यतीन कार्येकर
‘‘पाचगणीच्या पठारावरचं डोळय़ांत न मावणारं आकाश.. कोळी बांधवांबरोबर होडय़ांवरच राहून पकडलेली ताजी मासळी लगेच शिजवून खाणं.. सह्याद्रीच्या डोंगररांगांत हरवून जाणं.. आपल्या तोकडेपणाची जाणीव करून देणाऱ्या समुद्रात उडी मारून पोहणं.. शिवथरघळीत एकटय़ानं घेतलेला ‘धबाबा तोय आदळे’चा प्रत्यक्ष अनुभव.. हे सर्व अनुभव नवे आणि वेगळे. माझ्यासाठी हेच पर्यटन आहे. निसर्गाचा रसरशीत अनुभव देणारं..’’ सांगताहेत अभिनेते यतीन कार्येकर.
प्रत्येकाची पर्यटनाची एक व्याख्या असते. वर्षभर कामं करून शिणल्यावर ठरलेल्या काळासाठी ठरवलेल्या ठिकाणी जायचं, तिथे हॉटेलांत ए.सी. रूममध्ये राहायचं, शक्य असेल तितकं पाहायचं आणि पुन्हा नव्यानं शिणून घेण्यासाठी घरी परतायचं, ही पर्यटनाची एक सर्वसामान्य व्याख्या. माझी व्याख्या अशी नाही. मनात आलं की उठावं, कधी बाइक घ्यावी, कधी कार काढावी, कधी ट्रेनमध्ये बसावं, मनात येईल तिथं जावं, नव्या जागा बघाव्यात, नव्या माणसांना भेटावं, त्यांच्यात बसावं, तिथेच एखाद्या झोपडीत राहावं, एखाद्या माउलीच्या हातचा भाकरतुकडा हातात घेऊन बुक्कीनं फोडलेल्या कांद्यासह खावा, झाडाखाली बसावं, तिथल्याच विहिरीचं वा ओढय़ाचं पाणी प्यावं, मनात आलं की घरी परतावं, हे माझं पर्यटन. लहानपणापासून आम्ही असंच करत आलोय.
माझी आठवण तगडी आहे! वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून मला सारं आठवतं. फ्लॅश बॅक- माझ्या धाकटय़ा भावांचा जन्म झालेला नव्हता. मम्मी आणि पप्पा (अभिनेत्री आणि डॉक्टर ज्योत्स्ना कार्येकर आणि डॉ. शरद कार्येकर) कित्येकदा पुण्याला जायचे, लागूकाकांकडे. म्हणजे डॉ. श्रीराम लागूंकडे! आमच्याकडे मॉरिस कार होती. पुण्याला जाताना वाटेत खोपोलीला थांबायचं, रमाकांत किंवा संगम हॉटेलमध्ये बटाटेवडे खायचे. मगनलाल चिक्कीची खरेदीही व्हायची. प्रवास सुरू असायचा. कधी तरी पुणं यायचं. आम्ही लागूकाकांच्या घरी पोहोचायचो. दुसऱ्या दिवशी सकाळी लगबग असायची, ती लवकर घराबाहेर पडण्याची. लागूकाका त्यांच्या मर्सिडीजमधून आम्हाला घेऊन निघायचे. ते, दीपामामी (दीपा लागू) आणि आम्ही तिघे. खूप वेळा आम्ही पाचगणी, महाबळेश्वराकडे जायचो. त्या काळात (मी १९६९ ची गोष्ट सांगतोय.) रस्ते फारसे तयार झालेले नव्हते. जे होते ते खडबडीत आणि जेमतेम एखादी कार जाऊ शकेल असे रस्ते! पर्यटनाविषयी जागरूकता आणि त्यासाठी शासनानं खर्च करायची पद्धत अलीकडे, गेल्या पंचवीस-तीस वर्षांत सुरू झाली असावी. तर, ही मोठी मर्सिडीज घेऊन जाताना समोरून एखादा ट्रक, एखादी एस.टी. (लाल डबा- एके काळची महाराष्ट्राची ती जीवनवाहिनी होती. मी भरपूर भटकलोय तिच्यामधून!) किंवा अगदी बैलगाडी आली, की मग ठरायचं- रस्त्याच्या किनारीवरून कोणत्या गाडीनं खाली उतरायचं, दुसरीला जायला रस्ता करून द्यायचा.
बहुतांशी लागूकाकांची गाडी खाली उतरायची. लागूकाका आणि पप्पा हे दोघंही डॉक्टर. पप्पा डोळय़ांचे डॉक्टर, पण त्यांच्यात डॉक्टरी गप्पा व्हायच्या नाहीत हे आठवतंय. ते सारे सतत नाटकाबद्दल बोलत असायचे. मम्मी आणि तिची सर्व भावंडं मराठी नाटय़सृष्टीत काही तरी भरीव करताहेत, हे कळण्याची समज नव्हती आणि वयही नव्हतं. त्या वेळी हे चौघं कोणत्या गप्पा मारायचे ते आज सांगता येणार नाही किंवा ते आठवतही नाही. पण आठवतात ते त्या चौघांचे हसरे, आनंदी चेहरे. वाईवरून पुढे जाताना त्या परिसरातल्या ऐतिहासिक वास्तू म्हणून मंदिरं पाहिलेली आठवतात. घाट रस्त्याची वळणं वळणं घेत गाडी पुढे सरकत असायची. खिडकीतून बाहेर पाहताना मी मम्मीला विचारायचो, ‘‘आपण त्या डोंगराच्या टपावर जाणार ना? मग मला आकाशाला हात लावता येईल.’’ ती हसायची. सांगायची, ‘‘बघ, प्रयत्न कर!’’ पाचगणीचं ते पठार, डोंगरमाथ्यावरचा तो माझ्या डोळय़ांत न मावणारा जमिनीचा तुकडा, तिथे उतरल्यावर मला वाटायचं, आकाशाच्या खूप जवळ आलोय. मी हात वर करायचो, पण आकाश हातात गवसायचं नाही. लागूकाका आम्हाला कासच्या पठारावर घेऊन जायचे. तेव्हा ते आजच्याइतकं प्रसिद्ध नव्हतं, पण कासच्या पठारावर बहरलेली फुलांची सृष्टी मोहून घ्यायची. मम्मी, पप्पा त्याबद्दल खूप काही सांगायचे. ती फुलराई बघून फुललेले त्यांचे चेहरे मला अद्यापही आठवतात!
कट टू- पावनिखड! माझी मोठी अक्काआत्या (उर्मिला सालये) तिच्या मुलांना व आम्हा भाच्यांना घेऊन दर सुट्टीत कुठे ना कुठे जात असे. एकदा तिनं आम्हाला कोल्हापूरला नेलं. पन्हाळा किल्ला दाखवला. तो दाखवताना एक बंगला दाखवला, म्हणाली, ‘‘हा लता मंगेशकरांचा बंगला!’’ तिथून थोडं अंतर चालत नेलं आणि सज्जाकोठी दाखवली. सज्जाकोठीत छत्रपती संभाजी महाराजांना ठेवलेलं होतं, ती सारी कथा तिनं सांगितली. पन्हाळय़ावरून तिनं आम्हाला विशाळगडाकडे नेलं. वाटेत एका ठिकाणी थांबली, म्हणाली, ‘‘चला आता आपण चालत जाऊ या.’’ आम्ही तिच्या मागे निघालो. तिनं एका अवघड पायवाटेवरून आम्हाला दोन डोंगरांच्या कपारीत उतरवलं. तिथल्या दगडांना स्पर्श करत ती म्हणाली, ‘‘ही पावनिखड!’’ चौथीच्या पुस्तकात वाचलेला बाजीप्रभूंचा इतिहास तिनं डोळय़ांसमोर उभा केला. आजही तो क्षण, तो थरार मनात जसाच्या तसा जागा आहे.
कट टू- कर्जत. आमचं फार्म हाऊस होतं सावळा सोसायटीत. पावसाळय़ातल्या एखाद्या शनिवारी मी भल्या पहाटे बाइकला किक मारायचो. कर्जतला विलूआत्याकडे फोडणीचा भात किंवा थालीपीठ खायचो. कधी बाइक घेऊन जवळच असलेल्या आंबिवली गावात जायचो. तिथून पेठच्या किल्ल्याचा सुळका बघत बघत वर जायचो. एकटाच. किल्ल्यावर गोडय़ा पाण्याचं एक टाकं आहे, भैरोबाची गुहा आहे, तोफा आहेत. कडय़ाच्या टोकावर जाऊन एकटाच बसायचो. पावसाची सर यायची. भिजायचं! पायाखालून एखादा साप सरसरत जायचा, एखादी गाय जवळ यायची, अंग घासून जायची, तिच्या मानेला स्पर्श करून पाठीवर हात फिरवत बसायचं. छोटय़ाशा शेताच्या बांध्यावर लाजाळूची चिमुकली झाडं असायची. उगाच त्यांना हात लावायचा, की मग पानं मिटून जायची. ती पानं मिटता मिटता मन उमलून यायचं! सह्याद्रीच्या डोंगररांगांत हरवून जायचो. भूकही लागायची नाही. परत येताना एखाद्या स्थानिकाच्या झोपडीत डोकवायचं. मिळाला तर गुळाचा चहा प्यायचा. त्याला दुवा द्यायचा आणि खाली उतरायचं. दुसऱ्या दिवशी एम.एस्सी.च्या अभ्यासाला सुरुवात. ही सवय अजूनही कायम आहे.
कट टू – एम.एस्सी. मरीन झूऑलॉजीचा वर्ग. माशांची गणती करण्यासाठी किंवा त्यांच्या वेगवेगळय़ा प्रजाती काय हे समजून घेण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना कोळी बांधवांबरोबर खोल समुद्रात जावं लागे. ती एक जबरदस्त मजा असायची. दोन दोन दिवस समुद्रात ही मंडळी मासेमारी करत असायची. मासेमारी करणं ही पेशन्स वाढवणारी गोष्ट आहे. निळय़ाभोर आकाशातून आग ओकणारा सूर्य, समुद्राचा खारा वारा, ते सारं सोसत माशांची झुंड येण्याची वाट बघणं, योग्य ते मासे पकडणं, हे सारं भन्नाट आहे. मी ते बारकाईनं बघत असे. बोटीच्या आजूबाजूनं समुद्रात उडी मारून पोहत असे. आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या प्रोटेक्टिव्ह वस्तू नसत, पण कोळी बांधव आजूबाजूला असत. खोल समुद्रात उतरल्यानंतर जी माणसाच्या चिमुकलेपणाची जाणीव होते ती वेगळीच! त्यातही खोल समुद्रात तुमची बोट तरंगत असताना, काळोख्या रात्री दिसणाऱ्या विशाल आभाळात ग्रह-तारे पाहताना आपल्या तोकडेपणाची होणारी जाणीव आणखीच वेगळी. समुद्रात होणारी संध्याकाळ, समुद्रात विलीन होत जाणारा सूर्य, अंधाराची सृष्टीवर हळूहळू बसत जाणारी पकड आणि अचानक अंधार झाल्याची जाणीव होणं. हवेत जमा होत जाणारा खारट, उबदार गारवा! धमाल यायची. तुम्ही जेव्हा समुद्रातून आलेली ताजी मासळी घेण्यासाठी धावता, तेव्हा खरं तर ती बर्फात ठेवलेली मासळी एक दिवस तरी जुनी असते. मी समुद्रात मासेमारी सुरू असताना नेटमधून आलेली, त्यातून सोडवता सोडवता थेट सोललेली आणि स्टोव्हवर रटरटत असलेल्या रश्शात टाकून शिजवलेली तळहातभर मोठी कोलंबी किंवा सुरमई, पापलेट तिथंच खाल्लंय. त्या चवीचं वर्णन करणं अशक्य!
कट टू- राजस्थान. १९८८. चंबळच्या खोऱ्यातलं रावतभाटा. तिथं एम.एस्सी.च्या अभ्यासासाठी एका कार्यशाळेत सामील झालेलो. वर्कशॉप संपल्यावर रात्रीच्या बसनं मुंबईला जायला निघालो. बस फुल्ल होती. मी कंडक्टरला म्हणालो, ‘‘मी मधल्या पॅसेजमध्ये झोपेन.’’ त्याप्रमाणे मी पथारी पसरली आणि झोपलो. तिथे एक सज्जन गृहस्थ होते. त्यांना ते फारसं पटलं नाही. मला म्हणाले, ‘‘आप मेरे यहाँ आईये, यहाँ बैठिये।’’ ते ऐकतच नव्हते. शेवटी मी बसलो. गप्पा मारू लागलो. वाटेत उदयपूर आलं. ते उदयपूरचे होते. त्यांनी मला आग्रह करकरून उदयपूरला उतरायला लावलं. दोन दिवस ठेवून घेतलं, भरपूर फिरवलं. उदयपूर म्हणजे तलावांचं शहर. वर्षभरात जेमतेम ३२ इंच पावसाच्या त्या शहरात किती तरी तलाव आहेत. जेव्हा कोणत्याही, आज आधुनिक वाटत असलेल्या सुविधा नव्हत्या, त्या काळात तलावांचं हे शहर उदयसिंग राजानं कसं वसवलं असेल हा प्रश्न मला पडला. तिथे मका, ज्वारी, गहू, मोहरी अशी पिकं घेतली जातात, माशांच्या शेतीच्याही सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत. या उद्यमशीलतेनं मला त्या वयातही मोहवून टाकलं. खास पाहुणचार केल्यावर त्यांनी दोन दिवसांनी मुंबईच्या बसमध्ये स्वत: तिकीट काढून मला बसवून दिलं. आपल्या भारतात अशीही माणसं असतात! त्यांचा आणि माझा अद्यापही संपर्क आहे, फक्त त्यांचं नाव सांगायचं नाही अशी त्यांची अट असल्यानं ते सांगत नाही इतकंच.
कट टू- शिवथरघळ. धुंवाधार पाऊस कोसळत होता. घरी कुणालाही न सांगता पहाटे बाइक काढली. कुठे जायचं ते ठरवलं नव्हतं. मम्मीला फक्त चिठ्ठी लिहून ठेवली, ‘भटकायला जातो, दोन दिवसांत येतो.’ पालीला आलो. वाटलं, जवळच टाटाचं पॉवर जनरेशन प्लांट आहे भिऱ्याला, तिथे जाऊ या. गेलो. अक्षरश: ढगांत होतो. कोणाची तरी ओळख काढली. रात्रीचा आसरा मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो, तो थेट गोरेगाव ओलांडून महाडपर्यंत पोहोचलो. आठवलं, जवळच शिवथरघळ आहे. रस्ताही जातो तिथवर. रस्ता भिकार होता, पण बाइकसाठी पुरेसा होता. घळीपासून दूरवर बाइक उभी केली. दगडांवरून उडय़ा मारत घळीजवळ पोहोचलो. आकाशातून पाऊस आणि घळीच्या समोरून प्रचंड धबधबा कोसळत होता. दासबोधाची रचना इथेच झाली असं मानतात. रामदासांनी ‘धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आदळे।’ असं का म्हटलंय हे प्रत्यक्ष तिथे जाऊन अनुभवल्याशिवाय कळणार नाही. मी घळीच्या आत गेलो. आत घळभर गारवा आणि धबधब्याच्या प्रपाताचा नाद भरून होता. तिथेच बैठक मांडली. हळूहळू तंद्री लागत गेली. तो नाद माझ्या अंगात झिरपत गेला. मी त्या निसर्गाच्या विराट रूपात विरून गेलो होतो. माझा मी राहिलोच नाही..
कट टू- कोकणातल्या डेरवणजवळचा एक निर्जन समुद्रकिनारा. एका चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. एका बोटीवरच सेट लावलाय. भर दुपारी बारा वाजताची वेळ. ऊन मी म्हणतंय. अशा वेळी एक आजी आपल्या नातवाबरोबर मोटारसायकलवर बसून आल्या. माझ्याजवळ येऊन डोळे किलकिले करून बघितलं आणि म्हणाल्या, ‘‘शरदचा मुलगा ना रे तू?’’ मी आश्चर्यचकित होऊन ‘हो’ म्हणालो. ‘‘अरे, मी त्याची पेशंट. त्यांनीच माझं डोळय़ाचं ऑपरेशन केलेनी! आमच्या ‘ह्यां’चंपण केलेलं, माझ्या लेकाचंपण केलेलं.. बरं वाटलं तुला पाहून! आता डॉक्टर जगात नाही, पण तुला भेटले ना! बस. सांग मनातल्या मनात बापसाला हात जोडून, त्यानं डोळे दिलेले लोक आहेत अजून!’’ पप्पा अनेक वर्ष एस.टी.च्या रातराणीनं चिपळूणला डॉ. गोखले यांच्या हॉस्पिटलमध्ये जायचे. पहाटे पोहोचायचे, लगेच त्यांची ऑपरेशन्स सुरू व्हायची, ती साडेपाचपर्यंत चालायची. नंतर थोडा वेळ फ्रेश होऊन त्यांची ओ.पी.डी. सुरू व्हायची. मी अनेकदा पप्पांच्याबरोबर जायचो. कशेडी घाट आला, की घाटमाथ्यावर एक इंग्रजी ‘व्ही’ आकाराचं वळण घेऊन बस उताराकडे वळायची. मला ते पाहायला जाम आवडायचं. बस उताराला लागली की डावीकडे उंच भिंत बांधलेला कडा दिसायचा. उन्हाळय़ाच्या दिवसांत आंबे झाडावरून पाडून खाण्याची मजा और होती. त्या आठवणी जागवत मी करोनाकाळात खेडमध्ये अशोक नायक यांच्या फार्मवर बरेच दिवस राहिलोय.
कट टू- न्यूझीलंड. एका मालिकेच्या प्रोमोसाठी मी गेलो होतो आणि एका दहा सीटर मर्सिडीजमधून न्यूझीलंडच्या ऑकलंड एअरपोर्टवरून क्वीन्सटाऊनला चाललो होतो. साडेबारा तासांचा प्रवास, डोंगरदऱ्यांतून जाणारा रस्ता. हा कारचा प्रवास अचानक झाला. त्याचं असं झालं- मुंबई ते चेन्नई, चेन्नई ते सिंगापूर आणि सिंगापूर ते ऑकलंड, असला भलामोठा प्रवास. त्यात सिंगापूर ते ऑकलंड हा थकवणारा, कंटाळवाणा प्रवास. तो झाल्यावर आम्हाला छोटय़ा फ्लाइटनं क्वीन्सटाऊनला जायचं होतं. प्रोडय़ूसरनं आमच्याजवळ इतकं सामान दिलं होतं की बस! ते गोळा करून आम्ही लोकल फ्लाइटसाठी जाईतो ती फ्लाइट निघून गेलेली. आम्ही प्रोडय़ूसरला फोन केला. त्यानं आमच्यासाठी एक मर्सिडीज करून दिली. आम्ही ऑकलंडहून निघालो. विमानानं पंचेचाळीस मिनिटांचं ते अंतर, कारनं जवळपास आठ तासांचं होतं! रस्ता डोंगरा-डोंगरातून जात होता. तिथे सूर्य लवकर मावळतो. दुपारी तीनच्या सुमारास आम्ही निघालो. अंधार पडायला सुरुवात झाली होती. पण त्या वेळी तो वळणावळणांचा रस्ता स्वप्नवत भासत होता, हिरवीगार डोंगरराजी.. आपल्या कोकणांतही असते ती, पण इथली हिरवाई काही वेगळीच होती. छोटय़ा छोटय़ा झऱ्यांसारख्या खळखळणाऱ्या नद्या, नदीकाठांवरची छोटी छोटी गावं, त्या गावांतल्या अद्ययावत सोयी, उत्तम रस्ते, ठिकठिकाणी फूड जॉइंट्स, हसतमुख, कष्टाळू माणसं. अंधार पडत गेला, पण मनात भीती नव्हती. वळणावळणांवरची उंच उंच झाडं, कारच्या प्रकाशात फिरणाऱ्या त्यांच्या सावल्या, कारमध्ये उबदार वातावरण असूनही अवतीभवती असलेला जाणवणारा हवेतला गारवा. सारं काही अद्भुत होतं. रस्त्यात मध्येच गाडी खडखड आवाज करत होती, शेणाचा पो असावा अशा गोळय़ांवरून जाताना तो आवाज होत होता. मी ड्रायव्हरला विचारलं, ‘‘हा कसला आवाज?’’ तो म्हणाला, ‘‘ओह, दीज आर रॅबिट्स.’’ येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे मरण पावलेले ते ससे होते. काय?.. मी किंचाळलोच? या निसर्गरम्य देशात मुक्या प्राण्यांचा असा मृत्यू होतोय आणि या ड्रायव्हरला त्याबद्दल काहीच वाटत नव्हतं? जवळपास चाळीस तासांचा प्रवास झाला होता. हे ससा प्रकरण कळेपर्यंत शरीराला प्रवासातून आलेला थकवा आता जाणवत नव्हता. पण, नंतर मी कोसळलोच! न्यूझीलंडमध्ये फिरताना त्यांच्या उंच दणकट पोलिसांच्या हातात फक्त दंडुके असलेले पाहिले. मला या गोष्टीविषयी कुतूहल वाटलं. मी शेवटी एकाला विचारलं, ‘‘तुमच्याजवळ फायरआम्र्स (पिस्तुलं) कशी नाही?’’ तो म्हणाला, ‘‘वुई डोण्ट नीड इट. आम्हाला त्याची गरज नाही. इथे गुन्हे जवळपास घडतच नाहीत.’’
प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल असायला हवं. कुतूहल हा पर्यटनाचा मूलमंत्र आहे. कुतूहलपूर्तीच्या वेळी जो आनंद मिळतो, तो वेगळा असतो. मी त्या आनंदाच्या शोधात असतो. मनातली गोष्ट सांगू?.. आपण या जगात आलोय तेच समजा नव्वद वर्षांचं आयुष्य घेऊन आलोय. आपण एक पर्यटकच आहोत या जगण्याचे. आलाय तो जाणारच. आपण आपल्या आत्म्याला काय दाखवतोय, त्याला जगण्यातले वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी आपण कसं प्रशिक्षित करतोय हे महत्त्वाचं. खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधलं आपलं जगणं हेच एक आनंद पर्यटन नव्हे का?..
शब्दांकन- डॉ. नितीन आरेकर
yateenkary1@gmail.com