स्त्रीजीवनातील बदलांच्या स्पंदनाचा मागोवा घेणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपटांचा ‘ओ वुमनिया’ हा महोत्सव नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता. त्यातील लघुपटांविषयी व त्यानिमित्ताने झालेल्या चर्चा व परिसंवादाविषयी.

निर्भया.. भारतीय समाजाच्या काळजातली ठसठसीत जखम! या घटनेतील आरोपींवर गुन्हा दाखल झाला व त्यांना शिक्षा झाली याबद्दल सगळ्यांना हायसे वाटत असतानाच या खटल्यातील मुख्य आरोपीची तिहार तुरुंगात जाऊन बीबीसी चॅनेलच्या प्रतिनिधीने मुलाखत घेतली व या निमित्ताने त्याने काढलेले निर्लज्ज उद्गार जेव्हा जगासमोर आले तेव्हा समाजात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली.  
अमानुष बलात्कारातील आरोपीच्या बेताल वक्तव्याला अभिव्यक्ती स्वातंत्र मानू नये. ‘इंडियाज डॉटर’ या लघुपटावर बंदी आणावी, अशा मागण्यांनी वातावरण ढवळून गेले. नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताकदिनी सर्व संचालनाचे नेतृत्व करणारी ‘इंडियाज डॉटर’ सर्वाच्या नजरेसमोर असताना ‘इंडियाज डॉटर’चे असे भयावह रूप सर्वासमोर यावे का? आपल्या समाजातील पुरुषांची मानसिकता आरोपी व त्याच्या वकिलाच्या वक्तव्यातून जगापुढे यावी का? अशा अनेक प्रश्नांचा कोलाहल समोर उभा राहिला व त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की १०० वर्षांचा इतिहास असणाऱ्या भारतीय चित्रपटाने आणि त्यानंतर लघुपटानेही खरेच भारतीय स्त्रीचे वास्तव दर्शन घडवले का? स्त्रीजीवनात झालेल्या बदलांच्या स्पंदनाचा मागोवा खरंच लघुपट चित्रपटांनी घेतला आहे का? स्त्रीने कितीही कर्तृत्व गाजवले तरी स्त्रियांच्या प्रश्नांकडे बघण्याची समाजाची नजर इतकी असंवेदनशील का आहे? समाजात वाढत चाललेल्या स्त्रीवरच्या अत्याचारांचे प्रमाण बघता स्त्रीची उपभोग्य वस्तू म्हणून प्रतिमा तयार करण्यासाठी अप्रत्यक्ष का होईना चित्रपट जबाबदार आहेत का? यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘भारतीय स्त्रीशक्ती’ने आयोजित केलेल्या ‘ओ वुमनिया’ या चित्रपट महोत्सवातून करण्यात आला. हा चित्रपट महोत्सव भारतीय स्त्रीशक्ती व साठय़े कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
या महोत्सवात एकूण तीन मोठे चित्रपट व तीन लघुपट दाखविले गेले. ‘ओसामा’ हा २००४ साली प्रदर्शित झालेला आंतरराष्ट्रीय चित्रपट. त्याची कथा थोडक्यात अशी, अफगाणिस्तानमधल्या एका छोटय़ा गावात तालिबानी फौजांचा धुमाकूळ सुरू असताना स्त्रियांना गावात राहणे, मोलमजुरी करणे अशक्य बनते. अशा वेळी एका कुटुंबातील एका १४-१५ वर्षांच्या मुलीला, ‘ओसामा’ तिचं नाव, तिची आजी केस कापून मुलाचे कपडे घालून मुलगा बनविते व ती एका दुकानात नोकरी करू लागते. अचानक तालिबान्यांकडून मुलांचे अपहरण करून त्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्याच्या कामी नेमले जाते, त्यात तिचेही अपहरण होते. प्रयत्न करूनही ती आपले स्त्रीत्व लपवू शकत नाही. याची शिक्षा म्हणून अनेक बायका व मुले असणाऱ्या म्हाताऱ्या मुल्लाशी तिचे लग्न लावून दिले जाते. या चित्रपटात कुठेही झाडाचे हिरवे पान नसणाऱ्या क्रूर निसर्गाचे दर्शन घडते, जणू तिथल्या स्त्रियांकडे बघण्याच्या पुरुषी मानसिकतेचे ते निदर्शक असावे.
या चित्रपटावर अतिशय संवेदनशील चर्चा झाली. त्या देशातील परिस्थिती किती भयंकर आहे, आपण महाराष्ट्रात किती सुखी आहोत असे विचार स्त्रियांनी व्यक्त केले, तर काहींनी महाराष्ट्रातील बलात्काराच्या घटनांचा दाखला देत इथली सुरक्षितताही फसवी आहे, असे मत मांडले. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी समाजात जे जे काम चालते त्याच्यात आपण आपला खारीचा तरी वाटा उचलला पाहिजे, असा विचार व्यक्त केला गेला.
‘टीआयएसएस’ यांच्या ‘ओढणी’ या लघुपटात स्त्रियांच्या प्रकट गप्पांतून स्त्रियांच्या लंगिकतेवर प्रकाश टाकला गेला, तर निशिथा जैन यांच्या ‘गुलाबी गँग’ या लघुपटातून     स्त्रियांनी संघटित प्रयत्न करताच परिवर्तनाचा वेग कसा वाढतो, तसेच स्त्रीचे सबलीकरण कसे घडू शकते हे समजून आले. ‘जोर से बोल’सारखा लघुपट मुलींच्या छेडछाडीमागच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो. या लघुपटांबरोबरचा ‘मातृभूमी- अ नेशन विदाउट अ वुमेन’ हा चित्रपट अस्वस्थ करणारा होता. ‘मातृभूमी’त एकही स्त्री नसलेल्या एका खेडय़ाचे दर्शन होते. मनीष झा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून अशी काही खेडी आपण बिहार, हरियाणात स्वत: अनुभवली आहेत, असे त्यांनी सांगितले. या चित्रपटावर चर्चा करताना, स्त्रियांविषयीची इतकी भीषण परिस्थिती दाखवणारा चित्रपट महिलादिनी दाखवायला नको, असे विचार काहींनी व्यक्त केले. तर स्त्री जीवनातील हे वास्तव, हे दु:ख आजच्या दिवशी तरी समजून घेऊन जागृत झाले पाहिजे, असे विचार व्यक्त झाले. या चित्रपटाचे सादरीकरण अतिरंजित आहे, असा आरोपही चित्रपटावर झाला, पण असा विचार करणे म्हणजे महाराष्ट्रातील भ्रूणहत्येसाठी वादग्रस्त डॉ. सुदाम मुंडेसारख्या घटनांना विसरणे आहे, असेही म्हटले गेले.
‘अ डे आय बिकम वुमन’ या नावाची एक लघुपट मालिका आहे. यात ‘हवा’ नावाचा एक लघुपट आहे. यातल्या हवा नावाच्या इराणी मुलीला नववे वर्ष पूर्ण होत असताना घरातील आई-आजी सांगतात की तू आता स्त्री होणार आहेस, तू आता बुरखा घालायचा, खेळायला जायचे नाही. यावर मुलगी म्हणते, माझा जन्म दुपारी १२ वाजताचा आहे. आता ११ वाजलेत, मला थोडा वेळ खेळू दे, आइसक्रीम खाऊ दे; पण दुर्दैवाने तिच्या याही इच्छा पूर्ण होऊ  शकत नाहीत. आपल्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या, इराणी स्त्रियांच्या आयुष्यातील तीन वैशिष्टय़पूर्ण टप्पे अधोरेखित करणाऱ्या तीन कथा यात गुंफल्या आहेत. २००० साली तयार केलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन मेरझेह मेशकिनी यांनी केले आहे. उरलेल्या दोन आहू (अँ) व हूरा (ऌ१ं) या लघुपटातही स्त्रियांच्या अशाच अधुऱ्या राहिलेल्या साध्या साध्या स्वप्नांच्या कथा आहेत, तर ‘एपिक’ या लघुपटात अनेक कर्तृत्ववान स्त्रियांच्या यशोगाथा मांडल्या आहेत.
सुमित्रा भावे व सुनील सुखटणकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘संहिता’ हा चित्रपटही या महोत्सवात दाखवला गेला. एक स्त्री पटकथा लेखक, एका चित्रपटाची संहिता लिहिताना त्याच्याशी आपल्या जीवनातील घटनांचे धागे गुंफत राहते. चित्रपटभर ही संहिता व नायिकेचे आयुष्य असा नात्यांचा सुंदर अलवार गोफ पाहायला मिळतो. या चित्रपटावरील चर्चेला सुमित्रा भावे व सुनील सुखटणकर दोघेही हजर होते. या सत्रात अनेक मुद्दय़ांवर चर्चा झाली. नायिका आपली कथा चित्रपट संहितेत का बघते? पात्रे तीच का आहेत? चित्रपटातील नायिका पटकथाकार आहे, तर ती जीन्स टॉपमध्येच का आहे? नायकाचे मतपरिवर्तन कशामुळे होते, या प्रश्नांची सविस्तर उत्तरे त्यांनी दिली.
या महोत्सवाचा समारोप ‘स्त्रीचे सामाजिक वास्तव व चित्रपट’ या विषयावरील परिसंवादाने झाला. त्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नाटककार चित्रपट कथालेखक अभिराम भडकमकर, अभिनेत्री पल्लवी जोशी, दिग्दर्शक समृद्धी पोरे यांनी भाग घेतला. स्त्रियांच्या वाढत्या अत्याचाराला चित्रपट जबाबदार आहेत का? या पहिल्याच प्रश्नाला सर्व मान्यवर वक्त्यांनी कडाडून विरोध केला. चित्रपटामुळे स्त्रियांवरच्या अन्याय-अत्याचारांत वाढ झाली आहे, असे आम्हाला वाटत नाही, कारण ज्याप्रमाणे चित्रपटातील चांगल्या गोष्टींमुळे लगेच परिस्थिती चांगली होत नाही, त्याप्रमाणे चित्रपटातील काही दृश्यांमुळे अत्याचाराच्या घटना वाढतात हे खरे नाही. भारतीय स्त्रीशक्ती, मुंबईची अध्यक्ष या नात्याने बोलताना मी मात्र चित्रपटामुळे स्त्रियांवरील अन्याय-अत्याचारांच्या घटनेत नक्कीच वाढ होते, असे मत व्यक्त केले. ‘मुलींच्या नकारातच होकार दडलेला असतो.’ ‘मुलींनाही मुलांनी केलेली छेडछाड आवडते, असे चुकीचे समज चित्रपट पसरवत असतो.’ नाक्यावर उभं राहून मुलींची चेष्टा करण्यासाठी ‘आती क्या खंडाला?’ ‘चिकनी चमेली’सारख्या गाण्यांचा वापर केला जातो. केवळ चित्रपटातील हिरो सहभागी होतात म्हणून ‘एआयबी रोस्ट नॉक आऊट’सारख्या कार्यक्रमांना युवावर्गाची पसंती मिळते, असं मत मी व्यक्त केले.
चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले की, मागणी तसा पुरवठा या न्यायाने चित्रपट बनतात. चुकीच्या गोष्टी दाखवणाऱ्या चित्रपटांना लोकांनी ‘नाही’ म्हटले पाहिजे. स्वत:जवळ असलेल्या नकाराधिकाराचा वापर केला पाहिजे. ‘महिलांच्या समस्या मांडणारे चित्रपट बनवायला, त्यात भूमिका करायला नक्कीच आवडेल, पण अशा चित्रपटांचे व्यावसायिक गणित मात्र जमत नाही. त्यामुळे अशा चांगल्या चित्रपटांना चित्रपटगृहात जाऊन पाहणे ही प्रेक्षकांची जबाबदारी आहे,’ असे मत पल्लवी जोशी यांनी मांडले. आजकालच्या चित्रपटाचे स्वरूपच बदलले असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, नायक आणि खलनायक यांतले अंतर कमी झाले आहे. आयटम साँग स्वत:लाच मिळावे ही नायिकांची धडपड असते. लेखक अभिराम भडकमकर यांनी सिनेमा व अभिजात साहित्य यांचा संबंध सुटता कामा नये, यावर भर दिला. लेखन जेवढे कसदार तेवढा चित्रपटाचा दर्जा नक्कीच सुधारेल, असेही ते म्हणाले. अॅड. समृद्धी पोरे यांनी मात्र फक्त मनोरंजन नव्हे, तर चित्रपटांनी समाजप्रबोधन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत व्यक्त केले. त्या दृष्टीने त्यांनी सरोगसी या विषयावरचा ‘मला आई व्हायचंय’ हा चित्रपट काढला. या चित्रपटाद्वारे स्त्रियांना पर्यायी मातृत्वाची वाट दाखवली, अशी टीका त्यांच्यावर झाली. शिवाय अलीकडच्या काळात गाजलेला डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात आदिवासींचे एक आयटम साँग घालावे, असा आग्रह त्यांना धरण्यात आल्याची आठवण त्यांनी सांगितली. मात्र मागणीपुढे न झुकता त्यांनी ती नाकारली.
या महोत्सवाच्या आयोजनाचा आमचा हेतू स्पष्ट होता. स्त्री जाणिवेच्या कक्षा रुंदाव्यात व जगभरातील स्त्रियांची दु:खे पाहून आपल्या दु:खाची रेषा लहान वाटावी, या हाच प्रांजळ हेतू होता. ‘आयुष्यात प्रथमच असा अर्थपूर्ण महिला दिन अनुभवला.’ ‘या चित्रपट महोत्सवात सहभागी झाल्याने आयुष्याकडे बघण्याची दृष्टीच बदलली.’ ‘दोन दिवसांत अनेक नवीन गोष्टी ऐकायला व पाहायला मिळाल्या.’.. स्त्री प्रेक्षकांच्या अशा भरभरून प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या यातच या महोत्सवाच्या आयोजनाचं सार्थक झालं.  
रागिणी चंद्रात्रे
 bharatiyastreeshakti@gmail.com

Story img Loader