डॉ. अंजली जोशी

मागची पिढी आणि आजची तरुण पिढी यांच्यातल्या मतभेदांपैकी एक विषय म्हणजे लग्न. मागच्या पिढीला वाटतं की लग्न झालं की स्थैर्य येईल, पण तरुण पिढी आधी आयुष्यात स्थैर्य आणण्याच्या मागे असते. त्यांच्या मते, स्थैर्य आलं की लग्न होईलच. आणि नाही झालं तरी त्यांना घाई नसते. परदेशी, तेही एकटं राहणाऱ्या तरुणांचे प्रश्न अधिकच वेगळे, कारण सगळय़ा गोष्टी त्यांना एकटय़ानं पार पाडायच्या असतात. पण ते पालक पिढी समजून घेत नाही. ‘प्रेम नको, पण काळजी आवर’ अशी म्हणायची वेळ या तरुणांवर का येत असावी?..

Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Grandparents got married again In 60th Wedding Anniversary
‘एक नात आयुष्यभराच…’ गजऱ्याच्या मुंडावळ्या बांधून आजी-आजोबा उभे राहिले लग्नाला; VIRAL VIDEO एकदा बघाच
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO

शनिवारी सकाळी जाग आली तेव्हा अंग मोडून आलं होतं. तेवढय़ात आईच्या मेसेजची धून वाजली. तिकडे आता संध्याकाळचे ५ वाजले असतील. हा तिचा तिसरा ऑडिओ मेसेज. त्यात काय असणार याचा अंदाज होताच. काहीशा अनिच्छेनंच तो उघडला. ‘‘शुभम, अरे, मी ज्या नवीन मुलींची प्रोफाइल्स पाठवली आहेत तुला, त्यांना संपर्क केलास का? या वीकएंडला तरी जमव बाबा. आता दोन आठवडे झाले.’’

ती उघडून बघायलाही फुरसत मिळाली नव्हती. आईबाबांना वाटतं की, शनिवार-रविवार म्हणजे कामाची धावपळ नाही. उलट जास्तीत जास्त काम याच दिवशी असतं. घराची स्वच्छता, बाजारहाट, आठवडय़ाचे कपडे धुणं, इस्त्री करणं, नोकरीतली अपूर्ण कामं, यात हे दोन दिवस बघता बघता संपून जातात. आधीच्या आठवडय़ातला रविवार तर गाडीवर साचलेला बर्फ काढण्यातच गेला. मागच्या आठवडय़ात कंपनीत आर्थिक तणावामुळे वेतनकपातीची कुजबुज चालू होती आणि मग मूडच गेला. दर वीकएंडला काही तरी नवीन उभं ठाकतं. आईबाबांना हे समजणं अवघड आहे. तिथे प्रत्येक कामासाठी माणसांची मदत मिळते. इथे प्रत्येक गोष्ट स्वत:च करायची. इथल्या कार्यपद्धतीशी आईबाबांना रिलेटच होता येत नाही. त्यांचं पालुपद चालूच असतं- ‘सुट्टी असूनही वेळ कसा मिळत नाही?’

वीकएंडचा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आठवडय़ाच्या भाज्या करून त्या वेगवेगळय़ा डब्यांत भरून फ्रीजरमध्ये ठेवणं. पोळय़ा रेडीमेड मिळतात. अर्थात हे मी आईबाबांना सांगितलेलं नाही. नाही तर शिळं अन्न कसं वाईट असतं, ते खाल्ल्यामुळे तब्येतीवर कसा दुष्परिणाम होतो, याबाबत एक लेक्चर मिळेल. आई तर तेवढय़ावर थांबणार नाही. मी राहतो त्या परिसरात जेवणाचा डबा मिळतो का, याची एक शोधमोहीमच हातात घेईल आणि आता लग्नाच्या मुलींची प्रोफाइल्स जोमदारपणे पाठवत असते, त्यात डबेवाल्यांच्या प्रोफाइल्सची भर पडेल.

उठायचं त्राण नव्हतं. अंगातून गरम वाफा आल्यासारखं वाटतंय. ताप आला असणार बहुतेक! पॅरासिटामॉलची गोळी घेतली. आता थोडा वेळ शांत झोप लागली की बरं वाटेल. आजची सगळी कामं तुंबून राहणार. या वीकएंडलाही प्रोफाइल्स बघायला वेळ मिळणार नाही. आईला काय सांगणार? ताप आला आहे, असं सांगितलं तर तिला तिथे रात्रभर झोप लागणार नाही आणि मग सतत काळजीनं फोन करत बसेल. ‘डॉक्टरकडे जा. औषध घे. खर्चाचा विचार करू नको,’ म्हणून मागे लागेल. इथे किरकोळ तक्रारींसाठी डॉक्टरकडे कुणी जात नाही. वैद्यकीय उपचार इतके महागडे असतात की, एक-दोन टेस्ट्समध्येच आतापर्यंतची साठवलेली पुंजी रिती होईल!  

फोनच्या रिंगनं जाग आली. आईबाबांचा व्हिडीओ कॉल. मी सावरून बसलो. झोपलेलो दिसणार नाही याची काळजी घेऊन फोन उचलला. ‘‘असा का दिसतोस? चेहरा उतरलेला दिसतोय!’’ आईचा पहिलाच प्रश्न. ‘‘झोपेतून उठल्यामुळे वाटत असेल!’’ मी संभाषणाची गाडी दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला. पण आईनं परत विषय छेडलाच. ‘‘शुभम, अरे कधी बघणार आहेस त्या मुलींची प्रोफाइल्स? इंटरेस्ट दाखवलेल्या मुली आहेत त्या. त्यांच्या पालकांचे फोन येत राहतात मला. त्यांना काय सांगू?’’

‘‘त्यांच्या मुलींनाच थेट संपर्क करायला सांग की!’’ मला त्या विषयावर चर्चा नको होती. ‘‘अरे, त्या मुलीही तशाच! उत्तरच देत नाहीत. मग आम्ही पालकच एकमेकांना संपर्क करत राहतो. कसली रे तुमची पिढी? पहिला कॉन्टॅक्ट कुणी करायचा यावरून इगो इश्यू?’’ आईची पट्टी चालूच होती. ‘‘आई, हा इगो इश्यू नाही. आम्हाला वेळच मिळत नाही.’’

‘‘वेळ आपोआप नाही मिळणार! तो काढायला लागतो. ठरवून लग्न करायचंय ना? मग त्यासाठी वेळ नको का काढायला?’’ आईशी हुज्जत घालण्याचं त्राण माझ्यात नव्हतं; पण वाटलं, सध्याच्या अरेंज्ड मॅरेजमधले ताण आईबाबांना कळणार नाहीत! तीन-चार वधू-वर सूचक मंडळांत नाव नोंदवलं आहे. त्यातून सतत मॅच झालेल्या मुलींची प्रोफाइल्स पूर आल्यासारखी येत राहतात. ‘इंटरेस्टेड’ मुलींची नोटिफिकेशन्स येत राहतात, मेसेज येत राहतात. ‘लोकेशन फ्लेक्सिबिलिटी’ आहे का? भारतात परत येणार का? स्मोकिंग, ड्रिंकिंग करतोस का? कंपनी बदलणार का? किती प्रमोशन्स मिळाली? आधीची रिलेशनशिप होती का? अशा प्रश्नांची उत्तरं देत राहायचं. कुणाशी कुठला संवाद साधत आहोत, याचा ट्रॅक ठेवणंही कठीण जातं. या सगळय़ातून पुढे गेलं तरी लगेच निर्णय घेता येत नाही. चर्चाच्या असंख्य फेऱ्या होतात. अनेकदा पुढे काहीच होत नाही. हे सगळं  थकवणारं आहे.

‘‘अरे, त्या श्रुतीशी बोललास ना? पॉझिटिव्ह वाटतंय का?’’ आई नेटानं विचारत होती.

‘‘कोण श्रुती?’’ मला संदर्भ लागेना.

‘‘अरे, मागच्या आठवडय़ात दीड-दोन तास गप्पा मारल्यास ना तिच्याशी?’’ तिच्या आईचा फोन आला होता मला. जमतंय असं वाटतंय का?’

‘‘माहीत नाही.’’ मी वैतागून म्हटलं.

‘‘अरे, मग एवढा वेळ काय गप्पा मारत होतात? जमेल असं वाटलं तरच एवढा वेळ आपण देतो ना बोलण्यासाठी?’’ आई बोलतच होती.

‘‘इतकं साधं नसतं ते! तुला कळणार नाही.’’ मी फोन ठेवता ठेवता म्हटलं.

डोळय़ांवर परत झापड आली आणि बंद डोळय़ांसमोर श्रुतीबरोबर झालेली व्हच्र्युअल चर्चा आठवली.

‘‘तुझं जीवनाचं ध्येय काय?’’ तिनं विचारलं.

‘‘इथे सेटल व्हायचंय हे नक्की. आहे त्याच क्षेत्रात पुढे काम करायचंय.’’ मी खरंखुरं उत्तर दिलं.

‘‘हे काय ध्येय झालं? सीईओ व्हायचं ध्येय तू ठेवलं पाहिजेस!’’ ती तोंड वाकडं करून म्हणाली.

‘‘मी रिअ‍ॅलिस्टिक आहे.’’ मी म्हणालो.

‘‘नाही. तू आत्मसंतुष्ट आहेस. तुझ्यात महत्त्वाकांक्षा नाही. तू प्रत्यक्षात सीईओ होशील की नाही, यापेक्षा त्या दिशेनं तू पावलं टाकत आहेस का, हे महत्त्वाचं आहे. तुझ्यात ती जिद्द दिसत नाही.’’ चर्चा संपली तेव्हाच नकार येणार याचा अंदाज लागला.

अर्थात मीही कित्येक नकार दिले आहेत. मागच्याच महिन्यात चर्चा झालेल्या एका मुलीनं विचारलं, ‘‘तू ड्रिंकिंग किती करतोस?’’ मी प्रामाणिकपणे सांगितलं की, ‘‘मी सोशल ड्रिंकर आहे. पंधरा दिवसांतून एकदा मित्रमंडळींबरोबर ड्रिंक घेतो.’’ त्यानंतर तिच्या मेसेजला उत्तर पाठवायला दहा मिनिटं जरी उशीर झाला तरी, ‘‘काय रे, कुठे होतास? ड्रिंक करत बसला होतास का?’’ म्हणून संशयानं विचारत राहायची. जसा काही मी अट्टल दारुडय़ाच आहे! अर्थातच मी तिच्याबाबत पुढे गेलो नाही.

पण केवळ हाच मुद्दा नाही, तर बचत किती करायची? घरखर्च कसा चालवायचा? आईवडिलांच्या आजारपणात कुणी आणि किती वेळ काढायचा? असे असंख्य मुद्दे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. आईबाबांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी म्हणजे- मुलीचं कुटुंब, शिक्षण आणि आईवडील! पण जेव्हा मुलं दूरदेशात जाऊन स्वतंत्रपणे सगळं करत असतात, तेव्हा कुटुंबाच्या प्रभावातून ती बाहेर आलेली असतात. त्यांची व्यक्तिमत्त्वं भिन्न झालेली असतात. म्हणून व्यक्तिमत्त्वाचे सूक्ष्मातिसूक्ष्म कंगोरे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचे असतात. जे आईबाबांना बिनमहत्त्वाचे मुद्दे वाटतात, ते आमच्या दृष्टीनं गाभ्यातले असू शकतात.

एकदा मी याबाबत बोलण्याचा प्रयत्नही केला, तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘तुम्ही मुलं-मुली कसल्या फालतू मुद्दय़ांची चिकित्सा करत राहता! एका मुलीनं म्हणे लग्नाला नकार दिला, कारण तिला मांजरं आवडतात; पण मुलाला कुत्रे! हे काय कारण झालं? आमच्या वेळी असली चिकित्सा नसायची. एक-दोन भेटींतच लग्न पक्कं ठरायचं आणि तरीही आमचे संसार सुखाचे झालेच की!’’ यातले किती संसार खरे सुखाचे झाले आहेत, यावर मी अर्थातच आईबाबांशी वाद घातला नाही; पण मुलींबरोबरच्या चर्चाचा तपशील सांगणं बंद केलं. तरीही ते खोदून खोदून विचारत राहतात. एकदाचं लग्न उरकलं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं त्यांना वाटतं.

इथे अनेकदा एकटं वाटतं. शेअरिंग करण्यासाठी जवळचं माणूस हवंसं वाटतं. जोडीदाराची कमतरता जाणवते. लग्न करावंसं वाटतं; पण आईबाबा मानतात तसं लग्न ही जीवनाची इतिकर्तव्यता मी मानत नाही. लग्न प्रथम प्राधान्यक्रमांकावर नाही. प्रथम प्राधान्यक्रमांकावर स्थैर्य आहे. त्यासाठी नोकरी टिकवणं महत्त्वाचं आहे. इथे नोकरकपात सुरू झाल्यापासून आमच्या क्षेत्रात हाहाकार उडाला आहे. नोकरी गेली तर पर्यायी मार्ग काय अवलंबायचे हा विषय सध्या प्राधान्यावर आहे. लग्नाच्या प्रयत्नांना मग कमी वेळ दिला जातो. तसं झालं की आईबाबा कासावीस होतात. त्यांना वाटतं की लग्न झालं की स्थैर्य येईल. मला उलटं वाटतं. आधी स्थैर्य, मग लग्न. लग्न झालं तर उत्तम, पण नाही झालं तरीही आकाश कोसळत नाही. लग्न सामाजिक मान्यतेसाठी नाही, तर स्वत:साठी करायला नको का?

 .. किती वेळ गेला कुणास ठाऊक. मला दरदरून घाम आला होता. ताप उतरला असावा. मला तरतरी वाटत होती. उठणार, तेवढय़ात फोनची रिंग परत वाजली. आईचा फोन. ‘‘शुभम, मला चैन पडत नाही. बरा आहेस  ना रे?’’

मला भरून आलं. सांगायचं होतं, की लहानमोठय़ा गोष्टींसाठी माझी काळजी करणं तुम्ही सोडून द्या. माझी काळजी वाहायला मी समर्थ आहे. हजारो मैल दूर असलेल्या देशात मी स्वतंत्रपणे निभावून नेत आहे. मदत लागली तर पहिली हाक तुम्हालाच मारीन. लग्न ठरवण्यासाठी नाही का तुमचा सपोर्ट मागितला? पण म्हणून हात धुऊन मागे लागू नका. मग तुमच्याशी बोलण्याचाच ताण येतो. मला माझ्या गतीनं जाऊ द्या. माझ्या निर्णयांत मला तुमचा सपोर्ट हवा आहे, अवलंबन नको. या दोन्हीतली सीमारेषा फार धूसर आहे ना?’’

पण माझे शब्द घशातच अडकले, कारण आईचा आवाज ऐकू येत होता, ‘‘शुभम, अरे, माझ्या मैत्रिणीनं एका मुलीचं स्थळ सांगितलं आहे. तू बोलून तर बघ..’’