योगायोगानेच फोटोग्राफीतून मिळालेल्या पहिल्या कमाईने नलिनी यांना उद्योग करण्याचा आत्मविश्वास दिला आणि प्लास्टिकलाच आपल्या उद्योगाचं भांडवल करत नाशिक येथे उभी राहिली, अमोल इंडस्ट्री. अडीअडचणींना तोंड देत गेल्या २५ वर्षांत कोटय़वधींचा डोलारा सांभाळत यशस्वी उद्योजिका ठरलेल्या नलिनी कुलकर्णी यांच्याविषयी..
एकदा एका शाळेच्या कार्यक्रमात गेल्या असताना नलिनी कुलकर्णी यांच्या हातात कॅमेरा होता, त्यामुळे सगळ्या मुलांच्या पालकांकडून फोटो काढण्यासंबंधी विचारणा झाली. त्यानुसार त्यांनी तब्बल १८ रोल वापरून सगळ्यांचे फोटो काढले. ते कलात्मक फोटो प्रिंट करून शाळेत दिल्यावर अनेक पालकांनी त्या प्रिंट्स दहा दहा रुपयाला विकत घेतल्या. ही होती नलिनी कुलकर्णी यांची अकस्मात झालेली पहिली कमाई. त्या वेळी पहिल्यांदा त्यांना वाटलं त्या स्वत:सुद्धा काहीतरी करू शकतात, या पहिल्या कमाईनं त्यांना आत्मविश्वास दिला आणि घराला हातभार लावण्यासाठी काहीतरी उद्योग करण्याचं त्यांच्या मनानं नक्की केलं.
त्यानंतर काही वर्षे नलिनीताईंनी फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू ठेवला. लग्नसराईच्या दिवसात आणि शाळेच्या वार्षिक कार्यक्रमांच्या वेळात त्यांच्याकडे प्रचंड काम असायचं. पण इतर वेळी मात्र रिकामा वेळ भरपूर असायचा. हा वेळ सत्कारणी लावून अधिक चांगला व्यवसाय सुरू करायला हवा असं त्यांच्या मनानं घेतलं. त्या काळात प्लास्टिक उत्पादनं जोर धरत होती. सकाळी उठल्यावर तोंड धुवायच्या ब्रशपासून दिवसभरात लागणाऱ्या अनेक वस्तू प्लास्टिकपासून बनतात असं नलिनी यांच्या लक्षात आलं, त्यामुळे प्लास्टिकच्या संबंधी काही व्यवसाय करायचा असंही त्यांनी ठरवून टाकलं. त्याच वेळेस त्यांना ‘मिटकॉन’च्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षणांची माहिती झाली. तीन महिन्यांचं हे प्रशिक्षण नलिनी यांनी एकही सुटी न घेता मनापासून पूर्ण केलं.
या प्रशिक्षणातून त्यांना प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग या व्यवसायातले सगळे बारकावे शिकता आले. मार्केट सव्र्हे कसा करायचा, व्यवसाय कसा करावा, त्यात होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात, व्यवसाय तोटय़ात जाण्यापासून कसा वाचवावा अशा अनेक बाबी, अनेक मान्यवरांकडून त्या शिकल्या. हे शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरुवातीला त्यांनी फक्त प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंगमध्ये बनवलेल्या उत्पादनांचं ट्रेडिंग आणि मार्केटिंग केलं. त्यामुळे स्वत:चा भांडवल खर्च फारसा करावा न लागता त्यांना थोडाफार नफा मिळायला लागला. त्यांचे मामेसासरे एका बल्ब बनवणाऱ्या कंपनीत होते, तिथे बल्बच्या फिलामेंट ठेवायला डब्या हव्या आहेत असं त्यांना कळलं. दरम्यान एका ओळखीच्या व्यक्तीकडे प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंगचं मशीन पडून होतं. त्यावरच या डब्या बनवायला घेतल्या आणि त्या कंपनीच्या ऑर्डरची पूर्तता करायला सुरुवात केली. पण अचानक ही कंपनी बंद पडली आणि हे डब्या बनवायचं काम बंद करावं लागलं. पण या व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता मात्र जातच होता, त्यामुळे गप्प बसून चालणार नव्हतं. ‘मिटकॉन’च्या प्रशिक्षणामध्ये मार्केट सव्र्हेचं महत्त्व आणि तो कसा करायचा हेही शिकवलं होतंच. त्यामुळे आता नलिनीताईंनी मार्केट सव्र्हे बनवला. स्वत: जाऊन इतर लोकांना आणि कंपन्यांमध्ये भेटून हा सव्र्हे भरून घेतला. यावरून त्यांच्या लक्षात आलं की अनेक ठिकाणी कामं मिळण्याची शक्यता आहे.
होमिओपॅथी डॉक्टरांची व्यावसायिक गरज ओळखून आसपासच्या डॉक्टरांना लागणाऱ्या औषधाच्या बाटल्या आणि त्यांची झाकणं त्या बनवायला लागल्या. या बाटल्यांची ऑर्डर मिळाली की नलिनीताई उत्पादन करायला सुरुवात करायच्या आणि तयार बाटल्या डॉक्टरांना पोहोचवण्याचं काम त्या स्वत: किंवा त्यांची मुलं करायची. आता दुसऱ्यांचं मशीन वापरून मागणी पूर्ण करणं पुरेसं नसल्याने नलिनी यांनी स्वत:च्या राहत्या घरातच एक नवं प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग मशीन आणलं आणि काम सुरू केलं. सुरुवातीला कंपन्यांचं काम मिळवण्यासाठी अगदी ५ ते १० टक्के ऑर्डर्स आपल्याकडे नोंदवण्याची त्यांनी कंपन्यांना विनवणी केली, शिवाय चांगला माल देण्याची हमी दिली. त्यामुळे नलिनी यांना काही ऑर्डर्स मिळाल्या. पहिल्या ऑर्डर यशस्वीरीत्या आणि उत्तम रीतीने पूर्ण केल्यामुळे पुढच्या ऑर्डर्स अधिकाधिक यायला लागल्या. काम इतकं वाढलं की फोटोग्राफी बंद करावी लागली. हळूहळू घरात ५ मशीन्स वाढवली. अंगणातच कूलिंग टँक बसवून घेतला. या सगळ्यात एक गोष्ट खूपच चांगली होती, ती म्हणजे घरातल्यांची मदत. ऑर्डर मिळाल्यावर कंपनीच्या डिझाइनप्रमाणे त्या डाय बनवून घ्यायच्या. मग प्रॉडक्शन झाल्यावर वस्तूचं फिनिशिंग करायला घरातले सगळेच जण मदत करायचे, ते झालं की रात्री उशिरापर्यंत जागून पॅकिंग करायलाही घरातल्या सगळ्यांचीच मदत होई. एकदा का पॅकिंग झालं की सकाळी नलिनीताई ते तयार सामान लुनावर ठेवून कंपनीत पोहोचवून येत. परत आलं की पुन्हा एकदा वस्तू बनवायला घेत. तोपर्यंत घरातच उत्पादन होत असल्याने हे काम करता करता मध्येच पटकन स्वयंपाक आणि घरातली कामंही करता येत होती.
मग कामाचा व्याप वाढू लागला तसं कारखानाही वाढवायला हवा, असं नलिनीताईंना वाटलं आणि त्याच सुमारास नाशिक एम.आय.डी.सी.मध्ये स्त्री उद्योजकांसाठी सवलतीमध्ये जमिनी उपलब्ध होत्या. नलिनी यांनी लगेचच तिथे एक जमीन घेऊन आपला कारखाना तिथे हलवण्याची तजवीज केली. त्यानंतर गोल्ड लोन घेऊन त्यांनी सेमी ऑटोमॅटिक मशीन्स आपल्या कारखान्यात बसवल्या, त्यामुळे उत्पादनक्षमता अधिकच वाढली. सिमेन्स, मायको, एशियन इलेक्ट्रॉनिक्स, क्रॉम्प्टन अशा मोठमोठय़ा कंपन्यांचे सुटे बारीक भाग बनवायला त्यांच्याकडे यायला लागले. त्यांची ‘अमोल इंडस्ट्री’ वाढू लागली. या सगळ्या कामाला पुरं पडायचं तर अजून मशीन्स हवी होती. त्या वेळी त्यांनी आई आणि वाहिनीचे दागिने तारण ठेवून त्यावर कर्ज काढले. सोन्याच्या दागिन्यांचा भल्याभल्यांना मोह पडत असताना त्यांच्या आई आणि वहिनीने त्यांच्यावर विश्वास ठेवून ते दागिने दिले ही केवढी मोलाची गोष्ट होती! त्या पैशातून आणखी एक सेमी ऑटोमॅटिक मशीन त्यांनी आणलं आणि आपलं काम पुढे सुरू ठेवलं.
हा काय किंवा दुसरा कुठला काय, व्यवसाय हा शेवटी एकमेकांवरच्या भरवशावर आणि शब्दावर चालतो. त्यामुळे निर्णय घेणारी व्यक्ती बदलली की कधी कधी आधीचे निर्णयही डावलले जातात. असाच एक अनुभव नलिनी यांनाही आला. एका कंपनीसाठी त्यांनी डाय बनवले आणि उत्पादन सुरू केलं. काहीच काळात त्या कंपनीतली निर्णयप्रमुख व्यक्ती बदलली आणि त्यांनी ते काम दुसऱ्याच एका कंपनीला दिलं. अशा कामात डाय बनवायला बराच खर्च आलेला असतो. असं काम अचानक बंद झाल्यावर तो खर्च नुकसान खात्यात जातो. पण असे तुरळक अनुभव सोडले तर नलिनीताईंना कंपन्यांकडून अनेकदा कौतुकाची पावती मिळालेली आहे. त्यांचा मुलगा अमोल याने आता सोलर पॅनेल्स बसवली असल्याने कारखान्यात सोलर वीज जास्तीतजास्त वापरली जाते. त्यामुळे विजेचीही बचत होते.
आता तर ‘अमोल इंडस्ट्री’मध्ये सगळ्या पूर्ण ऑटोमॅटिक मायक्रो प्रोसेसर असलेल्या मशीन्स आहेत. त्यांची अचूकता आणि उत्पादन करण्याची क्षमताही खूप अधिक आहे. ऑर्डरसुद्धा ऑनलाइन घेता येतात. ऑर्डर, उत्पादन आणि पुरवठा एकमेकाला योग्य आहे की नाही याची संगणकावरून देखरेख करता येते. नलिनीताई बाहेरगावी प्रवासात असतात तेव्हा त्यांचा मुलगा हा व्यवसाय पाहतोच, पण कंपनीतल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या स्वत:ही लक्ष ठेवून असतात. कंपनीत तयार होणाऱ्या वस्तूंचं असेम्ब्लिंग, फिनिशिंग आणि पॅकेजिंग हे काम आता दोन-तीन बचतगटांकडे सोपवलं आहे त्यामुळे त्या स्त्रियांनाही रोजगार मिळतो. सगळ्या अडीअडचणी सांभाळत कोटय़वधींचा हा डोलारा नलिनीताई आत्मविश्वासाने गेली २५ वर्षे सांभाळत आहेत.
केवळ ११वीपर्यंत शिकलेल्या नलिनी कुलकर्णी यांची व्यावसायिक झेप इतकी उत्तुंग आहे की आज त्यांना एम.बी.ए. कॉलेजमध्ये किंवा इतर शैक्षणिक संस्थांमध्येही प्रशिक्षण द्यायला, त्यांच्यात प्रेरणा निर्माण करायला आमंत्रित केलं जातं. डी. आय. सी., जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, उद्योगवर्धिनी नाशिक पुरस्कार, मिटकॉन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. लघुउद्योगभारती संस्थेसाठीही त्या काम करतात.
आपल्या व्यवसायाचं गमक सांगताना त्या म्हणतात, योग्य दिशेनं काम केलं तर महिन्याला लाखो रुपये कमावता येतीलच, शिवाय हवं तितके दिवस काम करता येईल आणि त्याचं समाधान वेगळंच आहे.
उद्योगमंत्र
चार भिंतींच्या आत न राहता स्त्रियांनी जिद्दीने बाहेर पडून काम केलं पाहिजे. एक स्त्री उद्योजक झाली तर सगळं घर उद्योजक होतं आणि अख्ख्या कुटुंबाचीच प्रगती होते.
व्यावसायिक तंत्र
काटकसरीपणा, जिद्द, प्रामाणिकपणा हे व्यवसायात अतिशय महत्त्वाचे आहेत. कर्ज वेळेत फेडलीच पाहिजेत आणि आपली जशी उन्नती झाली तशीच आपल्याबरोबर इतरही काही जणांची प्रगती व्हायला आपण कारणीभूत ठरलं पाहिजे.
नलिनी कुलकर्णी, नाशिक
अमोल इंडस्ट्रीज, नाशिक
amolind.nsk@gmail.com
swapnalim@gmail.com