चुकांमधून शिकून भविष्याची वाटचाल आपल्या मनाप्रमाणे करणाऱ्या सासवडच्या प्रणया पाटील. केवळ पाच हजार रुपयांच्या भांडवलावर बॅग बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. आता या व्यवसायाची उलाढाल २४ लाखांपर्यंत गेली आहे. या व्यवसायातील यशाबरोबरच आता त्या परिसरातील लोकांच्या विकासाचे स्वप्न पाहात आहेत, त्यांच्याविषयी..

लहानपणापासूनच खेळांमध्ये तिने प्रावीण्य मिळवले होते. अकरावीत असताना तिने तिचे मॅरेथॉनचे स्वप्नही पूर्ण केले होते. लष्कराचे आकर्षण आणि आवड असल्याने तिने एनसीसीमध्ये प्रवेश घेतला. स्नॅपशूटिंगमध्ये तिला सुवर्णपदकही मिळाले होते. सगळ्याच एनसीसी कॅडेटचे असते तसेच तिचेही दिल्लीच्या परेडमध्ये भाग घ्यायचे स्वप्न होते. तिची मेहेनत फळास आली आणि तिचे प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडसाठी निवड झाली. पण त्याच संधीच्या मागून दुर्दैवही वाट बघते आहे याची मात्र तिला कल्पना नव्हती. परेडसाठी निवड झाली तेव्हा नेमकी ती बारावीत असल्यामुळे घरातून दिल्लीला जायची परवानगी नाकारण्यात आली. तिला याचा भयंकर राग आला. डोक्यात राख घालून घेऊन तिने त्यावर्षी बारावीचे पेपर दिलेच नाहीत आणि आयुष्याची परवड सुरू झाली.
सासवडच्या प्रणया पाटील आज आपल्या गतआयुष्याबाबत आणि चुकांबाबतही अगदी मोकळेपणे सांगू शकतात, कारण ते आयुष्य मागे टाकून त्या वेगळ्या वाटेवरून खूप पुढे गेल्या आहेत. त्यांच्या घरात अगदी साधे, पठडीतले वातावरण होते. प्रणयांना लहानपणापासूनच या चौकटीचा तिटकारा होता. त्यांना आयुष्यात काही तरी वेगळे करायचे होते, पण घरातून अर्थातच परवानगी नव्हती. पुढे एमपीएससी करायचे असे त्यांनी मनाशी ठरवून ठेवले होते. त्यात त्यांच्या मोठय़ा बहिणीची त्यांना साथ होती. पण त्या एका प्रसंगाने त्यांचे आयुष्य बदलून टाकले. घरच्यांवर रागावून बारावीची परीक्षा देणे टाळल्यावर पुढे त्या थोडी फोटोग्राफी शिकल्या आणि दोन र्वष जमतील तशा नोकऱ्याही केल्या.
शिक्षण नाही, फारसे काही करण्यासारखे नाही म्हटल्यावर घरातून ओळखीत लग्न लावून दिले गेले. लग्न झाल्यावर तरी आपल्या स्वप्नांची पूर्तता होईल असे प्रणयांना वाटले होते, मात्र तसे काही घडले नाही. नवऱ्याचा संशयी स्वभाव, रोजचे ताणतणाव, भांडणं, मानसिक त्रास या सगळ्यातून त्यांनी अगदी वर्षभरातच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्यांना त्यात यश आले नाही पण लग्नाचे नाते तुटलेच. अशा नात्याला पुन्हा जोडून पाहण्यापेक्षा दोघांनीही वेगळे व्हायचे ठरवले.
घटस्फोटानंतर पुन्हा आयुष्य नव्याने सुरू करायचे म्हणून प्रणया पुण्याला आल्या. तिथे मिळेल तशी नोकरी सुरू करून कॉट बेसिसवर हॉस्टेलमध्ये राहायला लागल्या. इथे अडचणींचे अनेक डोंगर समोर होते पण तरीही मनात जिद्द होती. या काळात अपुरा पगार, खायची, राहायची अबाळ यामुळे त्या आजारी पडल्या आणि बहिणीने त्यांना पुन्हा घरी यायला सांगितले. आता पुढे नक्की काय करायचे हेच कळत नसल्याने त्यांनी घरात राहून वर्षभर विविध कोर्स केले. सॉफ्टटॉय बनवणे, बॅग बनवणे, फॅशन डिझायनिंग, पार्लरचे काम अशा अनेक गोष्टी त्या दरम्यानच्या काळात शिकल्या. मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन शिक्षणही सुरू केले.
१९९८-९९ मध्ये घरगुती स्वरूपात बॅगा, ड्रेस शिवायच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या ताईने त्यांना पाच हजार रुपये दिले त्यातून कच्चा माल आणून बॅगा बनवायच्या व्यवसायाला सुरुवात केली. बहिणीच्या ऑफिसमधून बॅगा किंवा ड्रेस शिवायच्या ऑर्डर्स यायला लागल्या. व्यवसाय वाढवायचा तर कच्च्या मालासाठी बाहेरगावी एकटे फिरणे, लोकांना भेटून बोलणे हे सगळे करावेच लागायचे. पण सासवडसारख्या छोटय़ा ठिकाणी लोकांना ते पटत नव्हते. एक स्त्री स्वत:च्या पायावर उभे राहायचा प्रयत्न करतेय हे पाहूनच लोक नाव ठेवायचे. घरी येऊन तक्रार करणे, वैयक्तिक टीका, त्यामुळे घरच्यांचीही बोलणी या सगळ्यांचा त्यांनी खूप त्रास सहन केला. पण त्यांचे काम बघून हळूहळू हे सगळे कमी झाले.
थोडा व्यवसाय वाढल्यावर त्यांनी पुण्यात आणि मुंबईत खादी ग्रामोद्योगमार्फत प्रदर्शनात भाग घेतला. नाबार्डमधेही प्रदर्शनात भाग घेतला आणि संपर्कातून अधिकाधिक ऑर्डर्स मिळायला लागल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांना शालेय बॅगा पुरवण्याच्या ऑर्डर्सही मिळायला लागल्या. जास्त ऑर्डर्स यायला लागल्या तसे बॅग शिवायला लोक कमी पडायला लागले. मग प्रणयांनी बॅग शिवायला शिकवण्याचे क्लासेस सुरू केले. त्या क्लासमध्ये उत्तम बॅगा शिवणाऱ्या कारागीर महिला त्यांना मिळाल्या आणि गरजू महिलांना घरी बसल्या बसल्या पैसे कमावण्याचे साधनही मिळाले.
जसजसा व्यवसाय वाढत गेला तसे भांडवल कमी पडायला लागले. त्या वेळी ‘भारतीय युवा शक्ती ट्रस्ट’ या संस्थेने त्यांना पन्नास हजार रुपयाचे कर्ज तर दिलेच पण मार्केटिंग, अकाऊंटिंग, क्वॉलिटी कंट्रोल अशा सगळ्याच बाबतीत सखोल मार्गदर्शनही केले. या अमूल्य सहकार्यामुळेच आज ‘ओंकार एंटरप्रायझेस’ची उलाढाल चोवीस लाखांपर्यंत पोहोचली आहे.
व्यवसायातल्या या यशाची नोंद राष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली. त्यांना केंद्रीय ग्रामीण बँक, नाबार्ड (२००९)चा ‘यशस्वी उद्योजक पुरस्कार’, भारत सरकार व नेहरू युवा केंद्रातर्फे (२००८) ‘युवा गौरव’ पुरस्कार, मिटकॉनचा (२०१०) ‘महाराष्ट्र उद्योगजननी पुरस्कार’, सर्व शिक्षा अभियानांतर्गत (२०११) ‘प्रेरक महिला’ पुरस्कार, प्रवीण मसालेवाले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे (२००७) ‘उद्योगजननी कमल पुरस्कार’, सिटी फाऊंडेशन ग्रुपचा ( २००५) ‘यशस्वी उद्योजक’ या व अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
व्यवसाय वाढवताना केवळ स्वत:चा फायदा करून घ्यायचा असा विचार प्रणयांनी कधीच केला नव्हता. त्यांचे पूर्वीचे अडचणीचे दिवसही त्या विसरलेल्या नाहीत. त्यामुळे गरजू स्त्रियांना मदत करून स्वत:च्या पायावर उभे करायला हवे असे त्यांच्या मनात होते. त्याच वेळी नाबार्डच्या मदन कोठुळे सरांनी एन.जी.ओ. स्थापन करण्याबाबत सुचवले. तेथून प्रणयांना जास्तीत जास्त गरीब आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचता आले असते. त्यांनी चंद्रकांत जगताप यांच्या सहकार्याने २००४ मध्ये ‘पार्थ डेव्हलपमेंट फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे बचत गट स्थापन करून त्या गटांना काम दिले जाते. बहुतेक वेळा प्रणयाच कच्चा माल स्वत: जाऊन आणतात आणि तो स्त्रियांना पुरवून त्यांच्याकडून डिझाइनबरहुकूम बॅगा बनवून घेतात. तर काही वेळा ज्यांना शक्य असेल त्या स्त्रिया स्वत:चं भांडवल घालून कच्चा माल आणतात आणि बॅगा बनवून ‘ओंकार एंटरप्रायझेस’ला पुरवतात.
सुरुवातीला बचत गटाच्या स्थापनेने कार्य सुरू केलेली ही संस्था अल्पावधीतच खूप मोठी झाली आहे. आज ‘पार्थ डेव्हलपमेंट फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत सुमारे ४५० स्त्री व पुरुष बचत गट स्थापन झाले असून, या गटांना ब्युटीपार्लर, मसाले बनवणे, बॅगा शिवणे, फॅशन डिझायनिंग, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ व्यवसाय, घरगुती विद्युत उपकरणे दुरुस्ती, मोबाइल दुरुस्ती असे अनेक प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. दत्तक पालक योजना, बाल संस्कार शिबिरे, आरोग्य शिबिरे आदी राबवले जातात. सुमारे ६८ गावांमध्ये संस्थेचे कामकाज सुरू आहे.
प्रणया यांची अजूनही अनेक स्वप्न आहेत. संस्थेच्या माध्यमातून अधिक रोजगारनिर्मिती व्हावी हेच त्यांचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या आसपासच्या खेडय़ामध्ये स्त्रिया आजही स्वयंपूर्ण होण्याचा विचार करत नाहीत, तरुण मुली भविष्याचा विचार करत नाहीत याचे त्यांना वैषम्य वाटते. सासवड परिसरातील जीवन जास्तीत जास्त कृषिप्रधान असल्याने त्यांना त्यांच्या विभागात कोल्ड स्टोरेज, फूड डिहायड्रेशन प्लांट असे काही कृषिप्रधान उद्योग सुरू करायचे आहेत. या व्यवसायांमधून अधिकाधिक स्त्रिया आपल्या पायावर उभ्या राहाव्या असे त्यांना वाटते. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून गरीब मुलांसाठी आश्रमशाळा, वृद्धाश्रम सुरू करायचेही त्यांच्या मनात आहे.
प्रणया यांच्या कार्याचा आवाका आणि धडाडी बघता, पुढच्या काही वर्षांतच त्यांचे नाव कृषिप्रधान उद्योग क्षेत्रातही कौतुकाने घेतले जाईल यात शंका नाही.

करिअरचा मूलमंत्र
व्यवस्थित आराखडे मांडून भविष्यातल्या गोष्टी ठरवायच्या. व्यवसायात स्थिरता आली असल्याने आता कृषिप्रधान उद्योगांमार्फत इतरांना स्वबळावर उभं राहायला मदत करायची.

व्यवसायासाठी सल्ला
तुमच्या व्यवसायासाठी संवाद सर्वात महत्त्वाचा, त्यामुळे तो सुधारण्यावर भर दिला पाहिजे. डोक्यात सतत व्यवसायाचे विचार असावेत तरच नावीन्यपूर्ण कल्पना सुचतील, नव्या दिशा उघडत जातील.
प्रणया पाटील, सासवड
ओंकार एंटरप्रायझेस, omkarpranaya282@gmail.com

पार्थ डेव्हलपमेंट फाऊंडेशन, parthsaswad@rediffmail.com
swapnalim@gmail.com

Story img Loader