‘सारिकाला वाटतंय की मी इम्पोटंट, नपुंसक आहे.’ तीस वर्षांचा जयेश शांतपणे मला सांगत होता. सत्तावीस वर्षांची त्याची बायको सारिका त्याच्या शेजारीच बसलेली होती. त्यांच्या लग्नाला एक महिना होत होता. ‘सर, मला तसं काही वाटत नाही पण तरी मला चेक अप करायचा आहे. सारिकाची त्यामुळे खात्री होईल.’जयेशने सारिकासमोरच माझ्याकडे त्यांच्या येण्यामागचा हेतू सांगितला.
मी सारिकाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. सारिकाने लगेचच मला ‘हो सर’ म्हणून ‘मम’ म्हणत जयेशच्या बोलण्याला दुजोरा दिला.
‘तुला असं का वाटतंय?’ मी सारिकाला विचारले.
‘सर, गेल्या एक महिन्यात जयेशला एकदाही व्यवस्थित संबंध करता आला नाही. त्याची उत्तेजना ही लगेचच नष्ट होते म्हणून मला असं वाटतंय.’ सारिकाने अगदी स्पष्टपणे मला सांगितले.
मी विचार करू लागलो, पंचवीस वर्षांपूर्वी आमच्या काळातील कुठल्याही नवविवाहितेने इतक्या स्पष्टपणे असे नवऱ्याला, डॉक्टरला सांगितले असते का? किंबहुना सेक्सबद्दल असा विचार तरी केला असता का? काळ बदला आहे, पिढी बदलत आहे हे लगेचच लक्षात येते.
‘जयेश, तुला काय वाटतंय? तुला काय प्रॉब्लेम जाणवतोय?’ मी.
‘सर, सारिका म्हणते ते खरे आहे. आम्ही बरेच वेळा प्रयत्न करूनही मला संबंध करायला जमला नाही. प्रत्येक वेळी माझी उत्तेजनाच ऐन मोक्याच्या वेळी जाते. मला काही कारण कळले नाही. पण मला वाटते की मी इम्पोटंट नाहीये.’ जयेश मला सांगत होता.
‘‘आता आम्ही इम्पोटन्स हा शब्द वैद्यकीय क्षेत्रात वापरणे बंद केले आहे बरं का. त्या ऐवजी इरेक्टाइल डिस्फन्क्शन म्हणतो. जास्त योग्य, स्पेसिफिक.’’ मी सांगितले. नंतर जयेशची लैंगिक तपासणी करून मी दोघांनाही सांगितले, ‘हे बघा, हा इरेक्टाइल डिस्फन्क्शनचा नव्हे तर ‘अन्कन्झमेशन’चा प्रॉब्लेम आहे.’
दोघांनीही या नवीन शब्दाने बुचकळय़ात टाकले. त्यांची उत्सुकता अधिक न ताणता मी या ‘अन्कन्झमेशन’ विषयी त्यांना सांगू लागलो.
‘अन्कन्झमेशन’ म्हणजे नवरा-बायकोमध्ये वैवाहिक संबंध म्हणजेच शारीरिक संबंध प्रस्थापित न होणे. त्यांच्यात नातंच बनलेलं नसणे. हा प्रॉब्लेम सातत्याने जाणवत असेल तर कायद्यानेही तो विवाह, ‘शून्य विवाह’ मानला जाऊन रद्द होऊ शकतो. याचे कारण लग्न या संस्थेची व्याख्याच मुळी ‘कायद्याने आणि समाजाने त्या दोन व्यक्तींच्या कामजीवनाला दिलेली मान्यता.’ अशी आहे. कारण विवाहसंस्था ही मुळातच कुटुंबसंस्था व्यवस्थितपणे सुरू राहण्यासाठी स्थापन केली गेली. म्हणजे औरस वारसदार असावेत म्हणूनच. त्यासाठीच कामजीवन अर्थात् सेक्स हा वैवाहिक जीवनाचा पाया बनला. तीच गोष्ट जर घडली नसेल व घडतही नसेल तर तो ‘शून्य विवाह’ होतो.
दुसरी केस. रमेशराव समोर चिंताग्रस्त होऊन बसले होते. मला सांगत होते की त्यांच्या मुलीचे लग्न होऊन केवळ दोनच आठवडे झाले होते आणि नवऱ्याला ‘काहीही’ जमत नाही असे सांगत नाते तोडून मुलगी घरी आली होती. परत जाणार नाही, असे आईबाबांना ठामपणे सांगत. मुलगी पंचवीस वर्षांची तर तिचा नवरा अठ्ठावीस वयाचा. भरीस भर मुलीच्या आईनेही ‘जाऊ दे बाळ, अशा नवऱ्यापेक्षा आपण दुसरे स्थळ बघू या. लग्नाच्या खर्चापेक्षा (जो चार-पाच लाखांत झाल्याचे रमेशरावांनी मला सांगितले.) तुझे आयुष्य महत्त्वाचे आहे बाई!’ म्हणत मुलीला अनुमोदनच दिले. रमेशरावांना हे काही पटत नव्हते म्हणून माझा सल्ला घ्यायला ते आले होते.
केस होती अन्कन्झमेशनची. न बनलेल्या नात्याची. पती-पत्नीच्या सहकार्याने पूर्णपणे सुटणारी. पण त्यांच्या ‘स्मार्ट’ मुलीला, मुलामध्ये असा प्रॉब्लेम येतोच कसा? तो पुरुषच नाही, वगरे कल्पना ठामपणे रुजल्या होत्या. त्यात रमेशरावांच्या बायकोने मुलीसमोरच त्यांना ‘नाहीतर काय. असा कधी प्रॉब्लेम असतो का? आपल्याला कधी आपल्या वेळी जाणवला नाही तो! हो की नाही हो?’ असे म्हणत रमेशरावांनाच जज्ज केले. (बिचाऱ्या रमेशरावांना त्यांची हनिमूनची फजिती आठवली. पहिल्यांदा त्यांना नीट जमायला दोन महिने लागले होते! बायको हे विसरली की काय? हुश्श! मुलीसमोर इज्जत वाचली! हे सर्व त्यांनीच मला सांगितले). पण मुलगी हट्टी होती. शेवटी घटस्फोटाकडेच वळली, हे नंतर मला कळले. सगळय़ात विशेष म्हणजे नंतर रमेशरावांच्या जावयाने एकटय़ाने येऊन त्याचा प्रॉब्लेम कसा घालवायचा याचे माझ्याकडे ‘शिक्षण’ घेतले, दुसरे लग्न तरी नीट टिकावे म्हणून!
एक अशीच केस सांगतो. एक देशमुखकाका त्यांच्या तीस वर्षांच्या पुतण्याला, अशोकला घेऊन माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितले, अशोकचा नुकताच घटस्फोट झाला होता. त्याच्या बायकोने त्याच्यावर तो पुरुष नाही असा आरोप केला होता. कोर्टात तो आरोप ग्राहय़ धरून तिला विवाहमुक्त केले होते. त्या कलंकाने अशोकच्या वडिलांच्या पश्चात त्याचा सांभाळ करणारे काका निराश झाले होते. ते प्रकरण निस्तरण्यात लाखो रुपये लागले ते वेगळेच. माझ्याकडे येण्याचा उद्देश अशोकची तपासणी करून तो पुन्हा लग्न करण्यास सक्षम आहे का हे विचारणे, हाच होता.
तपासणी करून व त्याच्या वीर्याचा नुकताच केलेला रिपोर्ट बघून अशोक त्याचे पुढचे लग्न योग्य मार्गदर्शन केल्यास निश्चितच यशस्वी करू शकेल, असे माझे मत त्यांना सांगताच अशोकचे काका खूश झाले व अशोकचा चेहराही खुलला. वीर्यपतन होणे म्हणजे त्या पुरुषाच्या िलगात संभोगक्षम ताठरता येते असे मानायला काहीच हरकत नसते. वीर्याचा रिपोर्टही नॉर्मल होता म्हणजेच अशोकची प्रजननक्षमताही व्यवस्थित होती. गंमत म्हणजे अशोकने विवाहपूर्व सेक्सथेरपीचे सेशन्स करून दुसरे लग्न करायचा त्याचा आत्मविश्वास वाढवला. दुसरे लग्नही काही महिन्यांनी केले आणि त्या दोघांनी विवाहोत्तरही ‘हनिमून मार्गदर्शन’ घेतले. ज्या समस्येसाठी त्याचा पहिला घटस्फोट झाला होता आणि त्याच्या पुरुषत्वावर डाग लागला होता ती समस्या पूर्ण घालवून त्याने यशस्वीपणे त्याचे वैवाहिक जीवन सुरू केले. त्याच्या नवीन बायकोला त्याच्यावर लागलेला डाग माहीत होता परंतु तिच्या आत्ताच्या अनुभवातून तिची खात्री पटली होती की अशोकला आता तरी कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि तेव्हाही असा काही प्रॉब्लेम असेल यावर तिचा विश्वास बसत नव्हता. गरज होती ती योग्य मार्गदर्शनाची, ज्यामुळे अशा समस्या निश्चितच सोडवता येतात.
वैद्यकीय क्षेत्रात ‘सेक्सॉलॉजी’च्या उदयाने व विकासाने आता ही समस्या वैद्यकीय समस्या मानून सोडवता येऊ शकते हे सर्वानीच (नवविवाहितांनी, त्यांच्या पालकांनी, डॉक्टरांनी आणि कायदेपंडितांनी सुद्धा) लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे अशा कारणांसाठी न्यायालयाकडे धाव न घेता योग्य तज्ज्ञाकडून ती सोडवता येऊ शकते हे ध्यानात घेतले पाहिजे. जसे धाडस जयेश-सारिका यांनी दाखवले.
जयेश आणि सारिका केसमधेही समस्या अन्कन्झमेशनची असूनही त्याला ‘इम्पोटन्स’चे लेबल लावून बघितले जात होते. पस्तिशीच्या अगोदरचे निव्र्यसनी (विशेषत: तंबाखू, सिगारेट, गुटखा, दारू यापासून लांब असणारे) पुरुषांमध्ये िलगाच्या ताठरतेच्या समस्या इम्पोटन्स म्हणून बघणे हे बरोबर नाही असे मी मानतो. याचे कारण या वयात संबंधांच्या वेळी येणारी िलगताठरतेची समस्या ही दोन गोष्टींमुळे जास्त अनुभवाला येते, एक कार्यचिंता (परफॉर्मन्स अॅन्झायटी) आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लैंगिक संबंधाविषयीचे अज्ञान (सेक्शुअल इग्नरन्स).
या गोष्टींमुळे कामसंबंधाच्या वेळी त्या पुरुषाचा व संबंधित स्त्रीचाही सेक्सचा प्रतिसाद नीटपणे विकसितच होत नाही. पुन:पुन्हा असा अपयशाचा अनुभव येत गेला तर त्या पुरुषाला अपयशाची भीती (फियर ऑफ फेल्युअर) वाटून त्याचा लैंगिक आत्मविश्वास (सेक्शुअल कॉन्फिडन्स) पूर्णपणे ढासळतो. िलगताठरता व्यवस्थित आणायची व ती टिकवायची सेक्सथेरपीतील तंत्रे तरुणांना सहज आत्मसात करता येऊ शकतात व त्यामुळे ही समस्या सोडवता येऊ शकते.
स्त्रीचा सेक्सचा प्रतिसाद नीट विकसित झाला नाही तर तिचे ओटीपोटातील सेक्सचे स्नायू घट्ट होत असल्याने निर्माण होणारी व्हजायनिस्मसची समस्या आणि बाहेरील ‘फोरशे त्वचेचा’ अडथळा वारंवार येऊन (हायमेन, योनीपटल नाही!) िलगात आलेली ताठरता संबंध करायच्या वेळी नष्ट होऊ शकते. मग सतत असा अनुभव आल्यास त्या पुरुषाचा आत्मविश्वासच ढासळतो. म्हणूनच याला इम्पोटन्स, इरेक्टाइल डिस्फन्क्शन म्हणू नये. मात्र तंबाखू, स्मोकिंग, दारू या व्यसनांना बळी पडलेली व्यक्ती असेल तर मात्र इरेक्टाइल डिस्फन्क्शनची केस होऊ शकते, ते सुद्धा त्या तरुणाची संपूर्ण लैंगिक व वीर्य तपासणी केल्यानंतर कळते.
मुळात समस्येबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. पती-पत्नी दोघांचेही सहकार्य अनिवार्य आहे आणि ज्या लग्नाला आपण संमती दिली होती ते लग्न टिकेल कसे हे त्या दोघांच्याही आई-वडिलांनी बघणे आवश्यक आहे. कायदासुद्धा लग्न मोडण्यापेक्षा ते टिकावे म्हणून वेळ देत असतो, समुपदेशन करत असतो.
थोडक्यात, अन्कन्झमेशन ही वैद्यकीय समस्या असून घटस्फोट हे त्याच्यावर उत्तर नाही. सेक्सथेरपी आणि हनिमून काउन्सेिलग हाच त्यावर मार्ग असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा