सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
काही महिन्यांच्या बाळाला काय हवंय किंवा ते काय म्हणतंय हे घरच्या मंडळींना जाणून घ्यावं लागतं, ते त्याच्या हावभावांवरून आणि हालचालींवरून. एकदा का तो ‘संवाद’ जमला की ‘शब्देविण संवादु’ भलताच अर्थपूर्ण होऊन जातो.
संवाद ही माणसाला लाभलेली फार मोठी देणगी आहे आणि कलासुद्धा. कधी आणि कसा सुरू होतो संवाद?..
घरात शांतता. मांडीवर झोपलेल्या दीड महिन्याच्या नातवाकडे बघत मी बसले आहे. संथ जलाशयावर सतत छोटय़ा छोटय़ा लहरी उठाव्यात तसे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटताहेत. त्या मिटलेल्या पापण्यांआड काय बघतोय तो? कुणाशी बोलतोय तो? पाहा- त्याच्या भुवया कशा आक्रसल्या. डोळे घट्ट आवळून धरले अन् तोंडातून बारीक बारीक हुंदके बाहेर पडले. दुसऱ्याच क्षणी आठय़ा नाहीशा झाल्या. जिवणी विलगली. ओठांची कवाडं उघडली आणि आवाजाविनाच ऐकू आलं एक निरागस हास्य.. आता बंद पापण्यांआड डोळे वेगानं फिरताहेत. कोणतं सुंदर स्वप्न पाहतोय तो?
हे विभ्रम बघताना वेळ पुढे पुढे जातोय. एवढय़ात झाली वेळ उठायची. पापण्या फडफडल्या, पुन्हा मिटल्या. डोळे उघडले-अनोळखी माणसाकडे पाहावं तसं निरखून पाहिलं मला, अन् ओळख पटली तशी हळूच जिवणी हसू लागली. एक अतिकोमल आवाज बाहेर पडला आऽ ख् ग.. त्या आवाजाला प्रतिसादाची अपेक्षा होती. मी पण हुंकारले प्रत्युत्तरादाखल-थोडं मोठय़ानं. त्यानं आनंदानं मान हलवली आणि हाताच्या मुठींनी हवेतच गुद्दे लगावले.
आता स्वारी रंगात आली. डोळ्यात चमक आली. भुवया नाचू लागल्या. मान आणि पाठ उंचावून वर यायला बघतोय तो. हात जोरात चाललेत आणि पायांनी अंथरुणावर ताल धरलाय. घशातून बाहेर येतोय एक आनंदी गुरगुराट.. अचानक कपाळावर आठी पडते. चेहरा कसनुसा होतो. तक्रारवजा सूर बाहेर पडतो. अगंबाई.. ओलं केलंय वाटतं! मी लगेचच कपडे बदलते आणि मग मिळतं बक्षिसादाखल पुन्हा एक गोड हास्य.
थोडा वेळ गेला. बदलला मूड. आता आग्रहीपणे रडू फुटतंय. मान इकडेतिकडे हलतेय. ओठांची चोच उघडतेय पक्ष्याच्या पिलासारखी दाण्याच्या शोधात. हे पाहा गुलाबी जिभली ओठ चाटायला लागली. बाळाला भूक लागली. आई कुठेय? एक अत्युत्सुक शोध. आली आलीच आई. खूप खूप अपेक्षेनं टक लावली तिच्या चेहेऱ्याकडे आणि मग सुरू झाला एक पूर्णब्रह्माचा आनंद. शेजारी बसलेय मी, त्याची आजी. या संवादकलेबद्दल नितांत कृतज्ञ !
शास्त्रज्ञांनी शोध लावलाय- अगदी आईच्या पोटातच बाळ ऐकत असतं निरनिराळे आवाज, ओठही उघडत मिटत असतात. जन्म होताच सुरू होतो पहिला संवाद-रडण्यातून. आपल्या जिवंतपणाची जाणीव करून देणारा. तेव्हापासून बाळाचा शब्देविण संवादु सुरू होतो. रडण्याच्या तरी केवढय़ा परी. भूक लागली, झोप आली, एकटं वाटतंय. थंडी वाजतेय, उचलून घ्या.. एक ना दोन. बाळाशी संवाद साधणाऱ्या आईबाबांनाच कळते ही रडण्याची भाषा.
पहिल्या एक-दोन महिन्यात नुसते स्वरच पडतात बाहेर, पण बाकी मदतीला अख्खं शरीर बोलत असतं. वरचेवर हसायला येतं, पण बिनआवाजी. खुदकन् बाळ हसतं तेव्हा तिसरा-चौथा महिना असतो. पाठोपाठ घशातून मांजरासारखी गुरगुर.. आपल्या स्वरयंत्राच्या निर्मितीवर बाळ स्वत:च खूश होतं आणि पुन पुन्हा रियाज करायला लागतं. अपेक्षेनं आजूबाजूला बघतं, जवळ बोलावतं. काहीतरी इंटरेस्टिंग दिसत असतं. त्यावर आईनं काहीतरी बोलावं अशी अपेक्षा असते. त्यासाठी आधी नजरभेट व्हावी लागते. ८-१० इंचावरून पाहिला तर आईचा चेहरा बाळाला स्पष्ट दिसतो. शब्द, भाषा काही कळत नसलं तरी आवाजाची जात कळते. पोत कळतो. आवाजातलं प्रेम, आवाजातला ताल नक्की आवडतो. गाण्यात बोलावं तसं थोडय़ा उंच पट्टीमध्ये तालबद्ध बोललेलं बाळाला खूप आवडतं. आईनं पण थोडं बोलून थांबावं. बाळाचा प्रतिसाद काय आहे पाहावं, म्हणजे बाळालाही ‘बोलायची’ संधी मिळते. त्याचे डोळे बोलतात. चेहरा बोलतो. ‘अजून, अजून, तसंच..’ आईला सांगतो. संभाषण हे दुतर्फी असतं. हे इथेच तर कळतं बाळाला.
कधी अतिउत्साही माणसं बाळाजवळ जाऊन खूपच चर्पटपंजरी लावतात. बाळ थकून जातं. नजर वळवतं, चेहरा फिरवतं. सहा महिन्यांचं बाळ नाखुशी किंवा संशय व्यक्त करायला शिकतं. ‘अं.. अं.. ’ अशा तक्रारी करणं आणि मनासारखं झालं की आवाज करून हसणं सुरू होतं. आईबाबांनी, घरच्यांनी जितकं बोलावं तितकं बाळाला हवंच असतं. तोंडातून आता व्यंजनं यायला लागतात. पुन्हा पुन्हा एकच उच्चार. म्म्म्म् .. द्द्द्द् अशी गाडी सुरू होते. आता बाळाला संवादात कमीत कमी दोघे लागतात. याची पक्की जाणीव होते. पण ती दुसरी व्यक्ती माणूसच पाहिजे असं नसतं. खेळण्याशी, चित्राशी, समोर दिसेल त्या वस्तूशी बाळ बोलत राहतं.
बाळाशी कधी बोलावं? क्षणोक्षणी.. संधी मिळेल तेव्हा. आंघोळ घालताना, फिरायला नेताना, कपडे बदलताना, दूध पाजताना, प्रत्येक वेळी आपण काय करतोय ते सांगावं. कमी शब्द, छोटी वाक्यं, ओळखीच्या वस्तूंची, माणसांची नावं. सावकाश, स्पष्ट, शांतपणे गोड आवाजात उच्चार. त्यावेळी बाळाशी थेट नजरानजर व्हायला हवी. लक्षात घ्या- बाळ तुमचा आवाज ऐकतं तशीच ओठांची हालचालही पाहतं. चक्क ‘लिप रीडिंग’ शिकतं. हळूहळू शब्दोच्चार आणि त्या त्या वस्तूंचा मेळ घालायला लागतं. याच काळात बाळ बडबडगीतांना, गोष्टींच्या तालबद्ध वाचनाला भरपूर प्रतिसाद देतं. ६ ते ९ महिन्यांच्या काळात बऱ्याच शब्दांचा अर्थ त्याला समजतो, पण अर्थपूर्ण उच्चार स्वत: करण्यासाठी अजून ३-४ महिने जावे लागतात.
बाळाशी बोलताना वाचत बसणं, दुसऱ्या व्यक्तीशी बोलणं, दुसरीच कामं करत बसणं, इतकंच काय, बाळावरून नजर वळवणं यामुळे बोलणं तिथेच थांबतं. एखाद्या खेळण्याशी किंवा माणसाशी ‘बोलायला’ बाळाला आवडत नसेल- मूड नसेल तर बाळ तिथेच खेळणं टाकून देतं, अंग चोरतं, दुसरीकडे पाहतं, चेहरा लपवतं ही नापसंतीची देहबोली समजून घ्या. नाहीतर बाळाला रडण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
अगदी जन्मापासून रडणं, हसणं, निर्थक आवाज करणं आणि देहबोली यातून विकसित होत होत बाळ जेव्हा वर्षांचं होतं. त्या वेळेपर्यंत त्याला दादा, बाबा, मामा.. असे एखाददुसरे शब्द जाणीवपूर्वक उच्चारता येऊ लागतात. कमाल म्हणजे पुढच्या पाच वर्षांत ही संख्या १०,००० होते आणि दहा वर्षांत ४०,०००. मुली मुलांपेक्षा जास्त आणि लवकर (चुरूचुरू) बोलतात. एकत्र कुटुंबात किंवा पाळणाघरात अनेक मुलांच्या समवेत राहणारी मुलं शांत घरात एखाद्याच व्यक्तीबरोबर राहणाऱ्या मुलांच्या तुलनेत कितीतरी जास्त बोलतात. जाणीवपूर्वक बाळाशी बोलत राहणारे, जन्माच्या आधीपासून आपल्या लाडक्याशी शब्देविण संवाद साधणारे आईबाबा बाळाला एक अद्भुत देणगी सहज देऊ शकतात, ती म्हणजे भाषिक कौशल्य. बाळाच्या पुढच्या आयुष्यासाठी लेखन, वाचन, संभाषणासाठी आवश्यक असणारी मूलभूत गोष्ट!

Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Abhijeet Sawant
“लाखो-हजारात माझी ताई तू…”, भावा-बहिणीच्या नात्यावर अभिजीत सावंतचे मंत्रमुग्ध करणारे गाणे
Neelam Kothari
“ती खूप घाबरली…”, समीर सोनीने सांगितला पत्नी नीलम कोठारीचा किस्सा; म्हणाला, “तुम्ही विशीत असताना…”
Everything is for father cute little girl rolls chapati with sweet hands Video Viral
“सगळं काही बाबांसाठीं”, इवल्या इवल्या हातांनी लाडक्या लेकीने लाटली चपाती, गोंडस चिमुकलीचा Video Viral
Star Pravah popular serial aai kuthe kay karte will off air Milind gawali share post
ठरलं! ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप, मिलिंद गवळी पोस्ट करत म्हणाले, “या प्रवासामध्ये…”
Anil Deshmukh criticizes Ajit Pawar, Anil Deshmukh latest news, Ajit Pawar latest news,
अनिल देशमुखांची अजित पवारांवर टीका, म्हणाले, “ते फडणवीसांच्या मांडीवर बसल्याने आबांवर…”
six ambedkarite parties
सहा आंबेडकरी पक्ष-आघाड्या विधानसभेच्या मैदानात