‘‘हा आपल्या नैतिक सद्सद्विवेकबुद्धीवर भला मोठा डाग आहे’’,‘युनिसेफ’ च्या कार्यकारी संचालक कॅथरीन रसेल यांचे हे उद्गार आहेत, मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्धचे. आणि याला कारण म्हणजे ‘युनिसेफ’ने या विषयावरची १२० देशांतील २०१० ते २०२२ दरम्यानच्या सर्व्हेक्षणावर आधारित जाहीर केलेली आकडेवारी. पुढील महिन्यात बालकांवरील हिंसासमाप्तीच्या निमित्ताने भरवण्यात येणाऱ्या जागतिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेली ही आकडेवारी अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. माणसांतील विकृती, भोगवादी वृत्ती, संवेदनहीनता, क्रूरता… विशेषणे संपणारच नाहीत अशी कृत्यं जगाच्या पाठीवर सुरू आहेत. ती थांबणार कशी, कधी? या प्रश्नांची उत्तरे मात्र कुणाकडेच कधीही नसणार आहेत. कारण ती थांबणार नाहीतच, हेच त्यातलं भयानक सत्य आहे. जगाच्या पाठीवर सर्वच ठिकाणी, सर्वच स्तरावर, सर्वच वर्गांत बलात्कार आणि लैंगिक अत्याचार हे होत आहेतच, मात्र त्यातली क्रूरता अधिक गडद होते जेव्हा हा अहवाल सांगतो की, जगभरात १८ वर्षांच्या आतील ३७ कोटी मुलींवर बलात्कार वा लैंगिक अत्याचार झालेले आहेत, याचाच अर्थ आज आठ मुलींमधली एक मुलगी लैंगिक अत्याचारग्रस्त आहे. हाच आकडा ६५ कोटी एवढा होतो जेव्हा त्यात ऑनलाइन वा समाजमाध्यमाद्वारे किंवा शाब्दिक छळाद्वारे होणारा ‘थेट-संबंध न आलेला’ परंतु तेवढ्याच भयाचा, अपमानाचा सामना कराव्या लागणाऱ्या मुलींचा त्यात समावेश होतो.

मुलांच्या बाबतीतली दुर्दैवाची परिसीमा आणखी एक कळस गाठते जेव्हा हे जाहीर केलं जातं की, मुलींबरोबरच मुलग्यांचेही शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. आजच्या घडीला २४ ते ३१ कोटी पुरुष वा मुलांनी आपल्या बालपणात बलात्कार वा लैंगिक अत्याचार सहन केला आहे. याचा अर्थ ११ मुलांमधील एकाला या अनुभवातून जावं लागत आहे. हे जगभरातील मुलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. अर्थात यात सर्वाधिक बळी आहेत ते सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकी देश.

हे ही वाचा…ऐकावे मनाचे… करावे मनाचेच…

तिथल्या अत्याचारग्रस्त मुलींची संख्या आहे ७ कोटी ९० लाख. तर पूर्व आणि दक्षिण-पूर्व (आग्नेय) आशियातीतील आकडा आहे ७ कोटी ५० लाख. मध्य आणि दक्षिण आशियात ७ कोटी ३० लाख (ज्यामध्ये आपल्या देशाचाही समावेश होतो), युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये ६ कोटी आणि ८० लाख, उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियात २ कोटी ९० लाख. आणि यातील अत्याचारग्रस्त मुली या वय वर्षे १४ ते १७ या दरम्यानच्या अधिक आहेत.

हे ही वाचा…हात धुता धुता…

अशा प्रकारची ‘युनिसेफ’ने ( United Nations Children’ s Fund) जाहीर केलेली ही पहिलीच जागतिक आकडेवारी आहे. या पहिल्या जागतिक अहवालात प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, विविध सांस्कृतिक, भौगोलिक आणि आर्थिक स्तरातील मुलांवर होणाऱ्या अत्याचाराची माहिती दिली आहे. ‘‘विशेषत: अस्थिर वातावरण असलेल्या भागातील मुलं लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. युद्धजन्य परिस्थिती किंवा सशस्त्र संघर्ष होत असलेल्या भागात भयावह लैंगिक हिंसा घडताना दिसते,’’, असे कॅथरिन रसेल सांगतात. त्या म्हणतात की, ‘‘मुलांच्या मनावर यामुळे खोल आणि कायमस्वरूपी आघात होतो. वयस्क झाल्यावरही हा धक्का त्यांना सतावत असतो. नैराश्य, चिंता यासारख्या गोष्टींबरोबरच इतर व्यक्तींसोबत ‘निरोगी नातं’ प्रस्थापित करण्यासाठीदेखील त्यांना अडचणी येतात.’’जगभरातील मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा लढा देण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी ‘युनिसेफ’ने उपायही सुचवले आहेत. अशी मुले मदत मागण्यास कचरतात. आपल्यावर अत्याचार झाला आहे, हे त्यांच्या लक्षात यावं, यासाठी प्रत्येक मुलाला यासंदर्भातील माहिती देऊन सजग करणे आवश्यक आहे. यापासून बचाव करण्यासाठीचे नियम आणि कायदे अधिकाधिक कठोर आणि सक्षम करणे तसेच त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा, साधनसुविधा पीडित मुलांना उपलब्ध करून देणे, मुली आणि स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार मिळतील, असं वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे.