अधिकाधिक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवायचं हे संगीता सवालाखे-काहारे यांनी नुसतं ठरवलंच नाही तर पूरक अभ्यासक्रम निवडून संशोधन केलं आणि त्यातूनच प्रयोगशाळा उभारली. आज १० हजारहून अधिक शेतकऱ्यांना त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळवलं आहे.
कृषी क्षेत्रात बी.एस्सी. आणि मग एम.एस्सी. करून मग एखाद्या रिसर्च सेंटरमध्ये किंवा सरकारी नोकरीत संशोधक म्हणून रुजू व्हायचं असं तिचं अभ्यासू मध्यमवर्गीय मुलामुलींसारखंच स्वप्न होतं. बी.एस्सी.(कृषी) या अभ्यासक्रमाअंतर्गत शेवटच्या सेमिस्टरला सहा महिने इंटर्नशिप करावी लागते. तिची नेमणूक झाली ती चंद्रपूरमधल्या सिन्देवाई खेडय़ातल्या चारपाच शेतकऱ्यांसाठी. पहिल्याच दिवशी खेडय़ात गेल्यावर तिथल्या शेतकऱ्यांशी बोलणं झालं आणि तिला वस्तुस्थितीची जाणीव झाली. पूर्वी मोठी शेती, धनधान्याने संपन्न असलेले हे शेतकरी आता मात्र कंगाल झाले होते. ट्रॅक्टरपासून सगळी शेतीची अवजारं होती, पण आताच्या घडीला मात्र त्यांना शेती परवडत नव्हती. शेतीचं बी-बियाणं, खतं, रासायनिक औषधं या सगळ्याचा प्रचंड खर्च आणि त्या प्रमाणात उत्पन्न मात्र अगदी नगण्य असा आतबट्टय़ाचा व्यवसाय सुरू होता. त्यामुळे घरात खायची चणचण, इतकंच काय तर शेतकरी कुटुंब असूनही चहापुरतंही दूध मिळायची मारामार होती. डोईवर भरमसाट कर्ज, सावकाराचा तगादा, उधारी असे अनेक प्रश्न स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले आणि तरुण रक्ताच्या तिनं त्याच क्षणी ठरवून टाकलं की आता काम करायचं अशा शेतकऱ्यांसाठीच..आणि आज संगीता सवालाखे (काहारे) या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी मदत करत स्वत:ची जैविक खतं आणि औषधं बनवणारी प्रयोगशाळा चालवत आहेत.
बावीस वर्षांपूर्वी सिन्देवाईवरून शेतकऱ्यांच्या हलाखीच्या कहाण्या ऐकून परतलेल्या संगीता यांनी आपले वडील कृषी कीटकशास्त्राचे (entomology) प्रा. एन. पी. काहारे यांच्याशी चर्चा केली. पूर्वीच्या काळीही उत्तम शेती होत होती आणि जमिनीचा कसही टिकून होता. नैसर्गिक संसाधनांमुळे पीक भरपूर यायचं. पण रसायनांच्या अति वापरामुळे गेल्या पन्नाससाठ वर्षांत जमीन नापीक व्हायला लागली. या खराब जमिनीतून पीक काढायचं तर अधिक खतं वापरायची, असं एक दुष्टचक्र सुरू झालेलं त्यांना जाणवलं. त्यावर विचार केल्यावर रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळल्यास शेतीचा बराच खर्च कमी होऊन हळूहळू उत्पन्नही निश्चितपणे वाढेल असं वाटायला लागलं. थोडक्यात, अमृताच्या वेष्टनात गुंडाळून आपण विषच खात असतो आणि त्या विषाचे परिणाम पुढच्या पिढय़ांनाही भोगावे लागतील इतके दूरगामी असतात. हे सगळं टाळण्यासाठी सेंद्रिय शेती हा उत्तम उपाय आहे, पण त्याचबरोबर शेतीवर येणारे रोग टाळणं आणि शेतीला उपयोगी जैविक खते पुरवणंही तितकंच महत्त्वाचं होतं. त्यामुळे संगीता यांनी त्या दृष्टीने आपले प्रयोग सुरू केले. सिन्देवाईतल्या त्या चार शेतकऱ्यांना त्यांनी बऱ्याच चर्चा करून जैविक शेती करण्यास राजी केलं. त्यासाठी जैविक औषधं, जैविक खत, शेणखत वापरायला लावलं. त्या वर्षी त्यांचा शेती खर्च अगदी कमी झाला आणि उत्पन्न बऱ्यापैकी मिळालं. हे पाहिल्यावर आणखी काही शेतकरी संगीता यांच्याकडे मार्गदर्शनासाठी आले.
त्या दरम्यान, संगीता यांनी कृषी कीटकशास्त्रात एम.एस्सी. केलं. आलेल्या नोकरीच्या संधी नाकारल्या आणि आपलं संशोधन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरूच ठेवलं. त्यांचं लग्न होऊन त्या नागपूरहून यवतमाळला गेल्या. तिथे एका कृषी मेळाव्यात बोलत असताना एका शेतकऱ्यानं आपली व्यथा मांडली की दरवर्षी कंपन्या नवनवीन उत्पादनं घेऊन बाजारात येतात आणि अनेक जाहिराती करून ती शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात. त्याने संगीता यांनाच जैविक खते आणि औषधे मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून देण्याबद्दल सुचवलं. तेथेच ‘विदर्भ बायोटेक लॅब’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.
स्कॉलरशिपचे पैसे वापरून, स्वत:च्या घरातच तीन खोल्यांमध्ये एक छोटी प्रयोगशाळा उभारून, संगीता यांनी १९९५ मध्ये कामाला सुरुवात केली. काही कीटक शेतीला पूरक असतात. अशा मित्रकीटकांमधे ट्रायकोग्रामा (Trichoderma) हा परजीवी कीटकही येतो. हा कीटक पिकांवरील रोगकारक अळ्यांच्या अंडय़ावर पोसला जातो त्यामुळे रोगकारक अळ्यांचा बंदोबस्त होतो. या कीटकांची अंडी कागदावर चिकटवून शेतकऱ्याला दिली जातात. त्या कागदाचे छोटे चौकोनी तुकडे करून ते पिकांना टाचणीने लावायचे. त्यातून ट्रायकोग्रामा बाहेर येऊन रोगकारक अळ्यांना अटकाव करतो. हा ट्रायकोग्रामा परजीव अगदी सूक्ष्म म्हणजे खसखशी एवढा लहान असतो आणि त्याचा मानवाला किंवा पिकालाही काहीच त्रास होत नाही. इतर रासायनिक कीटकनाशके दर तीन-चार दिवसांनी फवारावी लागत असताना ट्रायकोग्रामाचे कागद मात्र पंधरवडय़ातून एकदा इतक्या कमी वेळा लावावे लागतात. त्यात मजुरी वाचतेच, शिवाय एकरी फक्त दोन कागद लागत असल्याने याचा खर्च अगदीच नगण्य आहे. शेतकऱ्यांना हे ट्रायकोग्रामाचे कागद पुरवले आणि त्यांच्याकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. हे जैविक औषध शेतकऱ्यांना खूप उपयोगी ठरलं. पहिल्या वर्षी फक्त दोनशे कागद, दुसऱ्या वर्षी दोन हजार आणि तिसऱ्या वर्षी तब्बल १० हजार कार्ड विकली गेली.
मग हळूहळू सेंद्रिय खत म्हणून ट्रायकोडर्मा (Trichoderma) या एका मित्रबुरशीचा वापर संगीता यांनी करून पाहिला आणि त्यालाही खूप यश मिळालं. अत्यंत बहुपयोगी अशी ही बुरशी पिकावरच्या रोगकारक बुरशा मारणं, झाडं सडायला अटकाव करणं, बियाणं रुजण्याचं प्रमाण वाढवणं, विविध एन्झाइम्स, आणि आम्ल झाडांना पुरवणं, झाडांना तजेलदार करणं, माती भुसभुशीत करणं इत्यादी अनेक गोष्टी करते. पावडर किंवा द्राव या दोन्ही प्रकारात उपलब्ध असल्याने वापरायलाही सोपं असं हे उत्पादन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं आहे.
आज एम.आय.डी.सी. विभागात असलेल्या ५०० टन उत्पादन क्षमता असलेल्या ‘विदर्भ बायोटेक लॅब’मध्ये अशी विविध प्रकारची सुमारे अकरा उत्पादनं आज बनवली जातात. २५ जण काम करत असलेल्या या प्रयोगशाळेत सगळ्या स्त्रियाच आहेत. संगीता यांच्या बहिणी आणि एम.एस्सी. करत असणारी मुलगीही त्यांच्याबरोबर काम करते. ही जैविक औषधे सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड (सी.आय.बी.) कडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय विकता येत नाहीत. प्रमाणपत्र मिळवण्याचं हे क्लिष्ट आणि वेळखाऊ कामही त्यांनी केलं आहे. शिवाय आयएसओ ९००१-२००८ प्रमाणपत्रही मिळवलं आहे. नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, पुणे आणि आसपासच्या अनेक खेडय़ांमध्ये शेतकरी ही उत्पादने वापरून सेंद्रिय शेती करून चांगले उत्पन्न मिळवायला लागले आहेत. सरकारी क्षेत्रालाही पुरवठा केला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये मागणी आहे. त्याशिवाय टाटा ट्रस्टकडून या उत्पादनांचं वाटप शेतकऱ्यांना केलं जातं.
ही प्रयोगशाळा उभारण्यात सगळ्यात कठीण काम म्हणजे शेतकऱ्यांचं मन वळवणं. त्यासाठी संगीता यांनी खूप कष्ट घेतले आहेत. दूरदूरच्या खेडय़ापाडय़ांत जाऊन तिथल्या ग्रामपंचायतीत भेटायचं, शेतकऱ्यांसाठी चर्चा/संवाद आयोजित करायचा, त्यांचे प्रश्न सोडवत मार्गदर्शन करायचं आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार करायचा. बरेच प्रयत्न केल्यावर चार-पाच शेतकरी तयार व्हायचे, मग त्यांना आपली उत्पादनं द्यायची, त्यांचा फॉलोअप ठेवायचा अशा अनेक गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. एकदा काही शेतकऱ्यांना फायदा झाला की मात्र बाकीचे शेतकरीही त्यांची उत्पादनं घेऊन बघायचे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी, जमिनीचा कस सुधारण्यासाठी आणि लोकांच्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी अधिकाधिक सेंद्रिय शेती केली गेली पाहिजे. सरकारतर्फे सेंद्रिय शेतीचा पुरस्कार, मार्गदर्शन झालं पाहिजे. सरकारी कृषिकेंद्रातून सेंद्रिय/ जैविक खतं, औषधे उपलब्ध करून द्यायला हवीत, तसेच टोटल सेलच्या काही टक्के सेंद्रिय सेल हवा असा एखादा नियमही करायला हवा असं त्यांना वाटतं. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी कमी खर्चात चांगली शेती करू शकतील आणि सगळ्यांनाच आरोग्यदायी अन्नधान्यही मिळेल हा दुहेरी फायदा होईल.
‘विदर्भ बायोटेक लॅब’बरोबरच संगीता ‘इंटरनॅशनल काँग्रेस फॉर वुमन आंत्रप्रनर’ (दिल्ली)च्या डायरेक्टर जनरल सेक्रेटरी हे पदही भूषवतात. त्यांच्या या कष्टदायक आणि वेगळ्या कामाची थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतेली गेली आणि २००२ मध्ये युनेस्कोच्या ‘वुमन्स क्रिएटिव्हिटी इन रुरल लाइफ’ या पुरस्काराने त्यांना स्वित्र्झलड येथे सन्मानित केलं गेलं. जिल्हा उद्योग पुरस्कार (महाराष्ट्र सरकार), महाराष्ट्र उद्योगिनी (मिटकॉन)अशा पुरस्कारांनीही त्यांना गौरवलं गेलं आहे. जिनिवा येथे तर त्यांना खूप चांगली मानाची नोकरीही चालून आली होती, पण ती नाकारून त्यांनी यवतमाळमध्येच आपलं काम सुरू ठेवलं. ज्या मातीत त्या घडल्या तिथल्या शेतकऱ्यांसाठी काम करायचा त्यांचा निश्चय आज इतक्या वर्षांनीही पक्काच आहे.
सल्ला
कुठल्याही व्यवसायात प्रामाणिकपणा आणि मेहनत फार जरुरी आहे. केवळ झटपट पुढे जायच्या प्रयत्नात उत्पादनाची प्रत, आणि ग्राहकांचा विश्वास याला तडा जाऊ नये.
उद्दिष्ट
अधिकाधिक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवून, आपल्या जेवणातून रसायनांच्या रूपात पोटात जात असलेलं विष कमी करायचं आहे. रासायनिक शेतीमुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास थांबवून, पूर्वाचलातल्या सिक्कीम, मेघालय, मणिपूर अशा राज्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून पूर्णपणे सेंद्रिय आणि जैविक शेतीकडे वाटचाल झालेली त्यांना बघायची आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी फिरून याबद्दल जागरूकता आणण्याचं कामही संगीता करत आहेत.
संपर्क – विदर्भ बायोटेक लॅब,यवतमाळ
दूरध्वनी – ०७२३२-२४२३३३
मोबाइल – ९१ ९४२२८६९४२३
info@vbl-biofarming.com
swapnalim@gmail.com