तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ या मानसशास्त्र विषयात एम. ए.असून बिहेव्हिअरल थेरपिस्ट आहेत. गेल्या १३ वर्षांपासून त्या विद्य कौन्सिलिंग सेंटर चालवत असून ‘स्नेहा मुंबई’ या एनजीओच्या कर्मचारी समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. मुंबईत एच.आय.व्ही आणि बाल गुन्हेगारी या विषयात काम करणाऱ्या वेगवेगळ्या एनजीओंबरोबर त्यांनी काम केलेले आहे. तत्पूर्वी सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यलयात त्यांनी तीन वर्ष अध्यापनाचे काम केले होते.
स्वत:चा अवकाश मिळवण्यासाठी मुद्दाम एकटं राहणं आणि मनानं ‘एकाकी’ वाटणं, या दोहोंत फरक आहे. पहिला प्रकार मनातला विचारांचा गुंता सोडवायला मदत करू शकतो. एकाकीपण म्हणजे मात्र ‘मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊन जाते..’ आज जगभरात मोठी होत चाललेली ही मानसिक, सामाजिक समस्या. या समस्येचं स्वरूप उलगडून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवणारं हे सदर दर पंधरवडयानं.
काही वर्षांपूर्वी मी एका सहलीसाठी तारकर्लीला गेले होते. तिथे पॅरासेलिंगचा अनुभव घ्यायचं ठरवलं. खाली बोटीत माझीच माणसं गप्पा मारत बसली होती. वर-वर गेल्यावर तिथली नीरव शांतता प्रकर्षाने जाणवायला लागली. खालच्या सगळया आवाजांपासून दूर मी एकटी होते. एकांत काय असतो हे त्या दिवशी मी काही मिनिटांसाठी अनुभवलं. मी आणि मीच होते तिथे काही काळ!
काही वेळा घरात कोणी नसताना, बसमध्ये शेवटच्या स्टॉपवर उतरण्याआधी, लोकलमध्ये लेडीजच्या डब्यात, शाळा कॉलेजमध्ये एखाद्या दिवशी वर्गात एकटंच उरल्यावर, ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करत थांबल्यावर, अशा नानाविध प्रसंगांत असा एकांताचा, आजूबाजूला कोणीच नसण्याचा अनुभव आपण कधी ना कधी निश्चित घेतलेला असतो. हा शरीराशी संबंधित एकटेपणा असतो. याला आपण ‘एकटं असणं’ (बीइंग अलोन) असं म्हणतो. अशा प्रसंगात आपण भीती, असुरक्षितता या भावनांची अनुभूती घेतो. हे असं शारीरिक एकटेपणही अंगावर येतंच. करोना साथीतले दिवस आठवले, तर किती विचित्र परिस्थिती होती. शेजारच्या घरात राहणारे तिथे होते खरे, पण जणू ती भिंत अशी काही अभेद्य होऊन बसली, की त्यांच्याशी संपर्कही कठीण झाला होता. या काळात अनुभवलेल्या एकटेपणाचे किती तरी किस्से आजच्या पिढीकडे आहेत.
अनेक इंग्रजी चित्रपटांमध्ये कोणत्या तरी संकटात अडकून एकटं राहण्याचे प्रसंग हीच चित्रपटांची कथा झाली आहे. ‘लाइफ ऑफ पाय’, १२७ अवर्स, ‘ग्रॅव्हिटी’, ‘ब्लॅक वॉटर’, ‘फॉल’ वगैरे. ना कोणाशी बोलणं, ना जगण्याची खात्री.. अशा वेळी आस लागते ती फक्त एका सहवासाची. प्राचीन काळापासून माणसाच्या भावना जसजशा विकसित होत गेल्या तसतसं त्याचं नागरिकीकरण होत गेलं, समाज आणि समाजाचा सहवास खूप महत्त्वाचा होत गेला. माणूस हा सामाजिक प्राणी असल्याने लादलं गेलेलं एकटेपण खूप काळापर्यंत लांबलं तर माणसाच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होतो. एखादा गुन्हा केल्यावर दिली जाणारी पहिली शिक्षा ही व्यक्ती आणि समाजातल्या लोकांचा सहवास तोडून त्याला एकटं ठेवणं हीच असते हे लक्षात घेता सहवासाचं महत्त्व अधोरेखित होतं.
एकटेपण सगळयांना नेहमीच डाचतं असं नाही. आपल्या मनाची तयारी करून, निश्चित अशा एखाद्या उद्दिष्टासाठी, काही तरी नवीन अनुभूती घेण्यासाठी जाणीवपूर्वक निवडलेलं एकटेपण हे एखादी नवनिर्मितीही करून जातं. रोजच्या धबडग्यातून बाहेर पडून ‘सोलो ट्रिप’ करणाऱ्यांची संख्या हल्ली वरचेवर वाढताना दिसत आहे. तिथे भीती आणि असुरक्षिततेची जागा ही उत्सुकता, आनंद, नावीन्याची आस, यांसारख्या सकारात्मक भावनांनी घेतलेली असते. मध्यंतरी माझ्या ओळखीतल्या तिशीच्या तरुणाचं कर्करोगानं अचानक निधन झालं. ते इतकं अनपेक्षित होतं की त्याच्या बायकोला कुणी एकटं ठेवी ना. या नातेवाईकांच्या भावना निश्चितच चांगल्या होत्या. पण दिवाळीच्या एके दिवशी तिनं सगळयांना सांगितलं, की ‘मला एक-दोन दिवस एकटीलाच राहायचं आहे.’ नातेवाईक समंजस होते. सगळयांनी तिच्या म्हणण्याचा आदर ठेवत तिला तो अवकाश दिला. नवरा गेल्यापासून रोज लोकांना भेटल्यावर ती त्यांच्या मनातल्या त्याच्या आठवणी ऐकत होती. पण तिच्या मनातला तो आठवायला तिला उसंत, एकटेपणाच मिळत नव्हता. तिनं मागून घेतलेल्या एकटेपणानं तिला तो अवकाश मिळवून दिला.
एकाकीपण ही मात्र मनाची स्थिती आहे. त्याचा तुमच्या शारीरिक एकटेपणाशी संबंध असेलच असं नाही. उदाहरणार्थ, शेकडो फॅन्स आणि सहकाऱ्यांच्या गराडयात वावरणाऱ्या एखाद्या कलाकाराचं एकाकीपण. एकदा एक प्रसिद्ध अभिनेता त्याच्या एका मुलाखतीत म्हणाला होता, की ‘मला जर मनातलं बोलायचं असेल, माझा ताण कोणाशी तरी बोलून घालवायचा असेल, तर मी आई-वडिलांकडे जाऊ शकत नाही. कारण त्यांना काय करावं ते कळणार नाही. उलट मला ताण आला आहे याचा त्यांनाच ताण येईल. मित्रांशी बोललो तर त्यांना एवढंच वाटेल, की यानं मला त्याचा प्रॉब्लेम सांगितला. त्यामुळे मी मनातलं कोणाकडेच बोलत नाही.’ अर्थात ही गोष्ट फक्त या स्टार अभिनेत्याची नाही, तर अनेक व्यक्तींची, सामान्यांचीही आहे.
एकाकीपण ही आता अनेक देशांची एक सामाजिक समस्या झाली आहे. त्यामुळेच ‘जागतिक आरोग्य संघटने’नंही त्याची दखल घेत म्हटलं आहे, की रोज १५ सिगारेट ओढण्यानं आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामापेक्षाही भयंकर दुष्परिणाम एकाकीपणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर होतो! (Loneliness could be worse for health than smoking 15 cigarettes a day.) आपल्याला वाटत असेल, की करोनानं या एकटेपणाच्या समस्येची आपल्याला जाणीव करून दिली. पण वास्तव तसं नाही. करोनाच्या आधीही एकाकीपणाची समस्या जगभरात पसरत चालली होती. करोनानं त्यात आणखी भर टाकली एवढं मात्र खरं. भारतातल्या गरिबी, बेकारी, भ्रष्टाचार, शहरं-गावांची दुरवस्था, यांसारख्या आपलं रोजचं जगणं त्रासदायक करून टाकणाऱ्या समस्यांच्या वेढयात आपलं एकाकीपणाच्या या मानसिक-सामाजिक समस्येकडे दुर्लक्ष झालं असेल. पण जगातल्या अनेक देशांनी या समस्येकडे गंभीरपणे पाहायला सुरुवात केली आहे.
आपण जर एकाकीपणाची व्याख्या पाहिली, तर एकाकीपण म्हणजे तुम्ही समाजापासून विलग आहात याची जाणीव होणं. ही जाणीव बाहेरचे कोणी करून देत नाहीत, तर ती ज्याची त्यालाच होते. आता या व्याख्येकडे बघितलं, तर जे समस्येचं कारण आहे, त्यातून उपायही सापडू शकतो असं म्हणता येईल. म्हणजे ज्याला एकाकीपण जाणवतं, त्यालाच पुढाकार घेऊन त्यावर मात करण्यासाठी उपाय करावे लागतील. पण हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. हेच लक्षात घेऊन जपान सरकारनं एक उल्लेखनीय पाऊल उचललं. ते म्हणजे ‘मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस’ हे मंत्रालयच त्यांनी नव्यानं सुरू केलं. वाढत्या आत्महत्यांना कसा आळा घालावा, याचा विचार करताना एकाकीपणाची तीव्र भावना हे आत्महत्यां- मागील एक महत्त्वाचं कारण आहे हे जपान सरकारच्या लक्षात आलं. त्यावर उपाय म्हणून तत्कालीन पंतप्रधान युशिहिदे सुगा यांनी २०२०-२१ या काळात ‘मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस’ सुरू करून तेत्सुशी साकामोटो यांची ‘मिनिस्टर ऑफ लोनलीनेस’ म्हणून नियुक्ती केली. यासारखंच काम इंग्लंडमध्येही झालं. ब्रिटिश सरकारनं नोव्हेंबर २०१८ मध्ये ट्रेसी क्राऊच यांची ‘मिनिस्टर ऑफ लोनलीनेस’ म्हणून नियुक्ती केली. हे मंत्री आणि त्यांचे सहकारी एकाकीपणानं ग्रासलेल्या व्यक्तींना मदत करणं, त्यांना परत सामाजिक प्रवाहात आणणं, हे उद्दिष्ट ठेवून काम करतात. एकाकीपण सोसणाऱ्यांसाठी हेल्पलाइन चालवल्या जातात.
जपान हा सामुदायिक जीवनाला महत्त्व देणारा देश आहे. जर एखादी व्यक्ती दीर्घकाळापर्यंत सामाजिक देवाणघेवाणीपासून दूर असेल आणि स्वत:ला घरात बंद करून घेत असेल, तर ते ती केवळ एका व्यक्तीची मानसिक समस्या न मानता ती एक सामाजिक घटना आहे असं मानतात. या प्रकाराला त्यांनी ‘हिक्क्योमोरी’ ((Hikkiomori- shut in) अशी संज्ञा दिली आहे. जपानमधील काही फॅमिली डॉक्टरांनीही त्यांच्याकडे येणारे अनेक रुग्ण हे त्यांना कोणतीही शारीरिक व्याधी नसतानाही केवळ बोलण्यासाठी येतात, असं निरीक्षण नोंदवलं होतं. एप्रिल २०२३ च्या एका अहवालानुसार जपानमध्ये सध्या १५ लाख लोक हे या ‘हिक्क्योमोरी’नं ग्रस्त असून यामध्ये सर्व वयोगटांच्या लोकांचा सहभाग आहे. अशा प्रकारच्या एकाकीपणामुळे अपराधी वाटणं (गिल्ट), दुष्चिंता (एन्झायटी) अशा मानसिक आजारांची शक्यता वाढते. जपान सरकारच्या आरोग्य विभागाने २०१८ पासून संपूर्ण जपानमध्ये ‘हिक्क्योमोरी’साठी ८५ प्रादेशिक आधार केंद्रं स्थापन केली. जपाननं या कामी पुढाकार घेतला असला, तरी एका अहवालानुसार एकाकीपणाचा सर्वात जास्त दर हा ब्राझील, तुर्कस्तान, भारत आणि सौदी अरेबिया या देशांत आहे.
वैयक्तिक आयुष्यात आलेली वेगवेगळी कारणं सोडता जीवनात अचानक होणारे बदल, मानसिक आरोग्याच्या समस्या, स्व-आदराचा अभाव आणि व्यक्तिमत्त्वातले काही घटक या एकाकीपणाला कारणीभूत असतात. हा एकाकीपणा तीन प्रकारांत विभागण्यात येतो. सर्वात पहिलं, भावनिक एकाकीपण. या व्यक्तींच्या आयुष्यात अर्थपूर्ण नातेसंबंधांचा अभाव असतो. मग ते वैवाहिक नातेसंबंध असोत की इतर कौटुंबिक मैत्रीसारखी सामाजिक नाती. त्यामुळे आपला आनंद, दु:ख आणि इतर भावना त्यांना कोणालाच सांगता येत नाहीत. दुसरा प्रकार, सामाजिक एकाकीपण. आधुनिक काळातल्या अनेक प्रसंगांबरोबरच मला इथे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी सहन केलेला सामाजिक बहिष्कार आठवतो.
तिसऱ्या प्रकारामध्ये ‘आपण एकटेच आहोत, आपल्याला कुणाशीही काहीच देणंघेणं नाही,’ ही विरक्तीची भावना ‘अस्तित्वात्मक एकाकीपण’(एक्झिस्टेन्शियल लोनलीनेस) आढळते.
एकंदर एकाकीपणाच्या या जागतिक समस्येची व्याप्ती बघता या मानसिक-सामाजिक समस्येवर येत्या काही काळात भारतालाही काम करावं लागणार आहे. म्हणूनच पुढील लेखांमधून आपण एकाकीपणाचे विविध कंगोरे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
trupti.kulshreshtha@gmail.com