अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अक्षरश: रस्त्यावर राहायला लागलेल्या माधुरी यांनी स्वकष्टाने परकर शिवून दारोदारी जाऊन विकण्याचा वरकरणी क्षुल्लक वाटणारा व्यवसाय सुरू केला.. प्रचंड कष्ट केले आणि आज त्यांच्याकडे दीडशे स्त्रिया कामाला असण्याइतपत तो वाढवला. शून्यातून व्यवसाय उभा करणाऱ्या माधुरींचा हा प्रवास..
घरात बसून साडय़ांना पिकोफॉल लावून देणं, परकर शिवून देणं अशी कामं करताना माधुरी खांडवे यांना एकदा बचतगटांच्या स्टॉलमध्ये तीन दिवसांसाठी एक स्टॉल मिळाला. आलेली संधी वाया जाऊ द्यायची नव्हती. दोन वर्षांची मुलगी आणि अकरा महिन्यांचा मुलगा यांना आईकडे ठेवून त्यांनी ज्यांच्यासाठी त्या परकर शिवून देत तिथून परवानगी घेऊन कापड मिळवले, परकर शिवले आणि स्टॉल सुरू केला. तीन दिवसांत तब्बल तीस ते पस्तीस हजारांची विक्री झाली; कपडय़ाचे पैसे परत द्यावेच लागले; पण शिलाईचे एका परकरामागे तीन रुपये या दराने बाराशे रुपये माधुरींच्या हातात आले. व्यवसायातून मिळालेला हा पैसा घरात खर्च न करता त्यांनी त्यातून मशीनला मोटर बसवून घेतली ज्यामुळे जास्त वेगाने शिलाई करता येणार होती. तीन-चार दिवसांनी आईकडून मुलांना आणायचे तर जायचा-यायचा शंभर रुपये खर्च होता. माधुरींनी परकर दुकानाच्या मालकीणबाईंकडे शंभर रुपये मागितले, पण त्यांनी चक्क नकार दिला. याचा माधुरींना फारच धक्का बसला. लहान मुलं इतके दिवस दूर ठेवून त्यांना राहावेना. शेवटी शेजारून उधारी घेऊन रात्री त्या आईकडे पोहोचल्या. एरवी कधी माहेरपणाला जास्त दिवस न थांबणाऱ्या त्या या वेळी मात्र दोन-तीन दिवस तिथेच होत्या. त्या वेळी आईला शंका आली आणि तिनं विचारणा केली. माधुरींनी घडलेला किस्सा सांगितला आणि पैसा असता तर स्वत:चा व्यवसाय सुरू केला असता, अशी खंतही बोलून दाखवली. आईने त्या क्षणी स्वत: साठवलेले दीड हजार रुपये हातावर ठेवले आणि त्यांना स्वत:चा व्यवसाय करायचं बळ दिलं. त्यानंतर मात्र गेल्या सोळा वर्षांत माधुरींनी कधी मागे वळून पाहिलं नाही.
जेजुरीजवळच्या धोण्डज इथल्या माधुरींचे वयाच्या सोळाव्या वर्षीच लग्न झाले. सासरी आल्यावर वडिलांनी सोनं न दिल्यामुळे कुरबुरी सुरू झाल्या. शिक्षणाच्या बाबतीतही नवऱ्याने खोटंच सांगितल्याचं लक्षात आलं. कंटाळून त्या माहेरी परतल्या. तीन-चार महिने माहेरी राहिल्यावर गावातल्या लोकांच्या बोलण्याचा त्रास होऊ लागल्याने त्या पुन्हा एकदा सासरी गेल्या. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच त्यांना आणि त्यांच्या पतीला घरातून बाहेर काढलं गेलं. राहायची काही सोय नाही, कुठं जायचं, काय खायचं याचा काही पत्ता नाही असे ते दोघे निगडीला एका देवळासमोर चक्क रस्त्यावर राहायला लागले. चार-आठ दिवसांनी सोन्याचे कानातले मोडून एका झोपडपट्टीमध्ये एक खोली घेतली. आता निदान डोक्यावर छत होतं.
त्या काळात त्यांच्या पतीने दिराबरोबर भाजी मंडईतले काम सुरू ठेवले होते, पण दिवसाचे फक्त वीस-तीस रुपये मिळायचे, त्यात काय भागणार? म्हणून माधुरींनी तिथे मिळतील ती कामं करायला सुरुवात केली. रंगीत काचा निवडायच्या कामात एक किलो काचा निवडल्या की दहा पैसे इतक्या कमी दरानं पैसे मिळायचे; पण जे काही मिळतील ते घराला उपयोगी म्हणून त्यांनी काम सुरूच ठेवलं. नंतर त्यांना एका कंपनीत काम मिळालं, तिथून हजार-बाराशे रुपये मिळायचे, त्यामुळे घरची परिस्थिती जरा सुधारली. मग माधुरींनी शिवणकामाचा कोर्स केला, घरी मशीन घेतलं आणि घरच्या घरी पिकोफॉल, कपडे शिवून देणं अशी कामं त्या करायला लागल्या. हळूहळू काम वाढलं. परकर शिवायचंही काम मिळालं आणि त्यातूनच स्वत:च्या व्यवसायाचं विश्व उभं केलं.
आईने दिलेल्या दीड हजार रुपयांत त्यांनी तीस परकरांचं कापड आणलं आणि एका दिवसात परकर शिवून दारोदारी विकायला गेल्या. सगळे परकर विकले गेले आणि अडीचशे रुपये नफाही झाला. हा नफा पुन्हा भांडवल म्हणून घालून या वेळी जास्तीचं कापड आणलं आणि परकर विकले. असं करत भांडवल वाढत गेलं आणि थोडाफार नफाही व्हायला लागला. दारोदारी जाऊन परकर विकतानाच ओळखीतल्या एका व्यापाऱ्याकडून अंतर्वस्त्रेही आणून विकायला सुरुवात केली. त्या विक्रीचाही थोडा पैसा मिळायला लागला. सुमारे साडेतीन र्वष त्या दारोदारी जाऊन कपडे विकत होत्या. कर्ज काढून दोन खोल्यांचं घर घेतलं पहिल्या वेळी घराचं कर्ज असल्यानं बँकेने व्यवसायासाठी कर्ज नामंजूर केलं. त्या वेळी त्यांनी पतपेढीतून पैसे उचलून व्यवसाय वाढवला आणि घराचं कर्जही फेडलं. पुन्हा एकदा दीड-दोन वर्षांनी भारतीय युवा शक्ती ट्रस्टकडून अर्ज केल्यावर बँकेने व्यवसाय कर्ज दिलं. या वेळी माधुरींनी दोन खोल्यांच्या घराच्या जागी तीनमजली बिल्डिंग उभी केली आणि खालचा मजला कारखान्यासाठी ठेवून ‘गायत्री परकर’ सुरू केलं.
२००७ मध्ये पुन्हा एकदा सासरी कुरबुरी होऊन त्यांच्या पतीचं भावाबरोबर भाजी मंडईत काम करणं बंद झालं. त्या वेळी लोक काय म्हणतील म्हणून ते माधुरींबरोबर काम करायला कचरत होते. बायकांच्या कपडय़ाचा व्यवसाय आपण करावा हे त्यांना पटत नव्हतं; पण मग माधुरींनी त्यांना समजावलं आणि सुनील खांडवे हेही त्यांच्याबरोबर या व्यवसायात उतरले. सायकलवरून कपडे विकण्यापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि आता अनेक गोष्टींत त्यांचा सहभाग असतो.
आज ‘गायत्री परकर’ या व्यवसायातून सुमारे दीडशे महिलांना रोजगार मिळतो. रोज सकाळी ठरावीक वेळेपर्यंत कापड कापून त्या महिलांना वाटतात. आदल्या दिवशीचे शिवलेले परकर घेऊन हिशेब करतात आणि मग कपडे पोहोचवायला, ऑर्डर घ्यायला माधुरी स्वत: जातात. काही जणी काम घरी घेऊन जातात आणि परकर शिवून दुसऱ्या दिवशी आणून कारखान्यात देतात. आता त्यांचे एक होलसेल दुकान आहे. आठवडय़ातले चार दिवस माधुरीताई फिरतीवर असतात तेव्हा त्यांची आता दहावीत असलेली मुलं हे दुकान सहज सांभाळतात.
पुणे आणि आसपासच्या साधारणत: शंभर किमीच्या परिसरात ‘गायत्री परकर’च्या उत्पादनाची विक्री होतेच, शिवाय महाराष्ट्राच्या इतर अनेक भागांतही विक्री होते. विविध स्टाइलचे, डिझायनर, सॅटिन इत्यादींचे परकर शिवण्याबरोबरच लेगिग्ज, स्कार्फ, ब्लाऊजपीस, इतर कपडे यांची घाऊक विक्रीही त्या करतात. महिन्याला वीस हजारांहून अधिक परकर शिवून त्यांची विक्री होते.
१९९५ मध्ये रस्त्यावर आपलं आयुष्य काढलेल्या माधुरींना आता सिटी ग्रुपतर्फे, भारतीय युवा शक्ती ट्रस्टतर्फे, डी.एस. कुलकर्णी यांच्यातर्फे आणि अन्य मानसन्मान मिळाले आहेत. शिवाय ‘युथ बिझनेस इंटरनॅशनल’तर्फे लंडनमध्येही त्यांना एक पुरस्कार मिळाला आहे. पूर्वी दारोदार फिरून कपडे विकते म्हणून हेटाळणी करणारे नातेवाईक आज त्यांचं कौतुक करतात तेव्हा त्यांना स्वत:चा सार्थ अभिमान वाटतो. अधिक न शिकता आपली मुलगी इतकी प्रगती करू शकते हे पाहून तिला अजून शिकवली असती तर, अशी चुटपुट मात्र माधुरींच्या आई-बाबांच्या मनाला लागून राहिली आहे आणि म्हणूनच आपल्या मुलगा आणि मुलीला भरपूर शिकवायचं, असं माधुरींनी ठरवून ठेवलं आहे. परकरसारख्या एखाद्या वरकरणी क्षुल्लक वस्तूची बाजारपेठ ओळखून तो व्यवसाय इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढवता येणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

उद्दिष्ट
स्वत:ची मोठी जागा घेऊन, स्त्रिया तिथे येऊन काम करू शकतील अशी कंपनी सुरू करायची आहे. सप्लाय चेन वाढवायची आहे आणि व्यवसाय अजून मोठा करायचा आहे.

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
Success story of Richa Kar the owner of Zivame company her family was ashamed from her business where she earned crores
ज्या व्यवसायाची जन्मदात्या आईला वाटायची लाज त्यातूनच कमावले कोटी, वाचा टीका झुगारून यश मिळविणाऱ्या उद्योजिकेचा प्रेरणादायी प्रवास

सल्ला
कुठलंच काम हलकं समजू नका. व्यवसाय म्हटला की नफा-तोटा होतच असतो, पण त्यातही चिकाटीने काम करणं जरुरी आहे. आजकाल सगळ्यांना ‘इझी मनी’ हवा असतो, पण व्यवसायात असे काही शॉर्टकट नसतात. जिद्दीने काम करत राहिलं तरच यश मिळतं
माधुरी खांडवे,
गायत्री परकर, गोंधळेनगर, हडपसर
८४२१०५०१८९
swapnalim@gmail.com