डॉ. अंजली जोशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उच्च शिक्षण घेतल्यावर चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली की धन्य झालो. आता कायमची काळजी मिटली, असं म्हणायचा काळ केव्हाच संपला आहे. विशेषत: ज्या क्षेत्राविषयी इतरांच्या मनात जास्त असूया आहे, त्या आयटी क्षेत्रात तर नोकरीची शाश्वती नाहीच. त्यामुळे एखाद्याची नोकरी गेली तर घरच्यांना कसं समजवायचं, खर्च कसे निभवायचे यापेक्षाही स्वत:ला या परिस्थितीत कसं तणावरहित ठेवायचं याचा ताण अधिक असतो. अशा विदीर्ण मन:स्थितीत गरज आहे ती आपल्या माणसांसमोर मन मोकळं करण्याची..
‘‘आकाश, आज फोनवर बोलायला तुला वेळ आहे, हे चांगलं आहे. नेहमी ऑफिसच्या कामाच्या घाईत असतोस. दिवसरात्र तुझं काम चालू असतं. थोडी उसंत काढ जरा. निशाची तब्येत कशी आहे? आता पाचवा महिना चालू आहे ना? तिला कडक डोहाळे लागलेले दिसताहेत. त्रास होत असेल तर तिला ऑफिसमधून रजा घ्यायला सांग. तू पण तिच्याकडे नीट लक्ष दे. तिचं मन तुला प्रसन्न ठेवायला हवं ना!’’ आई न थांबता फोनवर बोलत होती. मी ऑफिसमध्ये नव्हतो, हे तिला सांगण्याचा धीर मला झाला नाही.
‘‘अरे हो, माझ्यासाठी तू सेकण्ड ओपिनियन घ्या म्हणालास म्हणून आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे कालच जाऊन आलो. दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया करण्यावाचून पर्याय नाही, असं तेही म्हणाले. आता माझी सर्जरीची भीती कमी झाली आहे. उलट असं वाटतंय की कधी एकदा ती होईल आणि माझी वेदनांतून मुक्तता होईल..’’ मग बाबा फोनवर आले. ‘‘आकाश, सर्जरीची तारीख नक्की करायची आहे. खर्चाचा आकडा मोठा आहे. पर्सनल इन्शुरन्सची रक्कम पुरेशी नाही. मी सांगितलं त्यांना, मुलाच्या ऑफिसमध्ये आईवडिलांसाठी इन्शुरन्सची मोठी रक्कम मिळते. ऑफिसच्या एजंटला काय लागतं ते विचारून ठेवशील का?’’ मी आवंढा गिळला. ओठापर्यंत आलेले शब्द मनातच गिळून टाकले. ‘‘बाबा, आता घाईत आहे. नंतर करतो,’’ असं म्हणून कसाबसा फोन ठेवला.
काय सांगणार बाबांना, की महिन्याभरापूर्वीच माझी नोकरी गेलीय? त्यांनी किती कष्ट करून मला वाढवलंय, उत्तम शिक्षण दिलंय. त्यांना कोणत्या तोंडानं सांगू हे? मुलाखतीच्या सात फेऱ्या पार करून आताच्या या मोठय़ा कंपनीत माझी निवड झाली, याचा किती अभिमान आहे त्यांना? त्यांच्या नजरेतून तो गळून पडताना मला पाहावणार नाही. मग मीही माझ्या नजरेतून उतरेन. सुरुवातीला वाटलं, दुसरी नोकरी लगेच मिळण्यात अडचण येणार नाही. आधीच घोषणा करून त्यांना टेन्शन कशाला द्या? आताच्या कंपनीचा इन्शुरन्स बंद झाला, तरी नवीन कंपनीचा चालू होईलच की! पण नवीन नोकरी मिळणं हे वाटलं होतं तेवढं सोपं नाही, याची बोचरी जाणीव होतेय. अनुज ‘ग्लोबल क्रायसिस’ म्हणत होता ते खरंय. आभाळच फुटल्यावर ठिगळ कुठे कुठे लावणार? अनुजबरोबरचा दोन महिन्यांपूर्वीचा प्रसंग डोळय़ांसमोर जसाच्या तसा उभा राहिला.
नेहमीप्रमाणे अनुजच्या केबिनमध्ये त्याला रिपोर्टिग करायला गेलो आणि त्यानं थेट टर्मिनेशनची नोटीसच हातात ठेवली. अनुज जे काही बोलत होता ते कानांत शिरतच नव्हतं. नुसताच बधिर झालो होतो. मग अनुजच म्हणाला. ‘‘रिलॅक्स आकाश. अरे लोकेशन बंद होतंय म्हणून नाइलाजानं काढावं लागतंय. नाही तर तुझ्यासारख्या हाय परफॉर्मन्सरला काढणं, मला किती जिवावर येतंय!’’ अनुजचा प्रत्येक शब्द माझ्या डोक्यात सुरुंग पेटवत होता. गेली चार वर्ष दिवस-रात्र न बघता पडेल ते काम केलं, प्रोजेक्ट्सची संख्या दुप्पट केली, ढीगभर नवीन क्लाइंट्स आणले, २५ जणांची टीम सांभाळली आणि आता नफ्यात थोडा उतार आला तर मला लाथ मारून बाहेर घालवता? ‘‘धिस इज व्हेरी अनफेअर, अनुज!’’ मी चिडून म्हणालो. ‘‘वर्ल्ड इज नॉट ऑल्वेज फेअर आकाश! एम.डीं.ची ऑर्डर आहे म्हटल्यावर कुणाचाच इलाज नाही. तुला टर्मिनेशनचं जास्तीत जास्त चांगलं पॅकेज देण्याचा प्रयत्न करतोय मी!’’ अनुज म्हणाला.
त्याच्या केबिनमधून बाहेर पडताना मला वाटत होतं, की हे बहुतेक एक दुष्ट स्वप्न चालू आहे. जाग येईल आणि कळेल की हे खरं नाही. सध्या सगळीकडून नोकरकपातीच्या बातम्या कानांवर पडताहेत, म्हणून आपल्या मनानं हे स्वप्न रचलं असेल! ‘गूगल’, ‘ट्विटर’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘अॅमेझॉन’, अशा तालेवार कंपन्यांनी नोकरकपातीचं सत्र सुरू केलं, तेव्हापासून या दुष्टचक्राला सुरुवात झालीय. आमच्या कंपनीत नवीन भरती झालेल्यांच्या जॉइिनग डेट्स लांबणीवर पडत गेल्या, तेव्हा हे लोण अख्ख्या आयटी क्षेत्रातच पसरलंय, याची जाणीव झाली. काही जणांना डच्चू दिला गेला. तेव्हा वाटलं, या लोकांचा परफॉर्मन्स खराब आहे. पण दबक्या पावलांनी सुरू झालेली नोकरकपात आपल्यापर्यंत कधीच पोचणार नाही, याची खात्री असताना पाठीमागून येऊन बेसावधपणे तिनं कधी वार केला, ते कळलंच नाही.
आधी ही बातमी मी निशालाही सांगितली नाही. तिला मानसिक धक्का मला द्यायचा नव्हता. काही तरी जादू घडेल आणि नोकरीवर परत घेतलं जाईल, अशी वेडी आशाही लागून राहिली होती. पण महिन्याभराचा सवर्हिंग पीरियड संपत आला आणि तसं होण्याची आशा पार संपुष्टात आली. नवीन नोकरीही हातात नव्हती. एक मित्र म्हणाला होता, ‘‘तुम्ही नेहमी कारनं प्रवास करता. कधी तरी तुम्हाला रस्त्यावर अपघात झालेला दिसतो. तुम्ही हळहळत म्हणता, लोकांनी काळजीपूर्वक चालवायला हवं. त्यांच्याबाबत सहानुभूती दाखवत तुम्ही आपल्या मार्गाला लागता. पण एक दिवस ते तुमच्याबाबतच होतं. तुम्हालाच रस्त्यावर अपघात होतो. तुम्ही शॉकमध्ये जाता. जे घडलंय त्यातून बाहेर पडायला तुम्हाला वेळ लागतो.’’ माझ्या बाबतीत तसंच घडलं होतं.
हळूहळू सगळय़ा गोष्टी अंगावर येऊ लागल्या. नुकतंच आम्ही या नवीन घरात राहायला आलो होतो. जागेच्या भाडय़ाचे हप्ते माझ्या पगारातून जात होते. कार-लोन चालूच होतं. कर्जाचे हप्ते, रोजचा खर्च, बाळाचा होऊ घातलेला खर्च, नोकरांचे पगार, हे ओझं आता कसं वाहायचं? एकटय़ा निशाच्या पगारावर किती दिवस तरून जाणार? दिवस कसा तरी ढकलला जायचा, पण रात्र सरता सरत नव्हती. अंथरुणावर पडायचीच भीती वाटू लागली. बाळाचं स्वागत आता कुठल्या तोंडानं करणार? आईच्या ऑपरेशनचा खर्च कसा भागवणार? गुडघ्याच्या वेदनांनी बेजार झालेला आईचा चेहरा समोर यायचा. निशा हळवी आहे. तिला हे कळल्यावर काय होईल, या विचारानं काळजाचं पाणी पाणी व्हायचं. आतापर्यंतच्या बचतीचे, साठलेल्या पुंजीचे आकडे डोळय़ांसमोर नाचत राहायचे. रात्री-अपरात्री उठून मी जमाखर्चाचा हिशोब मांडत राहायचो. कितीही नॉर्मल राहण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी निशाला कळलंच. ती तर रडायलाच लागली. ‘‘निशा, तू काळजी करू नकोस. बाळाचं आगमन व्हायला अजून चार महिने आहेत. तोपर्यंत काही ना काही मार्ग निघेल. तू टेन्शन घेऊ नकोस. सगळा भार माझ्यावर सोड. तू या दिवसांत आनंदी राहिलं पाहिजेस.’’ मी उसनं अवसान आणून तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होतो. पण मनातून खात्री वाटत नव्हती.
रोज नोकरीसाठी अर्ज करतोय, काही ठिकाणी मुलाखतीही झाल्या आहेत. पण आता दोन महिने झाले तरी आशेचा किरण दिसत नाही. आलेला ताण दिसू नये म्हणून येणारा ताण, आईबाबांना न सांगण्याचा ताण, निशाला दिलासा देत राहण्याचा ताण, स्वत:चा आत्मविश्वास ढळू न देण्याचा ताण, असे ताणाचे किती तरी थर आता मनावर चढले आहेत. त्यातून स्वत:ला बाहेर काढण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतोय. सहकारी, समव्यावसायिक यांनाही कळवलंय. अशा ओळखींतूनच नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता दुणावते, हे मला माहीत आहे. पण नोकरकपातीची कुऱ्हाड आयटी क्षेत्रातल्या जवळपास सर्वच कंपन्यांनी उपसल्यामुळे नवीन पोझिशन्स फारशा निर्माण होत नाहीत आणि ज्या होतात त्यावर सगळय़ांच्या उडय़ा पडतात. आतापर्यंतचे सहकारी आता प्रतिस्पर्धी झाले आहेत. नाती कशी बदलतात हे कळण्यास नोकरी जाण्याचा एकच प्रसंग पुरेसा आहे. याबद्दलच्या समाजमाध्यमांवरच्या बोचऱ्या प्रतिक्रिया तटस्थपणे पाहणं आता हळूहळू जमू लागलंय. काही म्हणतात, ‘आयटीवाल्यांना भरमसाट पगार देऊन चढवून ठेवलं होतं. कधी तरी हा फुगा फुटणार होता. आता बघा सटासट नोकऱ्या जात आहेत!’ ‘आयटी’ क्षेत्राबद्दलचे किती गैरसमज लोकांच्या मनात असतात! त्यांना ‘आयटी’तला पगार दिसतो, पण भिंगरी लावल्यासारखं सतत नवीन शिकत राहावं लागतं, ते दिसत नाही. हरघडी नवीन तंत्रज्ञान बाजारात दाखल होत असतं. ते जर शिकून घेतलं नाही, तर तुम्ही बाजारातून मागे फेकले जाता. सतत रिस्किलिंग करत राहण्याचा ताण, हा ‘आयटी’ क्षेत्रात जास्तीत जास्त असतो. काही म्हणतात, ‘आता ‘चॅट जीपीटी’मुळे ‘आयटी’वाल्यांना काही कामच शिल्लक राहणार नाही.’ ‘आयटीची चांगलीच जिरली!’ म्हणून अनेकांना मनात आनंदाच्या उकळय़ा फुटत असतात. पण ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ मुळे फक्त ‘आयटी’वरच नाही, तर इतरही अनेक क्षेत्रातल्या नोकऱ्यांवर संक्रांत येणार आहे. हे ते सोयीस्कर विसरतात.
कधी कधी वाटतं, ‘आयटी’वर हे संकट भविष्यात येईल, हे ओळखण्यात आपण कमी पडलो का? वेळेवर ‘आयटी’मधून मॅनेजमेंटकडे वळायला पाहिजे होतं का? काही मित्रांनी तसं केलंही. पण मध्यंतरी मिडल-मॅनेजमेंटच्या सगळय़ांना काढलं. शेवटी काय? नोकरीवरून काढलं जाणं ही सध्याच्या व्यावसायिक कारकीर्दीत घडणारी अटळ अशी गोष्ट आहे. कुणी तरी म्हटलंय ना, की नोकरीवरून काढलं जाणं हे प्रेमभंगासारखं असतं. ते वेदना देतं; अतीव वेदना देतं. पण कणखरही बनवतं. मी कणखर बनण्याचा प्रयत्न करतोय. आपलं जीवन एका नोकरीवर एवढं अवलंबून असतं, हे नोकरी गमावल्यानंतरच लक्षात येतं. तरीही स्वत:ची ओळख नोकरीपासून वेगळी ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय. असा प्रवास करणारे आपण एकटेच नाहीत, तर इतर अनेक जण असाच प्रवास करत आहेत, किंबहुना, काही जणांचा प्रवास तर आपल्यापेक्षा खडतर आहे, हे कळल्यावर वेदनेची धार बोथट होते. आशेचा झरा झुळूझुळू वाहू लागतो.
कॉलेजमध्ये आपण अनेक विषय शिकतो, अनेक प्रशिक्षणं पूर्ण करतो. पण अशी आपत्ती कोसळल्यावर कसं तोंड द्यायचं, याचं शिक्षण कुठेच दिलं जात नाही. तो प्रवास एकेकटय़ाचाच असतो. गेले कित्येक दिवस मनात एक योजना घोळतेय. असं प्रशिक्षण देणारी कन्सल्टन्सी काढली तर? माझ्यासारख्या अनेकांची होरपळ थांबू शकेल. अशा कठीण काळात सकारात्मक ऊर्जा जास्त लागते. अशी ऊर्जा पुरवणारी साखळी आपण निर्माण करू शकू. याची सुरुवात स्वत:पासून करायची, याचं प्रशिक्षण स्वत:ला देतोय. स्वत:वर कुठलाही शिक्का मारून न घेता त्याबद्दल जवळच्या माणसांशी बोलणं ही त्यातली सुरुवातीची पायरी आहे आणि ती मला अमलात आणायची आहे. मग मी फोनपाशी गेलो. आईबाबांचा- घरचा फोन नंबर फिरवला. हात थरथरू लागले, घसा कोरडा पडू लागला.. पण नेहमीप्रमाणे फोन खाली न ठेवता माझं विस्कटलेलं बळ मी गोळा केलं. पलीकडून फोन उचलला गेला.. आणि म्हणालो, ‘‘आईबाबा, मला एक सांगायचंय..’’