मुलांची मानसिकता समजून घेतली. त्याचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले. काळजीपूर्वक त्याच्या प्रश्नाचा आम्ही अभ्यास केला. न रागावता, न कंटाळता, न वैतागता प्रश्न सोडविले. त्यामुळे त्याच्या प्रश्नांना समजून घेण्याबरोबरच त्याच्यावर चांगले संस्कारही करता आले. स्वत:मध्ये अडकलेल्या आम्हाला वेळीच बाहेर पडता आलं म्हणून आमचा मुलगा परत मिळाला!
माझा मुलगा अतुल १२-१३ वर्षांचा होता. शाळेत अभ्यासाकडे लक्ष देत नव्हता. सतत आपल्याच तंद्रीत असायचा. मुलांशी भांडायचा, चिडचिड करायचा. आम्हा दोघांनाही उद्धट आणि उलट उत्तरे द्यायचा. टीव्हीवरील कार्टून, कॉम्प्युटर किंवा मोबाइल्स यामध्ये सतत गर्क असायचा. त्याच्या अशा तक्रारींची मी यादी तयार केली होती. त्याच्याशी बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की, माझ्या नोकरीमुळे अतुलला मी वेळ देऊ शकत नव्हते. त्याचे वडील सिव्हिल इंजिनीयर असून स्वत:चा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. घरात अतुल व आम्ही दोघे असे तिघेच राहतो. अतुलची आजी कधीतरी दोन-चार दिवस आमच्याकडे येत असे. आम्हा दोघांना वेळ नसल्यामुळे आजीच अतुलच्या शाळेतून दिलेलं तक्रारीचे पत्र घेऊन आल्या होत्या. अतुलची शाळा सकाळी सातची होती. त्यासाठी त्याला साडेसहा वाजता घर सोडायला लागायचं. त्याची सर्व शाळेची तयारी घरात ठेवलेली कामवाली बाई करीत असे. तो जायचा तेव्हा आम्ही दोघे झोपलेले असायचो. दोघांना घरी यायला रात्रीचे साडेदहा वाजायचे. घरी आल्यावर दमल्यामुळे पटकून जेवून झोपायचो. कारण पुन्हा सकाळी ऑफिसला जायचे असायचे. त्यामुळे तिघांची भेट क्वचितच होत असे. अतुल टीव्ही बघत वेळ घालवीत असे. जोडीला कॉम्प्युटर आणि मोबाइल गेम्स होते.
आम्ही दोघेही पैसे व करियर यांच्या चक्रात अडकल्यामुळे आम्हाला स्वत:ला स्वत:साठीच वेळ मिळत नसे, तर मुलांसाठी कसा वेळ काढणार? आई-वडीलही वेळ देत नाहीत आणि घरातही कोणी नाही, त्यामुळे अतुलच्या मनाची घुसमट होत होती. त्याचा एकाकीपणा वाढू वागला होता. त्यामुळे मग काही समस्यांची सुरुवात झाली. अतुलला आपल्या काही समस्या, काही चांगल्या गोष्टी आम्हाला सांगायच्या असायच्या. पण त्याचे ऐकून घेण्याला आम्हाला वेळच नसायचा. मग त्याचा राग, खंत, असमाधान त्याच्या वर्तनातून दिसू लागलं. आम्ही सतत हा विचार करायचो. आम्ही हे सगळं करतो ते कोणासाठी? तर आपल्या मुलांसाठीच ना? मग तरी अतुल असं का वागतो? नंतर तो एकटेपणा घालविण्याकरिता एका मित्राच्या नादी लागून ‘गुटखा’ खायला शिकला. रात्रभर मित्रांसोबत डान्सबारमध्ये जाऊ लागला. हे जेव्हा आम्हाला कळले तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली. अतुल व्यसनी का झाला, या प्रश्नाचं एकच उत्तर होतं ते म्हणजे आई-वडिलांच्या सहवासाची त्याला असणारी ओढ आणि तो सहवास आम्ही देत नव्हतो. त्या क्षणी भानावर आल्यासारखं झालं. आपण आपल्या मुलासाठी वेळ देऊ शकणार नसू तर मग कुणासाठी? आयुष्यात कितीही पैसे मिळविले तरी मुले वाढताना बघण्याचा आनंद कसा मिळवू शकणार? मुलं शारीरिकरीत्या स्वावलंबी झाली, याचा अर्थ भावनिकदृष्टय़ा ती आई-वडिलांवर अवलंबून असता कामा नये, असं म्हणता येत नाही. मग आमच्या दोघांच्या लक्षात आले की, आताच्या काळात दोघांनी नोकरी करणे, पैसा कमविणे हे जरी आवश्यक असले तरी मुलाला वेळ देणे हीदेखील अग्रक्रमाची गरज आहे. मुलांचे भविष्य घडविण्यासाठी नुसती पैशांची गुंतवणूक करून चालत नाही, तर भावनिक गुंतवणूकही तितकीच महत्त्वाची आहे. मुलालाही आपल्या आधाराची गरज आहे. या गोष्टीची जाणीव तीव्रतेने झाली, पण त्याच वेळी आम्हाला हेही वाटायचे की, आपण एवढी मेहनत करतो तशीच मुलानेही अभ्यासात मेहनत घेऊन चांगली प्रगती केलीच पाहिजे. आमच्या वागण्या-बोलण्यातून हे अतुलला जाणवू लागलं. त्यामुळे तो अधिकच बिथरल्यासारखा वागायला लागला. त्यातून अतुलशी सुसंवाद न झाल्याने अभ्यासाविषयक, वर्तनाविषयक समस्या वाढीला लागल्या होत्या. आता अतुलला अशा वातावरणातून बाहेर काढून आपला मुलगा चांगला यशस्वी व्हावा, चांगला माणूस व्हावा म्हणून पहिल्यांदा त्याचा एकलकोंडेपणा काढून समाजात मिसळला पाहिजे, असे वाटले. त्याकरिता त्याच्याकडे आम्ही दोघे आळीपाळीने लक्ष दिले. आमच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या सवयी बदलल्या. त्याच्याबरोबर सकाळी लवकर उठण्यास सुरुवात केली. त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देण्यास लागलो. याचा परिणाम अतुलच्या मनावर फारच चांगला होऊ लागला. दरवर्षी चांगल्या मार्कानी पास होत गेला. त्याच्याशी संवाद साधत राहिलो. त्यामुळे त्यालाही संवाद साधता येऊ लागला. साहजिकच त्याचा उद्धटपणा, उलट बोलणे बंद झाले. त्याच्याच बेशिस्तपणा होता तो नाहीसा झाला. कारण आम्ही त्याच्या सतत सान्निध्यात होतो. त्याचा आक्रमकपणा आणि टीव्ही-कॉम्प्युटरचे व्यसन कमी होऊन अभ्यासात जास्त लक्ष देणे सुरू झाले. आम्हा दोघांनी त्याच्याशी संवाद साधला असल्यामुळे संभाषण चातुर्य वाढून तो आपले मत स्पष्टपणे मांडू लागला. आता इतरांशी जमवून घेणे त्याला आता त्रासदायक वाटत नाही. तो आता उदासीन न राहता अभ्यासात त्याची एकाग्रता वाढली आहे. तो आम्हा दोघांनाही आपले सर्व बरे-वाईट अनुभव शेअर करतो. अतुलकडून आम्ही काही महिने नियमित व्यायाम करवून घेतला. या व्यायामामुळे अतुलच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. त्याला बाहेरचे खेळ खेळण्यासाठी आम्ही उभयतांनी प्रवृत्त केले होते. त्यामुळे त्याची शारीरिक तसेच मानसिक स्थितीही सुधारल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही दोघांनीही ऑफिसच्या येण्या-जाण्याच्या वेळात बदल करून अतुलला पुरेसा वेळ देऊन त्याच्या आहाराकडे नीट लक्ष दिले. त्यामुळे आता त्याच्या तब्येतीची कोणतीच तक्रार नाही.
अतुल नुकताच एम.ई. झाला आहे आणि खूप समजूतदारही. मुलांची मानसिकता समजून घेतली. त्याचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले. काळजीपूर्वक त्याच्या प्रश्नाचा आम्ही अभ्यास केला. न रागावता, न कंटाळता, न वैतागता प्रश्न सोडविले. त्यामुळे त्याच्या प्रश्नांना समजून घेण्याबरोबरच त्याच्यावर चांगले संस्कारही करता आले. स्वत:मध्ये अडकलेल्या आम्हाला वेळीच बाहेर पडता आलं म्हणून आमचा मुलगा परत मिळाला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा