व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वीच झालेली फसवणूक संध्या ठाकूर यांच्यासाठी एक सकारात्मक अनुभव आणि धडाही होता. त्यातूनच बाजाराचा अंदाज घेत त्यांनी जिद्दीने व्यवसाय सुरू ठेवत फायबर ग्लासच्या माध्यमातून यशाची एकेक पायरी चढायला सुरुवात केली. आज ‘न्यू लुक फायबर’मध्ये बनवले जाणारे इमारतींचे घुमट, केबिन्स आणि पोर्टेबल टॉयलेट हे त्यांचे वैशिष्टय़ आहे..
फायबर ग्लास किंवा एफआरपी (फायबर रिइन्फोर्सड् प्लास्टिक)चा व्यवसाय करायचा असं ठरवल्यावर संध्या ठाकूर यांनी एका संस्थेत प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. तिथे शिकत असतानाच संस्थेतल्या एका व्यक्तीने सांगितलं की त्यांची थोडं भांडवल घालून काम करायची तयारी असेल तर ती काही काम मिळवून देईल. अर्थातच मिळालेल्या या संधीचा फायदा घेत त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे पोलिसांसाठी दंगलीच्या वेळी वापरायची, हातात धरायची बुलेटप्रूफ जाळी त्यांनी बनवली. त्यात पुन्हा पुन्हा काही सुधारणा करत पाच सहा नमुने तयार झाले, पण ऑर्डर मिळायचं नाव निघेना. तोपर्यंत सुमारे पन्नास हजार रुपये त्यात अडकले होते. आणि नंतर तर ती व्यक्ती भेटायला टाळाटाळ करू लागली. एक दिवस संध्या जिथून ऑर्डर मिळणार असं सांगितलं होतं त्या ऑफिसमध्ये गेल्या आणि चौकशी केली तर अशी कुठलीही ऑर्डर द्यायचीच नाहीये असं त्यांना कळलं. आणि त्यांना ऑर्डर द्यायचं आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीची बदलीही झाली होती. त्या व्यक्तीने त्या नमुन्याच्या जाळ्या स्वत:च्या फायद्याकरिता वापरून आपल्याला फसवलं हे लक्षात येताच संध्या यांच्या पायाखालची वाळूच सरकली. १९९३ मध्ये पन्नास हजार ही खूपच मोठी रक्कम होती आणि व्यवसाय सुरू करतानाच इतका मोठा धक्का पचवणं फारच कठीण होतं. पण त्या धक्क्यातून संध्या सावरल्या आणि स्वत:चा फायबर ग्लासचा मोठा व्यवसायही उभारला तो स्वत:च्या जिद्दीवर.
७०-८० च्या दशकात मध्यमवर्गीय घरात व्हायचं तेवढच संध्या यांचं शिक्षण झालं, लग्न होऊन त्या पूर्णवेळ गृहिणीही बनल्या. पण नंतर मुलगा शाळेत गेल्यानंतरचा मोकळा वेळ सत्कारणी लावण्यासाठी काही व्यवसाय करायचं त्यांनी ठरवलं. आणि मग १९८७ मध्ये घरच्या घरी करता येण्यासारखा, मशीनवर स्वेटर विणण्याचा व्यवसाय सुरू झाला. दिवसाचे फक्त चार-पाच तास दिले तरी पुरेसं होतं. काम वाढलं तसं आणखी पाच-सहा जणींना कामावर ठेवून त्यांनी व्यवसाय वाढवला. हळूहळू या कामात साचलेपणा येऊ लागला, शिवाय वर्षभर काम केलं तरी विक्री मात्र फक्त थंडीच्या दिवसांतच व्हायची त्यामुळे भांडवल अडकून राहायचं. बराच विचार करून दुसरा काहीतरी व्यवसाय करायचं त्यांनी ठरवलं. आजूबाजूला चौकशी केली, एकूण बाजारातल्या वस्तू पाहिल्या आणि त्यांना लक्षात आलं की फायबर ग्लासच्या वस्तू खूप उपयोगी आहेत. यामध्ये पोळपाटापासून ते विमानाच्या पंखापर्यंत अनेकविधी गोष्टी करता येतात त्यामुळे बाजारपेठही भरपूर आहे. साधारण वर्ष-दोन र्वष अभ्यास करून १९९२ मध्ये त्यांनी फायबर ग्लासचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. स्वेटर उद्योगातून मिळालेला सगळा पैसा सुरुवातीलाच खर्च झाला आणि त्यातून परतावा शून्य. शिवाय जाळी प्रकरणात इतकी मोठी ठेच बसल्यावर एखादी व्यक्ती पुन्हा कुठल्याच उद्योगाच्या वाटेला गेली नसती. संध्या यांनाही असे सल्ले मिळाले होते. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपलं गमावलेलं भांडवल तर परत मिळवायचं या जिद्दीने प्रयत्न सुरू केले.
त्या संस्थेत अधिक चौकशी केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की असं फसवलं जाणाऱ्या त्या एकटय़ाच नाहीत. इतरही अनेक जण फसले गेले आहेत. तिथेच भेटलेल्या एकीला ब्युटिपार्लरमध्ये वापरायचं बेसिन करून द्यायला सांगितलं होतं. तिचेही असेच वीसेक हजार रुपये गुंतले होते. दंगलीत वापरल्या जाणाऱ्या जाळ्या बाहेर विकता येणार नव्हत्या. मात्र हे बेसिन बाहेर कुणालातरी विकता येतील असा विचार करून दोघींनी भागीदारीत बेसिन करून विकायचं ठरवलं. मग वेगवेगळ्या पार्लरमध्ये जाऊन तिथे बेसिन विकायला सुरुवात केली. तसंच जिथे ब्युटिपार्लरचं प्रशिक्षण दिलं जातं अशा संस्थांसाठी एक योजनाही तयार केली. त्यांच्याकडे शिकणाऱ्यांपैकी कुणी बेसिन विकत घेतलं तर त्यातले काही टक्के नफा त्या संस्थेला देऊ लागल्या. यामुळे बेसिनच्या ऑर्डर मिळत गेल्या. तसे फायबरच्या पोळपाटाचीही ऑर्डर घेऊन ते पुरवू लागल्या. त्यानंतर काही काळातच त्यांची ही भागीदार दुसऱ्या शहरात निघून गेली. मात्र संध्या यांनी एकटीने व्यवसाय सुरू ठेवला. आसपासच्या दुकानात बाथ स्टूलसारख्या इतर काही वस्तूही त्यांनी पुरवायला सुरुवात केली.
व्यवसायात एखादी एकदम नामी संधी चालून येते आणि तिचा फायदा घेता आला तर व्यवसायाची सगळीच गणितं बदलतात हे संध्या ठाकूर यांच्या बाबतीतही खरं झालं. ज्या दुकानात फायबर ग्लासच्या इतर वस्तू ठेवत त्याला फायबरचे डोम बनवण्यासंबंधी गंगाणी बिल्डर्सने चौकशी केली आणि दुकानदाराने त्यांना संध्या ठाकूर यांच्याकडे पाठवलं. एका बिल्डर्सला बिल्डिंगसाठी प्रचंड मोठे पिरॅमिड आकाराचे डोम तयार करून हवे होते. असं इतकं मोठं काम कधीच केलेलं नसल्याने संध्या यांना जरा भीती वाटत होती. शेवटी त्यांनी घरी येऊन खर्चाचा अंदाज काढला आणि तो एका पिरॅमिडचा सुमारे अठरा हजार इतका आला. असे २१ पिरॅमिड हवे होते, म्हणजे सुमारे चार लाख रुपये अडकणार. पहिल्या अनुभवानंतर इतके पैसे गुंतवण्याबाबत त्या साशंक होत्या. पण काम मिळत असताना जमत नाही असं सांगणंही मनाला पटत नव्हतं. त्यामुळे खूप जास्त पैसे सांगून बिल्डरकडूनच नकार घ्यावा असं ठरवून त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेल्या. तिथे त्यांनी प्रत्येक डोममागे पंचवीस हजार रुपयांचा अंदाज सांगितला. वाटाघाटी करणाऱ्या गृहस्थाने एकवीस हजार ही किंमत ठरवत त्यांना ही ऑर्डर तुम्हीच करायची असं सांगून चक्क पन्नास टक्के रकमेचा आगाऊ चेकही दिला. आता नाही म्हणण्यात काहीच अर्थ नव्हता. फक्त जागेची अडचण होती. कारण इतके मोठे पिरॅमिड करायचे तर जागा प्रचंड लागणार. तोही प्रश्न बिल्डरने सोडवला आणि हे काम बांधकामाच्या जागीच करायचं ठरवलं. तांत्रिकदृष्टय़ा काही चूक राहू नये म्हणून तिथल्या वास्तुविद्याविशारदाच्या देखरेखीखाली हे काम सुरू केलं. संध्या यांनी आपली टीम तिथे नेऊन हे काम वेळेत पूर्ण करून दाखवलं आणि व्यवसायाचं एक मोठं दालन ‘न्यू लुक फायबर’च्या समोर खुलं झालं.
या पहिल्या कामात त्यांना अनेक गोष्टी शिकता आल्या. ड्रॉईंगबरहुकूम प्रॉडक्ट कसं बनवायचं हे लक्षात आलं आणि या यशानंतर अनेकविध ऑर्डर मिळतच गेल्या. वर्षभरातच पहिलं नुकसान भरून निघालं. १९९३ मध्ये घराच्या आउटहाऊसमध्ये सुरू झालेला हा व्यवसाय १९९७ मध्ये मोठय़ा जागेत नेला. फायबर ग्लासची कुठलीही वस्तू बनवताना त्याचा आधी साचा बनवावा लागतो. हा साचा लाकडात किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये बनवतात. आणि त्यावरून फायबर ग्लासची वस्तू बनवली जाते. ‘न्यू लुक फायबर’मध्ये ऑर्डरनुसार अनेक प्रकारचं काम केलं जात असलं तरीही इमारतींचे घुमट, केबिन्स आणि पोर्टेबल टॉयलेट बनवणं हे त्यांचं वैशिष्टय़ आहे. ऑफिसकामासाठी केबिन्स, सर्व सोयींनी युक्त असे भारतीय किंवा पाश्चात्त्य पद्धतीचे टॉयलेट्स केवळ साइटवर नेऊन लाइट व प्लम्बिंगची जोडणी केल्यावर लगेचच वापरता येतात. आणि अशा प्रकारच्या कामाला भरपूर मागणी आहे. एखादे उत्पादन बनवताना ते कुठं आणि कसं वापरलं जाणार आहे त्यावर ते कसं बनवायचं हे ठरतं. उदाहरणार्थ टॉयलेट्स किंवा केबिनसाठी आत स्टील आणि बाहेर फायबरग्लासच्या भिंती असतात. तर घुमट हे सेल्फ सपोìटग असतात. अशा अनेक गोष्टी अनुभवातून त्यांनी शिकल्या. आज संध्या यांच्याकडे सहा ते सात जण कायमस्वरूपी कामाला आहेतच शिवाय जरूर पडेल तसे प्रकल्पासाठी त्या आणखी दहा ते पंधरा जणांना रोजगार देतात. त्याशिवाय सगळ्या कुटुंबाची मदत त्यांना होते. त्यांची वास्तुविद्याविशारद (आर्किटेक्ट) असलेली सून प्रांजली ही या कामात त्यांना मदत करते.
या क्षेत्रात वीस वर्षांपेक्षा जास्त काळ त्या टिकून राहिल्या याचे कारण गुणवत्ता हे आहे असं संध्या ठाकूर मानतात. केवळ कमी किमतीत वस्तू देण्यासाठी उत्पादनाची प्रत खालावलेली त्यांना अजिबात चालत नाही, त्यामुळेच ग्राहकांचाही त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करत आत्रंप्रनर अवॉर्ड-मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अवॉर्ड, उद्योग जननी कमल पुरस्कार, उद्योगश्री-पुणे, ऑल इंडिया अचिवर्स अवॉर्ड या व अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. संध्या ठाकूर यांची जिद्द आणि चिकाटी बघता त्यांचा हा व्यवसाय अधिकाधिक यशाची शिखरं गाठत जाणार यात काही शंकाच नाही.
सल्ला
एखादी गोष्ट करायची ठरवली की अडचणीवर मात करत जिद्दीने ती पूर्ण केली पाहिजे. एखादी ठेच लागली तरी तिथेच अडकून न पडता पुढे जात राहिलं तरच यश तुमच्याकडे येतं.
नवनवीन आव्हानं स्वीकारत नवीन काम
करायचं. कर्ज न घेता आहे त्या भांडवलावर
आणि ५० टक्के आगाऊ पैसे घेऊनच कुठलंही काम करायचं.
संध्या ठाकूर,
न्यू लुक फायबर इंडस्ट्रीज, बाणेर हायवे, पुणे.
http://www.newlookfibre.com
newlook.ind@gmail.com
स्वप्नाली मठकर
मोबाइल – ९८२३०५३२६८.
swapnalim@gmail.com