‘‘डोंगरवाटा, गड-किल्ले, निसर्ग या भ्रमंतीची आवड लहानपणीच लागली. एकटंच ट्रेकिंगला निघायचं, गावकऱ्यांना विचारत पायी रस्ता शोधायचा, कुणी जात नाही अशा ठिकाणी जायचं, हा पुढे नित्यक्रम झाला. या ‘भटके’पणानं मला एक वेगळी ओळख दिली, ती फोटोग्राफर आणि लेखक म्हणून. माझी १२ पुस्तकं प्रकाशित झाली. राज्यातल्या आणि बाहेरच्याही अनेकांना माझे अनुभव ‘टूर गाइड’सारखे उपयोगी पडताहेत, हे पाहून आणखी हुरूप आला. या छंदानं मला आकाशातल्या रंगाऱ्याच्या कुंचल्यातून धरणीवर उतरलेल्या रंगांचा आस्वाद घ्यायला शिकवलं!’’ सांगताहेत अभिनेते मिलिंद गुणाजी.

पर्यटनाची आवड कुणाला नसते? रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक-दोन दिवस तरी सवड काढून एखाद्या निवांत ठिकाणी, निसर्गाच्या सहवासात जाऊन राहण्याची इच्छा प्रत्येकाला असते; पण ते सर्वाना सहज जमतंच असं नाही. मी मात्र याबाबतीत भाग्यवान ठरलो. लहानपणीच, म्हणजे तिसरीत असल्यापासून वडील आम्हाला दरवर्षी सुट्टीत कुठे ना कुठे घेऊन जात. वडिलांच्या खांद्यावर बसून लोहगड, विसापूर हे किल्ले बघितल्याची आठवण अजूनही ताजी आहे. त्यामुळे भटकण्याचं वेड मला लहानपणीच लागलं.

dependent personality disorder
स्वभाव-विभाव : अवलंबित्वाचं जग!
philosophy of living
सांधा बदलताना : जगण्याचं तत्त्वज्ञान
winter diet chaturang loksatta
आला हिवाळा…
transgender chaturang article
आहे जगायचं तरीही…
soar higher in life leaving behind bad past incident
इतिश्री : उंच भरारी घेण्यासाठी…
fear in human emotions fear of emotions and feelings
‘भय’भूती : भीतीचा आकाश पाळणा
politicians degrade statements on women
स्त्री ‘वि’श्व : स्त्रीद्वेष्ट्यांना पुरून उरणाऱ्या नेत्या
loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण

कॉलेजात गेल्यावर माझी स्वतंत्र भटकंती सुरू झाली. त्याच वेळी माझ्याकडे आधी ‘पेंटॅक्स के १०००’ आणि कालांतरानं उत्तम प्रतीचा ‘निकॉन’ कॅमेरा आला. मग जे जे मनाला भावलं, ते कॅमेऱ्यात टिपण्याचा छंद लागला. बऱ्याचदा मी एकटाच कॅमेरा, गिर्यारोहणाचं साहित्य आणि जिथे जायचंय तिथला नकाशा घेऊन बाहेर पडत असे. कधी एस.टी.नं, कधी मोटारसायकलनं. डोंगरातली वाट गावकऱ्यांना विचारून स्वत:च चालत चालत शोधायची, ही शिस्त मी स्वत:ला लावून घेतली होती.

हळूहळू माझ्याकडे बरेच चांगले फोटो जमा झाले. ते अनेकांनी बघावेत असं मला वाटू लागलं. म्हणून एक दिवस मी माझी ही ‘अदाकारी’ घेऊन ‘लोकप्रभा’ कार्यालयात गेलो. संपादक प्रदीप वर्मा म्हणाले, ‘‘फोटो छान आहेत, पण याबरोबर थोडी माहिती, भटकंतीतले अनुभव दिलेत तर वाचकांना जास्त आवडेल.’’ मग पहिला लेख माळशेज घाटावर लिहिला आणि लिहीतच सुटलो! मिळालेल्या प्रोत्साहनामुळे हुरूप येऊन मी महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडांपासून लोणारच्या निसर्गदत्त सरोवरापर्यंत ते ताडोबाच्या जंगलापर्यंत.. यातून पुस्तकाची संकल्पना पुढे आली आणि ‘माझी मुलुखगिरी’ हे माझं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं.

शिवाजी महाराजांचे सारे किल्ले मी पालथे घातले, पण माझ्या हृदयातलं, राजगडाचं स्थान वेगळं आहे. तिथली वाट न वाट माझ्या पायाखालची आहे. राजगडाच्या पाचशे फूट उंचीच्या बालेकिल्ल्यावर चढण्यासाठी अजूनही शेवटचा काही भाग दगडातील खोबणीत हात घालून पार करावा लागतो. या गडावरून भल्या पहाटे सूर्योदय पाहण्यासारखी दुसरी अद्भुत गोष्ट नाही! राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून दक्षिणेला भाटघर जलाशय, महाबळेश्वर, रायरेश्वराचं पठार, मकरंदगड, पश्चिमेला रायगड आणि लिंगाणा, उत्तरेला तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, सिंहगड आणि पूर्वेला पुरंदर, अशा अनेक किल्ल्यांचं सुंदर दृश्य दिसतं.

हेही वाचा… कलावंतांचे आनंद पर्यटन: प्रश्नांची उत्तरं शोधणारी भटकंती!

राजगडावरची एक आठवण, माझ्या मर्मबंधातली ठेव आहे. या गडाच्या संजीवनी, सुवेळा आणि पद्मावती या तिन्ही माच्यांवरून वर येण्यासाठी निरनिराळे मार्ग आहेत. यांपैकी गिर्यारोहकांना सर्वात लवकर पोहोचवणारा मार्ग म्हणजे पद्मावती माचीवरचा चोरदरवाजा रस्ता. एकदा या दरवाजातून वर चढून गेलो आणि पहाटे ५ च्या सुमारास माचीवर थडकलो. आजूबाजूला कुणीही नव्हतं. हॅवरसॅक बाजूला टाकली आणि पद्मावती तलावाच्या काठी एका खडकावर विसावलो. समोरचा तोरणा आणि राजगड यांमध्ये दरीवर धुक्याचं पूर्ण आवरण होतं. नुकतंच फटफटू लागलेलं. ढगांची दुलई अंगभर पांघरून बसलेल्या राजगडावर उगवत्या सूर्याची किरणं रेशीम पावलांनी प्रवेश करत होती. सगळा आसमंत लालसर सोनेरी! त्या काळात मी हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली होती. गुरुजींकडे तीन-चार वेळाच गेलो असेन.. पहाटेच्या संधिप्रकाशात सुरम्य, संदिग्ध वातावरणाची निर्मिती करणारा ‘ललत’ राग मी तेव्हा शिकत होतो. पुढे हे शिक्षण चित्रपटांच्या व्यग्र जीवनक्रमामुळे थांबलं ते कायमचंच! पण राजगडावरचं पहाटेचं ते जादूभरलं वातावरण पाहून माझ्याही नकळत मी ‘ललत’ आळवायला सुरुवात केली. माझा असा काही सूर लागला होता म्हणून सांगू! डोळय़ांसमोर पद्मावती तलाव, तोरण्याचं टोक ढगाआडून डोकावतंय आणि मी ‘ललत’च्या सुरांमध्ये हरवून गेलोय! या अनुभवावर लिहिलेला ‘ललत आणि राजगड’ हा लेख माझ्या ‘अनवट शब्द, सूर, डोंगरवाटा’ या पुस्तकात आहे. या भटकंतीत गडकोट, नदी, गुहा आणि पठारंही आहेत. राजगड, हरिश्चंद्रगडाबरोबर सुधागड, गाविलगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड, सज्जनगड, लोहगड, राजमाची, सूरगड, असे अनेक गड मी पालथे घातले. भीमाशंकरची रमणीयता अनुभवली. कळसूबाईची डोळय़ांत न मावणारी उंची मनात साठवली. कास पठारावरच्या रंगांच्या सोहळय़ाचं दर्शन घेतलं. सह्याद्रीतल्या पावसात चिंब भिजलो. असे समृद्ध अनुभव देणाऱ्या, तेव्हा न रुळलेल्या ठिकाणांची ओळख करून देणाऱ्या माझ्या या पुस्तकाला २०१२ चा उत्कृष्ट मराठी वाङ्मयनिर्मितीचा राज्य पुरस्कार मिळाला होता.

चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणानिमित्तानं केलेल्या भटकंतीतल्या अनुभवांवर मी ‘चंदेरी भटकंती’ हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं दुहेरी भाग्य असं होतं, की त्याला प्रस्तावना बाळासाहेब ठाकरे यांनी लिहिली होती आणि प्रकाशन अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झालं. बाळासाहेबांचे शब्द होते, ‘हा मिलिंद मला भटक्या समाजाचा नेता वाटतो. याचं भ्रमंतीचं वेड इतकं जबरदस्त आहे, की आज जर होनाजी बाळा हयात असते, तर ‘माझा मुकुंद कुणी हा पाहिला’ऐवजी ‘माझा मिलिंद कुणी हा पाहिला’ म्हणाले असते! काही पदार्थ असे असतात, की ते खाऊ लागल्यावर आवरणं कठीण होतं. उदाहरणार्थ पुणेरी मिसळ, गिरगाव चौपाटीवरील भेळ-पाणीपुरी, भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा, हे खाण्यात जी मजा आहे, तोच हवाहवासा चविष्टपणा मिलिंदच्या पुस्तकात जागोजागी आढळतो. या मिलिंदनं ‘गुणाजी’ आडनावाचा सन्मान केला आहे.’ त्या शब्दांनी माझ्या भ्रमंतीला अधिकच बळ मिळालं.

त्याआधीच, म्हणजे २००१ मध्ये ‘अल्फा’ वाहिनीवर (आजचं ‘झी टीव्ही’) माझी ‘भटकंती’ ही मालिका सुरू झाली होती. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तो पाहून माझ्या संबंधित लेखांचं ‘भटकंती’ या नावानंच पुस्तक प्रकाशित करण्याचं ठरलं. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हरिश्चंद्रगडावरच करण्याची अभिनव कल्पना, संतोष कोल्हेंच्या, म्हणजे या मालिकेच्या दिग्दर्शकांच्या मनात आली. प्रमुख पाहुणा म्हणून येण्यास कवी सौमित्र (किशोर कदम) यांनी आनंदानं संमती दिली. मालिकेदरम्यान खूप प्रेक्षक ‘आम्ही तुमच्याबरोबर एखाद्या ट्रेकला येऊ शकतो का?’ अशी सातत्यानं विचारणा करत होते. मग अल्फा वाहिनीवरून, ‘ज्यांना हरिश्चंद्रगडाच्या सफरीला आमच्याबरोबर यायचं आहे, त्यांनी माळशेज घाट ओलांडल्यावर गडाच्या पायथ्याशी असलेल्या खिरेश्वर गावाच्या बाहेर, अमुक ठिकाणी जमावं,’ असं जाहीर केलं. ठरल्याप्रमाणे १६ ऑगस्टला आमची टीम ठरलेल्या जागी पोहोचली, तेव्हा धो धो पाऊस पडत होता. जिथून गड चढायचा, ती टोलारिखड आणि आजूबाजूचे डोंगर धुक्यात अदृश्य झाले होते. तरीही पाऊस, वारा आणि थंडीची पर्वा न करता जवळजवळ पाचशे ते सहाशे लोक आम्ही येण्याआधीच तिथे हजर होते! आम्ही अवाक झालो. विशेष म्हणजे यात सर्व वयोगटांतली मंडळी होती. मुख्य प्रश्न होता राहण्याचा. वर ज्या तीन गुहा होत्या, त्यात मिळून जास्तीत जास्त शंभर ते दीडशे माणसं राहू शकणार होती. मग आम्ही जवळपासच्या गावातल्या लोकांची कशीबशी समजूत घालून त्यांना परत पाठवलं.

थोडय़ाच वेळात गडावर चढण्याची दुर्दम्य इच्छा असलेली बाकीची मंडळी, वर लावण्यासाठी आणलेले तंबू घेऊन माहीतगार ट्रेकर्सबरोबर डोंगर चढू लागली. दोन-तीन तासांत वर चढून आल्यावर लावलेले तंबू त्या रात्रीच्या वादळी पावसात उडून गेले आणि तंबूतले सर्व जण गुहेच्या आश्रयाला आले. गुहेत आधीच विसावलेले काही रसिक आणि आसऱ्याला आलेली गाई-गुरं, यांच्याबरोबर या नव्यानं आत शिरलेल्या मंडळींची चांगलीच दाटी झाली. तरीही सर्वाना एक वेगळंच थ्रिल जाणवत होतं. सौमित्रच्या बहारदार कवितांनी वातावरण हलकंफुलकं केलं. आमच्याबरोबर आलेल्या दोन गावकऱ्यांनी दगडांची चूल पेटवली, गरमागरम कांदा-बटाटा रस्सा आणि नाचणीच्या भाकऱ्या केल्या. त्याला अमृताची चव आली! एक प्रचंड मोठा धबधबा गुहेवर कोसळत होता. त्या पार्श्वसंगीताच्या तालावर रात्री खूप उशिरा, सर्व जण दाटीवाटीनं, मिळेल तिथे जागा पकडून झोपले. दुसऱ्या दिवशी गडाचं शूटिंग आणि पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्या दडपणानं मला भल्या पहाटेच जाग आली होती. समस्त मंडळी गाढ झोपेत होती. उजाडायचं बाकी होतं. पावसाचा जोर कमी झाला होता, पण धबधबा त्याच ताकदीनं कोसळत होता. सर्वत्र धुकंच धुकं! गुहेपासून पाच-दहा मिनिटांवर असलेल्या हरिश्चंद्रेश्वर मंदिरात एक चक्कर मारावी, असा विचार मनात आला आणि निघालो. मंदिरात दर्शन घेऊन बाजूच्या बैठकीवर थोडा वेळ बसलो. एवढय़ात मागच्या भागात असलेल्या तळघरावरची शिळा हलली आणि एकदम दचकलो. अर्थात इथे तळघर आहे आणि तिथे आजही साधू-संत तपस्या करतात हे मी ऐकून होतो; पण अशा मुसळधार पावसात कुणी असेल अशी पुसटशीही कल्पना नव्हती. तेवढय़ात शिळा बाजूला सरकवून भगवे कपडे परिधान केलेला तरुण योगी तळघरातून बाहेर आला आणि माझ्या समोरच्या बैठकीवर विसावला. त्यानं शांतपणे एक चिलीम शिलगावली आणि झुरके घेऊ लागला. मी न राहावून चौकशी केली. आरपार जाणाऱ्या नजरेनं माझ्याकडे पाहात त्यानं हिंदीतून सांगितलं, की त्याला नावगाव काही नाही! वर्षांनुवर्ष तो असाच फिरतोय. मन रमेल तिथे राहतो, साधना करतो. त्यानं ‘साधना’ या विषयावर अप्रतिम विवेचन केलं. मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. नंतर तो उठला, तळघरात दिसेनासा झाला. तरुण वयातल्या त्या साधूची अध्यात्मातील झेप पाहून मी नि:शब्द झालो. झुंजुमुंजु होण्याआधी हरिश्चंद्रगडावर धुक्या- पावसात, कडाक्याच्या थंडीत त्या योगी पुरुषाच्या सहवासात सत्कारणी लागलेली पहाट मनावर कायमची कोरली गेली.

हेही वाचा… सूर संवाद: उपशास्त्रीय गाण्यांचा अद्वितीय आनंद

‘भटकंती’ मालिकेच्या चित्रीकरणासाठी भ्रमंती करताना एकदा आमच्या जिवावर बेतण्याची वेळ आली होती. अलिबागच्या किल्ल्यावर चित्रीकरण होतं. हा किल्ला कायम पाण्यानं वेढलेला असतो. ओहोटी झाली की आत पायी ये-जा करता येते. आम्ही किल्ल्यात शिरलो, पण कामामुळे बाहेर पडायला थोडा उशीर झाला. तेव्हा भरती सुरू झाली होती. तरीही आम्ही निघालो, कारण आणखी एका किल्ल्याचं शूटिंग करायचं होतं. चालता चालता जेव्हा पाणी माझ्या गळय़ापर्यंत आलं तेव्हा धोका जाणवला आणि आम्ही परत फिरलो. देवाचं नाव घेत कसेबसे किल्ल्यावर पोहोचलो. खरं तर किल्लेदार वरून मोठमोठय़ा थाळय़ा वाजवून आम्हाला इशारे देत होता, पण ते आमच्या डोक्यातच शिरलं नाही. नंतर कळलं, की चारच दिवसांपूर्वी, येण्याजाण्याच्या वाटेच्या बाजूला असलेल्या भोवऱ्यात सापडून चार पट्टीचे पोहणारे बुडून मरण पावले होते. आमच्यासमोरही काळ आला होता, पण वेळ आली नव्हती!

किल्लेदार भला माणूस होता. आधी काहीही कल्पना नसूनही त्यानं आमच्या टीमची पोटापाण्याची व्यवस्था केली. संध्याकाळी ओहोटी लागेपर्यंत आम्हाला किल्ल्यावर थांबणं भाग होतं. सूर्याचा लाल गोळा जेव्हा सागरात बुडू लागला तेव्हा मावळतीच्या किरणांनी आसमंत केशरी झाला. त्या कातरवेळी मी माझ्या टेपरेकॉर्डवर पं. भीमसेन जोशींची ‘पूरिया धनाश्री’ रागातली चीज लावली होती, ‘पार करो अरज सुनो..’. ती आळवणी ऐकताना सकाळचा प्रसंग आठवून आम्ही अक्षरश: गहिवरलो होते.

एखाद्-दोन अपवादात्मक प्रसंग सोडल्यास भटकंतीच्या छंदानं माझ्या झोळीत आनंदाचे अगणित क्षण टाकले. उद्धव ठाकरे यांचं ‘महाराष्ट्र देशा’ हे महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या छायाचित्रांचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं तेव्हा हवाई छायाचित्रण (एरियल फोटोग्राफी) करताना एक मार्गदर्शक मित्र म्हणून त्यांच्याबरोबर जाण्याची संधी मला मिळाली. मी आधी खालून बघितलेले रतनगड, हरिश्चंद्रगड, संतोषगड, इत्यादी डोंगर-किल्ले, त्या वेळी मी प्रथमच वरून पाहिले. या सफरीत काढलेली सर्वच छायाचित्रं पहिल्या पुस्तकात समाविष्ट होऊ शकली नाहीत. मग उद्धवजींनी उर्वरित फोटो माझ्याकडे दिले आणि म्हणाले, ‘‘मिलिंद, तुझा हात लिहिता आहे. या फोटोंखाली तू तुझे अनुभव लिही.’’ त्यातून जे पुस्तक प्रसिद्ध झालं, ते ‘हवाई मुलुखगिरी’. हे माझं आजवरचं शेवटचं म्हणजे बारावं पुस्तक. Offbeat Tracks In Maharashtra आणि Mystical Maharashtra ही माझी इंग्रजी पुस्तकंही प्रसिद्ध झाली आहेत.

आजवर अभिनय क्षेत्रात चार दशकांची कारकीर्द झाली. चित्रीकरणाच्या निमित्तानं देशविदेशात खूप फिरणं झालं. ‘पपीहा’ या माझ्या तिसऱ्या चित्रपटात माझी भूमिका दक्ष वनअधिकाऱ्याची होती. त्यामुळे सर्व चित्रीकरण नागझिरा, ताडोबा, नवेगाव, बल्लारशाह जंगलात झालं होतं. तेव्हा मी वाघ, अस्वल, गवे, अशा जंगली प्राण्यांचे भरपूर फोटो काढले. इथल्या वन्यजीवनावर लिहिलं. आशुतोष गोवारीकर यांची ‘एव्हरेस्ट’ मालिका करताना हिमालयात मनमुराद भटकंती केली. डलहौसीतील खज्जर, काश्मीरमधील गुलमर्ग, सोनमर्ग, उत्तराखंड मधील जोशी मठ, औली ही ठिकाणं माझ्या अत्यंत आवडीची.

परदेशातील सर्वात आवडती जागा कोणती, या प्रश्नावर मात्र माझं डोळे मिटून उत्तर असेल नॉर्वेमधलं ‘फियॉट’वर वसलेलं फ्लॅम हे गाव (‘फियॉट’चा अर्थ उंच उंच डोंगर आणि खालची दरी म्हणजे समुद्र). डोंगरावर वसलेल्या टुमदार घरांची ही वस्ती. खाली निळाशार समुद्र. हे गाव म्हणजे विधात्यानं मन लावून रेखाटलेलं एक सुंदर चित्रच जणू! वळणावळणाचे सुबक रस्ते, हिरव्यागार कुरणांवर चरणारे मेंढय़ांचे कळप, घरासमोरच्या बागेत खेळणारी गोजिरवाणी मुलं, झाडांवर डोलणारी फुलं आणि ढगांनी वेढलेले डोंगर.. जणू परिकथेतलं गाव.

जंगलभ्रमंतीतून काढलेल्या छायाचित्रांची (प्राणी विश्व आणि समृद्ध निसर्ग) मी ‘बालगंधर्व’ (पुणे), ‘कालिदास’ (नाशिक) आणि ‘प्रबोधनकार ठाकरे सभागृह’ (विलेपार्ले, मुंबई) इथे प्रदर्शने भरवली. त्यांनाही तुफान प्रतिसाद मिळाला. लोकांनी अक्षरश: रांगा लावून ही छायाचित्रं पाहिली. प्रदर्शनातून आणि भटकंती या मालिकेतूनही सतत ‘जंगलं जपा, पर्यावरणाचं रक्षण करा, झाडं लावा आणि जगवा,’ असे संदेश देत राहिलो. त्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारनं मला ‘वनं आणि वन्यजीव’ (फॉरेस्ट अँड वाइल्ड लाईफ) यासाठीचा राज्याचा ‘ब्रँड अ‍ॅम्बॅसडर’ (२००८-०९) केलं. आतापर्यंत मी अनेक उत्तमोत्तम ब्रँड्ससाठी मॉडेलिंग केलंय, पण हा बहुमान मला लाखमोलाचा वाटतो. कारण जंगलभ्रमंती हा माझा श्वास आहे आणि जंगलरक्षण हा ध्यास!

न रुळलेल्या जागा शोधून, त्या लोकांना दाखवून त्यांना भ्रमंतीसाठी उद्युक्त करण्याचं वेड इतकं जबरदस्त होतं, की त्यापायी मी भरपूर मोबदला देणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणांमधून महिन्यातले चार-पाच दिवस तरी ‘भटकंती’ मालिकेसाठी काढत होतो. हा कार्यक्रम बघून एक पिढी फिरती झाली, त्यांचे तसे प्रतिसाद आले आणि मी भरून पावलो. खरं तर असे अनेक ‘भटके’ आहेतच, जे सातत्यानं अनुभवलेल्या गोष्टी लिहीत असतात. माझा चेहरा चित्रपटातून ओळखीचा झाल्यानं माझ्या भटकंतीला वलय प्राप्त झालं असावं.

छायाचित्रण आणि लेखनाबरोबर भ्रमंतीनं जन्म दिलेला आणखी एक छंद म्हणजे कविता करणं! निसर्गाची विविध रूपं पाहताना मनातल्या भावना शब्दांत उतरत गेल्या. अनेकदा पायी पालथे घातलेले गड-किल्ले हेलिकॉप्टरमधून नव्यानं बघताना वाटलं..

‘कधी वाटते जुनीच ओळख
नवीन झाली
नाते होते गहिरे कधी तरी
उकल परंतु आता झाली
काळे ढग तर भरले होते
ओली माती आता झाली’

या माझ्या गीतांना कौशल इनामदार यांनी संगीत दिलं आणि ‘मन पाखराचे होई’ हा माझा पहिलावहिला अल्बम आला.

मनात येईल तेव्हा निसर्गाच्या सहवासात रमता यावं म्हणून मी १५ वर्षांपूर्वी खंडाळय़ाला, राजमाचीच्या वाटेवर बंगला बांधला. कामातून थोडी उसंत मिळताच मी या घरी धाव घेतो. पाठच्या डोंगररांगांतून डोकावणारे ढग, माथ्यावरचे आभाळाचे विविध रंग, हवेतला धुंद गारवा, या प्रसन्न वातावरणात माझ्या मनाचं पाखरू होतं आणि गाऊ लागतं..

‘जेव्हा येती कृष्ण मेघ नभी
हलका करण्या भार जळाचा
रंग सुखाचा असतो तेव्हा
शाम सावळा करडा काळा
सुख सुरीले पैंजण बनवी
मुक्त मनस्वी निळय़ा झऱ्याला
सुख बिलगते सूर्य होऊनी
संधिप्रकाशी लाल नभाला
शांत सुखाचे साज असे जणू
योग्यासम काळय़ा डोहाला..
रंग सुखाचे कणाकणावर
रंगूनी जो गेला तो जगला..
रंग उतरतो कुंचल्यातून
आभाळातील रंगाऱ्याचा
रंग सुखाचे टिपण्यासाठी
अपुला कोरा कागद व्हावा’

milindgunaji@gmail.com

शब्दांकन : संपदा वागळे