फाऊंड्री क्षेत्रात पंधरा वर्षांचा अनुभव असल्याने संगीता आवटी यांनी जवळपास पंधरा र्वष नोकरी केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यांच्या व्यवसायाची गाडी सुरू होण्यास त्यांचं स्त्री असणं आड येत होतं. प्रयत्नांती मिळालेली पहिली ऑर्डर पूर्ण केली आणि त्यांची घोडदौड सुरू झाली. आज कोअर शूटिंग मशीन्स बनवणाऱ्या भारतातल्या अगदी मोजक्या पाच-सात कंपन्यांमध्ये त्यांची ‘व्हिजन इंजिनीअर्स’ अग्रगण्य मानली जाते.
पुण्याच्या संगीता आवटी यांनी जवळपास पंधरा र्वष नोकरी केल्यानंतर त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करावासा वाटला. फाउंड्री क्षेत्रात पंधरा वर्षांचा अनुभव असल्याने तोच व्यवसाय सुरू केला तर लगेचच कामाच्या ऑर्डर मिळतील असा त्यांचा आराखडा होता. पण संगीता यांचा अंदाज चुकला आणि केवळ त्या स्त्री असल्यामुळेच त्यांना ऑर्डर मिळणे कठीण झाले. मात्र काही महिन्यांतच त्यांनी कष्टाने मिळालेल्या दोन कोअर शूटिंग मशिनच्या ऑर्डर्स पूर्ण केल्या आणि यशाच्या मार्गावर पहिलं पाऊल ठेवलं.
स्वत: इलेक्ट्रिकल इंजिनीअर असून संगीता आवटी यांची नोकरी मेकॅनिकल क्षेत्राशी निगडित होती. तिथे त्यांच्या अनेक ओळखी होत्या आणि या क्षेत्रात जमही बसला होता. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांच्या मनात स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा विचार होता, पण तितकं भांडवल नसल्याने त्यांनी त्या दिशेने पाऊल टाकलं नव्हतं. मात्र पंधरा वर्षांनी पुन्हा एकदा त्या विचाराने उचल खाल्ली आणि ज्या क्षेत्रातला अनुभव आहे त्याच क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा असं त्यांनी ठरवलं. त्यांच्या या विचाराला त्यांचे पती दिलीप आवटी यांनीही साथ दिली. अर्थात काही नातेवाईक, मित्र मंडळी यांनी या क्षेत्रात स्त्रियांनी पडू नये असं सांगत नकारघंटाही वाजवली. त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून संगीता यांनी नोकरी सोडली आणि ऑर्डर मिळवायचा प्रयत्न करायला लागल्या आणि मग मात्र त्यांना धक्का बसला. त्या काळात मेकॅनिकल क्षेत्रात स्त्रिया अजिबातच नव्हत्या त्यात फाऊंड्रीसारखा व्यवसाय अगदी पुरुषप्रधान. फाऊंड्री किंवा कोअर शूटिंग मशीन तयार करण्यासाठी जी मशिनरी लागते त्याचे डिझाइन करणे आणि इतके मोठे मशीन बनवणे हे काम एखादी एकटी स्त्री करू शकेल याची अनेक कंपन्यांना खात्री वाटत नव्हती. शिवाय या मशीनची किंमत लाखो रुपये असल्याने या व्यवसायात नवख्या स्त्रीला ऑर्डर देणं कंपन्यांना सुरक्षित वाटत नव्हतं. त्यामुळे ओळख असूनही त्यांना पहिलं काम मिळणं दुरापास्त झालं होतं. जेव्हा ओळखीच्या कंपन्यांकडूनच नकार आले तेव्हा काही क्षण आपण चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना असंही त्यांना वाटून गेलं. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. शेवटी जवळजवळ चार-पाच महिन्यांनी दोन छोटय़ा कंपन्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना त्यांची पहिली ऑर्डर मिळाली. काम मिळालं तरी बाकीचे अनेक प्रश्न सोडवायचे होते, त्यातला मुख्य प्रश्न म्हणजे जागा. आधी स्वत:ची जागा घेऊन, सगळी तयारी करायला पैसा नव्हताच त्यामुळे ऑर्डर आली की ज्यांच्याकडे लेथ मशीन, मिलिंग मशीन, वेल्डिंग मशीन इत्यादी संच आधीच उपलब्ध आहे त्यांची मशीन आणि जागा वापरून तिथेच काम करून द्यायचं असं बोलून ठरवलं होतं. त्यामुळे त्या दुसऱ्या वर्कशॉपचं सगळं काम उरकलं की, संध्याकाळी उशिरा संगीता यांना काम करायला मिळत होतं. दुसरा प्रश्न होता भांडवलाचा. ऑर्डरबरोबर २५ टक्के आगाऊ पैसे मिळाले असले तरी बाकीची रक्कम उभारायची होती. त्यावेळी कर्ज घेऊन काम करण्यापेक्षा साठवलेली रक्कम वापरायची असं दोघांनी ठरवलं. त्यानुसार स्वत:चे पैसे वापरून दुसऱ्यांच्या वर्कशॉपमध्ये रात्र रात्र जागून त्यांनी पहिल्या दोन मशीन्स पूर्ण करून दिल्या. त्या अतिशय उत्तम प्रकारे सुरू झाल्या त्यामुळे त्या कंपन्याही समाधानी होत्या. या पहिल्या कामाचे बहुतेक पैसे दुसऱ्यांच्या वापरलेल्या मशीन आणि जागेचं भाडं भरण्यात गेल्याने फायदा जेमतेम झाला. मात्र या यशाने पुढच्या ऑर्डर मिळवणं मात्र सोपं गेलं.
तिथून मात्र संगीता यांच्या व्यवसायाची यशस्वी मार्गावर घोडदौड सुरू झाली. काही महिन्यांतच त्यांनी १६०० स्क्वे फूट जागा भाडय़ाने घेऊन तिथे आपलं वर्कशॉप उभारलं. दोनेक वर्षांतच काम अधिकाधिक वाढायला लागलं. मार्केटिंग, प्रॉडक्शन, दैनंदिन कामकाज इत्यादी गोष्टी एकटीने सांभाळणं कठीण व्हायला लागलं. त्यामुळे दिलीप आवटी यांनीही स्वत:ची नोकरी सोडली आणि ते या व्यवसायात पूर्णवेळ कार्यरत झाले. व्यवसाय मोठा होत होता पण त्यासाठी संगीता यांनी कर्ज काढायच्या ऐवजी येणारा फायदाच भांडवल म्हणून वापरला. काही काळातच स्वत:ची जागा घेऊन, लागणाऱ्या मशिनरी उभ्या करून ‘व्हिजन इंजिनीअर्स’ ही कंपनी स्थिरस्थावर व्हायला लागली. पण सुरुवातीच्या काळात संगीता यांना सोळा सोळा तास जागून काम करून घ्यावं लागत असे. पहाटे अडीच तीनला उठून ई-मेल आणि इतर पत्रव्यवहार पाहायचा, त्यानंतर घरातलं कामकाज, लहान मुलाचं सगळं आवरून कंपनीत जायचं. दिवसभर तिथे काम करून रात्री उशिरा परत यायचं आणि मग पुन्हा घराकडे लक्ष द्यायचं असा अतिशय व्यग्र दिनक्रम असायचा. या काळात त्यांना सासू-सासरे आणि पती यांची मात्र खूप मदत झाली. अनेकदा मुलाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही असा विचार करून त्यांना वाईटही वाटायचं, पण तरीही व्यवसायात लक्ष देणंही तितकंच जरुरी होतं. या सगळ्या कष्टातूनच त्यांनी कंपनी उभी केली.
आज कोअर शूटिंग मशीन्स बनवणाऱ्या भारतातल्या अगदी मोजक्या पाच-सात कंपन्यांमध्ये ‘व्हिजन इंजिनीअर्स’ अग्रगण्य मानली जाते. पूर्ण स्वयंचलित अशी कोअर शूटिंग मशीन्स इथे तयार करतात. या मशीन्सला वेगवेगळी डाइज, पॅटर्न्स आणि टुलिंग लागतात पूर्वी मशीन ‘व्हिजन इंजिनीअर्स’मध्ये बनवली तरी टूल्स बाहेरून तयार करून घ्यायला लागायची. त्या बाहेरच्या टूल्सचा मशीनशी समन्वय साधायला वेळ जायचा. हा विचार करून त्यांनी पाच वर्षांपूर्वी मिरज येथे टुलिंग तयार करणारं वर्कशॉप उभं केलं. त्यामुळे आज एखाद्या कंपनीला कोअर शूटिंग मशीन बरोबर टूल्सही पुरवता येतात आणि अर्थातच मशीन आणि टूल्स यांचा समन्वय साधायचा काळ अगदी कमी होतो. या मिरजेच्या वर्कशॉपसाठी लागणारी सुमारे ऐंशी लाखांची दोन व्हीएमसी मशीन्स त्यांनी भारतात आयात केली आहेत आणि त्यामुळे विविध प्रकारची डाइज, पॅटर्न्स आणि टुलिंग बनवणं सुकर झालं आहे.
भारतात पंजाब, हरयाणा, गुजरात अशा अनेक राज्यांतल्या सुमारे ५०० ठिकाणी ‘व्हिजन इंजिनीअर्स’ची मशीन्स बसवली आहेत. संगीता स्वत: सगळीकडे एकटीने प्रवास करून त्या त्या कंपन्यांची गरज जाणून घेतात. महिन्यातले १५ ते २० दिवस त्या परगावी असतात. तिथल्या कंपन्यांना भेट देऊन तिथली परिस्थिती पाहतात, स्वत: मोजमाप घेतात. कंपनीच्या गरजेप्रमाणे त्या कंपनीला कोणत्या प्रकारचं मशीन लागेल हे सुचवतात. त्यानंतर मग ऑर्डर वगैरे सोपस्कार झाल्यावर त्या मशीनचे डिझाइन बनवलं जातं आणि मग मशीन बनवलं जातं. ‘व्हिजन इंजिनीअर्स’मध्ये ३डी मॉडेलिंग करून न्यूमॅटिक, हायड्रॉलिक अशा सर्व प्रकारची मशीन्स डिझाइन करण्याची आणि बनवण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. या सगळ्या व्यवहारात स्त्रियांची उपस्थिती अजिबातच नाही असं त्यांचं निरीक्षण आहे. आता आता फाऊंड्रीक्षेत्रातल्या ऑफिसेसमध्ये मोजक्या मुली दिसतात. मात्र प्रत्यक्ष शॉप फ्लोअरवर किंवा या व्यवसायात निर्णयक्षम टीममध्ये मात्र संगीता सोडल्यास अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतक्या स्त्रिया आहेत त्यामुळेच हे क्षेत्र आव्हानात्मक आहे. पण संगीता आवटी आपल्या जिद्दीच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर इथे यशस्वी होत आहेत हेही तितकंच खरं.
त्यांच्या या वेगळ्या क्षेत्रातली कामगिरी पाहून त्यांना उद्योग जननी कमल पुरस्कार आणि भगिनी निवेदिता यशस्वी उद्योजिका पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. पण संगीता इतक्या यशाने हुरळून जाणाऱ्यातल्या नक्कीच नाहीत. चाकण येथे मोठी जागा घेऊन अधिक अद्ययावत प्लांट उभारायचे त्यांचे मनसुबे आहेत. त्यांचा मुलगा आता पदव्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीला गेला आहे. तिथले अद्ययावत शिक्षण घेऊन आणि तिथे थोडा कामाचा अनुभव घेऊन तो परत आला कीसंगीता यांना त्याच्याबरोबर काम करायचं आहे. त्यामुळे आणखी काही वर्षांत ‘व्हिजन इंजिनीअर्स’ आणि संगीता आवटी या यशाची नवी शिखरं काबीज करणार यात शंका नाही.
संगीता आवटी
‘व्हिजन इंजिनीअर्स’
पुणे, मिरज
visionengineersindia@gmail.com
http://www.indiamart.com/visionengineers९८२३८३४४२१
swapnalim@gmail.com
सल्ला
मी स्त्री आहे म्हणून एखादी गोष्ट करू शकत नाही असा विचार करू नका. आपली गुणवत्ता आणि कौशल्य ओळखून स्वत:च्या क्षमता जोखून पाहा. संयम ठेवा. काम करत राहा.
उद्दिष्ट
इथे मोठा प्लान्ट उभारून फाऊंड्रीतल्या नावीन्यपूर्ण अशा मशिन्स वापरून वेगळं आणि नवीन काम करायचं आहे.