आपल्या देशात साडेसहा कोटी लोक मधुमेहाचे त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी नवनवीन उपाय शोधण्यात वैद्यकशास्त्र सतत कार्यरत असतच. त्याच्याच प्रयोगातून भात्यामध्ये नवीन बाण समाविष्ट होत आहेत. एसजीएलटी २ इन्हिबिटर्स, इन्शुलिन इन्हेलर्स, इन्शुलिन पंप हे त्यातले काही.
मधुमेहाची जागतिक स्तरावर राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या देशात आज सुमारे साडेसहा कोटी  लोक मधुमेहपीडित आहेत आणि दर वर्षी या संख्येत भर पडत आहे. या रोगामध्ये माणसाच्या स्वादुिपडातील बीटा सेल्स काम करेनासे होतात आणि इन्शुलिनची निर्मिती कमी होते किंवा इन्शुलिन प्रतिरोध निर्माण होऊन त्याचा प्रभाव कमी होतो, परिणामी रक्तातील साखर वाढते आणि त्यामुळे शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांवर दुष्परिणाम होऊन गुंतागुंत होते, हे सामान्यपणे सर्वाना माहीत आहे.
मधुमेहावर मात करण्यासाठी काय करता येईल? या प्रश्नाचं उत्तर वैद्यक व्यावसायिक अनेक र्वष शोधत आहेत. बीटा सेल्सना उत्तेजित करून इन्शुलिनचं उत्पादन वाढवू पाहणारी औषधं ५० वर्षांपूर्वीपासून उपयोगात आली, त्यानंतर स्नायू आणि यकृतामधील इन्शुलिनचा प्रतिरोध कमी करून रक्तातील साखरेची पातळी कमी करणारी, आहारातील साखरेचं शोषण लवकर होऊ न देणारी, आतडय़ातील हॉर्मोन्सवर काम करून रक्तातील साखर कमी करणारी अशी अगणित औषधं बाजारात आली. इतकंच काय, थेट इन्शुलिनचा वापरसुद्धा सुरू झाला. प्रथम बोव्हाइन म्हणजे गाईंपासून मिळवलेलं आणि नंतर रिकॉम्बिनेंट तंत्राने बनवलेलं मानवी इन्शुलिन आणि अलीकडे काही वर्षांपासून कृत्रिम इन्शुलिन वापरली जात आहेत. तरीसुद्धा मधुमेह पूर्णपणे आटोक्यात ठेवणं नेहमी शक्य होतंच असं नाही. रक्तातली साखर अचानक कमी होणं, जेवणानंतरची साखर वाढत राहणं, काही औषधांमुळे वजन वाढणं, औषधांची परिणामकारकता कमी होत जाणं या समस्यांवर मात कशी करणार? नवनवीन औषधांचा आणि इतर उपचारपद्धतींचा शोध याच कारणासाठी सतत चालू असतो. प्रस्तुत लेखात अशा काही नवीन हत्यारांची ओळख करून देणार आहे.
एसजीएलटी २ इन्हिबिटर्स – १८३५ मध्ये सफरचंदाच्या बुंध्यापासून निघणाऱ्या फ्लोरिझिन या द्रव्यामुळे लघवीतून साखर टाकली जाते हे अचानक लक्षात आलं. या गुणधर्माचा मधुमेही रुग्णांसाठी उपयोग करता येईल का? या विचारातून प्रत्यक्ष वापरता येतील अशी औषधं विकसित व्हायला २०१४ साल उजाडलं. सर्वसामान्य माणसाच्या मूत्रातून साखर जाऊ नये म्हणून एसजीएलटी (सोडियम-ग्लुकोज ट्रान्स्पोर्टर-२) हा पदार्थ काम करतो. याला निकामी करणारी औषधं म्हणजेच एसजीएलटी २ इन्हिबिटर्स. यांच्या प्रभावामुळे लघवीतून साखर बाहेर टाकली जाते. त्याचबरोबर पुष्कळ पाणी निघून गेल्याने रक्तदाब कमी होतो. रक्तातील साखर कमी होते. रुग्णाचं वजनही काही प्रमाणात उतरतं. साखर आटोक्यात राहिल्यामुळे हृदय, डोळे, नसा इत्यादी महत्त्वाच्या अवयवांचं रक्षण होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. म्हणजेच मधुमेहातील जवळजवळ सगळे रासायनिक बदल परतवून लावणं यामुळे शक्य होईल.
मात्र या औषधांचे काही दुष्परिणामसुद्धा आहेत, ज्यासाठी सतर्क राहायला हवं. वरचेवर लघवीत जंतुसंसर्ग होणं, मूत्रमार्गात व योनिमार्गात बुरशीचा संसर्ग, वजन अवाजवी कमी होणं, रक्तदाब कमी होणं, रक्तात कीटो अ‍ॅसिडस् नामक विषारी द्रव्य वाढणं वगरे. परंतु हे सगळे परिणाम टाळता येण्यासारखे किंवा उपचार करण्यासारखे आहेत, असं तज्ज्ञ मंडळींचं मत आहे. मधुमेहाचा सामना करण्यासाठी खरोखर हे एक अभिनव हत्यार आहे.
इन्शुलिन इन्हेलर्स –मधुमेहाच्या काही रुग्णांना दिवसांतून अनेकदा इन्शुलिन इंजेक्शन्स टोचून घ्यावी लागतात. अशा कंटाळलेल्या रुग्णांना दिलासा मिळेल अशी गोष्ट म्हणजे इन्शुलिन इन्हेलर. हे एक असं उपकरण, जे दम्याच्या इनहेलरप्रमाणेच काम करतं, त्यातून सूक्ष्म पावडरीच्या रूपातलं इन्शुलिन फुप्फुसात ओढून घेता येतं आणि तिथून ते सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या िभतीतून थेट रक्तात मिसळतं. ही कल्पना बरीच जुनी असली तरी केवळ एका वर्षांपूर्वीच अशा इन्हेलरला यूएसएफडीएची मान्यता मिळाली आहे आणि आता लवकरच ते भारतातही उपलब्ध होणार आहे. या इन्शुलिनचा परिणाम अतिजलद असल्याने ते जेवणाच्या सुरुवातीला किंवा जेवण सुरू झाल्यावर २० मिनिटांत घेतलं पाहिजे. मधुमेहाच्या प्रकार १ व २ दोन्हीमध्ये जेवणानंतर वाढणाऱ्या साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते उपयुक्त आहे. अर्थात रुग्णाची अवस्था स्थिर असायला हवी, म्हणजे कीटो एसिडोसिससारखी गंभीर परिस्थिती नसावी. त्याला सर्दी, दमा इत्यादी श्वसनाचे विकार नसावे आणि धूम्रपान वज्र्य करावं लागतं. बहुधा या इन्शुलिनबरोबर दीर्घ काळ काम करणारं दुसरं इन्शुलिनसुद्धा वापरावं लागतं.
इन्शुलिन पंप – मधुमेह प्रकार १ च्या रुग्णांना (लहान मुलं किंवा तरुण रुग्ण) रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी दिवसातून अनेकदा ग्लुकोजचं प्रमाण मोजून योग्य मात्रा घायची असते. हे अर्थातच खूप अवघड, जिकिरीचं काम आहे. चूक झाल्यास साखर अतिशय वाढल्यामुळे किंवा प्रमाणाबाहेर कमी झाल्यामुळे जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. या चढ-उतारामुळे रुग्णाच्या अंतर्गत अवयवांचं नुकसान होऊ शकतं. यावर १९७० च्या सुमारास एक अभिनव उपाय निघाला, तो म्हणजे इन्शुलिन पंप. सोप्या शब्दात सांगायचं तर हे एक असं उपकरण आहे की जे रुग्णानं सतत अंगावर बाळगायचं असतं. त्वचेखाली घालून ठेवलेल्या एका सूक्ष्म नलिकेतून सतत अगदी कमी मात्रेमध्ये इन्शुलिन शरीरात पंपाच्या साहाय्याने सोडलं जातं. हा डोस स्वादुिपडाच्या सामान्य इन्शुलिन स्रावाइतकाच असतो. या प्रवाहात प्रत्येक जेवणाच्या वेळी वाढ केली जाते. नेमके किती युनिट इन्शुलिन सतत द्यायचं आणि वाढ किती करायची हे त्या वेळच्या साखरेच्या पातळीवर ठरतं. ही पातळी मोजणारा ग्लुकोमीटर हा या उपकरणाचाच एक भाग असतो. पूर्वी अशा तऱ्हेचा पंप बराच ओबड धोबड आणि वजनदार असे. आता प्रत्येक वर्षी त्याच्या बनावटीत सुधारणा होत सध्याचे नवीन पंप वजनात हलके, वापरायला सुटसुटीत आणि अधिकाधिक अचूक होत आहेत. आता साखरेची पातळी वाजवीपेक्षा कमी किंवा जास्त झाल्यास अलार्म वाजतो, तसेच साखर प्रत्यक्षात कमी-जास्त होण्यापूर्वीच त्याची सूचनासुद्धा रुग्णाला मिळते. अलीकडचे नवीन पंप ग्लुकोज सामान्य पातळीत ठेवण्यासाठी इन्शुलिन मात्रेमध्ये जरूर तो बदलसुद्धा करतात. इन्शुलिन पंपाचे ग्राहक बहुधा लहान मुलं किंवा नवतरुण असल्याने इन्शुलिन पंपाचं स्वरूप आकर्षक दिसण्यासाठी काळजी घेतली जाते. मधुमेह प्रकार १चे काही रुग्ण खेळाडू, मॉडेल्स, अभिनेते असल्याने त्यांचा उपयोग जन-जागरणासाठी करण्यात आला आहे, ज्यामुळे अधिकाधिक रुग्णांना पंप वापरण्याची स्फूर्ती येत आहे.
स्वादुपिंडाचे आरोपण- त्वचा, कॉर्निया, मूत्रिपड, हृदय, यकृत इत्यादी यशस्वी अवयव रोपणाच्या दालनात नव्याने प्रवेश केलेली शस्त्रक्रिया म्हणजे स्वादुपिंड ऊर्फ पॅन्क्रियाजचं आरोपण. जेव्हा इन्शुलिननिर्मिती अजिबात होत नसते तेव्हा नवीन स्वादुपिंडाचं आरोपण करणं हाच उपाय उरतो. असे रुग्ण बहुधा मधुमेह प्रकार १ चे असतात. अनियंत्रित मधुमेहामुळे पुष्कळदा किडनीसुद्धा खराब झालेल्या असतात. अशा रुग्णांमध्ये मूत्रिपड आणि स्वादुपिंड दोन्ही अवयव एकाच वेळी घातले जातात. नुकत्याच मरण पावलेल्या दात्याकडून हे अवयव मिळतात. काही वेळा जिवंत दात्याकडून मूत्रिपड मिळाल्यानंतर काही काळाने मृताकडून स्वादुपिंड मिळाल्याने ही शस्त्रक्रिया स्वतंत्रपणे केली जाते. अशा शस्त्रक्रियेत रुग्णाची स्वत:चे स्वादुपिंड तसेच ठेवून निरोगी स्वादुपिंड तिची नलिका लहान आतडय़ाच्या ज्या भागात उघडते त्याच्यासह उदरपोकळीच्या उजव्या भागात ठेवून तेथील रक्तवाहिन्यांशी तिच्या रक्तवाहिन्या जोडल्या जातात आणि नलिका रुग्णाच्या आतडय़ाशी जोडली जाते. नव्या स्वादुपिंडाचे पाचक रसांचे स्राव आतडय़ात सोडल्यामुळे रुग्णाला त्रास होत नाही.
अर्थात यासाठी निष्णात शल्यवैद्य आणि प्रशिक्षित सहायकांची टीम आवश्यक आहे. याच्या प्रशिक्षणाची सोयसुद्धा भारतात आजवर नव्हती. असं असूनही परदेशातून हे कौशल्य मिळवलेल्या भारतीय सर्जन्समुळे आज देशातल्या प्रमुख शहरात दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, कोची अशा ठिकाणी या शस्त्रक्रिया यशस्वीपणे होत आहेत. क्वचित प्रकार २ च्या मधुमेह रुग्णाचीसुद्धा ही शस्त्रक्रिया केली गेली आहे. इतर कोणत्याही अवयव रोपणाप्रमाणे या रुग्णांनाही आरोपित स्वादुपिंड शरीराने नाकारू नयेत म्हणून कायमस्वरूपी औषधं घ्यावी लागतात. परंतु नंतरचं आयुष्य मधुमेहमुक्त जगता येईल या आशेमुळे आता हळूहळू अशा रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आणि शल्यतज्ज्ञांचा अनुभव व आत्मविश्वाससुद्धा.
नव्याने वापरले जाणारे हे बाण मधुमेहाच्या लक्ष्याचा अचूक भेद करतील काय? मधुमेह समाजाच्या इतक्या विविध थरांमध्ये पसरलेला दिसतो आहे की काही प्रमाणात काही रुग्णांमध्ये त्यावर नियंत्रण ठेवणं निश्चित जमेल, असे वाटते.
डॉ. लीली जोशी – drlilyjoshi@gmail.com

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड