डॉ. अंजली जोशी
मुलांचं करिअर ‘घडवणं’ ही गोष्ट बहुसंख्य पालक आपलीच जबाबदारी असल्यासारखी हाती घेतात; पण सर्वच मुलांचा करिअरचा रस्ता सारखा नसतो. त्यातल्या खाचखळग्यांचा आणि अपयशाचा सामना अनेक मुलं करत असतात. प्रत्येक वेळी त्यामागे ‘हल्लीच्या पिढीची बेजबाबदार वृत्ती’च असते असं नाही. नवी पिढी कोणत्या अनुभवातून जाते अशा वेळी..
‘‘कुणाल, तुझ्या शिक्षणात खंड का दिसतोय?’’ नोकरीसाठी मुलाखत घेणाऱ्या परीक्षकांनी प्रश्न विचारला. ‘‘बारावीनंतर मी इंजिनीअिरगला गेलो; पण सुरुवात केल्यानंतर वाटलं की, मला यात रस नाही. मग एक वर्ष थांबून कॉमर्सला प्रवेश घेतला.’’ मी उत्तरलो. ‘‘पण बी.कॉम.नंतरही गॅप दिसतेय.’’ परीक्षकांनी परत प्रश्न केला. ‘‘हो. कारण मी ‘सी.ए.’चा अभ्यास करत होतो. त्यात दोन-अडीच वर्ष गेली; पण फायनल परीक्षा पास न झाल्यामुळे ते सोडून दिलं. मग अॅनॅलिटिक्सचे काही कोर्सेस केले. आता या क्षेत्रात पुढे जायचं ठरवलंय.’’
‘‘अरे, तुझं एकाही गोष्टीत सातत्य दिसत नाही. सतत धरसोड दिसतेय. तुला आम्ही नोकरी दिली तर तीही लगेच सोडशील. आम्हाला कमिटेड लोक हवे आहेत. आम्ही प्रशिक्षण देतो, त्यांच्यावर खर्च करतो; पण जर ते सोडून गेले तर सगळं वाया जातं.’’ दुसरे एक परीक्षक म्हणाले. मी गप्प बसलो. कामाचा अनुभव घेण्याआधीच कमिटमेंट कशी देणार? पण सध्या माझ्याकडे पर्याय नव्हता. मी मुलाखत देत असलेली ही सतरावी कंपनी होती.
‘‘सर, मी मनापासून काम करीन. तक्रार करायला जागा ठेवणार नाही.’’ मी म्हटलं. ‘‘हं! तुझी आतापर्यंतची हिस्टरीच सांगते की, तुझी आवड फार काळ टिकून राहात नाही. तुमची पिढीच अशी आहे, की नाही आवडलं की द्या सोडून! एखादी गोष्ट मनासारखी होत नसली तरी ती सहन करण्याची क्षमताच नसते तुमच्यात!’’ पहिले परीक्षक म्हणाले. मनात आलं, इंजिनीअिरगमध्ये एक वर्ष काढणं, मग कॉमर्सचा अभ्यास करणं, सी.ए. करण्यात काही वर्ष घालवणं हे केवळ ‘आवडलं नाही’ म्हणून सोडून दिलं इतक्या सोप्या व्याख्येत बसणारं नाही! या प्रवासात किती तरी अपयश आणि वैफल्य वाटय़ाला आलं आहे. ते पचवलंय म्हणून तर मुलाखत देऊ शकतोय!
न बोलता मी मुकाटय़ानं ऐकत होतो. मग त्यांनी आळीपाळीनं माझा करिअरचा प्रवास कसा भरकटलेला आहे, मी उद्दिष्ट ठरवून काम कसं केलं पाहिजे, अशा उपदेशांचा भडिमार करून मुलाखत आटोपती घेतली. घरी आलो, तर आईबाबा वाटच पाहत होते. ‘‘काय झालं?’’ आईनं विचारलं. मी नकारार्थी मान हलवली. ‘‘वाटलंच होतं! आता नोकरी शोधणं बंद कर आणि सरळ ‘एमबीए’च्या प्रवेश परीक्षेची तयारी कर.’’ बाबा निर्वाणीच्या स्वरात म्हणाले. ‘‘मला ‘एमबीए’त रस नाही आणि त्याची फी? त्याचं ओझं मला तुमच्यावर लादायचं नाही.’’ मी ठामपणे म्हटलं. ‘‘फीचं आम्ही बघू. तू परीक्षेला तर बस आधी!’’ ते परत म्हणाले. ‘‘ते आवडत नाही, हे माहीत असतानादेखील?’’ आवाजावर ताबा ठेवत मी विचारलं. ‘‘तुझ्या आवडी- निवडीचा विचार करत बसलो म्हणून ही वेळ आलीय आज! तुझे शाळा-कॉलेजमधले मित्रमैत्रिणी बघ. सगळे आता स्थिरावले आहेत. सुजीतला तर दहावीला तुझ्यापेक्षाही कमी मार्क्स मिळाले होते; पण त्यानं बघ कसं नेटाने इंजिनीअिरग केलं आणि आता मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीलाही लागलाय. आणि तू? तुझी गाडी मात्र रुळावरून पुढेच जात नाही. तू सेटल झालेला असावास, असं वाटणं साहजिक नाही का? आता या वयात तू आमची काळजी करायची, का आम्ही तुझी?’’ आई चिडून म्हणाली. ‘‘पण मी कुठे तुम्हाला काळजी करायला सांगतोय? नका ना करू काळजी!’’ माझाही आवाज चढला.
एक तर मुलाखतीचा बोजवारा उडाल्यामुळे मी आधीच वैतागलो होतो. त्यात आईबाबांशी होणारे हे रोजचे वादविवाद. मी मुद्दाम मुलाखतीची वाट नाही लावली ना? मुलाखत चांगली झाली नाही, त्याचं दु:ख मलाही आहे; पण त्याबद्दल सहानुभूतीचा एक शब्दही नाही. मी जिमची बॅग खांद्यावर अडकवली आणि शूज घालायला लागलो. ‘‘खर्चात तर तसूभरही कमतरता नाही! जिमला जायला हवं, बाहेरचं खायला हवं, महागडे शूज हवेत, नवीन मोबाइल हवा. आईबाबा आहेतच चोचले पुरवायला! एवढी बॉडी-बिल्डिंग करून उपयोग काय? कमवायची अक्कल नाही अजून!’’ बाबांचे तोफगोळे माझ्या दिशेनं सुसाट सुटले होते. त्यांनी स्वत:ला जखमी होऊ न देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करत होतो; पण आतमध्ये ज्वाला धुमसत होत्याच. मी दरवाजा दाणकन आपटून लावला आणि घराबाहेर पडलो. ऊठसूट माझ्यावर किती खर्च होतो हे आईबाबा ऐकवत बसतात. कमवत नाही म्हणून मी उपाशी राहायचं, की कदान्न खायचं, की सुतकी चेहरा करून घराच्या चार भिंतींत स्वत:ला कोंडून घ्यायचं? जिममध्ये जाणं ही त्यांच्या दृष्टीनं चैन आहे, माझ्या दृष्टीनं ती अत्यावश्यक गरज आहे. मोकळा श्वास घेता येण्याची ती माझ्यासाठी एकमेव जागा आहे. मित्र आता फारसे उरलेच नाहीत. जे कुणी होते त्यांच्यामध्ये मिसळणं अवघड जातं. नोकरी, बढती, लग्न या त्यांच्या विषयांच्या साच्यात मी बसू शकत नाही. यात आपण कुठेच नाही, याचं शल्य अजून टोचण्या देतं. ‘तुझं सध्या काय चालू आहे?’ हा प्रश्न कुणी ना कुणी विचारतोच! त्यांना तोंड दाखवणंही नको वाटतं.
प्रेमसंबंधातही तेच! चार वर्षांचे प्रेमसंबंध चारूनं चार वाक्यांत संपवले. ‘‘तुझं अजून काहीच धड नाही. मी आणखी वाट पाहू शकत नाही. आईवडील मान्यता देणं शक्यच नाही. त्यांनी विचारलं, की कुणाल करतो काय, तर माझ्याकडे उत्तर नाही.’’ चारू निघून गेल्याचं हलाहलही मी एकटय़ानं पचवलं. अवघड काळात जे सोबत देऊ शकत नाही, ते खरं प्रेमच नाही, अशी मनाची समजूत काढली; पण घाव तर बसलेच ना! जिममध्ये पोहोचलो. मंद संगीत चालू होतं. व्यायामाची साधनं खुणावत होती. मनाला तरतरी आली आणि मी व्यायाम सुरू केले. इथे आलं की साचून राहिलेली नकारात्मक ऊर्जा व्यायामातून बाहेर पडते. डोक्यातलं विचारांचं थैमान कमी होतं. मी मोबाइलवर इन्स्पिरेशनल व्हिडीओ चालू केला. उभं राहण्याचं बळ मी एकवटतोय, मुलाखत द्यायला जाऊ शकतोय ते यामुळेच! नाही तर कधीच कोलमडून पडलो असतो. हे आईबाबांना कसं कळणार? त्यांना वाटतं की, मी मजेत आहे. मला कष्ट करायला नको आहेत. मला मुलाखतीची बोलावणी येतात ती मी कष्ट केल्याशिवाय येतील का? मोबाइलवर असतो ते स्वत:ला गुंतवून ठेवण्यासाठी, आतमधल्या व्यथा दाबून टाकण्यासाठी. घरी आलो तेव्हा आईबाबांचं जेवण चाललं होतं. त्यांच्याबरोबर जेवणं मी टाळतो. नाही तर माझ्या खाण्यापिण्यावरून परत बोलणं सुरू करतील.
‘‘कुणाल, अरे, आमच्याशी नीट बोलशील की नाही? मुलाखतीत काय झालं?’’ आई म्हणाली. मी काहीच बोललो नाही. मुलाखतीच्या तपशिलात जाण्यात काहीच अर्थ नव्हता. परीक्षक आईबाबांच्याच पिढीतले होते. त्यांनी आधीच ग्रह करून घेतला होता. मला सुजीतचं बोलणं आठवलं. तो एकदा म्हणाला होता, ‘‘अरे, तुझ्या करिअरमध्ये गॅप्स आहेत त्याचं खरं कारण मुलाखतीत कशाला सांगतोस? सांगायचं की आई आजारी पडली म्हणून तिची काळजी घेण्यासाठी गॅप घेतली. नंतर सांगायचं की, वडिलांना अपघात झाला. त्यांच्या देखभालीसाठी परत गॅप घ्यावी लागली. परीक्षक इतके इमोशनल होतील बघ! उलट स्वत:च्या करिअरचा त्याग करून आईवडिलांची सेवा करतोस म्हणून पाठही थोपटतील तुझी. नोकरी तर नक्कीच तुझ्या खिशात. करून तर बघ!’’ तसं सांगणं मला योग्य वाटलं नव्हतं; पण आता वाटलं, की आई सारखी सुजीतशी माझी तुलना करत असते. तिला सांगितलंच पाहिजे, की नोकरी मिळवण्यासाठी तुमच्या काल्पनिक आजाराच्या आणि अपघाताच्या कहाण्या सांगण्याचा आग्रह सुजीत करत होता म्हणून!
‘‘अरे, गप्प काय बसतोस? तुझ्या मनात काय आहे सांगशील की नाही? आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण तू आमच्या वाऱ्यालाही उभा राहात नाहीस. ‘एम.बी.ए’चा नुसता विषय काढला तरी निघून जातोस. आतापर्यंत तू म्हणशील तसं आम्ही केलं. इंजिनीअिरगला जायचंय म्हणालास, म्हणून तिथे घातलं. नंतर सी.ए. म्हणालास, त्यालाही पाठिंबा दिला. आम्ही करायचं तरी काय अजून?’’
बाबा म्हणाले. हे मी इतक्या वेळा ऐकलं आहे की, कान आता आपोआप बंद होतात. विचारू का तुम्हाला, की इंजिनीअर व्हायचंय हे लहानपणापासून माझ्या मनावर तुम्हीच बिंबवलंत ना? जेव्हा इंजिनीअिरग सोडण्याचा निर्णय कळवला तेव्हाही किती विरोध केलात! मग कॉमर्सला प्रवेश घेतला तेव्हाही आग्रह धरलात, की नुसतं कॉमर्स करून पुरेसं नाही. सी.ए. करायला हवं. आणि आता एम.बी.ए.त रस नाही, हे अनेकदा सांगूनही माझ्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करता आहात. त्या वेळी लहान होतो. तेव्हा ऐकलं. आता नाही ऐकणार. येताजाता टोकत बसता. मी अपयशी आहे, नेटाने काही करत नाही, याचे पाढे वाचून माझी लायकी कशी नाही, हे सांगत बसता. तुमच्या अशा प्रत्येक शेऱ्यानं माझा आत्मविश्वास किती ढासळत जातो, याची कल्पना आहे का तुम्हाला? तुम्हाला खरंच मी माझ्या पायावर आत्मविश्वासानं उभं राहायला हवं आहे, की लोक काय म्हणतील, याची चिंता जास्त आहे? मी खोलीत निघून गेलो.
आईबाबा म्हणतात, की ‘आम्ही तुला समजून घेतो.’ पण ते त्यांच्या चष्म्यातून! मला माझ्या पद्धतीनं उभं राहू दे. मी स्वत:ला अजमावून पाहतोय. आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी असण्याचं महत्त्व मला माहीत आहे. म्हणून नोकरीही शोधतोय; पण ती त्यांच्या चष्म्यात बसणारी नसेल. त्यात बसण्यासाठी आता मला एम.बी.ए.चं नवीन ओझं डोक्यावर घ्यायचं नाही. नक्की काय करायचं आहे, हे ठरवायला मला वेळ हवा आहे. मी आताच नवीन मार्ग घेऊ शकतो. पुढे नव्या जबाबदाऱ्या आल्यावर ते शक्य होईलच असं नाही.
पलंगावर एमिली मॉरीशनचं ‘द बुक ऑफ रिलीफ’ पडलं होतं. वाटलं, की या क्षणी उठावं आणि आईबाबांना त्यातल्या ओळी वाचून दाखवत म्हणावं, ‘‘सगळय़ांनी एकच वेळापत्रक पाळायला पाहिजे असं नाही. जगातले ७०० कोटी लोक सगळय़ा गोष्टी एकाच क्रमानं करतील असं नाही. मी जिथे उभा आहे, ते माझं वेळापत्रक आहे आणि माझ्या क्रमानुसार ती वेळ योग्य आहे. फक्त त्यासाठी तुमच्या नजरेचा चष्मा उतरवायला लागेल आणि माझा चष्मा लावायला लागेल. निदान काही वेळापुरता तरी! कराल का तसं?..’’