अंधारातल्या जगण्यापासून आता सौरऊर्जेचा का होईना प्रकाश अनुभवणाऱ्या आदिवासींचं आयुष्य बदलत चाललं आहे. समाजाच्या विकासाचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे. ही रानाची पाखरं आता आधुनिक सुविधा हाती घेत गगनात भरारी मारू लागली आहेत.. गेली ४० वर्षे आदिवासी पाडय़ावर काम करताना आलेले अनुभव सुनंदा पटवर्धन यांच्याच शब्दांत..
लहानपणापासून ग्रामीण माणसांची दुर्दशा, रुग्णांचे हाल, बाल विधवांचे जीवन हे रोज पाहात होते. फार अर्थ कळत होता असं नाही, पण त्याचे पडसाद मन:पटलावर उमटत होते, त्याची बोच कळत होती. ६०-७० वर्षांपूर्वी तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा सरकारी हॉस्पिटले नसत. एखादे मिशन हॉस्पिटल असे, डोलीतून रुग्णाला आणून भरती करावी लागे. वाई येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षण घेताना सामाजिक स्थितीची जाणीव, होणारे संस्कार आपोआप रुजले होते. १९५५ मध्ये अठराव्या वर्षी वसंतराव पटवर्धन यांच्यासह विवाहबद्ध झाले. मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी होत गेल्यावर हळूहळू या सामाजिक कार्याकडे ओढले गेले. कुटुंबांतील सर्वाचे सहकार्य व पतीकडून मिळणारे मार्गदर्शन सोबतीला होतेच. आज ४० वर्षांनी या कामाकडे बघताना आपण कामाचा डोंगर पार केल्याचे समाधान मिळते आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील जव्हार, मोखाडा हे दोन अत्यंत दुर्लक्षित व दुर्गम भागातील आदिवासीबहुल तालुके आहेत. ‘प्रगती प्रतिष्ठान’ ही संस्था गेल्या ३५ वर्षांपासून या भागात काम करत आहे. हा भाग लहान लहान टेकडय़ा, उंच-सखल डोंगराळ प्रदेशाचा भाग आहे. ‘सर्व शिक्षा अभियाना’मुळे बहुतेक सर्व पाडय़ांत प्राथमिक शाळा सुरू झाल्याने, साक्षरतेचे प्रमाण वाढले. पाडय़ातील मुलेही शाळेच्या वाटेने जाऊ लागल्याने इथल्या घराघरांत शिक्षणाची किरणे पोहोचू लागलीत. मात्र त्याने समस्या सुटल्या नाहीत. त्या सोडवण्यासाठी या आदिवासी बांधवांना संघटित करावं लागलं. ही माणसं कष्टाळू, प्रामाणिक आहेत. अज्ञान, दारिद्रय़, वीज, पाणी अशा अनेक आवश्यक सोयींचा अभाव असूनही समाधानाने जगणारा समाज आहे.
इथे मुलगा-मुलगी हा भेद नाही. उलट मुलगी सासरी जाईपर्यंत आई-बापाने सांभाळली म्हणून आपल्या परिस्थितीनुसार मुलीच्या आई-वडिलांना धान्य रूपाने भेट देण्याची त्यांच्यात प्रथा आहे. हुंडाबळी, स्त्री-भ्रूणहत्या असे कलूषित विचारही त्यांच्यापासून कोसो दूर आहेत. अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची िहमत इथल्या स्त्रीत  आहे. आपल्या कुटुंबाची, पाडय़ाची परंपरा मानमर्यादा जपणारी, सांभाळणारी आहे. सासरी माणुसकीची वागणूक मिळाली नाही, तर ती कुढत बसत नाही. स्पष्ट सांगून माहेरी येते. आई-बापावर भार होण्याऐवजी बरोबरीने कष्ट, मजुरी करून स्वाभिमानाने जगते. म्हणूनच प्रामाणिकपणे उर्वरित समाजाला माझे सांगणे आहे की, या बांधवांकडे फक्त व्यवहारी दृष्टीने, मजुरांचा गट म्हणून पाहू नका. एका दुर्लक्षित समाजाचा घटक या प्रेमभावनेने पाहा. तो खरा सुशिक्षित असल्याची जाणीव तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी खरा धर्म, दुसऱ्याला प्रेम देण्यातच आहे, नाही का?
पाच वर्षांपूर्वीची घटना असावी. एकदा मी एका पाडय़ावर यमुनाच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. लगेचच काही दिवसांनी  ती मुलीला सरकारी दवाखान्यात घेऊन आली. तेव्हा ओझरती भेट झाली. पाठोपाठ ‘लेक बाळंतीण झाली, मुलगी झाली’ असा निरोप घेऊन तीच आली. क्षणभर मला कळेच ना! कारण लग्नाला ४-५ महिनेच झाले असतील. तेव्हा यमुनानेच खरी हकिगत सांगितली. ‘‘अगं वैनी ! मुलीला दिवस गेल्याचं लक्षात आल्यावर आम्ही आई-बापांनी तिला विश्वासात घेऊन सर्व माहिती घेतली, गावातल्याच मुलाचं नाव तिने सांगितलं, आम्ही त्या पोराच्या घरच्यांना भेटलो. त्यांनीही मुलाला विचारलं. मुलानेही मान्य केल्यावर महिन्या-दीड महिन्यांत दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने लग्न करून दिलं. उशीर कशाला करायचा गं! तरुण वयात कधी असं झालं तर ते समजून घेऊन जोडून देणं ही आपली जबाबदारी आहे.’’ किती सामंजस्य होतं यात.
 पूर्वीच्या काळी, लग्न करण्याची आíथक स्थिती नसेल तर सहजीवन सुरू होऊन दोन मुलं झाल्यावरही आदिवासी समाजात लग्न करण्याची प्रथा होती. पण हा समंजसपणा म्हणावा की आदिवासी समाजातील परंपरा की खरी माणुसकी माझ्याच विचारांचा गोंधळ झाला आणि मला माणुसकीचा सुगंध सापडला..
  ‘प्रगती प्रतिष्ठान’ची स्थापना १९७२ सालची. संस्थेच्या कामाची सुरुवात ठाण्यात ‘झोपू योजना’ प्रत्यक्षात आणण्यापासून झाली. त्यानंतर जिल्ह्य़ाच्या आदिवासी भागात काम सुरू झाले. आरोग्यविषयक, शैक्षणिक व शेतीविषयक अशा योजना राबवून या भागाचा सर्वागीण विकास साधण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी अनेक विकासात्मक प्रकल्पही राबवले. अनेक कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांवर संस्थेच्या कामाचा डोलारा उभा आहे.
आरोग्य सेवा, शिक्षण व अपंग शिक्षण अशा समस्यांचा पाठपुरावा करत गेलो. गावकरी कार्यकत्रे यांच्याबरोबर फिरताना, बोलताना समाजाचे प्रश्न समजू लागले. अशुद्ध पाण्यामुळेच होणारे आजार फार असल्याचे जाणवले. ९२-९३ मध्ये जव्हार व मोखाडा या भागात मोठय़ा प्रमाणावर बालमृत्यू झाले. या घटनेने मी व्यथित झाले. हे मृत्यू कुपोषणामुळे झाले होते. सरकारी मदत मिळेल तेव्हा मिळेल आपण काहीतरी केले पाहिजे, या भावनेने संस्थेने काम सुरू केले. गर्भवती महिलेपासून ६ वर्षांची मुले हा वयोगट निश्चित करून त्यांच्या आरोग्यासाठी काम सुरू केले. दायीचं काम करणाऱ्या महिला देवाचं काम समजून बाळंतीणीची पाच दिवस काळजी घेत. त्यांना साधने व स्वच्छता यांचे प्रशिक्षण दिल्याने बालमृत्यूचं प्रमाण कमी झालं. मुख्यत: नाळ कापण्यासाठी सिझर, थ्रेड, (त्यावर राख न टाकता) अ‍ॅण्टिसेप्टीक पावडरसह इतर स्वच्छता नीट पाळल्या गेल्याने २-४ महिन्यांत धनुर्वातामुळे होणारे बालमृत्यू कमी झाले, कुपोषण रोखण्यासाठी अनेक पाडय़ांमध्ये पाळणाघरातून काम करत जनजागृतीचा प्रयत्न केला. गरोदर माता, स्तन्यदा माता, चार महिन्यांच्या बालकापासून सहा र्वष मुलांची शारीरिक,मानसिक, बौद्धिक वाढ होईल असे संगोपन केले. अनुभव खूप शिकवणारे होते, सुरुवातीला मातांसाठी पुरवलेले ‘शतावरी कल्प’ त्या फेकून देत. त्यांना वारंवार समजावून सांगून पाठपुरावा केला. प्रसंगी मुक्काम करून कार्यकर्ते तयार केले. अखेर एक चांगला प्रयोग यशस्वी झाला.
बाळाच्या जन्मानंतर ‘न्यू बॉर्न बेबी कीट’ देऊन संरक्षण, काही ओषधे, खिमट, तेल, मॉलिश, आंघोळ अशा साध्या साध्या पण महत्त्वाच्या गोष्टींचं मार्गदर्शन मातांना केलं. पौष्टिक पण साधा गरम, ताजा आहार, गाईचं तूप, हवामानानुसार आहारात बदल सर्व लहान लहान गोष्टींचा विचार करून पाळणाघरे चालविली. पूर्वी दीड ते दोन किलो वजनाची मुले जन्माला येत. इतकी काळजी घेतल्याने किमान ३ किलो वजनाची मुले जन्माला येऊ लागली. प्रयत्नांना यश आलं, उभारी मिळाली.
ही मुले शाळापूर्व थोडे शिक्षण-बडबड गीते, चित्रातून प्राणी-पक्षी, रंग ओळखणे अशा गोष्टींत आनंदाने सहभाग घेऊ लागली. चपळता, आत्मविश्वास त्यांच्यात दिसू लागला. त्यामुळे पहिलीत प्रवेश घेतल्यावर किमान शिक्षक काय बोलतात याकडे त्यांचे लक्ष खिळू लागले. नव्या पिढीचे असे घडणे पाहणे हा शब्दातीत अनुभव होता. रस्ते नाहीत, बसची सोय नाही अशा भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह, कर्णबधिरांसाठी निवासी शाळा असे नवीन नवीन प्रश्न समोर येत होते. त्यांचा अभ्यास, प्रत्यक्ष गरजा याची सांगड घालून प्रश्न सोडविणे हेच काम कारण्याची तेव्हा गरज होती. हा काळ २५ ते ३० वर्षांपूर्वीचा होता. नियोजनबद्ध योजना राबवण्याचे प्रसंग थोडे आले. उलट गरजेपोटी एकेका समस्येचा छडा लावत पुढे पुढे जात राहिलो. प्रवास घडत गेला.
त्या काळात कोणत्याही पाडय़ावर एखादं काम करायला गेलं की सगळ्याजणींची एकच मागणी, ‘‘वैनी तू आम्हाला ‘नळपाणी योजना’ दे. पाणी आणायला लई कष्ट पडतात.’ मला त्याची जाणीव होती. पण तंत्रज्ञानाची जोड देऊन कमीत कमी खर्चात याची मांडणी कशी करावी हे माहीत नव्हतं. एका मत्रिणीशी बोलताना विषय काढला आणि तिने प्रत्यक्ष मांडणी तंत्र समजाऊन दिलं. ‘इनरव्हिल क्लब’ने खर्चाला मंजुरी दिली. गाव ते विहीर (दरीतील) वीज पोलची आवश्यकता होती. आदिवासी विकास खात्याकडून ‘टी एस पी बजेटमधून मंजुरी मिळण्याचे प्रयत्न केले. पण काम होण्यासाठी फारच वेळ लागण्याची चिन्हे आहेत, असे वाटले. एका अधिकाऱ्याने सोपा व खरा मार्ग सांगितला आणि लगेच काम झाले. चांगल्या कामाला सुयोग्य मार्गदर्शन, मार्ग देणारे मिळाल्याने यश आले आणि गावाला घराजवळ नळाने पाणी मिळाले. आम्हा सहकाऱ्यांचा विश्वास वाढला, बायकांचे कष्ट वाचले. या आनंदातून सर्वाना प्रोत्साहन मिळाले. आज प्रगतीच्या माध्यमातून १८ पाडय़ांना नळपाणी योजनेतून घराजवळ पाण्याची सोय झाली आहे. यापकी तीन नळपाणी योजना सौर ऊर्जेवर चालविल्या आहेत.
सामाजिक प्रश्नांच्या निवारणासाठी तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न झाला. तरी मुख्यत: आíथकदृष्टय़ा सक्षम होणे फारच गरजेचे होते. त्याकरिता विचार करून अखेर शेतीतून उत्पादन, अर्थाजन हा पर्याय अधिक योग्य वाटला. त्यातून कृषी विकास प्रकल्प आकाराला आला. केवळ शेती विकासातून आदिवासी बांधवांना आíथकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी ‘सिजेंन्टा फौंडेशन’ चे सहकार्य गेल्या पाच वर्षांपासून मिळत आहे. पाणी असेल तेथील शेतकऱ्यांना एक भाजीपाल्याचे उत्पन्न घेऊन अर्थाजनाबाबतचे प्रशिक्षण, बंधाऱ्याच्या माध्यमातून शेतीला, भाजीपिकांना पाणी देत पीक क्षेत्र व शिक्षण वाढविले.
 गेल्या वर्षीपासून खरीपात पावसाळी भाजीपाला लागवडीतून भातशेतीला आíथक जोड देण्यात आली. या पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात पडीक जमिनीवर कारल्याचे उत्पन्न घेऊन चांगला आíथक फायदा मिळाला. त्याच्या विक्रीसाठी एप्रिलपासूनच नियोजन केलेले होते. ९ टन कारली घाऊक पद्धतीने विकून शेतकऱ्यांना जागेवर चांगला भाव मिळवून दिला. काही माल जव्हारच्या बाजारात, सेल्वास रोडवर टपरी टाकून विकला. कारली, भेंडी, दोडके, गिलके, दुधी याचे उत्पादन परिसरातच शेतकऱ्यांनी विकले. शेतीमधून अर्थार्जन, रोपे तयार करण्यासाठी लहान लहान ग्रीन हाउसेस, थोडीशी यांत्रिक जोड करत पुढील २ ते ३ वर्षांत आíथक क्षमता वाढवून आमचा आदिवासी आíथकदृष्टय़ा सक्षम होईल. त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्यात आम्ही यश मिळवू, असे वाटते. यासाठी सबमर्सबिल पंपाने ६२ मीटर उंचीवर पाणी चढवून पडीक जमिनीवरील तीन हजार कारल्याच्या वेलींना ठिबक सिंचन बसविले आहे.
बोरीचा घोडा या गावाची एकी, कष्ट करण्याची तयारी पाहून त्या पाडय़ाला ‘सरफेस सौर पंपा’ने ७२ मीटर उंचीवर पाणी चढवून नळपाणी योजना पूर्ण केली. महिलांच्या कष्टाला न्याय दिला. वर्षांनुवष्रे मजुरीने पिचलेला, शेतीच्या कष्टाने थकलेला आमचा ग्रामीण शेतकरी वरील सर्व तंत्र मंत्र शिकून नव्या दमाने उभा करणे हे सर्वाचेच लक्ष्य आहे.
शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी भात कापणी, मळणी अशा कामांसाठी छोटय़ा-मोठय़ा यंत्रांचा वापर शेतकऱ्यांना दाखवून दिला. शेतीची तांत्रिक बाजू बळकट करण्याचे असे प्रयत्न सुरू केले. यातून शेतकऱ्यांच्या श्रमाला न्याय मिळेल. वेळ, डिझेल, खर्च वाचेल. थोडे पाठीशी विश्वासाचे बळ दिले तर तो खऱ्या अर्थाने बळीराजा होईल.
दोन-चार मोठे तलाव जव्हार तालुक्यात आहेत. म्हणून मत्सशेतीतून येथील ग्रामपंचायत आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी करण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी झाला. चोरी, दुर्गमता, भांडवल, तंत्रज्ञानाची कमी पडल्याने हे अपयश स्वीकारावे लागले. पण त्या वेळी पेरलेले रोहू, कटला, सिल्वर, काळा मासा आजही तळ्यात आहेत. मत्स्यशेतीतून चांगले अर्थाजन होऊ शकते. मात्र त्यासाठी विशेष मार्गदर्शन व पाठबळाची आवश्यकता आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी दशके लोटली तरीही दुर्गम आदिवासी पाडे अंधारात असावेत, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. ‘राजीव गांधी पाडा इलेक्ट्रिफिकेशन’ योजना व मंजुरी सर्व कागदावर राहिली! रोटी, कपडा, मकान या गरजा कधीच मागे पडल्या असून, शुद्ध पिण्याचे पाणी, शेतीला पाणी, पक्के रस्ते, वीज या गरजांना प्राधान्य असले पाहिजे, हा नव्या काळाचा मंत्र आहे. मोबाइलमुळे गेल्या ४-५ वर्षांत संपर्क यंत्रणा तरी निर्माण झाली.
एकदा पाडय़ांतील कामे संपवून जव्हारला परत येईपर्यंत काळोख झाला. मुख्य रस्त्यापासून एक कि. मि.वर असणाऱ्या गवते पाडय़ात एक निरोप द्यावा म्हणून जीपने पाडय़ापर्यंत गेले. घरात, पाडय़ात, डोंगरात सर्वत्र अंधाराचं साम्राज्य, पदपथावर दिवे नसण्याची आम्हाला सवयच आहे. पण महामंडळाच्या विजेचाही भरवसा नाही असे समजून हेड लाईट चालू ठेवण्यांस सांगून पाडय़ातील घरापर्यंत पोचले, तुलीबाईला हाका मारल्या. झोपडीत फक्त चुलीतील लाकडाचा, निखाऱ्याचा प्रकाश, त्या प्रकाशात दोघं-चौघं जेवत होती. क्षणभर मला असं का? हे कळेना. मी त्या बाईना म्हणाले की, ‘संध्याकाळच्या वेळी एक-दोन ठुम्या का लावत नाही गं !’’ तिने शांतपणे निर्विकारपणे उत्तर दिलं, ‘‘अगं वैनी आमचं हे असं जीवन, रेशन दुकानात रॉकेल आल्याचं समजलं तर मजुरीचे पसे संपलेले असतात. थोडीफार मजुरी मिळाल्यावर गेलं तर रॉकेल संपलं म्हणून सांगणार. मग हे असं काळोखात राहावं लागतं. तू या लाइटीचं काहीतरी कर गं.’
बेचनीतच जव्हारला पोचले. पर्यायाचा शोध घ्यायचं ठरवलं. स्वातंत्र्याचा अर्थ, लोकशाही, समाजाच्या किमान गरजा, त्या मिळणे- न मिळण्याची कारणे अशा अनेक विचारांचं मनात युद्ध सुरू झालं. पण त्यानंतरही त्या आजीचा संयम, शांतपणा आठवत राहिला. उत्तराच्या दिशेनं शोध सुरू झाला. प्रयत्नांती, परवडेल, कुणाच्याही परवानगीची गरज लागणार नाही अशी सौरऊर्जा सापडली.
सहा कर्णबधिर माजी विद्यार्थ्यांचं २ महिन्यांत प्रशिक्षण करून काम सुरू केलं. ‘सौर आशा’ नावाने असेंम्बल युनिटमध्ये एक लॅन्टन व ३ एलईडीची टय़ूब असे ५ वॅटचे २ दिवे प्रत्येक झोपडीला देण्याचं ठरलं. फुकट न देता प्रत्येकी  ५०० रुपये ( एक कुटुंब, एक झोपडी ) घेऊन, त्यात देणगीच्या ४२०० रुपयांची भर घालून तीन वर्षांत सुमारे सहा हजार कुटुंबांचा अंधार दूर झाला. याला वर्षांतून किमान तीन वेळा किरकोळ दुरुस्ती, देखभाल करणं आवश्यक असतं. चाìजग कसं होतं, फ्यूज गेला तर तो कसा बदलायचा, अशा प्राथमिक गोष्टी गावातल्याच काही मुलांना शिकवून समजावून दिल्या. हीच कर्णबधिर मुले (आदिवासी ) जोडणी, फिटिंग, दुरुस्ती, प्रशिक्षण सर्व कामे एकत्र करतात. त्यांना रोजगारही मिळाला. महत्त्वाचं म्हणजे अंधाराचं साम्राज्य संपलं. त्या त्या पाडय़ाला गरजेप्रमाणे पथदिवे दिले. पदपथासाठी बँक खाते असावं असा आग्रह ठेवला आहे. त्यामुळे २-३ वर्षांनी बॅटरी बदलून प्रकल्पाला स्थर्य आणण्याचा प्रयत्न केला आहे.
आम्ही दुर्गम ठिकाणी असलो तरी कामाचं महत्त्व समजून घेऊन, अनेक चांगल्या विचारांची, तांत्रिक, आíथक मदत करणारी माणसं मिळाली हे विशेष. प्रकल्प उभा केल्यापासून -प्रशिक्षणाचा टप्पा, तो प्रकल्प स्थिर होईपर्यंत लक्ष देणं हेसुद्धा तितकंच गरजेचं असतं. ज्यांना मदत करतो, त्यांना आत्मविश्वास देणं, प्रकल्प पूर्णत्वास जाईपर्यंत पाठबळ देणं, वेळ देणं हे एकमेका साह्य़ करू..अवघे धरू सुपंथ’ या उक्तीहून निराळं नाही. याचा प्रत्यय घेऊ शकले, याचं समाधान आहे. अजून बरंच काम बाकी आहे. त्यासाठी सत्तरी ओलांडल्यावरही कामात तितकीच गुंतलेली आहे.
संपर्क – जीवन छाया, दुसरा मजला, राममारुती रोड,
ठाणे(प.) पिन ४०० ६०२
दूरध्वनी – ०२२-२५३८९८००.
ई-मेल-sunandapatwardhan@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा