आता सगळय़ा जणी निवृत्त झाल्या आहेत, तरी आज आम्ही महिन्यातून एकदा एकीच्या घरी जमतो. खूप गप्पा मारतो आणि पुढच्या महिन्यात कुणाकडे जमायचे ते देखील ठरवतो. वर्षांतून एखादी ट्रीप काढतो. सगळय़ा जणी ट्रीप एन्जॉय करतो. चाळीस वर्षांची आमची ही मैत्री अशीच अभंग राहो..
माझं लग्न झालं १९७५ ला नि आम्ही आमचा नवा संसार कळव्याच्या आमच्या घरी मांडला. संपूर्ण बालपण मुंबईसारख्या ठिकाणी काढलेल्या मला कळवा एकदम नवीन. या नावाचं स्टेशन आहे हे देखील लग्न ठरल्यानंतरच समजलं. तिथे वस्ती होती, पण तशी तुरळकच. रात्री तर बायका फारशा नजरेस पडायच्या नाहीत. निर्जनच होता बराचसा परिसर. लोकांच्या घोळक्याबरोबरच चालत जायचं आणि एकदाचं घरी पोहोचलो की हुश्श करायचं अशी परिस्थिती!
अशा कळव्यात आमचा संसार-ऑफिस दोन्ही सुरू झालं. सकाळी ९ ची लोकल पकडून व्ही. टी. (आताचं सीएसटी) गाठायला लागायचीच. ऑफिस जरी १०.३० चं असलं तरी ९ चीच गाडी पकडावी लागे. कारण त्यानंतर एकदम १० वाजता गाडी असायची. हळूहळू मी त्या वातावरणात रुळू लागले. रोज एकच गाडी पकडत असल्यामुळे बरेचसे चेहरे ओळखीचे होऊ लागले. मैत्री व्हायला लागली, हळूहळू मैत्रीचे बंध घट्ट व्हायला लागले. सुलभा, अनघा, प्रतिभा, मंदा व शीला या माझ्यापेक्षा वयाने मोठय़ा असलेल्या आणि माझ्या बरोबरीची असलेली स्वाती खूप छान मत्रिणी मिळाल्या मला. मी बँकेत असताना भाग घेत असलेल्या कार्यक्रमांना प्रतिभा आणि अनघा कौतुकाने आवर्जून यायच्या. असं निव्र्याज प्रोत्साहन खूप काही देऊन जायचं. मला खूप आनंद होत असे. हळूहळू आमचा ग्रुप वाढू लागला. सकाळच्या गाडीच्या मत्रिणी वेगळय़ा संध्याकाळच्या वेगळय़ा. कळवा-व्ही. टी. अंतर जवळजवळ एक तासाचं, पण हा एक तास कसा जायचा ते कळायचंच नाही. गप्पा, गाणी यात वेळ खूप छान जायचा. नवरात्रात भोंडला, चत्रात आंबाडाळ पन्हे, संक्रांतीला तीळगूळ यांसारखे आपले पारंपरिक सणदेखील आम्ही उत्साहाने साजरे करायचो.
कुणाचा राग-लोभ नाही की उखाळय़ा-पाखाळय़ा नाहीत, केवळ निखळ मत्री. आम्ही बहुतेक सर्व जणी कळव्यातच राहणाऱ्या असल्यामुळे आमची मैत्री खूप छान जमली. विशेष म्हणजे सर्व जणी मध्यम परिस्थितीतूनच आलेल्या असल्यामुळे सगळय़ांची विचारसरणी आणि राहणीमान यात काहीच फरक नव्हता. पावसाळय़ाच्या दिवसात पूर्वी लोकल हमखास बंद पडायच्या, मग काय गाडीतून कधी कधी उडय़ा मारून ठाण्यापर्यंत चालत जायचे आणि ठाणे लोकल पकडून पुढे व्ही. टी. गाठायचे. हे उपद्व्यापही करायचो. गाडय़ा पूर्ण बंद असतील तर मात्र ऑफिसला दांडी व्हायची आणि तो दिवस मग एखाद्या मत्रिणीच्या घरी धमाल करीत जायचा. तिथे जाऊन प्रत्येकीच्या डब्यातल्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा, वेळप्रसंगी तिच्याकडे एखादा नवीन पदार्थ करून बघायचा आणि त्याचा आस्वाद घ्यायचा तो वेगळाच अनुभव असे. कधी कुणाची मंगळागौर, कुणाच्या मुलांच्या मुंजी, लग्नं या सर्व कार्यक्रमांना आम्ही सगळय़ा जणी आवर्जून हजर राहायचो.
माझी पाचवी मंगळागौर तर आजही कुणी विसरलेल्या नाहीत. ३१ जुल १९७९ दिवसभर धुवाधार पाऊस पडत होता. रेल्वे ट्रॅकवर पाणी तुंबून गाडय़ा ठप्प झाल्या होत्या. काही जणी ऑफिसमधून येणार होत्या. त्या अडकल्या होत्या त्यांना यायला खूप उशीर झाला, पण सगळय़ांनी मंगळागौरीला हजेरी लावलीच. कुठलीही सबब न सांगता, त्या वेळी काय वाटले हे शब्दात नाही सांगता येणार. नंतर मंगल, शोभा, मीरा, अलका, शीला धारप यादेखील आमच्यात आल्या आणि बघता बघता आमचा ग्रुप १२ जणींचा झाला.
आता सगळय़ा जणी निवृत्त झाल्या आहेत, तरी नातवंडांची बारशी, मुंजी या कार्यक्रमांना आवर्जून हजर राहतो. त्यांच्या महत्त्वाच्या वर्षांच्या परीक्षेपूर्वी शुभेच्छा द्यायला आणि निकालानंतर त्यांचे कौतुक करायला सर्व जणी खूप उत्साहाने हजर असतो. एकमेकींच्या अडी-अडचणींच्या वेळी आजही धावून जातो. आमचे सूर असे जुळले की त्याने आयुष्याला वेगळाच अर्थ मिळवून दिला.
पूर्वी आम्ही सर्व जणी कळव्यात होतो. आता काही जणी ठाण्यात तर काही मुलुंडला राहायला गेल्या आहेत. सध्याच्या आमच्या ग्रुपमध्ये अनिता, माधुरी आणि स्मिता या तीन नवीन मत्रिणींची भर पडलीय. त्यामुळे आता आमचा ग्रुप जरी ठाणे-कळवा असा असला तरी सर्वाचं मूळ कळव्यातच असल्यामुळे आमचा ग्रुप ‘कळवा ग्रुप’ म्हणूनच ओळखतो. आमच्यापकी तिघी जणींनी अमृत महोत्सवी वर्ष पार केले आहे. त्यांचे वाढदिवस आम्ही उत्साहाने साजरे केले. त्यांच्या आयुष्यात आलेलं एकाकीपण त्यांनी कधीच आमच्या ग्रुपला जाणवू दिलं नाही आणि आम्ही सर्व जणीदेखील त्यांच्या त्या काळात नेहमीच त्यांच्या सोबत होतो.
आज आम्ही महिन्यातून एकदा एकीच्या घरी जमतो. खूप गप्पा मारतो आणि पुढच्या महिन्यात कुणाकडे जमायचे ते देखील ठरवतो. वर्षांतून एखादी ट्रीप काढतो. शक्यतोवर सर्वाना येता येईल असाच दिवस आम्ही ठरवतो. कुठलीही पोकळ सबब न सांगता सगळय़ा जणी ट्रीप एन्जॉय करतो. आज दोघी जणी प्रकृतीमुळे थकल्या आहेत, तरीदेखील त्या प्रत्येकीच्या घरी, ट्रिपला उत्साहाने येतात. अगदीच अशक्य असेल तरच एखादी मत्रीण येत नाही. (काही जणींना पेन्शन नाही तरीदेखील त्या आमच्यात सामील होतात).
आमच्या निकोप मत्रीचं आमच्या नवऱ्यांनादेखील खूप कौतुक आहे. आमच्या ग्रुपबद्दल लिहावं तेवढं थोडंच आहे. अशा या आमच्या निकोप मत्रीला ४० र्वष पूर्ण होतील पण आजही आमची मत्री टिकून आहे. ती अशीच राहावी हीच इच्छा! म्हणूनच आमच्या मत्रीलादेखील जीवेत् शरद: शतम् अशा शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे?
निखळ मैत्रीची चाळिशी
आता सगळय़ा जणी निवृत्त झाल्या आहेत, तरी आज आम्ही महिन्यातून एकदा एकीच्या घरी जमतो. खूप गप्पा मारतो आणि पुढच्या महिन्यात कुणाकडे जमायचे ते देखील ठरवतो. वर्षांतून एखादी ट्रीप काढतो.
आणखी वाचा
First published on: 02-08-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unbroken friendship of forty years