बार्शी येथून लग्न होऊन पुण्यात आलेल्या गोदावरी सातपुते यांनी आकाशकंदील बनवण्यास सुरुवात केली आणि अखंड कुटुंब यात रंगलं. कल्पकता आणि मेहनतीमुळे वाढलेल्या या व्यवसायामुळे दर दिवाळीत त्यांचे आकाशकंदील अनेकांची घरे उजळवतात..
आपल्यापैकी अनेकजण आपण काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे असा विचार करत असतो. आपल्या व्यवसायासाठी एखादी झकास आणि नवीन कल्पना आपल्याला हवी असते. अशी एखादी कल्पना सुचली की लग्गेच व्यवसाय सुरू करायचा असाही आपला बेत असतो. पण अजुनपर्यंत कुणालाच न सुचलेली अशी नवीन कल्पना आपल्याला सापडतच नाही आणि मग बहुतेक वेळा व्यवसाय सुरू करायच्या नुसत्या वायफळ गप्पाच राहातात. पण खरं सांगायचं तर एखादी साधी सोपी संकल्पनासुद्धा नीट लक्ष देऊन जोपासली तर किती छान व्यवसाय होऊ शकतो हे गोदावरी सातपुते यांच्याकडे पाहिल्यावर कळते!
मुळच्या बार्शी, सोलापूर इथल्या गोदावरीताई दहावी झाल्या, पण पुढच्या शिक्षणासाठी २५ कि.मी. लांब जावे लागत असल्याने शिक्षण बंदच झाले. मग घरच्या घरी लोकरीची तोरणं आणि इतर वस्तू करून विकायला त्यांनी सुरुवात केली. वडील शेतकरी, त्यामुळे पैशाची अडचण असायचीच. अशा वस्तू विकून घराला थोडाफार हातभार लागायचा इतकंच. मग दोन-एक वर्षांत लग्न होऊन त्या पुण्याला आल्या.
खेडेगावातून शहरात आल्याने पहिली वर्ष-दोन र्वष तर अशीच गेली. आपण नुसतं घरात बसून राहण्यापेक्षा काहीतरी करायला हवं असं त्यांना नेहमी वाटायचं पण नक्की काय करायचं हे मात्र ठरत नव्हतं. होता होता दिवाळी आली आणि गोदावरीताई त्यांचे यजमान शंकर सातपुते यांच्याबरोबर दिवाळीच्या खरेदीला बाजारात गेल्या. त्या वेळी त्यांनी बघितलं की दिवाळीचे आकाशकंदील खरेदी करायला खूप गर्दी आहे आणि जवळपास सगळेच जण हे आकाशकंदील खरेदी करतात. त्याच वेळी त्यांना आकाशकंदील करून विकायची कल्पना सुचली. घरी येऊन त्यांनी घरात सगळ्यांनाच याबद्दल विचारलं. घरातही कोणी आक्षेप घेतला नाही, त्यामुळे थोडेफार सामान आणून त्यांनी पतंगी कागदाचे आकाशकंदील बनवायला घेतले. त्या दिवाळीच्या आधी तब्बल तीनशे आकाशकंदील तयार झाले होते. कंदील तयार तर झाले, पण कोणी विकत घेतले नाहीत तर? अशी धास्ती गोदावरीताईंना वाटायला लागली होती. घरातले आणि आजूबाजूचेही म्हणायला लागले की एवढे कंदील केलेत ते आता गळ्यात घालून फिरायला लागतील की काय! पण जवळच्याच एका दुकानदाराला आकाशकंदिलाबद्दल कळलं आणि त्याने सगळे आकाशकंदील एकदमच विकत घेऊन टाकले. हा पहिला व्यवहार झाला आणि मग मात्र गोदावरीताईंचा हुरूप वाढला.
पुढच्या वर्षी गोदावरीताई आणि त्यांच्या घरातले सगळेजण एकत्र कंदील करायला बसले आणि दिवाळीआधीच भरपूर आकाशकंदिलांची मागणी पुरवता आली. मग २००५ पासून त्यांना अगदी छोटय़ा कंदिलांचीही खूप मागणी आली आणि ती पुरी करायला त्यांनी सहा जणींना कंदील करायच्या कामावर घेतलं. व्यवसाय मोठा करायचा तर भांडवल पाहिजे होतं, त्यामुळे भारतीय युवा शक्तीकडून ५० हजारांचं कर्ज घेतलं आणि कंदील विक्री झाल्यावर ते फेडूनही टाकलं. गोदावारीताईंच्या यजमानांच्या ओळखी असल्याने नवनवीन ठिकाणी विक्री व्हायला लागली, मागणीही वाढली, शिवाय बाजारात पत वाढली आणि व्यवसायातला आत्मविश्वासही वाढला. पुढच्या वेळी त्यांनी अडीच लाखांचे कर्ज घेऊन कंदील केले.
आता तर जानेवारी महिन्यातच या आकाशकंदिलांचं काम सुरू केलं जातं. जिलेटीनचे छोटे कंदील, कागदाचे, फोमचे मोठे कंदील असे सुमारे २२-२३ डिझाइनचे कंदील त्यांच्याकडे तयार केले जातात. घरातले सासू-सासरे, दीर, जाऊ, मुलं, नवरा हे सगळेच कंदिलाच्या कामाला हातभार लावतात. कच्चा माल सगळा दिल्लीहून मागवला जातो. आलेले कागद गोदावरीताई डिझाइनप्रमाणे कापतात आणि मग तो त्यांच्याकडे काम करणाऱ्याना महिलांना दिला जातो. आता सुमारे ७५ महिलांना यातून रोजगार मिळतो. काही महिला कापलेले कागद घरी घेऊन जातात, तर काही तिथे कारखान्यात येऊन कंदील तयार करतात. छोटे कंदील असतील तर एक बाई दिवसाला दीडशे रुपये कमवू शकते. या कंदिलांचा डझनावर हिशेब असल्याने एक डझनावर पाच रुपये मिळतात. महिलांनी तयार केलेले कंदील बरोबर आहेत की नाही हे तपासून त्याचे नीट पॅकेजिंग करावे लागते. हे सगळे काम नीट होण्यासाठी गोदावरीताईंनी साखळी पद्धत ठरवली आहे. चारचार जणींचे ग्रुप करून प्रत्येकीचं काम ठरवून दिलं आहे. त्यामुळे कंदील बनण्याच्या प्रत्येक टप्प्यावर तो तपासला जातो. शिवाय पाचवी स्त्री हे तयार कंदील नीट पॅक करते. त्यामुळे सगळी कामे व्यवस्थित होऊन कामाची प्रतही चांगली राहते.
गेल्या वर्षी सुमारे ३० हजार छोटे कंदील तर सुमारे ५००० मोठे कंदील त्यांनी तयार करून विकले होते. या वर्षी आत्तापर्यंत सुमारे ६००० डझन माल तयार आहे. इतक्या प्रचंड संख्येने कंदील करायचे तर कागद कापायला वेळही खूप लागायचा. त्यामुळे त्यांनी आता कटिंग मशीन तयार करून घेतलं आहे. त्यामुळे कागद कापायचं काम सुकर झालंय. हे हजारो कंदील ठेवायला जागाही लागतेच, त्यामुळे तीन गुंठे जागा भाडय़ाने घेऊन त्यावर शेड करून गोदाम तयार केलं आहे. शिवाय सातपुते यांची एक तीन मजली इमारतही साठवणुकीसाठी वापरली जाते. तीन वर्षांपूर्वी एम.बी.ए. केलेल्या त्यांच्या दिराने, रत्नाकर सातपुते यांनी व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली असून ते अकाउंटिंग बघतात, मात्र महिलांकडून काम करून घेणे, त्यांच्या कंदिलांची मोजणी करून तो हिशेब ठेवणे, कागद कापून देणे, माल आणणे, पोचवणे ही कामं गोदावरीताई करतात. मुंबई, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, बीड, सोलापूर, लातूर, बार्शी ते अगदी हैदराबादलाही त्यांचे कंदील जातात. ओळखीतून, कर्णोपकर्णी मिळणाऱ्या प्रसिद्धीतून त्यांना दूरध्वनीवरून ऑर्डर मिळतात. मोबाइलवरूनच फोटो पाठवून मागणी नक्की केली जाते आणि मग ट्रान्स्पोर्टकरवी कंदील पोचते केले जातात.
व्यवसायात सतत कल्पकता दाखवली नाही तर बाजारात टिकाव लागत नाही हे ओळखून गोदावरीताई दरवर्षी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात. नवे डिझाइन, प्रकार तयार करतात. गेल्या वर्षी खास ऑर्डर आल्यामुळे केवळ दहा दिवसांत त्यांनी कामटय़ाचे दीडशे कंदील बनवून दिले होते. तसेच फिरत्या कंदिलांचीही मोठी मागणी त्यांनी पूर्ण केली होती. मशीनमुळे कागद कापायचा वेळ वाचतो त्यामुळे त्यांना इतर प्रयोग करायला वेळ मिळायला लागला आहे. या वर्षी छोटय़ा कंदिलात त्या नेहमीपेक्षा वेगळे आकार देणार आहेत, तर बाजारातली मागणी बघून मोठय़ा आकाराच्या कंदिलातही कपडा, जाळी, जूट, कामटय़ा अशा विविध प्रकारांतले इकोफ्रेंडली कंदील आणणार आहेत.
त्यांची ही छोटय़ा कल्पनेतून साकार झालेली उद्योजकता बघून २०१४ मध्ये ‘वाय.बी.आय.’ने (युथ बिझनेस इंटरनॅशनल) लंडनला बोलावून त्यांना पुरस्काराने सन्मानित केले. लंडनवारीत त्या सुमारे ४० देशांतल्या इतर उद्योजकांना भेटल्या आणि तिथे त्यांना नवीन कल्पना सुचली. वाढदिवस किंवा काही खास प्रसंगांच्या वेळेस पार्टी बॉक्स उडवले जातात. त्यातून जिलेटीनची चकमक जोरात उडते. जिलेटीन कंदिलाच्या कागद कटाईतून उरलेला कागद त्यात वापरायचा असे ठरवून गोदावरीताईंनी आता ते पार्टी बॉक्स बनवण्याचे मशीनही घेतले आहे. उरलेला जिलेटिन कागद वाया न घालवता तो नळकांडय़ात भरून हवाबंद करून त्याचे पार्टी बॉक्स बनवले जातात.
या वर्षी आकाशकंदील विकत घेताना एका इवल्याशा आकाशकंदिलाची ही लाखांची कहाणी नक्की आठवणार आणि नुसत्या कल्पनेपेक्षाही तिची अंमलबजावणी आणि व्यावसायिक दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे हे पुन्हा पुन्हा आपल्याला सांगणार आहे.
गोदावरी सातपुते
गोदावरी आकाशकंदील,
आंबेगाव पठार
धनकवडी, स्वामीनगर, पुणे – ४३
संपर्क : (९१)८३८०९९३६३४
– स्वप्नाली मठकर