सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
हा कट्टा आहे मुलांचा. मुलांच्या या गप्पांतून त्यांचं जगणं, त्यांचे विचार, त्यांच्या चिंता, त्यांची स्वप्न उलगडत जाणार आहेत. या गप्पांच्या निमित्ताने पालक म्हणून आपल्यालाही डोकावता येईल आपल्या मुलांच्या जगात. मुलांना समजून घ्यायला त्याचा नक्कीच हातभार लागेल. म्हणूनच हे सदर दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी..
नमस्कार, या सदरात आपण भेटणार आहोत आपल्या बालदोस्तांना. त्यांचं म्हणणं समजून घेण्यासाठी.. ही मुलं जी आपल्याला अनेक गोष्टी भरभरून देत असतात. त्यांना मोठं करताना आपणही मोठे होत जातो. शिकत, शहाणे होत जातो. अडचण आलीच तर मार्गदर्शनपर पुस्तकं वाचतो. आपले मित्र, समवयस्क यांच्याशी चर्चा करतो. कधी शाळेतल्या शिक्षकांना भेटतो. बालक-पालक केंद्र, समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ यांचा सल्ला हा असतो आपला शेवटचा आधार. पण मुलांना जाणून घेणं हा असतो खरा उपाय.
काही पालक मुलांबरोबर मोकळेपणानं वागतात, बोलतात. पण अनेकदा वयाचं, नात्याचं अंतर राहतंच. मुलं व्यक्त होतातच असं नाही. काही वेळा त्यांना जे सांगायचं असतं ते नेमकेपणानं मांडता येतच असं नाही. त्यांचं मन जर आपल्याला वाचता आलं तर आपलं काम सोपं होईल. आपली आणि त्यांची सुखी, संपन्न वैभवशाली भविष्याची स्वप्नं साकारायला मदत होईल. म्हणूनच आज आपण भेटणार आहोत मुंबईतल्या विलेपार्ले येथील मुलांना. वेगवेगळ्या शाळांत जाणारी, माध्यमात शिकणारी पण एकाच हौसिंग कॉलनीत राहणारी ही मुलं. यश, अलय, ऋचा, आभा, साक्षी, ऋतुजा, सई, शाल्मली, आर्यन. इयत्ता दुसरी ते दहावी अशा वेगवेगळ्या इयत्तात शिकणारी. यांचे पालक सुज्ञ, सुशिक्षित, आईबाबा दोघेही नोकरी-व्यवसाय करणारे. एक भलं मोठं एकत्र कुटुंब असावं अशा रीतीने गेली ४० वर्षे एकत्र एका कॉलनीमध्ये राहणारी ही मंडळी.
आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांची शाळा, शाळेतल्या बाई, घर, छंद, मित्र या पेक्षा आमच्या गप्पा रंगल्या अगदीच वेगळ्या अशा अनपेक्षित विषयावर. इमारतीची पुनर्बाधणी! सर्वाच्या मनात एकच प्रश्न ‘आमच्या घरच्या मोठय़ा माणसांना झालंय काय?’ कारण या मुलांच्या मते ‘अहो, घर लागतं कशाला? जेवायला आणि झोपायला! आम्ही घरी असतो ते केवळ याच दोन कारणांसाठी. सकाळपासून शाळा, क्लास, खेळ यातच दिवस संपतो. काही महिन्यांपूर्वी रात्रीचं जेवण तरी आम्ही एकत्र घ्यायचो. गप्पा मारायचो. पण आता.. बाबा ऑफिसमधून घरी आले की तडक सोसायटीचं ऑफिस गाठतात. घरातले आई-बाबा, मोठी माणसं, नातेवाईक कोणी भेटलं की हाच विषय रंगतो. वाढीव जागा, बिल्डर असं काहीबाही बोलत राहतात. पण आम्हाला कोणी विचारातच घेत नाही..
यश म्हणाला, ‘‘आम्ही पण गोंधळलो आहोत. कधी कधी खेळायचं विसरून आम्ही पण चर्चा करतो. गप्पा मारता मारता एकदम सीरियस होतो. आमचं हे खेळायचं ग्राऊंड जाईल. लपायच्या जागा गायब होतील. टाक्यांवरून उडय़ा मारताना येणारी मजा संपेल. क्रिकेट बाद होईल. बाग उद्ध्वस्त होईल. त्याहीपेक्षा महत्त्वाचं आमचे शेजारी तेच राहतील का? आमची मित्रमंडळी कुठे दुसरीकडे नाही ना जाणार? आता जसं आम्ही केव्हाही, कुठेही, कोणाच्या घरी जाऊ शकतो, खाऊ खाऊ शकतो, ते कसं जमणार. व्हरांडय़ात उभं राहून समोरच्या इमारतीतील मित्रांशी साइन लँग्वेजनं गप्पा मारता येतील का? ’’ .. खूप खूप प्रश्न पडलेत या मुलांना, पण कुणाशी बोलणार, त्यामुळे सध्या तरी सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत..
बोलता बोलता साहजिकच मुलांची गाडी घसरली पालकांवर. ‘आई-बाबा म्हणजे ना..’ या सुरात सुरू झालेल्या या गप्पा तक्रारीच्याच होत्या. या मुलांची अपेक्षा असते पालकांनी शाळेत यावं, शिक्षकांशी बोलावं, पालक सभेत मुद्दे मांडावेत. पण तसं होत नाही. त्यांना भीती वाटते. ‘नको, बाई रागावल्या, तुझ्यावर डूख धरला, तुला शिक्षा केली, घरी बसवलं, रस्टिकेट केलं तर!’ असं तेच सांगतात आणि मग आमचीच ढाल करतात. सांगतात, ‘बाईंना सांग..’ म्हणजे स्वत: पळपुटेपणा करतातच, पण आम्हालाही नको त्या गोष्टींची भीती दाखवत बावळट, पळपुटे बनवतात आणि अपेक्षा धरतात. आम्ही निर्भय, निडर व्हावं..!
दहावीत असणारी ऋचा म्हणाली, ‘‘आता हेच बघाना. टिकूजीनीवाडी हे शाळेची सहल नेण्याचं ठिकाण नाही. हे आईचं स्पष्ट मत. शाळेत येऊन तिने तिचा मुद्दा स्पष्टपणे मांडायला हवा होता. पण तसं झालं नाही. तिनं माझ्या फॉर्मवर सही करायला आणि सहलीला पाठवायला मात्र नकार दिला. मला सतत दोन-तीन दिवस प्रबोधन चाललं होतं. मी बोअर होईपर्यंत! खरं तर मला सहल कुठे जाते यापेक्षा एक दिवस अभ्यासातून सुटका, मित्रमैत्रिणींच्या बरोबर फक्त धम्माल, मस्ती, असं वाटत होतं. एरवी मी आई-बाबांशी वाद घालत नाही. म्हणून वाटलं होतं.. शेवटी मी माझं अस्त्र वापरलं. घरात अबोला धरला, अन्नाचा सत्याग्रह केला. तेव्हा मात्र मात्रा बरोबर लागू पडली. आईनं सकाळीच सही केलेला फॉर्म आणि पैसे माझ्या हातात ठेवले. हेच जर तिनं आधी केलं असतं तर? नाही म्हणजे तत्त्व, तुमचे विचार इ.इ. योग्य असतं, पण ते किती ताणायचे? ’’ ती इतरांकडे पाहून आपल्या वाक्याची पुष्टी करून घेत होती.
‘‘माझ्या मल्लखांबचं असंच झालं.’’ आर्यन सांगायला लागला. ‘‘आईनं माझं नाव व्यायामशाळेत घातलं. मी खूश. आता नवे मित्र भेटणार होते. मी आवडीनं जात होतो. मध्येच आम्ही गावी गेलो. तिथल्या भावंडाकडून झाडावर चढणं, वरून उडय़ा मारणं मी शिकलो. धम्माल! वेळेचं भान राहायचं नाही. आईनं मात्र या साऱ्यावरून वेगळाच अर्थ घेतला. परत आल्यावर व्यायामशाळेतल्या सरांना म्हणाली, याला मल्लखांब शिकवा. मला त्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. पण आईच्या हट्टासमोर काही चालेना. आईला वाटत होतं रुळेल हळूहळू. सहा महिने झाले. प्रात्यक्षिकं झाली. मी मल्लखांबाचा डेमो केला. सगळ्यांनी खूप दाद दिली. आईच्या डोळ्यात तर पाणीच आलं. मात्र घरी आल्यावर मी जाहीर केलं, बस्स इतके दिवस मी तुला वाईट वाटू नये म्हणून मल्लखांब..’’ माझं वाक्य पूर्ण होण्यापूर्वी आईनं मला जवळ घेतलं म्हणाली, ‘ओके..’ तिच्या समाधानासाठीच फक्त मी मला फारसं आवडत नसताना केलं. पण अखेर तिला कळलं ते. त्याच्याच बोलण्याचा धागा पकडत आभा सांगू लागली. ‘‘माझा अनुभवही थोडा वेगळा आहे. माझ्या आईनं माझ्याशी वाद घातला नाही. माझा निर्णय माझ्यावर सोपवला. आणि पटवून दिलं की मोठय़ांचे अनुभवाचे बोल खरंच महत्त्वाचे असतात. मी फ्रेंच शिकत होते. नंतर मला वाटलं जर्मनपण शिकावं. आईचा मी जास्त भाषा शिकण्यावर आक्षेप नव्हता तर मी (इयत्ता ८ वी) सर्व वेळा कशा सांभाळणार हा प्रश्न होता. दोन टर्मच वेळेची कसरत केल्यावर मीच जर्मनचा नाद सोडला आणि आईनं पण मौन बाळगलं. पण काही पालकच मुलांना.. उदा. माझी मैत्रीण सकाळी ९.३० वाजता डबे घेऊन बाहेर पडते. हा क्लास तो क्लास करत बिचारी रात्री ८ ला घरी पोहोचते. खेळणं, गप्पा मारणं पण ती विसरली आहे.’’ आभाला सांगितल्याशिवाय राहावलं नाही.
मुलं म्हटली की क्लासेसचा विषय अपरिहार्य. त्यांच्यापैकी काहीजण अभ्यासाच्या क्लासला जात होते काही नाही. कोणी नृत्य, संगीत, तबलावादन असं काही करत होती. सई सांगू लागली, ‘बाई क्लास आमची नाही, आमच्या पालकांची आणि शिक्षकांची गरज आहे.’ माझ्या चेहेऱ्यावरचं आश्चर्य पाहातच ती म्हणाली, ‘‘म्हणजे असं बघा आई-बाबांना कामाला जायचं असतं, आमचा अभ्यास घ्यायला वेळ नसतो म्हणून त्यांना क्लासला पाठवायचं असतं.’ श्लाल्मली म्हणाली,‘‘काही आईबाबा तर वेगळ्याच गोष्टी, स्टेट्सच्या गोष्टी आधी बघतात. क्लासची जागा, तो एसी आहे की नॉन एसी. तिथे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन होतं का, फी किती असते असं बरंच काही. शाळेत बाईपण विचारतात क्लासला कोण कोण जातं? वगैरे. खरंतर दोन्हीकडे तेच शिकवतात. पुस्तकं काय आम्हाला वाचूनही समजू शकतं. आम्हाला हवं असतं पुस्तकाच्या बाहेरचं. मग आम्ही वाचनालयात जातो. इंटरनेट वापरतो. मग घरी आणि क्लासमध्येपण बोअर होतं.’’ तिच्या म्हणण्याला दुजोरा देत अलय म्हणाला, ‘‘वर्गात आम्ही चक्क मागे, बाकाखाली वह्य़ा ठेवून गंमतजंमत करतो. डबा खातो. बाई काही लक्षच देत नाहीत. पण परीक्षेत नेमकं पुस्तकातलं उत्तर आम्ही जरा वेगळं लिहिलं तर मार्क कापतात आणि काही वेळा मात्र कॉमेंट करतात. आम्हाला वेगळा विचार करता येत नाही म्हणून.’’ अलय हेही सांगतो की म्हणून मला शाळेत जायचाच कंटाळा येतो. शाळेत जाण्यापूर्वी तो वेगवेगळ्या विचित्र तक्रारी करतो. माझे केस खेचले जाताहेत. नखांना कंप सुटलाय, पायात वेदना होताहेत. हात जड झालाय. त्याच्या वह्य़ा-पुस्तकं तर कायम गायब झालेली असतात (!) तर मिहीर शाळेच्या अनुपस्थितीचा विचार न करता वेगवेगळे कॅम्प्स, स्पर्धा यातच वेळ घालवतो. या सगळ्यांची एक कॉमन तक्रार म्हणजे, आजचे शिक्षक हे खूप बोअर वाटतात. अभ्यासात काही चॅलेंज नाही की अॅक्टिव्हिटी नाही जाणवत..’’
मुलांशी न थांबणाऱ्या गप्पा सुरू होत्या.. त्यांच्याशी बोलताना मला जाणवत गेलं. मुलांनाही त्यांचे त्यांचे प्रश्न आहेत, चिंता आहेत. पालक म्हणून आपण त्यांच्या जगात शिरायला हवं. काही घरात पालक खूपच समजूतदार झालेले आहेत. किमान सुशिक्षित घरात तरी, अर्थात हे अर्धसत्य आहे याची मला जाणीव आहे.
आई-बाबा म्हणजे ना…
हा कट्टा आहे मुलांचा. मुलांच्या या गप्पांतून त्यांचं जगणं, त्यांचे विचार, त्यांच्या चिंता, त्यांची स्वप्न उलगडत जाणार आहेत. या गप्पांच्या निमित्ताने पालक म्हणून आपल्यालाही डोकावता येईल आपल्या मुलांच्या जगात. मुलांना समजून घ्यायला त्याचा नक्कीच हातभार लागेल. म्हणूनच हे सदर दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी...
आणखी वाचा
First published on: 12-01-2013 at 01:07 IST
मराठीतील सर्व कट्टा मुलांचा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Understand your kids mind