्वैत अशाच कोणत्या तरी मठात दर शनिवारी संध्याकाळी जात असे. लग्नापूर्वी त्याने हे अमिताला, त्याच्या पत्नीला सांगितलंच नव्हतं. लग्नानंतर जेव्हा अमिताला हे कळलं तेव्हा तिला धक्काच बसला, कारण तिच्या विचारधारेत, तिच्या आयुष्यात या गोष्टींना स्थानच नव्हतं. आणि दर शनिवार त्यातच जाणार म्हटल्यावर तर ती चिडलीच.
अशा अनेक गोष्टींचा विचार लग्नापूर्वी होणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एकमेकांच्या आई-वडिलांचं स्थान आपल्या आयुष्यात काय असणार, दोघांचेही पालक किती अंतरावर असतील याचा विचारही पती-पत्नी दोघांनी मिळून लग्नापूर्वी करणं गरजेचं आहे.
चिन्मय आणि त्याची पत्नी राधा दोघे जण राहतात बंगळूरू येथे. आणि चिन्मयचे आई-बाबा राहतात मुंबईला. चिन्मयच्या आईने त्याला नियमच घालून दिला होता की रोज राधा काय स्वयंपाक करते, ते चिन्मयने तिला रोज फोन करून सांगितलंच पाहिजे. शिवाय राधाने रोज चटणी कोिशबीरपासून सगळा स्वयंपाक केलाच पाहिजे. अशा बाबतीत खरं तर चिन्मय आणि राधा दोघांनी मिळून आईला काय सांगायचं ते ठरवलं पाहिजे. अशा लहानसहान बाबतीत खरं तर पालकांनी पडण्याचं काही कारण नाही. पण आपल्या मुलांवर ( लग्नाच्या वयाच्या) पालकांची स्वामित्वाची भावना असल्याचं दिसून येतं. आणि पती-पत्नीच्या नात्यात अंतर पडत जातं.
मुला -मुलींशी बोलताना अजून एक जाणवलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचे मित्र-मत्रिणी!  याबाबतीतसुद्धा लग्नापूर्वीच बोलणं आवश्यक आहे. आपापल्या मित्र-मत्रिणींना लग्नानंतर किती अंतरावर ठेवायचं, याचंही भान दोघांनाही असायला हवं.
नरेंद्र आणि त्याची मत्रीण समिता. त्यांच्या मत्रीबद्दल नरेंद्रने त्याच्या पत्नीला काहीच सांगितलं नव्हतं. लग्नानंतर कुठून तरी त्याच्या पत्नीला नरेंद्र आणि समिताच्या मत्रीबद्दल समजलं आणि तिला धक्काच बसला. ती त्याला म्हणाली, मला हे नाही आवडणार. तर तू मत्री थांबव. त्याने तसं तिला खोटंच सांगितलं. पण प्रत्यक्षात मात्र तसं काही घडलं नाही. एकमेकांवर खूप आरोप-प्रत्यारोप झाले. त्याच्या पत्नीच्या मनात त्याने फसवल्याची आणि तो तिच्याशी खोटं बोलल्याची भावना घर करून बसली आणि पर्यायाने ते नातं जुळणं अवघड झालं.
अशी अनेक उदाहरणं!! एक मात्र नक्की पती-पत्नीचं नातं जर पक्कं बांधलं गेलं आणि ते टिकवण्यासाठी दोघांनीही मनापासून प्रयत्न केले तर विवाहसंस्थेला बसणारे हादरे नक्की कमी होतील आणि आपल्या सामाजिक स्वास्थ्याचा पाया मजबूत होईल यात मला शंका वाटत नाही.    
chaitragaur@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा