माझ्या लेकाने, अनिरुद्धने विमान चालविण्याचं प्रशिक्षण तर घेतलंच वर मित्रांच्या मदतीने खासगी विमान विकतही घेतलं आणि एके प्रसन्न सकाळी मला म्हणाला, ‘‘चल आई, तुला विमानाची सैर घडवतो.’’
आ पल्या मुलानं स्वत:च्या मालकीचा फ्लॅट घेतला, गाडी घेतली तरी आईचा आनंद गगनात मावेनासा होतो. मग मुलानं अगदी इतर चार मित्रांच्या भागीदारीत का होईना, पण ८० हजार डॉलर्सचं विमान विकत घेतलं तर?.. तो आनंद शब्दातीत असेल.
माझीही अवस्था अशीच काहीशी झाली. गेली २०-२२ वर्षे अमेरिकेत स्थायिक असणारा माझा मुलगा अनी (अनिरुद्ध) खासगी वैमानिक प्रशिक्षण वर्गात विमान चालविण्याचा सराव करीत होता. आपण मोटार ड्रायव्हिंग शिकतो त्याप्रमाणं तो तिथे विमान चालविण्याचं प्रशिक्षण घेत होता.
हा प्रशिक्षण वर्ग आणि त्याचा अभ्यासक्रम अमेरिकन फेडरल लॉनुसार रजिस्टर केलेला असून त्याचे कादयेकानून अत्यंत कडक आहेत. एव्हिएशन विषयाशी संबंधित अशी काही पुस्तकं त्यासाठी ठरवून दिलेली आहेत. त्यांचा अभ्यास करावा लागतो. लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. प्रचंड कठीण आणि मेहनतीला पर्याय नसलेले हे प्रशिक्षण असते. प्रत्यक्ष लायसन्स हातात पडण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांला ४० तास ‘फ्लाइंग’ पूर्ण करावं लागतं तसंच पाच तास स्वतंत्र (एकटय़ाने) विमान चालवावं लागतं आणि तीन तास रात्रीच्या वेळी प्रशिक्षकासह फ्लाइंग करून दाखवावं लागतं. या वेळी प्रशिक्षक अनेक प्रश्न विचारून वैमानिकाच्या ज्ञानाची आणि विमान चालविण्याच्या कौशल्याची परीक्षा घेत असतो. सर्व परीक्षा, प्रात्यक्षिकं पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला विमान चालविण्याचा परवाना मिळू शकतो आणि मगच तुम्हाला खासगी वापराकरिता विमान वापरता येते.
अशा प्रवासासाठी आपल्याजवळ आपले, स्वत:च्या मालकीचे विमान असावे, या हेतूने अनी आणि त्याचे चार मित्र यांनी प्रत्येकी १६ हजार डॉलर खर्च करून हे ८० हजार डॉलर्सचे विमान खरेदी केले. हे विमान पार्क करण्यासाठी ‘विंग्ज एव्हिएशन सेंटर’ या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचं प्रशस्त विमानतळ भाडय़ानं घेण्याचं ठरलं. या विमानतळावर अनीच्या विमानासारखी २०-२५ विमानं नेहमीच पार्क केलेली असतात. या विमानाच्या देखभालीचा खर्च म्हणून दर महिना ८० डॉलर्स फी द्यावी लागते. प्रत्येक जण पाच आठवडय़ांतून एकदा विमान वापरू शकतो. त्या वेळी तो फक्त मनमुराद फ्लाइंग करून सराव करू शकतो अथवा एखाद्या जवळपासच्या ठिकाणी विमानाने जाऊन येऊ शकतो. उदा. अनी फिलाडेल्फियाला राहतो आणि त्याची बहीण न्यू जर्सीला. एखाद्या रविवारी तो, हवा चांगली असल्यास, तिला भेटायला गाडी घेऊन न जाता, तिला अक्षरश:‘फ्लाइंग व्हिजिट’ देऊ शकतो. त्याला आपलं विमान मात्र अशाच एका खासगी विमानतळावर पार्क करावं लागतं. अर्थात ‘आपण विमान घेऊन जात आहोत,’ अशी रीतसर नोंद तारीख, वार, वेळ आणि कोठे जात आहोत, केव्हा परतणार या सर्व तपशिलांसह करणे आवश्यक असते.
अशा रीतीने खासगी वापराकरिता विमान नेताना इतरही काही पथ्यं (नियम) पाळावी लागतात. अमेरिकन फेडरल लॉनुसार आकाशमार्गाचे ए, बी, सी, डी आणि जी असे पाच विभाग (झोन्स) पाडलेले आहेत. त्याचे उल्लंघन तुम्हाला करता येत नाही. तसेच आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक विमानतळावर, तुम्हाला तुमचे हे विमान उतरविता येत नाही. कारण त्या विमानांच्या कक्षेत तुम्ही आलात तर त्या प्रचंड विमानांच्या पुढे तुमचे हे खासगी विमान, एखाद्या खेळण्यातल्या विमानाप्रमाणे भरकटून जाईल आणि फार मोठी हानी होईल. ती टाळणं गरजेचं असतं. असो.
तर अशा या स्वमालकीच्या विमानातून गगनभरारी मारण्याचा योग नुकताच मला आला. त्या दिवशी सहज बोलता बोलता माझा मुलगा मला म्हणाला, ‘‘तुझं सर्व आटोपून बारा-साडेबारापर्यंत तयार राहा. आज आपण माझ्या विमानातून चक्कर मारायला जात आहोत. त्याचं बोलणं सहज होतं, पण माझ्यासाठी तो वेगळाच अनुभव होता. (लहानपणी कोणी सायकलवरून चक्कर मारून आणली तरी त्याचं किती अप्रूप वाटायचं आणि आज मला माझ्या मुलाच्या मालकीच्या विमानातून चक्कर मारायला मिळणार होती. हे वैमानिकाचं प्रशिक्षण घेण्यासाठी त्यानं किती मेहनत घेतली होती आणि पाण्यासारखा पैसा (डॉलर्समध्ये) खर्च केला होता हे मी जाणून होते. त्याची ही आवड त्यानं अगदी कष्ट करून पूर्ण केली होती आणि आज मला विमानातून हिंडवून आणल्यावर त्याचं एक स्वप्न पूर्ण होणार होतं.)
‘‘खरं की काय? चल. पण काय रे, काही घाबरण्यासारखं नाही ना?’’
‘‘अगं आई, तुझा तुझ्या मुलावर विश्वास नाही का? घाबरू नकोस, काही होणार नाही. शिवाय माझा प्रशिक्षक मिस्टर बॉब स्मिथही येतोय आपल्याबरोबर. चल लवकर आणि हे बघ, जीन्स आणि टी-शर्ट असा सुटसुटीत ड्रेस घाल. जॅकेटसुद्धा नको. आज अगदी ब्राईट सनी डे आहे. ८२ अंश सेंल्शिअस टेम्परेचर आहे. अगदी परफेक्ट दिवस. चल चल लवकर!’’
मनातल्या मनात देवाचं स्मरण केलं आणि तयार होऊन त्याच्याबरोबर निघाले. सून राधानं ‘एन्जॉय’ म्हणत शुभेच्छा दिल्या. रेवती, शुभम दोघा नातवंडांनी ‘हॅप्पी जर्नी आज्जी’ असं उडत उडत म्हटलं आणि ती दोघं खेळायला पळाली.
आम्ही निघालो. १५-२० मिनिटांत आम्ही विंग्ज एव्हिेशन सेन्टरवर पोहोचलो. गाडी पार्क करून आम्ही विमान पार्क केलेल्या ठिकाणी पोहोचलो. अनीचे विमान तिथे पार्क केलेले होते. प्रथम अनीने विमानाची सर्व तपासणी केली. पेट्रोल टँक चेक केले. विमानात चढून इंजिन व अन्य गोष्टी चेक केल्या. तेवढय़ात मिस्टर बॉब हजर झालाच. ‘मि. बॉब, माय मॉम,’ ओळखीचा उपचार पार पडला. अनीच्या मदतीनं विमानाच्या पंखांवर एका विशिष्ट ठिकाणी पाय ठेवून मी विमानात माझ्या सीटवर बसले. पट्टा बांधला. हेड फोन आणि माऊथ फोनचं धूड डोक्यावरून कानावर ठेवलं.
एकूण चार सीटच्या या विमानात अनी व मि. बॉब पुढे आणि मी अनीच्या मागच्या सीटवर बसलो. (चौथी सीट रिकामी ) धावपट्टीवरून हळूहळू विमान पुढे नेत अनीने अत्यंत शिताफीने टेक ऑफ केलं नि विमान आकाशात झेपावलं. विमानाचा वेग हळूहळू वाढवीत नेत सुमारे १०० मैल वेगाने अनीचे विमान दोन हजार ५०० फूट उंचीवरून ‘चेस्टर कौंटी’ या २९ मैलांवर असलेल्या विमानतळाच्या (अर्थात खासगी विमानतळ) दिशेने जाऊ लागले. हवा अत्यंत स्वच्छ होती. सूर्य आत्यंतिक तेजानं तळपत होता. जो जो वर जावे तसा तसा आकाशाचा विस्तार वाढत होता, रुंदावत होता आणि जमिनीवरची घरं, झाडं, रस्त्यावरची वाहनं, टेकडय़ा, डोंगर वगैरे लहान लहान होत होते. यापूर्वी मी अनेक वेळा विमान प्रवास केला आहे, पण इतकं स्वच्छ आणि इतकं विस्तीर्ण आकाश कधीच पाहिलं नव्हतं. ईश्वरी लीला आणि मानवी कर्तृत्व यांचा सुंदर मेळ मी अनुभवीत होते. जो जो उंच जावे तो तो आकाश अधिकाधिक वर वर जात होतं. आकाशाला गवसणी घालण्याचे मानवी प्रयत्न अपुरे ठरत होते, पण म्हणून मानवी प्रयत्न थांबलेले नाहीत, हीच गोष्ट महत्त्वाची.
माऊथ फोनच्या आणि हेड फोनच्या सहाय्याने आकाशमार्गावरून चालू असलेल्या वाहतुकीशी संपर्क साधत होता. सुमारे २० मिनिटांनी आम्ही चेस्टर कौंटीच्या खासगी विमानतळावर उतरलो, अगदी १०० पैकी १०० मार्क मिळवून अनीने स्मूथ लॅण्डिंग केलं होतं. पाच मिनिटांने परत अनीने आकाशात झेप घेतली. परतीच्या वेळी वाऱ्याचा वेग उलट दिशेने होता म्हणून वेळ जरा जास्त लागला. पण लेकाविषयी अभिमान वाढवून गेला.
विमानाला त्याच्या जागेवर पूर्ववत बंदिस्त करून आम्ही कार पार्किंगकडे गेलो आणि १५-२० मिनिटांत घरी पोहोचलो. घरी सर्व जण वाट पाहत होते. माझ्या या अनोख्या गगनभरारीचं वर्णन करण्यात दुपार कधी संपली ते कळलंच नाही. एक गोष्ट मात्र मला कळली होती, ती म्हणजे हौसेचं मोल करता येत नाही आणि आनंदाला तराजूत घालून तोलता येत नाही. आनंद तोलणारा तराजू अजून अस्तित्वात यायचाय!
सैर मुलाच्या विमानातून ..
माझ्या लेकाने, अनिरुद्धने विमान चालविण्याचं प्रशिक्षण तर घेतलंच वर मित्रांच्या मदतीने खासगी विमान विकतही घेतलं आणि एके प्रसन्न सकाळी मला म्हणाला, ‘‘चल आई, तुला विमानाची सैर घडवतो.’’ आ पल्या मुलानं स्वत:च्या मालकीचा फ्लॅट घेतला, गाडी घेतली तरी आईचा आनंद गगनात मावेनासा होतो. मग मुलानं अगदी इतर चार मित्रांच्या भागीदारीत का होईना, पण ८० हजार डॉलर्सचं विमान विकत घेतलं तर?.. तो आनंद शब्दातीत असेल.
First published on: 09-02-2013 at 12:06 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel from child aeroplane