कोणताही व्यवसाय करायचा म्हणजे त्यात यश-अपयश, नकार-होकार, फायदा-तोटा, चुका होणं त्यातून शिकणं या गोष्टी अपरिहार्य असतात. महत्त्वाचं असतं ते यातून बाहेर पडून आपलं ध्येय साध्य करणं. निशा भगत यांनाही असे अनुभव अगदी व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच येत गेले पण त्याने निराश न होता आपल्याच अपयशातून, चुकांमधून शिकत सावधपणे त्यांनी व्यवसायाला पुढे नेलं. २००८ पासून घरून डिझाइनचे काम करत असताना त्यांचं काम आवडल्याने कामाची मागणी वाढली. त्यावेळी डिझाइन केलेले पेपर बाहेरून प्रिंट करून घेण्यापेक्षा आपण स्वत:च प्रिंटिंग मशीन घ्यावी असा विचार करून २०११ मध्ये त्यांनी बँकेकडून कर्ज मंजूर करून घेतलं. मित्रमंडळींकडून थोडे पैसे उधार घेतले आणि एक सेकंडहॅण्ड मशीन विकत घेतलं. पण सर्व व्यवहार होताना आयत्या वेळी बँकेने मशीन नवीन नाही या कारणावरून कर्ज द्यायला नकार दिला. सुरुवातीलाच बसलेला हा धक्का मोठा होता, परंतु खचून न जाता त्यांनी पैसे उभारले आणि पहिलं प्रिंटिंग मशीन घेतलं. निशा बी.कॉम.च्या पहिल्या वर्षांला असतानाच त्यांचं लग्न होऊन त्या जळगावला आल्या आणि काही महिन्यांतच शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्या पुन्हा माहेरी आल्या. या काळात शेजारीपाजारी, नातेवाईक यांच्यामध्ये त्यांच्या माहेरी येण्याबद्दल चर्चा चालायची, पण त्याकडे दुर्लक्ष करून निशा यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. या काळात आणि नंतरही सतत त्यांना आईवडिलांचा आधार होता. बी.कॉम. झाल्यानंतर पुण्याला सासरी गेल्यावर एका सनदी लेखापालाकडे (सीए) काम करायला सुरुवात केली. पती मिलिंद भगत हे एका प्रिंटिंग कंपनीत कामाला होतेच, मात्र दोघांचाही पगार अतिशय तुटपुंजा असल्याने संसार कसाबसा चालत होता. शेवटी निशा नोकरी बदलून पेपर कंपनीमध्ये अकाऊंटन्ट म्हणून रुजू झाल्या. या नव्या नोकरीत त्यांना पेपर व्यवसायाबद्दल खूप काही शिकायला मिळालं. संध्याकाळी नोकरी आटपून त्या मिलिंद यांच्या कंपनीत जायच्या. तिथे बसल्या बसल्या त्यांनी डीटीपी वगैरे शिकून घेतलं. स्वत:ची नोकरी सांभाळून त्या इथलं काम विनामोबदला करून देत. अशातच एकदा एका कंपनीकडून काम करून देण्यासंबंधी विचारणा झाली. हो नाही करता करता हे काम करायचं असं निशा यांनी ठरवलं. मात्र या कामासाठी सुमारे पन्नास हजार रुपयांचा कागद लागणार होता. नोकरी करत असलेल्या पेपर कंपनीतूनच त्यांनी हा कागद उधारीवर घेतला आणि पहिली ऑर्डर पूर्ण केली. यात त्यांना बराच फायदा झाला आणि प्रिंटिंग क्षेत्रात आपण व्यवसाय करायचा निर्णय घेतला गेला. हळूहळू ओळखी झाल्या आणि ओळखीतून नवीन कामंही मिळायला लागली. या काळात त्या स्वत: डिझाइन करत, मात्र प्रिंटिंग बाहेरून करून घेत त्यामुळे मिळणारा नफाही मर्यादित होता. स्वत:चं प्रिंटिंग मशीन असेल तर जास्त चांगला व्यवसाय करता येईल, असा विचार करून त्यांनी २०११ मध्ये प्रिंटिंग मशीन घ्यायचं ठरवलं. पण आयत्या वेळी बँकेने कर्ज नाकारलं. त्या वेळी मित्रमैत्रिणी आणि बीवायएसटी (भारतीय युवा शक्ती ट्रस्ट)च्या माध्यमातून त्यांनी पैसे उभारले आणि व्यवसाय वाढवला. प्रिंटिंग मशीन घेतल्यावर कटिंग मशीनही घ्यावं असं अनेकांनी सुचवलं. बाइंडिंग कंपनीचे मालक कुंडले यांनी तर चक्क स्वत:ची गुंतवणूक मोडून एकरकमी दोन लाख रुपये निशा यांना दिले आणि त्यातून त्यांनी कटिंग मशीन विकत घेतलं. कुंडले यांनी दाखवलेला विश्वास निशा यांचा आत्मविश्वास वाढवून गेला, पण तिथेही काही अडचणी आल्याच. नवीन मशीन ठेवण्यासाठी त्यांनी शहरात एक जागा भाडय़ाने घेतली. मशीन लावण्यासाठी फाऊंडेशन, वीज या सगळ्याची तयारी केली. मात्र जेव्हा मशीन आणलं तेव्हा लक्षात आलं की, या नव्या जागेत बीम असल्याने उंची पुरेशी नाही. मशीन दरवाज्यातून आतच शिरेना. इतकं महागडं मशीन बाहेर ट्रकवर थांबवून ठेवलेलं त्यामुळं निशा यांना दुसरी जागा शोधण्याची धावपळ करावी लागली. शेवटी योग्य जागा सापडली. या नव्या जागेतही साऱ्या सुविधा कराव्या लागल्या आणि तिथे मशीन स्थानापन्न झालं. आधीच्या जागेत केलेला खर्च बुडीत खाती जमा झाला, पण यावरून आयुष्यात एका अनुभवाची नोंदही झाली. मशीन आणण्यापूर्वी काय चुका केल्यात हे लक्षात आलं आणि पुढच्या वेळी काय काळजी घ्यायची तेही कळलं. जसजसा ‘एमिनन्स ग्राफिक्स’ हा व्यवसाय वाढला तशा व्यवसायाच्या गरजाही वाढल्या. पुस्तकं, ब्रोशर, शाळेच्या वह्य़ा, सर्टिफिकेट, व्हिजिटिंग कार्ड, आयकार्ड, फ्लायर अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडे डिझाइन आणि प्रिंट व्हायला लागल्या. जुन्या मशीन नवीन जास्तीच्या ऑर्डर प्रिंट करायला पुरेशा पडेनात. त्या वेळी भगत दाम्पत्याने आपसात चर्चा करून व्यवसाय वाढवायचा निर्णय घेतला. त्यासाठी २०१४ मध्ये त्यांनी अद्ययावत ‘फोर कलर मशीन’ विकत घ्यायचं ठरवलं. या वेळी आधीच्या अनुभवातून शहाणे झाल्याने व्यवस्थित चौकशी करून, नीट आराखडे बनवले. कॅनरा बँकेचे मॅनेजर कोंडेजकर यांनी महिला उद्योजकांना मिळणाऱ्या कर्जाविषयी सांगितलं आणि कर्ज घेण्यासंबंधित मार्गदर्शन केलं. सर्व अटींची पूर्तता केल्यावर आठच दिवसांत बँकेकडून रक्कम मिळाली. नवीन चार कलर प्रिंटिंग मशीन आणि त्यानंतर काही काळातच लॅमिनेट केलेल्या पृष्ठभागावर कोटिंग करण्यासाठी अॅक्वास कोटिंगचे मशीनही आणलं. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर ग्राहकाला सांभाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं निशा म्हणतात. ग्राहकाला वेळेवर आणि चांगल्या प्रतीचं काम मिळायला हवं, जिथे शक्य तिथे योग्य सल्ला देऊन ग्राहकाला थोडा फायदाही करून द्यायला हवा, असं त्यांना वाटतं. एकदा ग्राहकांचा विश्वास संपादन केला की पुढच्या ऑर्डर सहज मिळतात असा त्यांचा अनुभव आहे. प्रिंटिंग क्षेत्रात काम काम करताना एखादवेळा काही कारणाने ग्राहकाने काम नामंजूर करणं किंवा कागदाची प्रत बदलल्यामुळे चांगल्या प्रतीचे प्रिंटिंग न होणं अशा काही गोष्टीही घडल्या, पण आधी घडलेल्या गोष्टीवरून धडा घेऊन निशा पुढच्या वेळी तसा प्रकार होऊ नये याची काळजीही घेतात. आपल्याच चुकांतून शिकल्यामुळे त्यांना यश मिळत गेलं. या व्यवसायासाठी दिवसातले दहा ते बारा तास त्या बाहेर असतात, पण त्यांच्या सासूबाई आणि सासरे यांनी घराची आणि मुलाची जबाबदारीही घेतल्याने त्यांना व्यवसायाकडे पूर्ण लक्ष देणं शक्य होतं, असं त्या आवर्जून सांगतात. पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या जागेत आता सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री साडेअकरा अशा दोन पाळ्यांमध्ये ‘एमिनन्स ग्राफिक्स’चं काम चालतं. सुमारे पंधरा लोक निशा यांच्याकडे काम करतात. अनेक प्रकारची प्रिंटिंगची कामं इथे केली जातात. अजूनही नव्या प्रकारचं प्रिंटिंग मशीन निशा यांना आणायचं आहे, पण त्यासाठी साठ ते सत्तर लाख रुपये खर्च आहे. नवीन बाइंडिंग मशीनही आणायचं आहे. आतापर्यंत आऊटसोर्स करत असलेली सगळी कामं कंपनीमध्येच व्हायला हवी, असं निशा यांना वाटतं. या सगळ्या कामांसाठी नवीन नवीन तंत्रज्ञान वापरायचा निशा यांचा विचार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा