साताऱ्यातल्या फलटणमधल्या मेघना हालभावी. पूर्वानुभव नसतानाही उद्योगाच्या क्षेत्रात शिरल्या आणि चुकांतून शिकत शिकत आज त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज सुमारे २५ कंपन्यांना त्या पेपर टय़ूब्स त्याचबरोबर पेपर कॅन, पॅलेट अशी इतर उत्पादनेही पुरवतात. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना ‘मिटकॉन पुरस्कार’, ‘अन्नपूर्णा पुरस्कार’ असे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उत्पादन क्षेत्रातील पहिली स्त्री म्हणून त्यांचा सत्कारही करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजूनही बऱ्याचदा स्त्रीला ती कुणाची तरी नात, कुणाची तरी मुलगी, बहीण आणि मग कुणाची तरी आई अशी ओळख दिली जाते. देणाऱ्यालाही त्यात काही वावगं वाटत नाही. आणि शेकडो वर्षांच्या तथाकथित संस्कारांचा पगडा असल्याने त्या स्त्रीलाही त्यात काही चुकीचं आहे असं वाटत नाही. अर्थातच ‘कुणाची तरी’ अशी ओळख असल्यावर मग त्याच कुणाची तरी मालकी मान्य करायची आणि आयुष्यातली प्रत्येक गोष्ट त्याच्याच मान्यतेनं करायची असाही प्रघात पडलेलाच आहे. अशा वेळी साताऱ्यातल्या फलटणसारख्या गावात आपल्याला फक्त आजोबा नाही तर वडिलांच्या नावानं ओळखतात याबद्दल खंत वाटून, स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मेघना यांची जिद्द खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे.

थोडं मोठं झाल्यावरही त्यांच्या भावाशी त्यांचे वाद व्हायचे. भाऊ म्हणायचा, ‘‘अगं मुलगा म्हणजे दिवा. देवळातला दिवा कोणी हलवत नाही मात्र मुलगी म्हणजे पणती. जिथे गरज असेल तिथे नेऊन उजेड दिला जातो. त्यामुळे तुला माझी बहीण, लग्नानंतर तुझ्या नवऱ्याची बायको म्हणूनच लोक ओळखणार.’’ पण मेघना यांनी मात्र त्याच वेळी भावाला खडसावलं की मी माझी ओळख निर्माण करणारच. त्या दृष्टीने त्यांनी कोणाची नोकरी नको, असा विचार करून डॉक्टर व्हायचं ठरवलं. पण मेडिकलला त्यांना प्रवेश मिळू शकला नाही म्हणून त्यांनी मायक्रोबायोलॉजी घेऊन मग डीएमएलटी करायचं ठरवलं. पुण्याला  मायक्रोबायोलॉजीमध्ये पदवी घेतली आणि घरी परतल्या. तेव्हा आईने लगेच डीएमएलटीला प्रवेश घेऊ दिला नाही आणि त्याच दरम्यान त्यांचे लग्नही ठरलं. त्या वेळीही भावी सासऱ्यांनी त्यांना ‘तू स्वत: पुढे काय करायचं ठरवलं आहेस?’ असा प्रश्न विचारला होता आणि त्यांना वाटलं की इथे आपले विचार जुळतील. त्यांच्या पतीला, विवेक यांनाही व्यवसायच करायचा होता ही आणखी जमेची बाजू. लग्न झाल्यावर त्यांनी अनुभव हवा म्हणून एमआरची नोकरी सुरू केली. त्यासाठी त्यांना सासरे आणि विवेक यांनीच बळ दिलं.

नंतर मुलगा झाल्यावर त्यांनी नोकरी सोडली. काही तरी करायचं डोक्यात होतं त्यामुळे विवेक यांनी त्यांना पेपरटय़ूब बनवू शकतेस का असं विचारलं, पण आत्मविश्वासाअभावी त्यांनी ते मनावर घेतलंच नाही.  मग थोडे दिवस जिम इन्स्ट्रक्टरची नोकरी केली. ते सोडून एका कंपनीत त्या हेल्थ को-ऑर्डिनेटर म्हणून रुजू झाल्या. तिथेही हे काम आपल्याला अनेकदा सांगूनही समजत नाहीये हे त्यांना कळत होतं पण गरज म्हणून त्या काम करत राहिल्या. या नोकरीत मात्र अनेकदा त्यांचा अपमान झाला. ‘तुला काहीच अनुभव नाही, धड शिक्षण नाही, तरीही तुला ही नोकरी मिळालीये,’ असं वारंवार त्यांना ऐकून घ्यावं लागलं. एकदा मात्र एका चुकीपोटी त्यांचा प्रचंड अपमान करण्यात आला ते त्यांना सहन झालं नाही आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. मात्र, ‘मी तुम्हाला स्वत:चा व्यवसाय उभारून दाखवीनच.’ असंही सुनावून त्या बाहेर पडल्या.

त्याच दिवशी त्यांना टिळक विद्यापीठाची एमबीएची जाहिरात दिसली आणि तडकाफडकी त्यांनी जाऊन प्रवेशपरीक्षा देऊन प्रवेशही घेऊन टाकला. आता अजून शिक्षण घेऊन, शिक्षण नाही म्हणून झालेला अपमान त्यांना भरून काढायचा होता. हे पूर्ण वेळ शिक्षण घेतल्यावर त्यांनी स्वत:च्या प्रयत्नातून मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी मिळवली. त्यानंतर काही काळाने बिना बदामी यांच्याकडे त्या मुलाखतीसाठी गेल्या असताना बदामी यांनी त्या कशा उद्योजिका बनल्या याची कथा सांगितली आणि मेघना यांना त्यातूनच ऊर्जा मिळाली. बदामी यांच्याकडून मिळालेली नोकरी नाकारत आपणही उद्योजिका व्हायचं हे नक्की ठरवलं आणि २००९ मध्ये प्रत्यक्षातही आणलं.

कसला व्यवसाय करायचा हा विचार केल्यावर त्यांना अनेक वर्षांपूर्वी विवेक यांनी आणून दिलेल्या पेपर टय़ूब्स आठवल्या. मग अनेक ठिकाणी चौकशी करून त्या कागदाचे सप्लायर त्यांनी शोधले. टय़ूब बनवायला कसल्या मशीन लागतात हे शोधलं. त्यासाठी लागणारं भांडवल उभं करण्यासाठी जिल्हा उद्योग कार्यालयातून पंतप्रधान हमी योजने अंतर्गत चक्क पंधरा लाखांचं कर्ज मिळालं. लागणारी मशीन विकत घेतली खरी. पण त्या आधी सगळं इंटरनेटवरच पाहिलं असल्यामुळे नीट काही माहिती नव्हती. त्यामुळे मशीन बसवताना, सुरू करताना अनंत अडचणी आल्या. तशा चांगल्या गोष्टीपण घडल्या. एका मशीन ऑपरेटरने स्वत:च नोकरीसाठी फोन केला, तो कामावर आल्यावर त्यानेही अजून काही गोष्टी शिकवल्या. टय़ूब्स बनवल्यावर त्या ग्राहकाला हव्या त्या आकारात कापाव्या लागतात. सुरुवातीला हे कटिंगचं कामही त्यांनी शिकून घेतलं. त्यात अनेक चुका होत पण त्यातून नवीन गोष्टी शिकायला मिळत. हे काम करताना वेगवेगळे मशीनचे भाग वगरे आणायला त्यांना मार्केटमध्येही फिरावं लागलं, तिथेही बरंच काही शिकता आलं. पण इतकं सगळं नवीन असताना, त्यातली माहिती नसतानाही केवळ जिद्दीच्या बळावर त्यानंतर २०१० मध्ये म्हणजे केवळ वर्षभरात त्यांनी आपली पहिली ऑर्डर पूर्ण केली. ही पहिली ऑर्डर विवेक यांच्यासाठीच होती आणि अगदी छोटी होती. मग त्यांच्या लक्षात आलं की, छोटय़ा ऑर्डर पूर्ण केल्या तरी त्यातून कर्जाचा हप्ता भरता येणार नाही, आपल्याला अजून ग्राहक शोधावे लागणार आहेत.

तिथून एका नवीन वाटेवर वाटचाल सुरू झाली. इंटरनेटवर शोध घेऊन संपर्क वाढवला. बाजारात फिरून आणखी कशाला पेपर टय़ूब्स वापरल्या जातात याचा शोध घेतला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, जिथे जिथे काही तरी गुंडाळायचं आहे, मग त्यात टेप्स, दोरा, वायर्स, टिश्यू पेपर अशा अनेक गोष्टी आल्या; तिथे या टय़ूब्स लागतात. त्या दृष्टीने त्यांनी कंपन्यांना संपर्क करायला सुरुवात केली आणि  मग हळूहळू ऑर्डर मिळत गेल्या. या टय़ूब्सच्या ऑर्डर मोठय़ा असतात आणि त्या ट्रकभरून डिस्पॅच केल्या जातात. त्या ट्रान्स्पोर्ट बद्दल त्यांनी माहिती करून घेतली आणि चक्क स्वत:चा ट्रकही घेतला, नवीन मशीन्स घेतल्या. आज सुमारे २५ कंपन्यांना त्या पेपर टय़ूब्स त्याचबरोबर पेपर कॅन, पॅलेट अशी इतर उत्पादनेही पुरवतात. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना ‘मिटकॉन पुरस्कार’, ‘अन्नपूर्णा पुरस्कार’ असे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उत्पादन क्षेत्रातील पहिली स्त्री म्हणून त्यांचा सत्कारही करण्यात आला आहे.

हे काम करताना मेघना यांना अनेक अडचणी आल्या. सुरुवातीला या क्षेत्राची फारशी माहिती नसल्याने त्यांचं नुकसान खूप व्हायचं. वेस्टेजही खूप व्हायचं. एकदा तर अख्खी गाडी भरून टय़ूब्स  परत आल्या कारण टय़ूब्स नीट चिकटलेल्या नव्हत्या. या सगळ्या चुकांचा त्यांनी आढावा घेतला. ऑपरेटरच्या चुका, हवेत दमटपणा असल्याने पेपरचे होणारे नुकसान, चिकटवायला लागणारा गोंद चांगला नसल्याने होणारं नुकसान त्यांच्या लक्षात यायला लागलं आणि ते होऊ नये म्हणून उपाय योजनाही करता यायला लागली. आधी कधी स्क्रूड्रायवरही हातात घेतला नव्हता पण आता मशीनमध्ये होणारे छोटे तात्पुरते बिघाड स्वत:चे स्वत: दुरुस्त करता यायला लागले. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना कसं सांभाळायचं आणि त्याच वेळी काम होण्यासाठी आपला अधिकारही दाखवून द्यायचा हे जमायला लागलं. मालक म्हणून एक स्त्री आहे हे कामगारांना पटायला वेळ गेला, मात्र मेघना यांचा कामातला अनुभव आणि ज्ञान पाहून आता कामगारांनाही सवय झाली आहे. काही वेळा घरातल्या जबाबदाऱ्या आणि कंपनीतल्या जबाबदाऱ्या यांची सांगड घालताना खूप त्रास झाला पण आपल्या जिद्दीने त्यांनी निभावून नेलं. मागच्याच वर्षी पावसाचं पाणी कंपनीत घुसून सगळं उत्पादन वाया गेलं होतं पण तीन-चार महिने अथक परिश्रम करून त्यांनी ऑर्डर पूर्ण केल्या आणि नुकसान भरून काढलं.

एरवी आधी मार्केट सर्वेक्षण करून मग व्यवसायात हात घालायचा हाच प्रघात, पण हा पायंडा मोडूनही मेघना हालभावी यांनी आज एक यशस्वी व्यवसाय उभा करून दाखवला आहे. आणि लहानपणी पाहिलेलं, स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायचं स्वप्न पूर्ण केलं आहे. पुढेही त्या यशाची अनेक शिखरं पादांक्रात करतील यात शंकाच नाही.

स्वप्नाली मठकर swapnalim@gmail.com

मराठीतील सर्व उद्योगभरारी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women entrepreneurs meghna halbhavi inspiring story