आनंदाचे क्षण भर्रकन उडून गेले. वयाच्या उत्तरार्धात सर्व प्रसंगांकडे अलिप्तपणे पाहण्याचा विचार केला आणि सर्वप्रथम आठवली ती ‘उकडपेंडी!’.. जुन्या एकत्र कुटुंबातल्या त्या गमतीजमती! एकमेकांना संभाळणारी आपुलकी!
संसारातील हेवेदावे, जीव नकोसा होणं हे प्रत्येक स्त्रीच्या वाटय़ाला येतंच. गरीब असो की श्रीमंत. त्यातून निभाव लागतो हेपण ठरलेलं. मनपण सोसून थकतं, पण तिथेच उकडपेंडीसारखा प्रसंग निर्झर झऱ्यासारखा झुळझुळ आवाज करीत वाहतो- पुन्हा पुन्हा नवीन योजना, उत्साह देतो.. काय आहे हा उकडपेंडीचा प्रसंग? त्यासाठी ५५ र्वष मागे जावं लागेल..
माझं लग्न ५५ वर्षांपूर्वी झालं..  सासरी आमच्या घरी १०-१२ मंडळी होती. एकत्र कुटुंब. दीर, नणंदा, पुतणे, पुतणी, जाऊबाई.. अगदी गोकुळ म्हणा ना. मला बरंच काम असायचं, कामं करायची एकेक पद्धत लक्षात ठेवून सासरच्यांना प्रसन्न ठेवायचा अथक प्रयत्न असायचे. मात्र सगळ्यांच्या खेळकर स्वभावाने दडपण असं नव्हतं. नव्या नवलाईचे दिवस होते.
एक दिवस मोठंच काम माझ्या अंगावर आलं. दुपारच्या फराळाचं काम! सासूबाईंनी सांगितलं आणि अक्षरश: माझ्या छातीत धडधडलं. आता काय करायचं? मला साधा स्वयंपाक यायचा म्हणण्यापेक्षा बरा जमायचा. पण फराळाचं करायचं म्हणजे काय? माझ्या डोळ्यातली भीती बहुतेक सासूबाईंनी पाहिली. म्हणाल्या, ‘घाबरू नकोस, उकडपेंडी तर करायची! येते ना तुला?’ मी नंदीबैलासारखी मान हलविली. ‘मला पाहायला आल्या तेव्हासुद्धा प्रश्नांची भीती वाटली नव्हती पण आता? शिवाय माझ्या माहेरी गोड पदार्थच जास्त व्हायचे, खारे पदार्थ कमीच. असो.’
त्या वेळी स्वयंपाकासाठी ‘भुशाची शेगडी’(चूल) असायची. स्टोव्हवर फक्त दुपारचा चहा होई. मी भुशाची शेगडी भरून पेटवली. एक मोठी लोखंडी कढई तिच्यावर ठेवली.. तोपर्यंत सासूबाईंनी कांदा, कोथिंबीर, लिंबू चिरून दिलं. अंदाजाने तीन पाव कणिक, १ पाव बेसन घेतलं आणि कढईत छान खरपूस भाजलं. खरं तर उकडपेंडीत काय काय असतं, कशी करायची हेच मला नीटसं माहीत नव्हतं. ‘अनसीन पॅसेज’ची परीक्षा. ‘देवा तार रे बाबा’, करीत भाजलेली कणिक ताटात काढली. नंतर कढईत भरपूर तेलाची फोडणी केली. चिरलेल्या कांद्याची रास ओतली, तिखट, कढीपत्ता, हळद, हिंग जे सापडेल ते घातलं आणि लोटाभर पाणी घातलं. मग मिठाची आठवण झाली. मीठ घातलं मग साखर हवीच ना. तीपण झटक्यात टाकली. आणि पाणी गरम व्हायची वाट पाहत बसले. एका गुडघ्यावर हनुवटी ठेवून!
मनावरचं दडपण, धूर, उष्णता यामुळे माझा चेहरा बघण्यासारखा झाला असावा. त्यात माझे धाकटे दीर स्वयंपाकघरात आले, झालं की नाही फराळाचं बघायला. सासूबाई तिथेच उंबरठय़ावर बसल्या होत्या. त्यामुळे मला चवही बघता येत नव्हती. वाटलं चुकलं की सांगतील पण झालं उलटं! तोंडाला पदर लावून त्यांनी हसू लपविलं आणि दिरांना म्हणाल्या, ‘अरे बंडय़ा उकडपेंडीचं फोडणीचं वरण झालंय!’ ते ऐकून माझं उरलंसुरलं अवसान गळालं नि डोळ्यातलं पाणी कढईत पडलं. हातपाय थरथरत होते. ते पाहून दीर बाहेर गेले. माझा भाऊ बाहेर बसला होता, त्याला म्हणाले ‘अरे, चल रुमाल घे, तुझी बहीण रडतेय.’
तोपर्यंत काही न सुचून भाजलेली कणिक, बेसन कढईतल्या पाण्यात घातली. लिंबाचा रस, कोथिंबीर घातली. हलवून झाकण घातलं आणि शेगडीचं लाकूड ओढलं. कशी होते उकडपेंडी.. मला काळजीनं घेरलं.
भाऊ स्वयंपाकघरात आला. ‘काय झालं गं’ म्हणून विचारायला लागला. डोळ्यांतील आसवं माझं बिंग फोडतील म्हणून निकराने परतविली, ‘काही नाही रे उगीच थट्टा करताहेत,’  मी बळे बळे म्हणाले. बस तू म्हणत, त्याला बसायला पाट दिला. वाटलं निदान याच्यासमोर तरी कुणी नावं ठेवणार नाहीत.
थोडय़ा वेळाने मी कढईचं झाकण काढलं. खमंग वास सगळीकडे पसरला. हळूहळू सगळे जण स्वयंपाकघराच्या बाहेर जमले. सगळ्यांना उत्सुकता! नव्या नवरीची पाककला! सासूबाईंनी झाऱ्याने उकडपेंडी हलविली आणि एकदम खूश झाल्या. ‘बंडय़ा! अरे छानच, उकडपेंडी मऊ मोकळी झालीय! मी करते त्याच्यापेक्षा छान! तुला जिलबीपण येत असेल ना?’ त्यांनी ममत्वाने माझ्याकडं पाहिलं. मी नेहमीसारखी मान डोलविली. सर्वानी चवीनं खाल्ली. ह्य़ांनी हळूच प्लेटवर दोनदा चमचा वाजवला. मी चोरून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी हसत चमच्याने हवेत १ चा आकडा काढला. मी इतकी आनंदले. मनात म्हटलं ‘जिंकलीस’. पसंतीची पावती मिळाली. कुणाला न समजता..
काळ पुढे सरकत गेला. कुटुंब विभक्त झाली. समजुती, गैरसमजुती, मानअपमान, लहान-मोठा या सगळ्या आवर्तात सगळं तितरबितर झालं. मनाच्या कुठल्या कोपऱ्यात झालेल्या प्रसंगाचे वाईट क्षण, जाळ्यासारखे चिकटून बसतात. कुरतडून काढू म्हटलं तरी निघता निघत नाहीत. उलट मन मात्र रक्तबंबाळ होतं. आनंदाचे क्षण भर्रकन उडून गेले. वयाच्या या उत्तरार्धात सर्व प्रसंगाकडे अलिप्तपणे पाहाण्याचा विचार केला आणि सर्वप्रथम आठवली ती ‘उकडपेंडी!’ जुन्या एकत्र कुटुंबातल्या त्या गमतीजमती! एकमेकांना सांभाळणारी आपुलकी! असं वाटतं पुन्हा एकदा त्या छोटय़ा धंतोलीतील घरात जावं, सगळे जण तिथं असावेत आणि कढईभर खमंग उकडपेंडी बनवावी…
chaturang@expressindia.com

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”