नवीन वर्षातच बातमी आली ती जहाल नक्षलवादी विमला सिडाम ऊर्फ तारक्का हिच्या आत्मसमर्पणाची… दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य तारक्का ही मागील ३८ वर्षांपासून नक्षल चळवळीत कार्यरत होती. सलग २५ वर्षं दक्षिण गडचिरोलीतील प्रत्येक गाव तिच्या भीतीनं चळाचळा कापायचं. आत्मसमर्पणानंतर तिला भेटल्यावर चेहरा अजून तजेलदार दिसत असला तरी त्यावर निराशेची काजळी पसरलेली जाणवत होती. तिला बोलतं करताना दिसली ती तिच्यातली हळवी स्त्री आणि उतारवयामुळे आलेलं शहाणपण… तारक्काचा नक्षल चळवळीचा उलगडलेला प्रवास…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
माझ्या पुढ्यात बसलेल्या तारक्काच्या रक्तरंजित पर्वाचा कालावधी ३८ वर्षांचा… म्हणजे नक्षल चळवळीच्या वयाच्या निम्मा. तिच्यावर दाखल गुन्ह्यांची संख्या ६६. त्याची वर्गवारी करायला गेलं तर ३५ चकमकी, जाळपोळीच्या सात घटना व २४ इतर गुन्ह्यांचा समावेश. त्यात खुनासारखे गंभीर गुन्हे सामील. तिचा चेहरा अजून तजेलदार दिसत असला तरी त्यावर निराशेची काजळी पसरलेली… सलग २५ वर्षं दक्षिण गडचिरोलीतील प्रत्येक गाव तिच्या भीतीनं चळाचळा कापायचं. तिच्याशी बोलायला सुरुवात तरी कुठून करायची असा प्रश्न पडलेला. मग सहज म्हणून विचारलं, ‘तुझं वय काय?’ त्यासरशी ती चक्क लाजली. थेट उत्तर न देता माझ्या हातातलं पेन घेत तिनं स्वत:च्या हातावर लिहिलं- ५४. वयाच्या सोळाव्या वर्षी अहेरी तालुक्यातील जिमलगट्टाजवळ असलेल्या किष्टापूर गावची ही विमला चंद्रा सिडाम चळवळीत सामील झाली. हे वय तसं धोक्याचं. प्रेम व हिंसा या दोन्हींच्या आकर्षणाचं. विमलाला हिंसेचं आकर्षण का वाटलं याची कारणं आदिवासींवर होत असलेल्या अन्यायात दडलेली. त्याच्या उजळणीची गरज नाहीच मुळी.
ते वर्ष होतं १९८६… तेव्हा या अन्यायाविरुद्ध आदिवासींनी पेटून उठावं म्हणून नक्षल समर्थक संघटनांनी कमलापूरला एक अधिवेशन भरवलेलं. हे गाव विमलाच्या गावापासून काही अंतरावर… या वातावरणनिर्मितीमुळे ‘‘तू चळवळीत गेली का?’’ असं विचारताक्षणी ती भूतकाळात जाते. ‘‘दलमचे लोक गावात यायचे. त्यांच्या चर्चेतून अन्यायाची जाणीव झाली व मागे वळून पाहिलंच नाही,’’असं तिचं उत्तर. हातात बंदूक आल्यावर आधी दलम सदस्य. मग पार्टी मेंबर, नंतर कमांडर, विभागीय समिती सदस्य व सर्वात शेवटी दंडकारण्य स्पेशल झोन समितीची सदस्य असा तिचा प्रवास… चळवळीत सामील झाल्यावर तीनच वर्षांनी तिला भूपती ऊर्फ सोनू भेटला. मूळचा तेलंगणाचा व सध्या नक्षलींच्या सर्वोच्च अशा केंद्रीय समितीचा सदस्य असलेला भूपती तेव्हा अहेरी, पेरीमिली व भामरागड या तीन दलमचा प्रमुख होता. त्यानं थेट लग्नाची मागणी घातली व विमलानं लगेच होकार दिला. त्यानंतर ती झाली ‘तारक्का.’ थेट वरिष्ठ पदावरच्या व्यक्तीचीच पत्नी झाल्यानं चळवळीत तिला सारे ‘दीदी’ म्हणायला लागले, असं सांगताना ती जरा हळवी झाली.
‘‘आजवर किती लोकांना ठार मारलं?’’ असा थेट प्रश्न ऐकून ती कावरीबावरी होते. ‘‘आता कशाला जुन्या जखमांवरची खपली काढता,’’ असा प्रतिप्रश्न करत ती उठते व चांगलं ग्लासभर पाणी पिते. नुकतंच आत्मसमर्पण झालं, त्यामुळे ती लवकर मोकळी होणार नाही हे तिच्या भेटीआधीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल व विशेष महानिरीक्षक संदीप पाटील यांचे शब्द आठवतात. मग चर्चेची गाडी काही घटनांकडे वळवण्याचा माझा प्रयत्न सुरू होतो. भामरागडच्या पुढे तीस किलोमीटरचं अंतर पार केल्यावर छत्तीसगडच्या सीमेवर हित्तलवाडा नावाचं गाव आहे. तिथल्या शाळेत नांदेडचा मुंडे नावाचा तरुण शिक्षक म्हणून काम करायचा. दुर्गम भागात सारेच शिक्षक शाळांना पाठ दाखवत असताना हा बहाद्दर याच गावात राहून माडिया मुलांना अक्षराचे धडे द्यायचा. त्याला भेटायला अनेकदा गेलेलो. गावात आली की तारक्का त्याची विचारपूस करायची हे त्याच्याच तोंडून ऐकलेलं. हा संदर्भ देताच तिची कळी खुलते. ‘‘हो, आठवतो मला तो. खूप प्रामाणिक होता,’’ असं म्हणत ती त्या परिसरातल्या अनेक आठवणी सांगू लागते. त्याला भेटायला अनेकदा तिथं गेलो. त्यातल्या दोन भेटीच्या वेळी नुकतीच तू तिथून निघून गेलेलीस. एकदा तर एका समर्थकानं तुझ्यासाठी आणून ठेवलेले बिस्किटांचे खोके घेऊन तू निघाली व आम्ही गावात पोहोचलो. ‘आम्ही’वर ती प्रश्नार्थक नजरेनं माझ्याकडे बघते. सोबत त्या भागातला काँग्रेसचा नेता बहादूरशाह आलम होता, असं सांगताच ती चमकते. मग तोंडून स्वाभाविकपणे प्रश्न बाहेर पडतो, ‘‘का मारलं त्याला?’’ यावर बराच काळ ती गप्प राहते. मुलाखतीच्या खोलीत शांतता पसरते. मग खाली मान घालून ती बोलायला सुरुवात करते. ‘‘बहादूर चांगला नेता होता. त्याला मारू नका असं मी पार्टीला सांगून बघितलं, पण कुणी ऐकलं नाही. शेवटी छत्तीसगडमधून ‘क्विक अॅक्शन टीम’चे लोक बोलावून त्याची हत्या करण्यात आली. चांगलं काम करणाऱ्यांना आम्ही त्रास दिला नाही. त्या शिक्षकाला कुठे त्रास दिला? शाळांना आमचा कधी विरोध नव्हताच. हा गैरसमज जाणीवपूर्वक पसरवला गेला.’’ हळूहळू ही मोकळी होतेय हे लक्षात येताच पुढचा प्रश्न विचारला.
‘‘२०१२ मध्ये नेलगोंडाला बहादूरशाहसमोर माझा पुतळा तुम्ही जाळला. तेव्हा तूही हजर होती हे खरे ना?’’ हे ऐकल्याबरोबर ती डोळे रोखून बघायला लागते. ‘‘सलवा जुडूमच्या के. मधुकररावला भामरागडला आणायची काही गरज नव्हती. तुम्ही दोघे त्यामागे होता. म्हणून नर्मदाच्या सूचनेवरून पुतळा जाळला. जुडूमनं आदिवासींचं खूप नुकसान केलं.’’ दोघांतलं संभाषण आता वादाच्या दिशेनं जाऊ लागलं हे लक्षात येताच मी विषय बदलतो. ‘‘आजवर जेवढे लोक तुम्ही मारले ते आदिवासीच होते. पोलीस असोत वा खबरे. यातून हाती काय लागलं?’’ यावर ती काही काळ निरुत्तर होते. मग हळूच म्हणते, ‘‘शत्रूशी हातमिळवणी केली की असं होणारच. अनेकदा ही कृत्यं करताना आमचाही नाइलाज व्हायचा. सी-६० चा कमांडर पांडू आलामला नारगुंडाच्या चकमकीत ठार केलं. त्यावरून आम्हालाही स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. तो लढवय्या होता, पण शत्रू होता ना!’’ हे ऐकल्यावर तिच्यातल्या आकलनशक्तीची जाणीव होते.
‘‘चळवळीत महिलांचं शोषण होतं हे खरं आहे का?’’ या प्रश्नावर ती सरसावून बसत घडाघडा बोलू लागते. ‘‘जिथं पुरुष आहे तिथं या गोष्टी थोड्याफार प्रमाणात घडणारच. पण चळवळीत असे प्रकार घडू नयेत म्हणून मी खूप कष्ट घेतले. अगदी सुरुवातीला दुर्गण्णा नावाच्या सदस्यानं गावातल्या एका मुलीवर जबरदस्ती केली. तेव्हा मी स्वत: त्या गावात गेले. सगळ्यांची बैठक घेतली व माफी मागून तो पुन्हा गावात आला तर जोड्यानं मारा असं सांगून परतले. सोनू नावाच्या एका सदस्यानं दलममधल्याच एका मुलीवर हात घातला. त्याला निलंबित करेपर्यंत मी शांत बसले नाही. पेरीमिलीला मनोजनं असाच प्रकार केला. त्याच्यावर कारवाई करा असा आग्रह धरला. अशा काही माझ्या माहितीतल्या घटना सोडल्या तर आजही ही चळवळ मुलींसाठी सुरक्षित आहे. आताही चळवळीत सर्वाधिक मुली आहेत. अनेक दलम असे आहेत जिथं केवळ दोन पुरुष व दहा महिला आहेत. तिथं स्त्री-पुरुष असा भेद कधीच केला जात नाही. मग ते स्वयंपाकाचं काम असो की सर्वांत कंटाळवाणी समजली जाणारी सेंट्रीड्युटी (दलमच्या सुरक्षेसाठी पहारा देणारे सदस्य) करण्याचं.’’ चळवळीत मुली जास्त का यावर ती विस्तारानं जे काही सांगते ते आपले डोळे उघडणारं असतं. ‘‘आजही माडिया व बडा माडिया या जमातींत पूर्वापार चालत आलेल्या परंपरा प्रत्येकानं पाळाव्यात असा आग्रह धरला जातो. यातील एक म्हणजे, विवाहितेनं ब्लाऊज न घालणं. थोड्याफार शिकलेल्या वा नव्या जगाची जाणीव होत असलेल्या मुली यासाठी तयार होत नाहीत. त्यांना असलं शरीरप्रदर्शन आवडत नाही. तारक्काला स्वत: या समस्येचा सामना करावा लागला. त्यामुळे चळवळीत सामील झाल्यावर तिनं अनेक गावांत ब्लाऊज वाटले. गावबैठकांमध्ये याला कुणी विरोध केला तर थेट बंदूक रोखायला मागेपुढे पाहिलं नाही. या ब्लाऊज वितरणामुळे पंचक्रोशीतले टेलर माझ्या ओळखीचे झाले,’’ असं हसत हसत ती सांगते. मुली जास्त का याच्या उत्तरातला दुसरा मुद्दा ती मांडते तो पुटूल नावाच्या वाईट परंपरेचा. या जमातीत मामाची मुलगी हक्काची समजण्याची रीत. त्यानुसार, तरुण लग्नाच्या आधी मामाच्या मुलीला घरी आणून तिचा उपभोग घेऊ शकतो. यावर कुणाला आक्षेप घेता येत नाही. एखाद्या मुलीनं घेतलाच तर पंचायत बसते, पण निर्णय मुलाच्या बाजूनं लागतो. शहरीकरणाची चटक लागलेले तरुण या परंपरेच्या नावाखाली मुलींवर चक्क जबरदस्ती करतात. यात लग्नाची अट नसतेच, यामुळे अनेक मुली हे टाळण्यासाठी थेट चळवळीचा रस्ता धरतात. आदिवासी जमाती स्त्रीप्रधान, त्यामुळे शेतीपासून गुरे राखण्यापर्यंतची कामे स्त्रियाच करतात. आधी पुरुष जंगलात जायचे, आता रोजगारासाठी बाहेर जातात. अशा स्थितीत मुलींच्या वाट्याला धडाचं शिक्षणही येत नाही. वर जाचक परंपरा पाचवीला पुजलेल्या, त्यामुळे त्यांचा ओढा चळवळीकडे वाढलेला. हे सामाजिक वास्तव तारक्का तिच्या मोडक्यातोडक्या हिंदीत सांगते तेव्हा थक्क व्हायला होतं.
‘‘तू तर चळवळीतील सर्वोच्च नेत्याची पत्नी. तरीही सोडून का यावंसं वाटलं?’’ यावर तिची नजर पुन्हा शून्यात जाते. ‘वृद्धत्व कुणाला चुकलं आहे का,’ असा प्रश्न स्वत:लाच विचारत ती बोलू लागते. ‘‘आजकाल लोक चळवळीत यायला तयार होत नाहीत. सरकारचा वावर दुर्गम भागात वाढलाय. पोलीसही आक्रमक झालेत. ज्यांच्यासाठी आम्हाला लढायचं आहे तेच साथ देत नसतील तर करायचं काय, हा तिचा प्रश्न अंतर्मुख करायला लावतो. शरीराला अनेक व्याधी जडल्यानं तीन वर्षांपूर्वी मी बंदूक त्यागली. भूपतीची पत्नी असल्यानं सर्वांना माझ्या सुरक्षेची काळजी. म्हणून मला अबूजमाडमध्ये हलवण्यात आलं. सुरक्षित ठिकाणी ‘डेरा’ टाकायचा व पाच सुरक्षारक्षकांच्या देखरेखीत राहायचं असाच दिनक्रम सुरू झाला. आता करायचं काय? बसून नुसतं खायचं किती काळ असं वारंवार जाणवू लागल्यावर माड परिसरात असलेल्या कंपनी व दलममधील सदस्यांची वैद्याकीय सेवा सुरू केली. बाहेरच्या डॉक्टरांनी आणून दिलेली औषधं गरज पडेल तशी वाटायची. कुणी जखमी होऊन आलाच तर त्याची सेवा-शुश्रूषा करायची. कधी कधी औषधंही वेळेवर मिळायची नाहीत. मग याही कामाचा कंटाळा यायला लागला. मधेमधे भूपती भेटायला यायचा. तब्येतीची काळजी घे म्हणायचा. तेव्हा समर्पणाचे विचार मनात यायचे, पण बोलण्याचं धाडस झालं नाही. दीड वर्षांपूर्वी तो शेवटचा भेटला. ही भेट अखेरची ठरेल असं तेव्हा वाटलं नाही. चळवळीत असताना अनेक गावांना सरकारच्या दहशतीपासून वाचवलं. धीर दिला. पण आता मला धीर देणारं कुणी नाही याची जाणीव अलीकडे तीव्र व्हायला लागली. मग गेल्या नोव्हेंबरमध्ये मन घट्ट केलं व ठरवलं, आता शरण जायचं. माझी एक अंगरक्षकही तयार झाली. शेवटी डिसेंबरच्या एके दिवशी अंगावरचा गणवेश उतरवला व उपचारासाठी जायचं असं सांगून निघाले.’’ हे सांगताना तारक्का हळवी होते.
‘‘चळवळीतील अनेक जण शरण येताना लपवलेला पैसा घेऊन येतात. तू काय केलं?’’ असं विचारताक्षणी ती चिडते. ‘‘तो चळवळीचा पैसा, मी कशाला आणू?’’ असं म्हणत मला निरुत्तर करते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर शरण आल्यावर काय घडलं, यावर तिच्या गप्पांची गाडी कुटुंबाकडे वळते. ३८ वर्षांनंतर वडील व भाऊ भेटायला आले. सोबत भावाची मुलं होती. त्यांनी घराचा व्हिडीओ आणला होता. तो पाहून बालपणीच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. आता भावाची मुलं शिकत आहेत. जिवाच्या भीतीमुळे गावात आता जाता येणार नाही, पण एकदा जाऊन सारं बघायचंय. हे सांगता सांगता ती चर्चेत शांतपणे बसलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला विचारते, ‘‘त्या सेतू केंद्रात आपण सकाळी गेलो कागदपत्रे तयार करायला. ती झाली का?’’ तो ‘‘नाही’’ म्हणतो. हे विचारताना तिला नागरिकत्वासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचे वेध लागल्याचं जाणवतं. एक जहाल नक्षली ते सर्वसामान्य नागरिक असा तिचा प्रवास आता कुठे सुरू झाला हे लक्षात येतं. शेवटी उठताना न राहवून मी विचारतो- ‘‘आता भूपतीचं काय?’’ त्यासरशी तिचे डोळे डबडबतात. ‘‘त्याला सोडून येण्याचं दु:ख तर आहेच. हा विश्वासघात असंही वाटेल त्याला कदाचित, पण माझाही नाइलाज झाला. केवळ त्याची पत्नी म्हणून सुरक्षा घेऱ्यात किती काळ राहायचं व त्यासाठी लोकांना का अडकवून ठेवायचं हाच प्रश्न मला सतावत होता. शेवटी आले निघून. तोही येईल कदाचित. किंवा येणारही नाही. आता भेट होईल की नाही तेही सांगता येत नाही. कदाचित तिथंच भेटेल तो,’’ असं म्हणत ती आभाळाकडे बोट दाखवते. तेवढ्यात तिच्या सेवेसाठी ठेवलेला एक पोलीस सायंकाळचा डबा घेऊन दारात येतो. ‘‘अरे, सुबह का खाना तो खत्म नही हुआ. अब क्या करू इसका,’’ असं म्हणत ती त्याच्या हातातला डबा घेते. हिंसेला प्रेमानंही उत्तर देता येतं हे सांगणारा तो प्रसंग बघून खोलीतलं वातावरणच हळवं होऊन जातं. मग बाहेर पडल्यावर निरोप घेताना तारक्का म्हणते, ‘‘वेळ मिळाला की येत जा भेटायला. तेवढंच बरं वाटेल.’’ ‘हो’ म्हणत मी चालू लागतो, पण तिची नजर माझा पाठलाग करत असल्याचं सतत जाणवतं. हिंसेचा मार्ग त्यागून मुख्य प्रवाहात आलेली ही आपलीच माणसं, असा विचार मनात बळावत जातो.
devendra.gawande@expressindia.com