शिल्पा परांडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘गडचिरोलीच्या आदिवासी भागात खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासासाठी गेले, तेव्हा मला राज्यात इतर ठिकाणी जशी प्रेमानं आपल्या पदार्थाविषयी सांगणारी माणसं भेटली होती, तशीच इथेही भेटली. मुंग्यांची चटणी, मोठी आंबील, बांबूच्या ओल्या कोंबांचे वडे, लाकोरीचे वडे, अशा नानाविध पदार्थाची माहिती घेता आली..’’ गडचिरोली आणि गोंदियातील दुर्गम भागांत दिसलेल्या खाद्यसंस्कृतीबाबतचा हा भाग दुसरा. 

गेल्या अंकात (३० सप्टेंबर) लिहिल्याप्रमाणे एव्हाना मी गडचिरोलीमधल्या गावांमध्ये स्थिरावले होते. मला कोणतीही भीती नाही, याची खात्री पटली होती. गोरगा, आंबील यांचा आस्वाद घेऊन नाना तऱ्हेची भरडधान्यं (मिलेटस्) पाहून झाल्यावर मी एका गृहस्थांबरोबर गावाचा फेरफटका मारण्यासाठी निघाले. ते गाव नितांतसुंदर आणि स्वच्छ. समोर खास मोह वाळवण्यासाठी मचाणं बांधली होती. त्यावर चढून एक-दोन स्त्रिया मोह वाळवण्यासाठी तो पसरवत होत्या. ग्रामीण भागात एखाद्या घराच्या आवारात पाळलेल्या कोंबडय़ा फिरताना मी अनेकदा पाहिलं होतं, पण इथे चक्क मोर फिरत होते. ते पाळीव नव्हते बरं का!

‘‘आपण पुढे गोरगा काढत आहेत ते पाहायला जाऊ’’ म्हणत त्या गृहस्थांनी मला एके ठिकाणी आणलं. तेथे ताजी-ताजी गोरगा (ताडीसारखं मद्य) काढली जात होती. ते पाहून झाल्यावर ज्या गोष्टीची मी फार पूर्वीपासून वाट पाहत होते, आणि खरंतर ती पाहायला मिळेल असं मला वाटलंही नव्हतं, ती अवचित पहायला मिळाली. ‘मुंग्यांची चटणी’! एका घरातल्या बाईंनी मला ती समोरच करून दाखवली. ‘‘आजारपणात तोंडाला चव यावी म्हणूनच नाही, तर ही चटणी आरोग्यासाठीही चांगली आहे. आम्हाला ताकद मिळते यामुळे..’’ तिथले लोक सांगत होते. मला त्यांच्याकडे बारक्या लालचुटुक मिरच्याही पाहायला मिळाल्या. थाई ‘बर्डज् आय चिली’सारख्या दिसणाऱ्या या मिरच्या. मिरची भारतात पोर्तुगीजांनी आणली, असं म्हणतात. मात्र या लोकांचा विश्वास आहे, की मिरची खूप पूर्वीपासून इथल्या जंगलात आणि पर्यायानं त्यांच्या आहारात आहे. मागे मी अशाच आशयाचा नागालँडमधल्या आदिवासींचा व्हीडिओ पाहिला होता, तो आठवला. मी त्या मिरच्यांच्या बिया घेतल्या आणि घरी नेऊन कुंडीत लावल्या. ते झाड फार काळ नाही जगलं, पण मला एकदा का होईना, गडचिरोलीच्या जंगलातल्या त्या मिरच्या पुण्यात खायला मिळाल्या. असो.

तर, संध्याकाळची वेळ होत आली. त्यांची गोरगा घेण्याची वेळ. माझ्या परतीच्या वाटेवर गोरगा घेतलेले अनेक स्त्री-पुरुष मला दिसले; पण नशेतली भांडणं, आरडाओरडा, कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन मात्र त्यांच्यात किंवा इतरही आदिवासी गावांत माझ्या पूर्ण प्रवासात दिसलं नाही. उलट अनेक छान छान गोष्टी जाणून घेता आल्या. त्यांच्यातल्या अनेक सांस्कृतिक, सामाजिक गोष्टी आपल्या शहरी आयुष्यातदेखील शिकण्यासारख्या आहेत, असं वाटलं.

गोंदिया जिल्ह्यातले गोंड हे इथले मूळ रहिवासी. ते गोंद म्हणजे डिंक आणि लाख आणून विकत असत, असा उल्लेख आढळतो. त्यावरूनच ‘गोंदिया’ हे नाव रूढ झालं असावं. भंडाराप्रमाणे गोंदियामध्येही भाताचं उत्पादन चांगलं आहे. म्हणूनच गोंदियाची दुसरी एक ओळख ‘राइस सिटी’ अशीही आहे. इथे मला आदिवासींबरोबर राजस्थानी, गुजराती, बंगाली अशा वेगवेगळय़ा समाजांचेदेखील लोक भेटले. छत्तीसगड, मध्य प्रदेश लागूनच असल्यामुळे तिथले अनेक लोक मला भेटले. गडचिरोली- प्रमाणेच इथल्या आदिवासींच्या आहारातदेखील जंगली भाज्यांचा अंतर्भाव आहे. पातुरीची भाजी, हरदफारी/ अरदफरी, केना, शेरा, लेंगळा, खापरखुट्टी, सात्या (मशरूमचा प्रकार) यांची भाजी, वाश्ते किंवा वास्ते- म्हणजे बांबूचे ओले कोंब, कुडाची फुलं, अशा अनेक प्रकारच्या जंगली भाज्या आदिवासी करतात. बांबूच्या ओल्या कोंबांचे वडे, भाजी, मुठ्ठे (मुटके) विशेष प्रिय आहेत. लाखेच्या डाळीचा वापर जाणवण्याइतपत आहे. भाजी, भाकरी, वडे, पुऱ्या, घुगऱ्या किंवा बांबूचे वडे, नाखवडी अशा स्वतंत्र पदार्थामध्येदेखील लाखेच्या/ लाकोरीच्या डाळीचा वापर होतो.

इथले कुणबी समाजाचे लोक दिवाळीला दिवसे आणि एक विशिष्ट प्रकारची आंबील करतात. तिला ‘मोठी आंबील’ म्हणतात. तांदूळ आणि ज्वारीचं पीठ पाण्यात एकत्रित एक ते दोन तासांसाठी भिजवून नेहमीच्या आंबीलप्रमाणे शिजवतात. त्यात हिरवी मिरची, आलं, लसूण, मीठ आणि दही किंवा ताक घालून ही आंबील तयार केली जाते.

महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यांच्या हद्दीवरच्या गावांमध्ये जाणं, तिथल्या लोकांना भेटणं, त्यांची संस्कृती समजून घेणं हा माझ्या आवडीचा विषय आहे. हद्दीवरच्या गावांमध्ये दोन्ही भागांतली संस्कृती, प्रथा, राहणीमान, भाषा, खाद्यपरंपरा यांचा मिलाफ असतो, असा माझा अनुभव आहे. गोंदियाला लागूनच मध्य प्रदेश आहे. त्यामुळे इथल्या अनेक गोष्टींमध्ये आजही साधम्र्य जाणवतं. मराठी प्रांतात असणारे लसणाच्या चोपाचे (पातीचे) आयते, लाकोरीचे वडे, शेवखंड, कडबोळी, हे मध्य प्रदेशात अनुक्रमे लसण के चिले, तेल के बडम्े, शेव के लड्डू, ठेठरा किंवा बेसन ठेठरी ही नावं धारण करतात. तर कनुले जन्माष्टमीला केले जाणारे. त्यासाठी तिखट-मीठ, आलं-लसूण आधणाच्या पाण्यात घालतात आणि भिजवलेल्या कणकेचे नाण्यांसारखे चपटे, लहान गोल या चविष्ट रश्शात सोडून शिजवतात. चकोल्या वा वरणफळांसारखंच! थेटल्या-मेटल्या, खुरमी हेही काही वेगळे पदार्थ आहेत.

  सालेकसा तालुक्यात प्रवास करताना अनेक ठिकाणी खाल्ला तो गव्हाचा हुरडा. आजपर्यंत ज्वारीचा हुरडा मी खाल्ला होता. नवीन धान्य आल्यानंतर ते प्रथम ग्रामदेवतेला अर्पण करण्याची प्रथा सर्वत्र आढळते. माझ्या प्रवासादरम्यान अनेक गावांत विस्तवावर भाजलेल्या गव्हाच्या लोंब्या, त्यात साखर घालून देवाला दाखवून सर्वाना वाटल्या जात असल्याचं मी पाहिलं. काही ठिकाणी या हुरडय़ाबरोबर प्रसादाचं ओलं खोबरंही दिलं जात होतं. कुणी तुम्ही दूरवर प्रवासास निघाला आहात म्हणून पिशवीत थोडा हुरडा बांधूनही देत होतं. तसं तर अनेकांनी मला ‘‘दूरवर आला आहात, पुढे प्रवासात काही खायाला नाही मिळालं तर..’’ असं म्हणून पुरचुंडीत काही ना काही खाऊ बांधून दिला आहे. माझ्या स्मरणात राहिली ती प्रेमाची पुरचुंडी! प्रथम तर इतक्या दूरवरून आपल्या गावात अशी एखादी मुलगी, स्वत: गाडी चालवत येतेय, ही गोष्ट गावाकडे तशी नवीन असते. त्यामुळे त्यांना त्याचं मोठं अप्रूप आणि काळजी वाटे. त्यांची काळजी, प्रेम या स्त्रिया खाऊच्या पुरचुंडीतून व्यक्त करत. अशाच एका पुरचुंडीनं उन्हात प्रवास करताना मला साथ दिली होती. त्यात होतं सातूचं पीठ! मुळातच पूर्वी प्रवासात जाताना लोक सातूचं पीठ बरोबर घेऊन जात. खाण्याची सोय म्हणूनदेखील आणि उष्णतेच्या विकारांवरसुद्धा सातूचं पीठ चांगलं असतं. त्यामुळे आजही विदर्भात अनेक ठिकाणी सातूचं पीठ खाल्लं जातं. हे पीठ म्हणजे गहू किंवा जव, हरभरा डाळ, वेलची, सुंठ, जिरं भाजून दळून केलेलं पीठ. खातेवेळी पाण्यात अथवा दुधात शिजवून किंवा तसंच पाण्यात घालून ते पाणी प्यायलं जातं. काही ठिकाणी तांदूळ आणि जायफळाचाही त्यात वापर केला जातो.

लेखा यागावात गेले, तेव्हा गावाच्या मुख्य चौकात नीरव शांतता होती. तिथे विहीरीजवळ मी बसून राहिले. एक वयस्कर बाई माझ्या बाजूला येऊन बसल्या. बराच वेळ आम्ही काही बोललो नाही. त्या उठून गेल्या आणि परत आल्या, ते हातात मोह आणि आंबील घेऊन. समोर मोह पाहिल्यावर माझ्यातल्या ‘मोहाला’ आवर घालणं शक्यच नव्हते! खाणं घेऊन त्या आल्या, मात्र बोलत अगदी मोजकंच होत्या. ‘‘दमून आली असशील, म्हणून दिलं खायला! गावातल्या बाया पाणी भरायलीत..’’ इतकं बोलून परत शांत! काही बाया आणि मुली पाणी भरण्यासाठी आल्या. वाटलं, आपणही हात साफ करून घ्यावा. आतापर्यंत मी मोठं अवजड जातं, गावातलं उखळ-मुसळ वापरून पाहिलं होतं. विहिरीतून पाणी काढण्याचा अनुभव बाकी होता. दुष्काळी भागात विदर्भात तर अनेक ठिकाणी नद्या, विहिरी आटलेल्या किंवा अगदी तळाशी पाणी. इथेही तीच परिस्थिती.

त्यामुळे पाणी काढताना बरेच कष्ट पडत होते. या आणि त्यांच्यासारख्या अनेक गावांतल्या स्त्रिया, मुली न जाणे कित्येक वर्ष हे काम नेमानं करत आल्या आहेत..  (क्रमश:)

parandekar.shilpa@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribal food culture tribals of gadchiroli chanturnag article amy
Show comments