समाजाच्या अपेक्षांनुसार किंवा ठरावीक मानदंडांनुसार आपण वागतो, पण व्यक्तिमत्त्व विकार असणाऱ्या व्यक्तींना नेमकं हेच जमत नाही. ‘पॅरॉनॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ हा असाच एक व्यक्तिमत्त्व विकार, ज्यात ‘ती वा तो असं का वागतो?’ याविषयी सामान्यांना प्रश्न पडतो. सतत कुणावर तरी संशय किंवा जग आपल्या विरोधातच आहे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते आणि ते सतत चिडचिड करत नेहमीच खूप तणावात आणि रागात असतात. या विकाराविषयी…
याआधीच्या (६ जुलै) लेखात म्हटल्याप्रमाणे व्यक्तिमत्त्व घडत असताना काही विकार स्वभावात येऊ शकतात आणि त्यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर ते व्यक्तिमत्त्व विकारात बदलू शकतात. परंतु या विकारांविषयी माहिती घेताना, त्याविषयी वाचताना, आपल्या मनात माझ्यातही हे लक्षण आहे का? मी पण असं वागतो का? असं वाटण्याची दाट शक्यता असते. कारण ही लक्षणं काही वेगळीच असतील असं नाही. क्वचित प्रसंगी काही ठराविक प्रसंगात आपल्यातही ही लक्षणे दिसू शकतील, पण आपण वेळीच त्याला आवर घालतो. समाजाच्या अपेक्षांनुसार किंवा ठराविक मानदंडांनुसार माणूस वागतो. पण व्यक्तिमत्त्व विकार असणाऱ्या व्यक्तींना नेमकं हेच जमत नाही.
या विकारांचे वर्णन करणारे एक अचूक वाक्य सांगण्यात येतं, it’ s about the whole fabric it’ s not about one thread. ही लक्षणे व्यक्तिमत्त्व व्यापून टाकतात. दुसरं म्हणजे वाचकांच्या या आधीच्या लेखाला आलेल्या प्रतिक्रियेनुसार, एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. DSM -५ (Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders) नुसार सांगण्यात आलेल्या दहा व्यक्तिमत्त्व विकारांची आपण येथे माहिती घेणार आहोत. इतर मानसिक आजारांवर चर्चा करणे इथे संयुक्तिक ठरणार नाही. DSM-५ मध्ये दहा विकार लक्षणांनुसार तीन विभागांत विभागले आहेत. cluster a, cluster b, cluster c. त्यापैकी cluster a हे विक्षिप्त आणि विचित्र लक्षणांचा समूह असणाऱ्या व्यक्तिमत्त्व विकारांचा विभाग आहे.
हेही वाचा…गर्दीच्या गारुडात गारद विवेक
सुषमा, तिचा नवरा उमेश आणि मुलांबरोबर पुण्यातल्या एका कॉलनीत राहायची. इथे राहायला येऊनसुद्धा त्यांना बारा वर्षं होत आली होती. सुषमाचं सततच कोणाना कोणाबरोबर खटकायचं, पण छोटी कॉलनी होती. त्यामुळे शक्यतो सगळे एकत्र असावेत म्हणून शेजारपाजारी तिला सांभाळून घ्यायचे. अशातच केदार आणि निशा हे जोडपं आपल्या दोन दहा वर्षांच्या जुळ्या मुलांसोबत त्याच कॉलनीत राहायला आले. त्यांचे घर सुषमाच्या घराला लागूनच होतं. एकदा दुपारच्या वेळी निशा झोपली असताना दोन्ही मुलं घराबाहेरच्या अंगणात क्रिकेट खेळायला गेली. भांडणांशिवाय खेळ कुठला पुरा व्हायला! दोघांची चांगलीच जुंपली. शेवटी निशाच्या मध्यस्थीनं आधी भांडण आणि नंतर खेळही संपला. या सगळ्या भानगडीत शेजारी राहणाऱ्या सुषमाची झोप मोडली. तिला एरवीही मुले खेळायला लागली, अगदी संध्याकाळी खेळायला लागली तरी विनाकारणच असं वाटत राहायचं की, तिचे शेजारी तिला त्रास देण्यासाठी मुद्दाम मुलांना बाहेर खेळायला पाठवतात. पण निशा किंवा इतर शेजाऱ्यांशी त्याविषयी मोकळेपणाने बोलण्याऐवजी तिनं त्यांच्या विरोधात वागायला सुरुवात केली.
पुढे निशाला इतर शेजाऱ्यांकडून कळलं की, सुषमाची अशी ठाम समजूत आहे की, सगळेच शेजारी तिला त्रास देण्यासाठी हे सगळं करत आहेत. तिनं स्वत:च इतरांशी बोलणं बंद केलं आणि अर्थातच नवरा आणि मुलांनाही तिनं कोणाशीही बोलायला बंदी केली होती. सुषमाला उमेशनं समजावून सांगायचा प्रयत्न केला की, ‘अगं, सुट्टीत मुलं घरासमोर नाही खेळणार तर कुठे खेळणार? पण हो, दुपारच्या विश्रांतीच्या वेळेला ते गोंधळ करत असतील तर मग मी बोलून बघतो. पण बोलणं कमी किंवा बंद करून कसं चालेल?’ उमेशनं असा सूर पकडला की, हिला आणखीनच राग यायचा. तिला वाटायचं, उमेशलाही शेजारच्यांचीच काळजी आहे. तिची अधिकच चिडचिड व्हायची. खरंतर तिच्याही मुलांना बाहेर जाऊन खेळायचं असायचं, पण आईच्या या ठाम समजुतीमुळे त्यांना बाहेर जायची परवानगी नव्हती. हळूहळू सुषमानं येता-जाता शेजारच्यांकडे रागाचे कटाक्ष टाकणे, त्यांच्या तोंडावर दार आपटणे सुरू केले. शेजारच्यांच्या पाहुण्यांशीही ती उद्धटपणे बोलायची आणि त्यांचा अपमान करायची. हे सगळं अति झालं तेव्हा शेवटी निशा आणि केदार या दोघांनी पुढाकार घेऊन सुषमाशी बोलायचा प्रयत्न केला. तेव्हा सुषमा त्यांना म्हणाली, ‘‘तुम्ही सगळे जाणूनबुजून मला त्रास देण्यासाठी हे सगळं करत आहात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की, या भिंती पेपराएवढ्या पातळ आहेत. बाहेर खेळणाऱ्यांचे, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे सतत आवाज होतात आणि ते सहजपणे मला ऐकू येतात. मला त्याचा त्रास होतो. तरीही तुम्ही आपल्या मुलांना बाहेर खेळायला पाठवता? निशा आणि केदारचे तिचा गैरसमज दूर करण्याचे सगळे प्रयत्न संपले आणि परिणामी सुषमाचं उद्धट आणि आक्रमक वागणं चालूच राहिलं.
हेही वाचा…वैद्यकीय शिक्षणात लिंगभाव!
सुषमाचे शेजारी आणि त्यांच्या पाहुण्यांचे एक निरीक्षण अगदी खरं होतं की, ती नेहमीच खूप तणावात आणि रागात दिसते. तिच्या चेहऱ्यावर कोणीच कधीच मनमोकळं हास्य बघितलं नव्हतं. ती कॉलनीत वावरताना गॉगल लावून फिरायची. गॉगलचा संबंध उन्हाशी नसावा, कारण ढगाळ आणि पावसाळी वातावरणातही ती सतत गॉगल घालायची. बरं, कॉलनीतली परिस्थिती अशी होती की, मुलांच्या शाळेतही तिची प्रतिमा बिघडलेली होती. ती सतत टिपेच्या आवाजात सगळ्यांसमोर तिच्या मुलांवर ओरडायची, इतर पालकांशी तिची भांडणं व्हायची. सगळ्या पालकांनी, ती सतत भडकायची म्हणून तिला ज्वाला असं नाव दिलेलं होतं. पालक तिला चिडवतात असं कळलं की, ती त्यांच्याशी आणखीनच उद्धट आणि आक्रमक वागायची. एकाच गावात राहूनही तिनं तिच्या मुलांच्या शाळा अनेक वेळा बदलल्या होत्या. इथली शिक्षण पद्धती चांगली समाधानकारक नाही, असं तिचं म्हणणं असायचं. शाळा बदलायचं आणखी एक कारण ती सांगायची की, इथले पालक मला एकटं टाकतात. या तिच्या वागण्याचा सर्वांत जास्त परिणाम तिची मुलं आणि नवऱ्यावर व्हायचा. तिची नोकरीही अशी होती की, ज्यात तिचा लोकांशी कमीत कमी संपर्क यायचा आणि जेवढा संपर्क यायचा तेवढ्यातही ती काहीतरी तिरकस बोलायची आणि लोकांवर टीका करायची.
उमेशनं दीर्घकाळ हे सगळं सहन केलं. तिच्या म्हणण्यानुसार, समाजातल्या लोकांशी संबंध कमी केले, पण तिच्यात बदल होत नव्हते. तो समजावून थकला होता. मुलांवर होणारा परिणामसुद्धा त्याला जाणवत होता. आईच्या अशा विक्षिप्त स्वभावामुळे त्यांची भावनिक वाढ निरोगीपणाने होत नव्हती. त्याच्या ऑफिसमधल्या कोणीतरी त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. खरंच लोक तिला त्रास देत असतील आणि आपण त्यावर विश्वास ठेवत नाही, असं होतंय का? दुसरं मन म्हणत होतं, काहीतरी गडबड आहे, ती कुठेही गेली तरी कोणावरच विश्वास ठेवू शकत नाहीये. शेवटी त्याने मानसोपचारतज्ज्ञांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांना सगळी केस हिस्टरी सांगितली. ती ऐकल्यानंतर डॉक्टरांनी उमेशला सांगितलं, ‘‘सुषमाला पॅरॉनॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर (Paranoid Personality Disorder- PPD) आहे.’’ नाव ऐकूनच उमेश घाबरला. डॉक्टरांनी त्याला शांत केलं आणि सांगितलं, ‘‘हा व्यक्तिमत्त्व विकार असणाऱ्या व्यक्ती कधीच लोकांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांचा इतरांवर सतत संशय असतो किंवा लोक आपल्या वाईटाचाच विचार करत आहेत असंच त्यांना सतत वाटत असतं.’’
हेही वाचा…सांदीत सापडलेले : एक नॉर्मल मुलगा!
उमेश म्हणाला, ‘‘हो डॉक्टर, प्रसंगी ती माझ्यावरही विश्वास ठेवत नाही.’’
डॉक्टर म्हणाले, ‘‘आपण अजून थोडं नीट समजून घेऊया. पहिलं लक्षण म्हणजे या व्यक्तींकडे एक अतार्किक संशय असतो की, इतर लोक त्यांचं नुकसान करत आहेत किंवा त्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संशयाला काहीच प्रमाण, आधार,तर्क नसतो. या व्यक्तींनी अर्थ लावलेला असतो.’’
उमेश म्हणाला, ‘‘बरोबर म्हणालात डॉक्टर. सुषमाला खरं तर कॉलनीतील लोक त्रास देत नाहीत, पण तिनं मुलांच्या खेळण्याचा आणि येणाऱ्या जाणाऱ्यांच्या आवाजाचाही त्रास म्हणजे जाणून-बुजून तिला दिला गेलेला त्रास असा अर्थ लावला आहे. पण मी तिला वास्तवाची जाणीव करून देतोय तर तिला वाटतं की, मीही शेजारच्यांमध्ये सामील आहे.’’
डॉक्टरांनी उत्तर दिलं, ‘‘अरे कशी ठेवेल ती विश्वास? तिच्या मनात आधीपासूनच तुझ्या आणि इतरांच्या विश्वासूपणाबद्दल एक अतार्किक शंका आहे. त्यामुळे तुम्ही कसेही वागलात तरी ती अतार्किक शंका तशीच राहते. फार काय! अरे या व्यक्ती आपली माहितीही इतरांपासून लपवून ठेवतात, का माहिती आहे? त्यांना वाटतं की, जग आपल्या माहितीचा आपल्या विरुद्ध वापर करेल.’’
यावर उमेशनं आणखी माहिती पुरवली, ‘‘डॉक्टर, कॉलनीतले किंवा माझ्या मुलांच्या शाळेतले पालक तिला सहज काहीतरी बोलून जातात, पण तिला त्यात काहीतरी अपमानकारक किंवा धमकी दिल्यासारखं वाटतं. आणि ते सगळं खरं आहे, १०० टक्के सत्य आहे, असं मानून ती दीर्घकाळपर्यंत मनात अढी धरून बसते.’’
‘‘बरोबर आहे. अरे, पॅरानॉईड पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये हीच लक्षणे खूप ठळकपणे दिसतात.’’ डॉक्टरांनी सांगितलं.
‘‘ डॉक्टर, कधी कधी माझ्याशी किंवा इतरांशी बोलताना तिला अचानक तिच्यावर समोरचा आरोप करतोय असं वाटतं. प्रत्यक्षात असं काहीच नसतं. तिला एकदा असं वाटायला सुरुवात झाली की, ती उलट खूप रागरागाने भांडायला लागते.’’
‘‘अरे हो, यातली काही लक्षणं सुषमामध्ये खूप स्पष्टपणे दिसत आहेत म्हणूनच तिला पॅरानॉईड पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे याचं निदान झालय. एक शेवटचा, पण थोडा वैयक्तिक प्रश्न तुला विचारू का? ती तुझ्या चारित्र्यावर संशय घेते का?’’
हेही वाचा…माझी मैत्रीण : गुलबकावलीचं फूल!
हा प्रश्न ऐकल्यावर उमेशचा बांध फुटला. ‘‘मी या सगळ्यानंतरसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करतो, पण ती वारंवार माझ्यावर उगाचच संशय घेते की, माझे विवाहबाह्य संबंध आहेत.’’
डॉक्टर म्हणाले, ‘‘उमेश, आता हे सगळं ऐकल्यावर PPD म्हणजे काय हे तुझ्या लक्षात आलं असेलच. हे व्यक्तिमत्त्व विकार दीर्घकाळपर्यंत राहतात. काही प्रमाणात औषध उपचार आणि जास्त प्रमाणात सायकोथेरपी या कॉम्बिनेशनने तिला नक्कीच मदत होईल. फक्त तोपर्यंत तुलाही स्वत:ला सांभाळून सुषमाला आधार द्यावा लागेल.’’
हेही वाचा…जिंकावे नि जगावेही : आयुष्याचा ताल आणि तोल!
डॉक्टरांच्या क्लिनिकमधून निघताना सुषमाकडे बघायचा एक नवा दृष्टिकोन उमेशकडे होता. निदान ती अशी का वागते? याचं उत्तर त्याला आज मिळालं होतं.
trupti.kulshreshtha@gmail.com