मुलगाच पाहिजे असा आग्रह आपल्यासाठी नवा नाही. अगदी आजही. त्याची कारणेही अनेकदा चर्चिली गेली आहेत. त्यात आर्थिक जशी आहेत, तशी सामाजिकही आहेत. मात्र मुलगा झाला नाही, या कारणासाठी एखादीला किंबहुना, जिला आपण पत्नी वा सून मानतो तिचा तिरस्कार करणं किंवा तिचं अस्तित्वच नाकारणं आणि झालेल्या मुलीलाही प्रेम न देणं, आपला सामाजिक दर्जा कमी झाला अशा पद्धतीने वागणं-बोलणं, मुलीला गळ्यातील धोंडा समजून पालनपोषण करणं, या मानसिकतेचं आपण काय करणार आहोत? त्या स्त्रीच्या हतबलतेचं, निराशेचं आपण काय करणार आहोत? आजही एक मोठा वर्ग या मानसिकतेचा गुलाम आहे. विचारवंत म्हणवणारा वर्ग त्यासाठी काही करेल का?
अगदी ताजा अनुभव. चार दिवसापूर्वीचा. मी ऑपरेशन करण्यासाठी एका हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत होतो. इतक्यात वॉर्डातून मोठय़ाने रडण्याचा आवाज ऐकू आला. वॉर्डातील एखादा रुग्ण दगावला तर नाही ना या मन:स्थितीत वॉर्डात गेलो. तीन-चार बायकांचं सामूहिक रडणं चालू होतं. कानोसा घेतला तर लक्षात आलं की तिसरी मुलगी झाल्यामुळे हा आक्रोश होता. स्वत रुग्ण, तिची आई आणि सासू तिघीही मोठमोठय़ाने रडत होत्या. त्यांना थोडंसं शांत करून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तिसरी मुलगी झाली म्हणून का रडता? जे देवानं दिलं त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि कुटुंबनियोजनाचं ऑपरेशन करून घ्या. यावर रुग्णाची आई म्हणाली, ‘‘तुम्हांला असं म्हणायला काय जातंय? हुंडा देऊन या तीनही मुलींचं लग्न कोण करून देणार? आमाला एकादा तरी मुलगा नको का? देवानं असं कसं केलं’ असं म्हणून ती पुन्हा रडायला लागली. त्या स्त्रीचा नवरा शेती करणारा, त्याला तिसरी मुलगी झाल्याचा निरोप मिळाल्यानंतर मला माझ्या बायकोचं तोंड पाहायची इच्छा नाही, असा निरोपही त्यांना नुकताच मिळाला होता. हाही अनुभव मला नवीन नव्हता. ती स्त्री आणि तिचे नातेवाईक खेडय़ातील अशिक्षित लोक होते. त्या सर्वाना मी माझ्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अर्थातच त्यांची मनस्थिती भेदण्यांत मी पुन्हा एकदा अपयशी ठरलो आणि हताश मनाने ऑपरेशन थिएटरकडे चालू लागलो..
आपल्याला एखादा मुलगा असावा अशी इच्छा असणं काही गर आहे, असं मला वाटत नाही. पण मुलगी झाली की निराश होणं, आपला सामाजिक दर्जा कमी झाला अशा पद्धतीने वागणं-बोलणं, मुलीला गळ्यातील धोंडा समजून पालनपोषण करणं, प्रसंगी सोनोग्राफी करून मुलगा-मुलगी तपासणी करून मुलगी असल्यास गर्भपात करणं हे सर्वार्थानं गर आहे. माझ्या या डॉक्टरी व्यवसायात असे अनुभव इतके आणि सातत्याने येत आहेत ते पाहता प्रश्न पडतो, मुलगी नको म्हणण्याच्या, मुलगी नको म्हणून तिला जन्माला न घालण्याच्या, मुलगी झाली की नाक मुरडण्याच्या या मानसिकतेत कधी बदल होईल की नाही? आणि कधी होईल?
एक स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ म्हणून गेल्या २५ वर्षांपासून रोजच गर्भवती स्त्रियांशी व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांशी संपर्क येत असतो. त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेळेस काय होणार? मुलगा की मुलगी? या बाबतीत नातेवाईकांची असणारी उत्सुकता, त्यांची घालमेल, काही घडेलेले प्रसंग आणि त्यातून आलेले काही अनुभव आपल्यासमोर ठेवत आहे. बघू या मुलगा होण्याच्या हव्यासाचं मोजमाप आपल्याला करता येईल का ?
१९८७-८८चा तो काळ. मी भोकरच्या (तालुक्याचं ठिकाण) नागरी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो. एक शिक्षक आपल्या गर्भवती पत्नीला तपासणीसाठी घेऊन आले. तिची ती पाचवी गर्भधारणा होती. त्यांना पूर्वीच्या चार मुली होत्या. त्या बाईला तपासल्यानंतर, दोन गर्भ म्हणजे जुळे असावेत असं वाटलं. नांदेडला त्यांना सोनोग्राफी करून खात्री करून घेण्यासाठी पाठवलं. ती जुळ्याचीच गर्भधारणा होती. दर महिन्याच्या तपासणीच्या वेळेस या वेळेस तरी मुलगा होईल का नाही याबद्दल हमखास चर्चा होत असे. प्रत्येक वेळेस तिच्या मनातील बेचनी जाणवत होती. अखेर बाळंतपणाचा दिवस (ती रात्रीची वेळ होती) उजाडला. बाळंतपणाच्या कळा सुरू झालेल्या होत्या. बाळंतपण ‘नॉर्मल’ होईल अशीच परिस्थिती होती. तिचं बाळंतपण सुखरूप व्हावं, तिची दोन्ही बाळं जन्मल्यानंतर खणखणीत रडावी अशीच शक्यता असतानाही दुर्दैवाने सिझेरियन करायची वेळ आलीच तर तिला रात्री या अवस्थेत नांदेडला (जिल्ह्य़ाच्या ठिकाणी) कसं पाठवावं याचं टेन्शन माझ्या मनावर होतं. पण तिचं टेन्शन वेगळं होतं, कारण मुलगा झाला नाही तर तिचं भवितव्य काय असणार याची कल्पना तिला असावी. त्यामुळे मला मुलगा होईल का नाही हेच विचारणं चालू होतं. पहिलं बाळ डोक्याकडून बाहेर आलं, व्यवस्थित रडलंदेखील. नाळ कापण्याच्या आत तिनं विचारलं, ‘‘काय झालं?’ं’ मी काही उत्तर देण्यापूर्वीच मला सहकार्य करण्यासाठी आलेली नर्स ओरडली, ‘अरे देवा ! मुलगीच झाली.’ पुन्हा मुलगीच झाली हे कळल्याबरोबर ती रडायला लागली. नशिबाला आणि देवाला दोष देणं सुरू झालं. दुसरं बाळ बाहेर येण्यासाठीच्या कळा ती घ्यायलाच तयार नव्हती. मला तर बाळंतपण पूर्ण करणं आवश्यक होतं. ताबडतोब मला कल्पना सुचली, मी म्हणालो, ‘अहो बाई आतमध्ये मुलगा आहे, त्याचा जीव गुदमरत आहे. तुम्ही कळा घ्या आणि सहकार्य करा.’ मुलगा होईल या आशेवर तिने कळा दिल्या. दुसरं मूल बाहेर आलं. तो मुलगा होता. मुलगा झाल्याचं समजताच तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मी आजही विसरू शकत नाही. त्या अवस्थेतदेखील तिने माझा हात घट्ट पकडून स्वतच्या कपाळाला लावला. डॉक्टर तुम्ही म्हटल्यामुळे मला मुलगा झाला. काही मिनिटापूर्वी देवाला दोष देणारी, देवाचे पुन्हा पुन्हा आभार मानत होती. काहीही गुंतागुंत न होता जुळ्याचं बाळंतपण सुखरूप झालं. माझं टेन्शन संपलं आणि तिचंदेखील.
असाच आणखी एक अनुभव- एकदा एखाद्या गर्भवतीचं ‘सिझर’ झालं तर दुसऱ्या वेळेस तिला ‘सिझर’ लागण्याची शक्यता साधारणत ५० टक्के असते. दोन ‘सिझर’ झाल्यानंतर तिसऱ्या वेळेस ‘सिझर’ करावंच लागतं. अशीच एक पूर्वी दोन ‘सिझर’ झालेली आणि तिसऱ्या वेळेस ‘सिझर’ करण्यासाठीची केस आम्ही ऑपरेशन टेबलवर घेतली होती. तिला पूर्वीच्या दोन्ही मुलीच होत्या. साहजिकच या वेळेस तिला मुलगा व्हावा अशी तिचीच नव्हे तर तिच्या सर्व नातेवाईकांची इच्छा. आमची आपली नेहमीप्रमाणे मुलगा होवो वा मुलगी ऑपरेशन यशस्वी व्हावं, कुठलीही गुंतागुंत होऊ नये आणि बाळाने जन्मल्याबरोबर छान रडावं एवढीच इच्छा. या तिसऱ्या सिझेरियनसोबत कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करणंदेखील जवळपास अनिवार्यच असतं. तशी आम्ही तिची आणि तिच्या नवऱ्याची संमतीपत्रावर सही घेतलेली होती. या सर्व तयारीनिशी ऑपरेशन सुरू झालं. तिला तिसरी मुलगीच झाली. नुकताच जन्म झालेली मुलगी व्यवस्थित रडत होती. लहान बाळाच्या डॉक्टरांनी तिला तपासलं आणि सगळं काही ठीक आहे, असं सांगितलं. ठरल्याप्रमाणे आम्ही सोबत कुटुंबनियोजन शस्त्रक्रियाही केली. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असलेल्या ऑफिसमध्ये बसून आम्ही चहा घेत होतो. बाहेर नातेवाईकांमध्ये अपेक्षित निराशेच्या वातावरणाऐवजी आम्हाला आनंदी वातावरण असल्याचा अंदाज आला. आम्ही सिस्टरला विचारलं तर ती म्हणे, या बाईचा नवरा मिठाई वाटतोय. आम्हालाही आनंद झाला. तिसरी मुलगी झाल्यानंतरदेखील निराश न होता मिठाई वाटली जात आहे! समाज सुधारल्याच्या या घटनेचं स्वागत केलं पाहिजे. तिसऱ्यांदा मुलीचा पिता झाल्याबद्दल मिठाई वाटणाऱ्याचं हार्दकि अभिनंदन केलंच पाहिजे, असं आम्हाला वाटलं. आम्ही त्या स्त्रीच्या नवऱ्याला ऑफिसमध्ये बोलवलं. मिठाई घेऊन तो आत आला. त्याने आम्हाला मिठाई दिली. आम्ही त्याचं अभिनंदन केलं, त्यावर हे पतिराज म्हणाले, ‘‘तसं काही नाही डॉक्टरसाहेब, आमचं अगोदरच ठरलं होतं, तिसरी मुलगी झाली की दुसरं लग्न करायचं. यासाठी पत्नीकडून १०० टक्के परवानगी आहे. आता मी दुसऱ्या लग्नासाठी मोकळा, म्हणून मिठाई वाटत आहे.’’ असं म्हणून आमची प्रतिक्रिया ऐकण्याच्या आत तो आनंदाने ऑफिसच्या बाहेर निघूनही गेला. आमचे चेहरे मात्र एकदम पाहण्याजोगे झाले. धन्य तो नवरा आणि धन्य धन्य ती बायको! अर्थात त्या बायकोचं नंतरचं आयुष्य कसं असणार आहे हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नव्हतीच.
बाळंत होणाऱ्या त्या स्त्रीला मूल जन्माला येईपर्यंत कुणाचीच सहानुभूती नसते, अगदी स्वत:चीसुद्धा. असाही अनुभव अनेकदा येतो. वेळ दुपारी तीन वाजताची. एका मॅटíनटी होममधून गायनॅकॉलॉजिस्ट मॅडमचा फोन आला. र्अजट या. स्त्रीची डिलिव्हरी होत नाही, कदाचित ‘सिझर’ करावं लागेल. मी ताबडतोब निघालो. तिची ती दुसरी गर्भधारणा होती. पहिली मुलगी होती. पहिलं बाळंतपण नॉर्मल झाल्यामुळे या वेळेसदेखील नॉर्मलची वाट पाहणं चालू होतं. तिला भरपूर कळा येत होत्या, पण बाळ खाली सरकत नव्हतं. लेबर रूममध्ये तिची सासूदेखील उभी होती. आपल्या सुनेला धीर देत होती. मी तपासून पाहिलं तेव्हा बाळाच्या ह्रदयाचे ठोके कमी कमी होत होते. नॉर्मल डिलिव्हरीची वाट पाहावी तर गुदमरलेल्या अवस्थेत बाळ बाहेर येईल असं वाटत होतं. या अवस्थेत ‘सिझर’ करणंदेखील सोपं नव्हतं. डिलिव्हरी नॉर्मल होईल का नाही, जन्मलेले बाळ व्यवस्थित रडेल का नाही, समजा लवकर रडलं नाही तर काय करायचं या विवंचनेत आम्ही होतो. बाळाच्या जिवाचं काही बरं-वाईट झालं तर नातेवाईक आपल्यालाच दोष देतील. बाळाचा श्वास गुदमरल्यामुळे बाळाच्या जिवाला धोका असतो आणि बऱ्याच वेळेस लगेचचा धोका टळला तरी बाळ मतिमंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही ‘सिझर’ करण्याचीदेखील तयारी करून ठेवली होती. या सर्व टेन्शनमध्ये आम्ही सगळे होतो. तेवढय़ात कळांचा जोर वाढला, तिनेदेखील योग्य ते सहकार्य केले. प्रसूती व्यवस्थित झाली आणि बाळ खणखणीत रडलंदेखील.
त्या स्त्रीची सासू जी आतापर्यंत आमच्या आणि सुनेच्या जिवाची घालमेल जवळून बघत होती, ती एकदम म्हणाली, ‘‘कार्टीच झाली!’’ आणि लेबररूम सोडून तरातरा बाहेर निघून गेली. बाळंतपणात अर्धमेली झालेल्या सुनेला ना तिला आधार द्यावासा वाटला ना तिची काळजी वाटली. मुलगा असो वा मुलगी, ते बाळ सुखरूप असावं ही आमची धडपड, आमच्या मनावर असलेल्या ताणाची कल्पना त्या सासूला येणं अशक्य होतं. तिला फक्त मुलगा हवा होता, बाकी कोणत्याही गोष्टी तिच्या गावी नव्हत्या. या मानसिकतेचं खरंच काय करायचं हा प्रश्नच आहे.
या घटनेपेक्षाही अस्वस्थ करणारी ही एक कहाणी. एक ५० वर्षीय गृहस्थ, गावातली बडी असामी. विशेष शिक्षण नसलेल्या या गृहस्थाला दोन मुलीनंतर एक मुलगा झाला. दोन्ही मुलींची लग्ने झालेली. मुलासाठी मुली पाहणं चालू असतानाच त्या एकुलत्या एका मुलाचा दुर्दैवाने अपघातात मृत्यू झाला. बायकोचं गर्भाशयाचं ऑपरेशन झालेलं. इस्टेट भरपूर, पण वारस नाही. ५० वर्षांपेक्षा वयाने जास्त असलेल्या त्याने २१ वष्रे वयाच्या मुलीशी दुसरं लग्न केलं. लग्न होऊन सहा महिने झाले तरी मूलबाळ होत नाही म्हणून मोठी बायको लहान बायकोला माझ्याकडे दवाखान्यात घेऊन आली. सुरुवातीला तर वाटलं ती सुनेलाच घेऊन आली आहे. नंतर बोलण्यातून कळलं की तिची सवत आहे. मी विचारलं, तुमच्या ह्य़ांनी दुसरं लग्न कसं काय केलं? मोठय़ा बायकोचं उत्तर, ‘‘काय करणार? मुलगा गेला, माझं गर्भपिशवीचं ऑपरेशन झालेलं. मी तर आता मुलगा देऊ शकत नाही. मग मीच म्हणाले करा दुसरं लग्न. त्यांची तरी काय चूक?’’ दुसरी बायको यथावकाश गर्भवती राहीलदेखील, पण तिच्या पोटी मुलगाच जन्माला येईल याचा काय नेम? अजून एखादी मुलगीच झाली तर? या गोष्टींचा विचारच नाही?
मोठी बायको लहान सवतीशी प्रेमाने बोलत होती. ती नवी नवरी मात्र गप्प होती. ती म्हणजे न शिकलेली, गरीब घरची मुलगी. तिच्या आईबापाला सहा मुलीच, त्यातील एक मुलगी श्रीमंताच्या घरी जात आहे यातच त्यांना आनंद. ‘‘श्रीमंताच्या घरी काय कमी हाय? समदं हाय, अन् शेतावरबी कामाला जावं लागत न्हाय! बस्स. ’’ मुलीचं लग्न श्रीमंताच्या घरी झालं म्हणून आईबाप खूश. श्रीमंताचं दुसरं लग्न झालं म्हणून पहिली बायको खूश. मुलगा होईल व तो इस्टेटीचा वारस होईल यासाठी वयानं दुप्पट मोठय़ा माणसाशी लग्न करून आरामात राहायला मिळेल म्हणून नवी नवरी पण तयार. मुलगाच पाहिजे यासाठी केवढा हा अट्टहास! मुलाच्या हव्यासापोटी काय हे स्त्रियांचं जीवन!
हे आहेत प्रातिनिधिक अनुभव. असे सातत्याने येत असतात. वाचकांसोबत असे अनुभव ‘शेअर’ करण्याचा उद्देश असा की समाजात मुलाच्या हव्यासापोटी ग्रासलेल्या अशा विचारसरणीमागे पुरुष तर आहेतच, पण स्त्रियांदेखील आहेत. कधी बदलणार ही परिस्थिती ?
सर्वसाधारणपणे पहिल्यांदा मुलगा झाला की सर्वच जण सुटकेचा निश्वास सोडतात. पहिला मुलगा झाला ना आता नंतर काहीही होवो असं बोलतात. पहिल्या वेळेस आवर्जून मुलगीच व्हावी अशी इच्छा असणारी जोडपी नाहीतच असं नाही, पण प्रमाण अत्यंत अल्प आहे. पहिल्या मुलीला- पहिली बेटी, धनाची पेटी किंवा पहिली बेटी, तूप रोटी, असं मनापासून वाटणारे कधी तरी भेटतात, नेहमी नाही. अलीकडच्या काही वर्षांत मला पहिली मुलगी झालेली आवडेल किंवा मला मुलगीच पाहिजे असं म्हणणाऱ्यांना जेव्हा मी, का बरं? मुलगा का नको असं विचारल्यानंतर मुलगा-मुलगी आजकाल समान आहेत, मला मुलगीच आवडते अशी उत्तरं मिळतात. यातून मुलाचा हव्यास भविष्यात कमी होईल, असे काही संकेत मिळतात.
आपलं कुटुंब छोटं असावं, याचं महत्त्व फक्त शहरातील सुशिक्षित लोकांना पटलंय असं नाही. तर खेडय़ातील अशिक्षित अडाणी लोकंदेखील अपत्य संख्या मर्यादित ठेवताना पाहून समाधान वाटतं. पण आपल्याला किमान एक तरी मुलगा असायला पाहिजे, या मानसिकतेतून फारशी कोणाची सुटका झालेली नाही, असं मला माझ्या अनुभवातून जाणवतं. मुलगा असो वा मुलगी, निसर्गाने आपल्याला जे काही दिलं आहे, त्याचा आनंदाने स्वीकार करण्याची सवय लोकांच्या मनाला लागण्यासाठी विविध आघाडय़ांवर वेगवेगळया पद्धतीने अनेकांच्या सहभागाने निराश न होता भगीरथ प्रयत्न सातत्याने केले गेले पाहिजेत. अन्यथा शिवाजी जन्माला आला तर पाहिजे पण दुसऱ्याच्या घरी. तसं मुलगी जन्माला तर आली पाहिजे, पण ती दुसऱ्याच्या घरी या अवस्थेतून बाहेर पडणं कठीण.
ूँं३४१ंल्लॠ@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा