महेंद्र दामले

आदिवासी समूहात वाढलेल्या स्मिता किंकळे यांच्या आयुष्यात जेव्हा इरल्याऐवजी प्लास्टिक शीट आली, तेव्हा त्यांनी प्लास्टिकलाही आपल्या कलाकृतींचे माध्यम बनवले. विविधरंगी प्लास्टिक शीट्स एकमेकांवर ठेवत, कधी त्यांना कापत, कधी वितळवत छोटीमोठी शिल्पे तयार करत रंगपदराची एक अद्भुत सृष्टी त्या निर्माण करतात. स्मिता यांच्या या कलाकृती जर्मनीतील संग्रहालयात प्रदर्शित केलेल्या आहेत. त्यांच्या आणखी काही कलाकृती सेऊलमधील देसीएगोमध्ये ‘अर्थराईज’ प्रदर्शनात अलीकडेच मांडल्या गेल्या. समकालीनतेचं भान देणाऱ्या स्मिता यांच्या कलाविष्काराविषयी..

Sustainability Crusader Award Announced to Alok Kale Founder and Managing Director of Magnus Ventures Pune news
औद्योगिक कचऱ्यातून नवव्यवसायाची निर्मिती! पुण्यातील तरुण उद्योजकाचा प्रवास
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Demand to the judges to withdraw the ban on single use plastic in the court premises Mumbai print news
न्यायालयाच्या आवारातील एकेरी वापराच्या प्लास्टिकवरील बंदी मागे घ्या; वकील संघटनेची मुख्य न्यायमूर्तींकडे पत्रव्यवहाराद्वारे मागणी
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
fake Goods Market Pune, fake Goods, Market Pune,
शहरबात… बनावट मालाच्या बाजारपेठांना रोखणार कोण?
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
Green chillies from Vidarbha, Green chillies,
विदर्भातील हिरवी मिरची थेट दुबईच्या बाजारात

समकालीनतेच्या भानामुळे चित्र रंगांनी रंगवणे ही एक अविभाज्य कृती निर्थक आणि खूप प्राथमिक वाटू शकते; बऱ्याच वेळा ती वाटतेही. पण त्याच वेळी त्या कृतीचे संस्कार आणि त्यामुळे तयार झालेली दृश्यवृत्ती ही चित्र रंगवण्याच्या प्रवृत्तीला थांबवू शकत नाही. अशा प्रकारच्या द्वंद्वाबरोबर जगणे हे समकालीनतेचे एक लक्षण आहे. हे द्वंद्व, ‘चित्र नाही, तर मग दुसरे काय’ असा मूलभूत प्रश्न निर्माण करून चित्रकाराला जाणवणारा अस्तित्वाचा झगडा सूचित करते. आपल्या अनुभव आणि विचारव्यूहातील हे द्वंद्व चित्रकाराने ओळखू शकणे, यावर त्याचा प्रतिसाद आकार घेतो; पण हे समकालीनतेचे भान वगैरे सगळे शहरीजनांसाठी आहे. शहरात, निसर्गापासून दूर, दाटीवाटीने जगण्याच्या गरजेतून आणि संघर्षांतून जगण्यासाठी अतिआवश्यक म्हणून निर्माण झालेली एक वृत्ती आहे का ही? निसर्गात, जंगलात राहताना जी वृत्ती आवश्यक असते तिला समकालीनता म्हणता येईल का?

नागरीकरणामुळे नैसर्गिक भवताल सतत बदलत असते. ते बदल मानवनिर्मित घटक नैसर्गिक भवतालात हळूहळू शिरून घडत जातात. हे सगळे पाहणे, अनुभवणे एक चित्रकलेची विद्यार्थी आणि चित्रकार म्हणून स्मिता किंकळे यांच्यासाठी सहज होते. जन्मापासून त्या तानसाच्या जंगलातील खेडय़ात वाढलेल्या असल्याने, निसर्गाच्या चक्राला, त्याच्या अनेक रूपांना पाहणे हा तर जीवनाचा एक सहज भाग होता. स्मिता यांच्या आदिवासी म्हणून असणाऱ्या या जगण्यात बदल झाला, जेव्हा त्या चित्रकलेचे शिक्षण घ्यायला मुंबईत येऊ लागल्या. हळूहळू शहरी जीवनाशी संबंध येऊ लागला. स्मिता आठवणी सांगतात, ‘‘तानसाला असताना लहानपणी वापरल्या जाणाऱ्या ‘इरल्या’ऐवजी शेतात काम करताना पावसात वापरतात त्या प्लास्टिक शीट्स पहिल्यांदा पाहिल्या. हळूहळू प्लॅस्टिकच्या वस्तूंनी जगणे व्यापले आणि पटकन जळते म्हणून लाकूड जाळायला प्लास्टिकचा तुकडा वापरला जाऊ लागला.’’

(भारतात प्लास्टिक १९२० च्या आसपास आले आणि त्याचा सार्वत्रिक वापर हा १९६०-७० च्या दशकापासून वाढला.) हे प्लास्टिक बऱ्याच काळाने स्मिता यांच्या कलाकृतींचे माध्यम झाले. 

  सुरुवातीला आर्ट स्कूलच्या संस्काराने रंगाचे थर लावून अमूर्त प्रकारची चित्रे स्मिता रंगवत असत. परिणामी, माध्यमाचे पदर एकमेकांवर लावून तयार होत जाणारे दृश्य पाहणे हा त्यांचा एक मूलभूत स्वभाव होता. या स्वभावाला कायम ठेवत जीवनात शिरलेल्या प्लास्टिकला स्मिता प्रतिसाद देऊ लागल्या. 

कलाकृतीत प्लास्टिक वापरण्याकरिता, त्याच्या शीट्स एकमेकांवर लावणे, मग त्या कापणे आणि वितळवून बघणे सुरू झाले. प्लास्टिक माध्यम वापराच्या या अनुभवामुळे नवीन रूपे समोर आली. प्लास्टिक गरम असताना लाव्हा असावा तसे वितळते आणि थंड झाले की आकार घेते. प्लास्टिकचे थर लावून, त्यांना कापून, वितळवून, पसरवून जे रंगपदर दिसतात, ते स्मिता यांच्या चित्राला आकार देऊ लागले. ही चित्रे म्हणजे छोटी थापलेली शिल्पे भासतात. कलाकृती पाहताना अचानक एखादा रंग चमकून दिसतो आणि आपल्याला त्या कलाकृतीमध्ये खेचून घेतो; अनेकरंगी गोधडी बघावी तसे! अनेकरंगी, चांदीचा कागद चिमटून गोळा करून पाहावा, रंगीत ताऱ्यांनी भरलेले आकाश,कलाइडोस्कोप ( Kaleidoscope)मधील रंगीत नक्षी पाहावी, तसे काही अनुभव स्मितांचे काम पाहताना येतात.  तैलरंग, अ‍ॅक्रेलिक रंग वापरताना ब्रशचे फटके दिसतात. जलरंगात रंगाचे ओघळणे दिसते. स्मितांच्या प्लास्टिक वापरून केलेल्या कामात, खाद्यपदार्थ बनवतानाच्या व्हिडीओंमध्ये जसे काही पदार्थ वितळताना दिसतात, तसे सर्वात वरच्या थरातील प्लास्टिक वितळून, पसरून तुटत आकार घेतेय, त्याच्या खालच्या प्लॅस्टिकच्या छोटय़ा आकारांवर, त्यांच्या यामधील खळग्यांत पसरतेय, असे सर्व दिसते. प्लास्टिक वितळवून ठिपके, काही आकार, अशा रूपांत बदलताना आपण पाहू लागतो. एकाच वेळी ते प्रवाही आणि स्थिरही जाणवू लागते. हे सर्व पाहताना स्मिता आता शहरात राहतात, ही गोष्ट आणि त्याला जोडून त्यांच्या लहानपणापासूनच्या निसर्गरूपाच्या आठवणी आणि संदर्भ या प्लास्टिकरूपांमध्ये लागतात. स्मिता यांचे काम नीट पाहिले, तर त्यांच्या वृत्तीमध्ये पारंपरिक चित्रातील सौंदर्य आणि प्लास्टिक हाताळताना सापडणारे अनुभव, यामध्ये त्यांची होणारी आंदोलने दिसतात. पारंपरिक रंग हाताळण्याच्या अनुभवाने आणि कौशल्यामुळे, प्लास्टिकसुद्धा स्मिता अगदी सहजपणे हाताळतात. स्मिता यांच्या या सर्व प्रवासाचे दर्शन चित्रांचा पृष्ठभाग पाहताना होते.

आजच्या काळात प्लास्टिककडे, त्याचा पुनर्वापर नीट न केल्यामुळे ‘पर्यावरणनाशास कारण ठरणारा घटक’ म्हणूनच पाहिले जाते आणि त्याच वेळी काही किलोच्या वजनाचे प्लास्टिक प्रत्येक शहरी माणूस दरवर्षी वापरतो, इतके ते अपरिहार्य झाले आहे. जगताना

शहरी-निसर्ग याबरोबरच पर्यावरणपूरक आणि पर्यावरणविरोधी असे द्वंद्व सतत अनुभवायला मिळत असते. हे द्वंद्व, अपरिहार्यता, यातून काही वेगळी कल्पना म्हणून सुचू शकते, जी कलेच्या अंगाने महत्त्वाची ठरते.

स्मिता यांच्या कलाकृती जर्मनीतील  Kunsthalle Darmstadt Museum, Darmstadt,  Germany या  संग्रहालयात प्रदर्शित केलेल्या आहेत, त्या अशा सुचलेल्या कल्पनांसाठी महत्त्वाच्या आहेत. प्लास्टिक जीवनात सर्वदूर पसरल्याने, स्मिता यांनी प्लास्टिक वापरून एखादा तंबू वाटेल अशी झोपडी आणि त्यातील प्राणी, खेळणी, अशा सर्व गोष्टी प्लास्टिकने बनवल्या. जणू काही जगण्याच्या सर्व घटकांत प्लास्टिक भिनले आहे. त्यामुळे सर्व घटक हे प्लास्टिकचेच. जणू काही ‘जिवंत’, पण प्लास्टिकच्या वस्तू!

कदाचित अशा कल्पना या काहींना पटणाऱ्या नसतील. अशा कल्पनांनी मूलभूत प्रश्न सुटत नाहीत, असाही सूर लागेल; पण याचकरिता या कल्पना महत्त्वाच्या ठरतात. अपरिहार्यतेच्या भावनेतून जे सुचते, त्यातून कदाचित काही नवी अंतर्दृष्टी मिळण्याकरिता! कारण वैयक्तिक पातळीवर मूल्यांनुसारची कृती करून त्याचे प्रतिध्वनी भवताली ऐकू यावेत, हीच आर्त भावना समकालीनतेची आहे. याच कृतिजन्य आर्ततेसाठी, घुसमटीतून सुचलेल्या कल्पना महत्त्वाच्या ठरतात. स्मितांच्या कामाकडे रसिक प्रेक्षक चित्र म्हणूनसुद्धा पाहू शकतो किंवा सुचलेली कल्पना म्हणूनही पाहू शकतो. त्यातील कल्पना समजली तर समकालीन संवेदनांची दारं उघडू शकतात.

स्मिता यांच्या कलाकृती सेऊलमधील देसीएगोमध्ये ‘अर्थराईज’ प्रदर्शनात मांडल्या गेल्या होत्या. या प्रदर्शनात ‘पृथ्वीमाता’ या संकल्पनेवर आधारित कलाकृतींची संरचना होती. स्मिता यांच्याबरोबर जेसन किम आणि सून किम हे कलाकारसुद्धा सहभागी झाले होते.   

समकालीनतेची प्रतिसादरूपे रसिक प्रेक्षकांमध्ये काय प्रतिसाद निर्माण करतात ते पाहाणे, हेच अशा प्रदर्शनांचे फलित असते. ते यानिमित्ताने पाहाता आले.       

 endradamle@gmail.com

(आपल्या कलाकृतीसह स्मिता)

Story img Loader