डॉ. अंजली जोशी
आधीची पिढी आणि नंतरची पिढी यांच्यातील मतभेद हे कायमचेच. पण अनेकदा हे मतभेद वादाचं रूप घेतात आणि नात्यांमध्ये भेगा पडत जातात. मात्र त्यांची दरी होण्याआधी पालक आणि मुलांच्या नात्यातले ‘वळणबिंदू समजून घेणं महत्त्वाचं. नव्या जुन्या दोन्ही पिढय़ांना विचार करायला लावणारं हे सदर दर पंधरवडय़ानं.
लेखिका व्यावसायिक मानसोपचारतज्ज्ञ असून समुपदेशन मानसशास्त्रात त्यांनी ‘एम.फिल’ व ‘पीएच.डी.’ संपादन केली आहे. मुंबईतील नामांकित व्यवस्थापन शिक्षण संस्थेत त्या ‘एचआर’ (मनुष्यबळ विकास) या विषयाच्या प्राध्यापक व सहयोगी अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. अनेक संस्था व कंपन्यांशी त्या ‘कन्सिल्टग सायकॉलॉजिस्ट’ म्हणून संलग्न असून मानसशास्त्र व व्यवस्थापन या विषयांवर त्यांनी देशभर अनेक व्याख्याने व कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांची आजपर्यंत आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच मासिके, नियतकालिके व राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये शंभराच्यावर लेख व शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांची ‘मी अल्बर्ट एलिस’ ही कादंबरी विशेष लोकप्रिय झाली. ‘विरंगी मी, विमुक्त मी’ या कादंबरीला ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चा ‘ललित ग्रंथ पुरस्कार’ आणि ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा ‘कादंबरी’ पुरस्कार मिळाला आहे. २०२० च्या ‘चतुरंग’मध्ये त्यांनी ‘सायक्रोस्कोप’ ही मानसिक आरोग्यावरची लेखमाला लिहिली होती.
आपल्या सर्वाच्या आयुष्यात अनेक वळणबिंदू येत असतात. इतके, की चालू असलेल्या घडीत बदल करावा असं आपल्याला वाटू लागतं. काहीतरी चुकतंय, काहीतरी निसटून जातंय, याची जाणीव होते. हे वळणबिंदू कधी पुसट जाणिवेच्या स्वरूपात असतात, कधी सूक्ष्मपणे धडका देणारे असतात, तर कधी अवचितपणे समोर येऊन उभे ठाकतात. यातल्या प्रत्येक बिंदूत बदलाचं सामथ्र्य असतं. रचनात्मक कृती करण्यात, व्यावसायिक मदत घेण्यात हे बिंदू निर्णायक ठरत असतात. ते शोधता आले आणि त्यांचा विधायक उपयोग करता आला, तर आत्मविकासाला मदत तर होतेच, पण इतरांबरोबरचे नातेसंबंधही सुधारू शकतात.
आपल्या डोळय़ांसमोर वाढणारी आपली मुलं जेव्हा तारुण्यात प्रवेश करतात, तेव्हा येणारा टप्पा हा पालक-मुलांच्या नात्यातला एक महत्त्वाचा वळणबिंदू असतो. हा वळणबिंदू प्रस्तुत लेखमालेच्या केंद्रस्थानी आहे. वळणबिंदू अनुभवण्यासाठी खूप मोठी घटनाच घडावी लागते असं नाही, तर एखाद्याशी झालेला संवाद, त्यांचं व्यक्त होणं, बाजू मांडणं, हेही वळणबिंदू ठरू शकतात. असे अनेक वळणबिंदू तुम्हाला या लेखमालेत अनुभवण्यास मिळतील. तरुण मुलामुलींची मानसिकता यात उलगडून दाखवली जाणार आहे. त्यांच्या मनात काय चाललं आहे, ते कुठल्या भावनिक आंदोलनांतून जात आहेत, याची पाहणी या सदरात होणार आहे. त्यांची मानसिक स्पंदनं थेट, जशीच्या तशी तुमच्यासमोर ठेवली जाणार आहेत.
तरुण पिढीच्या मानसिक स्पंदनांचा आवाज आपल्याला अनेकदा ऐकू येत नाही. आपण स्वत:च्या मानसिक आवर्तात इतके गुरफटलेले असतो, की दुसरे आवाज ऐकू येण्याचे दरवाजे आपण बंद केले असतात. त्यांचं म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यांचे ताणतणाव, भावनिक चढउतार, आपल्यापेक्षा भिन्न असणाऱ्या त्यांच्या विचारपद्धती हे परकं वाटू लागतं. त्यांना समजून घेण्यामध्ये एक भिंत उभी राहते आणि मग ‘ही पिढी स्वार्थी आहे, चंगळवादी आहे, एनटायटल्ड आहे,’ असे शिक्के आपण सहजपणे मारून मोकळे होतो. पण त्यामुळे त्यांना समजून घेण्यातलं अंतर वाढत जातं!
२१ ते ३५ हा वयोगट या लेखमालेसाठी निवडलेला आहे. या वयोगटात एकतर शिक्षण संपलेलं असतं किंवा उच्च शिक्षणाचा शेवटचा टप्पा चालू असतो. आयुष्यात स्थिरस्थावर होण्याचा हा काळ असतो. स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित होत असते. नवीन नाती जोडली जात असतात. वेगळे मार्ग, वेगळय़ा वाटा निवडाव्याशा वाटत असतात. नवीन मतं, नवीन विचार, नवीन दृष्टिकोन यांचं आकर्षण असतं. एकूणच हा काळ स्थित्यंतराचा असतो. अनेक आव्हानं समोर ‘आ’ वासून उभी असतात. शिक्षण-नोकरी-व्यवसायाच्या संधी वाढल्या असल्या तरी तिथेही रस्सीखेच चालू असते. नोकरी-घर-छंद यांच्यातल्या प्राधान्यक्रमाचा पेच असतो. मैत्री जशी जुळते तशी तुटतेही, याचं प्रत्यंतर ‘ब्रेकअप्स’मधून अनुभवायला येत असतं. लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. पण त्यातली गुंतागुंतही ते अनुभवत असतात, मग तो प्रेमविवाह असो नाहीतर जुळवून आणलेला! जोडीदाराच्या अपेक्षा, तडजोडीचे निकष, अनुरूपतेच्या कल्पना पारखून घेण्याचा हा काळ असतो. या सगळय़ांतून स्वत:साठी सुयोग्य जोडीदार निवडणं सोपं नसतं. घटस्फोट घेणं हे पूर्वीसारखं अपवादात्मक राहिलं नसलं तरी ते मानसिकदृष्टय़ा थकवणारं असतं. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’सारखे सहजीवनाचे पर्याय असले तरी त्यातही आव्हानं असतात.
या आव्हानांना तोंड देताना या मुलामुलींचा स्वत:शी, पालकांशी, समाजाशी सूक्ष्म किंवा मोठय़ा पातळीवर संघर्ष चालू असतो. मुलांच्या आयुष्यात येणारी ही स्थित्यंतरं फक्त त्यांच्यापुरतीच मर्यादित राहत नाहीत, तर पालकही या स्थित्यंतरातून नकळतपणे जात असतात. मुलांबरोबर मुलांच्या बदललेल्या दृष्टिकोनांशी जुळवून घेताना पालकांचीही दमछाक होत असते. मग नात्यामध्ये तणाव येतो. हा कधी दृश्य असतो तर कधी अदृश्य. पण तोपर्यंत पालक-मुलांच्या नात्याचा स्थिर रेषेतला चाललेला प्रवास चढउताराचा होऊ लागतो. संघर्षांच्या ठिणग्या उडतात. आरोप-प्रत्यारोप होतात, खटके उडतात, मनं दुखावली जातात. कधी सांधली न जाणारी दुखापत होते.
हा टप्पा पालकांसाठी नवीन वळणबिंदू असतो. आपली मुलं आपली असूनही आपली नसण्याचा तो अनुभव असतो. ज्यांच्यासाठी आयुष्यभर केलं त्यांच्यापासून मनानं विलग होणं अवघड जात असतं. संवादाला विपरीत वळण लागतं. तणावाची नवीन आवर्तनं तयार होतात. ‘आम्ही कसे बरोबर आणि तुम्ही कसे चूक’ या हमरीतुमरीमध्ये काय म्हणायचंय तेच हरवून जातं. तरुण पिढीतले अनेकजण जेव्हा माझ्याकडे समुपदेशनासाठी येतात तेव्हा त्यांना त्यांचं म्हणणं ऐकून घेणं हवं असतं. त्यातले कितीतरी म्हणतात, की ‘आमच्यावर पालक उपदेशांचा भडिमार करतात. आम्हाला कळत नाही, आम्हाला अनुभव नाही, आम्ही चूक आहोत, असाच त्यांचा सूर असतो. आमच्या बोलण्यात काही तथ्य आहे, असं त्यांना वाटतच नाही. आमचं सगळंच कसं चुकीचं असेल? आणि समजा आम्ही चुकलो तरी त्यातून शिकूच की! आधी ऐकून तर घ्या!’ या पिढीला काय सांगायचं आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, याची मांडणी या सदरात केली जाणार आहे. तरुण पिढीची त्यांच्या दृष्टीनं खरी असलेली बाजू यात मांडली जाणार आहे. त्यांची बाजू ते तुमच्यापुढे सादर करतील.
या वयोगटात केंद्रस्थानी असणाऱ्या लग्न, जोडीदार, सहजीवन, प्रेमसंबंध, करिअर या विषयांसंबंधी ते काय विचार करतात, त्यांची कशी चिकित्सा करतात, त्यांचे ताणतणाव काय आहेत, हे या सदरात उलगडलं जाईल. या विषयांबाबत पालकांना काय वाटतं, त्यांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्यावर काय केलं पाहिजे, यासंबंधी ‘चतुरंग’मध्ये यापूर्वी बरंच लिहिलं गेलं आहे. आपण स्वत: त्या भूमिकेत असल्यामुळे पालकांना ही बाजू माहीत असते. पण दुसऱ्या बाजूबाबत अनेकदा पालक अनभिज्ञ असतात. ही अनभिज्ञता दूर करण्याचं काम ही लेखमाला करणार आहे.
समजून घेण्यासाठी मानसशास्त्रात ‘Revolving Discussion Sequence’ म्हणजे RDS नावाचं एक तंत्र वापरलं जातं. या तंत्राच्या पहिल्या पायरीत एकमेकांच्या बाजू निव्वळ ऐकणं अभिप्रेत असतं. ‘आरडीएस’चं तत्व आहे- ‘प्रत्येकाला एक बाजू असते आणि ती त्याच्या परीनं खरी असते.’ हेच तंत्र आपण या लेखमालेसाठी वापरणार आहोत. हे मुख्यत: भावनिक तंत्र आहे. २०२० च्या ‘चतुरंग’ मधल्याच ‘सायकोस्क्रोप’ या लेखमालेमध्ये भावनिक समस्या मांडून तिची कारणमीमांसा, उपाय यांची चिकित्सा मी केली होती. ते वैचारिक तंत्र होतं. या लेखमालेत मात्र समस्येची वैचारिक मीमांसा मांडली जाणार नाही. फक्त बाजू मांडली जाणार आहे आणि तिची चिकित्सा, मीमांसा तुम्ही करायची आहे.
समजून घेण्यातली पहिली पायरी आहे ऐकून घेणं. आपल्याला वाटतं तितकं सोपं ते नसतं. कारण इतरांचं सांगणं ऐकताना अनेकदा आपल्या स्वत:च्याच मानसिक प्रक्रियांचा अडथळा त्यात येत असतो. आपले विचार, ठाम कल्पना, अनुभवांवरून ठरलेली मतं, यामुळे इतरांचं ऐकताना आपण त्यांच्या सांगण्याचं मूल्यमापन करत राहतो आणि त्यात ऐकणं हरवून जातं. एखाद्या विषयावर आपल्या मनात इतके ठाम दृष्टिकोन तयार झालेले असतात की त्या विषयाच्या दुसऱ्या बाजूला आपण मनात शिरकावच करू देत नाही. चूक-बरोबर, योग्य-अयोग्य अशा निवाडय़ांवर नकळत झेपावतो. व्यक्तीच्या अंतरंगात शिरून तिच्या विचार व भावनांचे कंगोरे शोधण्यात हे निवाडे अडथळा निर्माण करतात. या लेखमालेत असा कुठलाही निवाडा न करता समोर मांडलेली बाजू सर्वप्रथम ऐकून घेणं तुमच्याकडून अपेक्षित आहे. ती तुम्हाला पटेल किंवा पटणार नाही. पण निदान इतरांना एक बाजू आहे, हे तरी कळेल. इतरांची बाजू ऐकल्यामुळे अनेक अंतर्दृष्टी आपल्याला मिळत असतात. जीवनाकडे पाहण्याचा समंजस, परिपक्व दृष्टिकोन विकसित करण्यास या अंतर्दृष्टी मदत करत असतात.
ऐकून घेण्याची मानसिकता जोपासणं म्हणजे इतरांना त्यांची बाजू असू शकते, ती आपल्या विरुद्धही असू शकते, पण ती तशी असण्याचा त्यांना अधिकार आहे, हे मान्य करणं. अनेकदा आपण ते मान्य करत नाही. जवळच्या माणसांच्या बाबतीत तर हे हमखास होतं. त्यांनी आपल्यासारखाच विचार केला पाहिजे, असा दुराग्रह धरला जातो. मात्र त्यांना जर आपल्यापेक्षा वेगळं वाटलं, तर आपण म्हणतो की त्यांना असं कसं वाटू शकतं? त्यांना असं वाटताच कामा नये. मग आपण त्यांचं वाटणं कसं चुकीचं आहे, हे सांगायला जातो, त्याची छाननी करायला जातो आणि संवाद फिस्कटतो. एकदा त्यांना असं वाटू शकतं याचा स्वीकार केला, की मग पुढल्या पायरीवर त्यांच्या मतांची छाननी करता येते. पण वाटण्याचा स्वीकार न करताच मतांच्या छाननीवर घसरलो तर संवाद सुधारण्यापेक्षा तो जास्त बिघडत जाण्याची शक्यता जास्त असते. हे टाळण्यासाठी ऐकून घेणं महत्त्वाचं आहे.
यावर काही जण विचारतील की ऐकून घेण्याचं बंधन आमच्यावरच का? आम्हीच का एकतर्फीपणे इतरांची बाजू ऐकून घ्यायची? यावर उत्तर असं आहे, की तुमची बाजू तुम्हाला माहीतच आहे. ती नव्यानं सांगण्याची गरज नाही. पण नवीन बाजू कळली तर समतोलपणे विचार करता येईल. युवा पिढीशी होणाऱ्या संघर्षांची धार निवळत जाईल, दुराव्याचं अंतर कमी होऊ शकेल, परस्पर-संवाद वाढीला लागेल आणि हेच या सदराचं मुख्य उद्दिष्ट आहे.
काही जण असंही विचारतील, की आम्हीच का पहिलं पाऊल उचलायचं? आम्ही त्यांचं ऐकू, पण प्रथम त्यांनी आमचं ऐकावं. आम्हीच का ऐकण्याच्या भूमिकेत प्रथम शिरायचं? पहिलं पाऊल कुणी उचलायचं याचे काही संकेत आहेत. जे जास्त सुज्ञ आहेत, अनुभवी आहेत त्यांनी पहिलं पाऊल उचलणं अपेक्षित असतं. तुम्हीच पहिलं उचललंत तर या लेखमालेतील अनेक वळणबिंदू तुम्हाला कृती करण्यासाठी उद्युक्त करतील, ही आशा आहे.
anjaleejoshi@gmail.com