सुखद भावना जागवण्याचं आणि दु:खद भावनांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य प्रत्येक विद्यार्थ्यांत निर्माण व्हायला हवं. यासाठी विद्यापीठांचा परिसर पर्यावरणपूरक असावा तसाच तो भावनिक संवर्धन करणाराही असावा. याकरिता स्वत:बरोबरच दुसऱ्याच्या भावनांची जाण कशी वाढवावी याचे ‘प्रज्ञा-परिसर’ या प्रकल्पाच्या रूपात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला गेला. भावनिक आरोग्य फुलवण्यासाठी विद्यार्थ्यांना याविषयी काय शिकवलं जाईल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाकाळाला आपण सरावलो होतो आणि तो सरण्याच्या खुणा दिसू लागल्या होत्या त्या काळातली गोष्ट. महाराष्ट्र सरकारच्या, उच्च शिक्षण विभागाने एक नवीन संस्था उभी करण्याचं ठरवलं होतं. महाविद्यालयीन शिक्षकांसाठी हरतऱ्हेचं प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेचं नाव होतं, MSFDA अर्थात् ‘महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था’. पुण्यामध्ये या प्रकल्पाचं सुसज्ज केंद्र उभं राहत होतं आणि हा कार्यभाग सांभाळणारे अधिकारी होते डॉ. निपुण विनायक. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत संस्थांना या प्रशिक्षणाशी जोडून कसं घ्यायचं यासाठी त्यांच्यासोबत, ‘प्रतिमा-बैठक’ आयोजित केलेली होती. कॉलेजच्या दिवसापासूनचा माझा मित्र डॉ. विजय जोशी (निवृत्त प्राचार्य, सोमय्या कॉलेज, मुंबई) त्या टीमचा भाग होता. भावनिक आरोग्याचं क्षेत्र, महाविद्यालयीन जीवनाशी जोडलं जायला हवं अशी त्याची मनापासूनची इच्छा. आमची ऑनलाइन मीटिंग सुरू झाली.

डॉ. निपुण मला आणि आय.पी.एच. संस्थेमधल्या सहकाऱ्यांना ‘एम.एस.एफ.डी.ए.’चं कार्य काय असेल, कसं चालेल हे समजावून देत होते आणि अचानक माझ्या डोळ्यासमोर आले काही महाविद्यालयांचे परिसर…जन्मापासून मी वाढलो तो जळगावच्या एम.जे. कॉलेजच्या विस्तीर्ण आवारात. कारण माझे वडील तिथं प्राध्यापक आणि वसतिगृहाचे पालक होते. दिवस-संध्याकाळ-रात्रीच्या वातावरणामधला हा परिसर मी हिंडून अनुभवला आहे. मराठवाड्यामध्ये अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयाचा परिसर असाच मोठा. वडील तिथं प्राचार्य म्हणून रुजू झाल्यावर आमची स्वारीसुद्धा या परिसरात सहजसंचार करायची. तिथल्या हॉस्टेलच्या आणि कॉलेजच्या मुलांसोबत खेळायची. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे त्या काळी त्या कॉलेजचे विद्यार्थी. पुढच्या अनेक वर्षांत दोघांनाही कधी भेटलो की आमच्या खेळाच्या आठवणी हमखास यायच्या. या परिसरात स्वामी रामानंद तीर्थ कधीमधी राहायला यायचे. फक्त मी आणि ते यांच्यातल्या संध्याकाळच्या गप्पा हा माझ्या विकासाचा ठेवा आहे. मी शाळकरी मुलगा. पण ते प्रेमाने, गंभीरपणे माझ्या प्रश्नांना उत्तरं द्यायचे. या सगळ्याला साक्षी होता तो परिसर. नंतर ठाण्याच्या महाविद्यालयामध्ये वडील प्राचार्य झाले आणि अजून एक परिसर जवळून अनुभवला. या तिन्ही परिसरांना सर्वार्थाने फुलवण्यात वडिलांचा यथार्थ वाटा होता. त्या साऱ्या अनुभवांचा वानोळा अचानकपणे एका प्रकल्प-प्रस्तावाच्या रूपात बाहेर पडला… ‘प्रज्ञा-परिसर प्रकल्प!’

‘‘पर्यावरणपूरक कॅम्पस असावा असं आपण म्हणतो. त्याचाच भाग आहे ‘भावनिक’ पर्यावरण… Emotions Friendly Campus ही कल्पना आपण प्रत्यक्षात का आणू नये? भावनिक प्रशिक्षणाचे प्रशिक्षण वर्ग महत्त्वाचे पण साऱ्या माहोलमध्ये, सुखद भावना जागवण्याचं आणि दु:खद भावनांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य निर्माण व्हायला हवं… कॅम्पसशी निगडित प्रत्येकाच्या मनात त्या परिसराशी असलेलं आपलं नातं घट्ट करण्याचा प्रवास सुरू व्हायला हवा. अनेक परिसरांमधली माणसं, एकमेकांशी आणि त्या भोवतालाशी ‘आपोआप’ जोडली जातात. आपण या जोडणीची प्रक्रिया जाणीवपूर्वक करू या.’’ असं प्रास्ताविक करून मी हा प्रकल्प कसा असेल याचं शब्दचित्र रंगवायला लागलो.

महाविद्यालयाच्या अंगणातले महत्त्वाचे गट कोणते? तर विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर, वरिष्ठ नेतृत्व, कार्यकारी संस्था (मॅनेजमेंट) आणि विद्यार्थ्यांचे पालक तसेच माजी विद्यार्थीदेखील. या साऱ्यांच्या सहयोगातून हा प्रकल्प उभा होईल. त्यासाठी या सर्व घटकांच्या प्रतिनिधींना आपण नियमितपणे प्रशिक्षण देऊ. ते तीन वर्षं चालेल. नेमकं काय असेल हे प्रशिक्षण?

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि ती जोपासायची कशी हे तपशीलवार शिकवणं हा पहिला मुद्दा. प्रभावी भावनिक नियमनाचे मार्ग त्यात शिकवले जातील. स्वत:बरोबरच दुसऱ्याच्या भावनांची जाण कशी वाढवावी याचं प्रशिक्षण असेल. मग हा संघ, ज्याला आम्ही नाव दिलं ‘कॅटेलिस्टस् ’… तर हे भावनिक विकासाचे अग्रदूत आपापल्या परिसरात जाऊन स्थानिक टीम तयार करतील. अशा साऱ्या जाणीव-जागृतीमधून ‘फलित’ काय निर्माण करायचं तर भावनिक संवर्धन करणारे अनेक अनुभव त्या परिसरात बहरत राहायला हवेत.

मी बोलत होतो. दहा मिनिटं झाली असावीत. थांबलो. डॉ. निपुणचा प्रतिसाद आला, ‘‘आय अॅम सोल्ड आऊट टू युवर आयडिया… मी तुझ्या कल्पनेने प्रभावित झालो आहे… योजना तयार करा आणि तातडीने सबमीट करा.’’

दृश्य चितारणं वेगळं आणि ते प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया वेगळी. ‘आय.पी.एच.’ अर्थात ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ संस्थे’च्या त्या वेळी, तीन दशकांच्या अनुभवामध्ये स्वयंसेवकांमध्ये उत्साह निर्माण करून त्यांना कार्यरत ठेवण्याची अनेक उदाहरणं होती ही आमची जमेची बाजू. व्यक्तिश: मी या प्रकल्पाचा ‘चेहरा’ असेन आणि नियोजनाच्या विविध अंगांवर इतर पाच-सहा सहकारी आपापली जबाबदारी घेतील असं आम्ही ठरवलं.

देशापरदेशामध्ये असे प्रयोग झाले आहेत का त्या अभ्यासाला लागलो. विद्यापीठातील वातावरण, ‘भावनिक आरोग्या’ला पोषक बनवणारे काही संदर्भ मिळाले. मनआरोग्याबद्दलचं अज्ञान कमी करून उपचार-मार्गदर्शन सेवांकडे सर्व घटक गटांना न्यावं यासाठी प्रयत्न झाले होते. परंतु परिसरासोबत आपले भावनिक बंध जोडण्याचे आणि त्यातून संस्थेचा वारसा पुढे नेण्याचा ‘आकृतिबंध’ म्हणजे मॉडेल तयार करायचे असेल तर ते मुळापासून करायला लागणार याची जाणीव झाली. नव्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’चा अभ्यास करून आपलं मॉडेल त्या तत्त्वांना प्रत्यक्षात आणणारंही असायला हवं असं लक्षात आलं.

एक साधं उदाहरण घेऊ. नव्या धोरणानुसार, शैक्षणिक परिसरात समुपदेशन सुविधा तयार करण्यावर भर आहे. बहुतेक महाविद्यालयांमध्ये ही खोली, मानसशास्त्र विभागामध्ये असते. इथंच ‘स्टिग्मा’ला सुरुवात होते. ‘पार सटकलेल्या’ मंडळींनी इथं जायचं अशी वदंता तयार होते. पुन्हा या खोलीचा ‘स्पेस’ अर्थात अवकाश म्हणून विचार कुणीच केलेला नसतो. तिला ‘Visual appeal’ अगदी शून्य असते. गेल्या तीन वर्षांमध्ये अनेक महाविद्यालयांनी हा ‘माहोल’ बदलायला सुरुवात केली. ‘इमोफिट’ ( Emofit) अशी पटकन रुळणारी नावं वापरली जाऊ लागली. हा कक्ष कॅन्टीन, जिमखाना अशा रहदारीच्या भागात आला. इथं प्रवेश करतानाच, कम्फर्टेबल वाटावं अशी रचना अगदी माफक खर्चात करता येते हे आमच्या कॅटेलिस्टनी करून दाखवलं. नेहमीच्या ‘टेबल-खुर्ची’ या डॉक्टरी पद्धतीला छेद देणारी मोहक जागा उभी राहिली. पण इथं विद्यार्थी यायला तर हवेत. त्यासाठी भावनिक जाण आणणारे अनुभव कॅम्पसमध्ये पेरायला हवेत. एका परिसरात ‘इमोशनल व्हील’ बनवायचा ठरला आहे. त्यावर रंग आणि भावनांची नावं असतील. आपल्या मूडप्रमाणे त्यातील ‘काटा’ अॅडजस्ट करायचा. झाला तो ‘सेल्फी पॉइंट’. भावनिक प्रशिक्षणासाठी, एकविसाव्या शतकातील जगण्याला साजेशा शैलीत ज्ञान-माहिती द्यायची आहे. आमच्या एका महाविद्यालयाने टेन्शन मोजण्याचा ‘टेन्सो-मीटर’ तयार करून तो वर्गावर्गांत वापरायला सुरुवात केली. आज अशा शंभरावर जास्त कल्पना विविध परिसरांत राबवल्या जायला लागल्या आहेत. वर्गातील विद्यार्थिसंख्या फक्त उपस्थितीने नाही तर भावनिक जवळिकीने वाढावी तसेच टिकावी यासाठीचे अनेक प्रयोग ग्रामीण-आदिवासी भागातील महाविद्यालयं करू लागली आहेत.

पण त्या वेळी हे सारं घडायचं होतं, घडवायचं होतं. त्यासाठी योग्य उमेदवार शोधण्याची प्रक्रिया सुरू करायची होती. या प्रकल्पात स्वयंसेवक म्हणून काम करण्यास उत्सुक प्रतिनिधी कसे शोधावेत याची मार्गदर्शक तत्त्वं आम्ही तयार केली. ती महाविद्यालयाच्या प्राचार्यांसाठी तसेच मॅनेजमेंटसाठी होती. शिक्षक, शिक्षकेतर, विद्यार्थी या सर्व गटांचे प्रतिनिधी शोधताना फक्त गुणवैशिष्ट्यांची यादी देण्यापेक्षा आम्ही काही ‘शब्दचित्रं’ तयार केली. हे वर्णन वाचल्यावर तुमच्या संस्थेतील कोणती व्यक्ती उभी राहते डोळ्यासमोर ते ओळखा. प्रकल्पाची माहिती देणाऱ्या, ‘प्रतिमा-बैठकी’ सुरू झाल्या. सहभागी होणारी जिल्हानिहाय एक अशी छत्तीस महाविद्यालयं आणि तीन स्वायत्त विद्यापीठ परिसर अशा ३९ प्राचार्यांच्या गटांसोबत तीन बैठकी झाल्या. प्रत्येक परिसराने सहा प्रतिनिधी पाठवावेत असंही ठरलं. ही निवड ‘एम. एस.एफ. डी. ए.’च्या शैक्षणिक सल्लागारांमार्फत झाली.

आणि दहा-अकरा महाविद्यालयांच्या पहिल्या गटाबरोबर पाच दिवसांचं प्रशिक्षण योजण्यात आलं, महाडजवळच्या बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठाच्या परिसरात. पावसाळी वातावरणात, रस्त्याची आव्हानं पेलत, मी आणि तीन सहकारी आदल्या रात्री डेरेदाखल झालो. माझ्या अंगात ‘व्हायरल’ तापाची कणकण होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सारे प्रतिनिधी जमले. आणि धक्के बसायला सुरुवात झाली. काही प्राचार्यांनी हा प्रकल्प ‘मानसशास्त्राचा’ म्हणून त्या विभागाकडे सोपवून दिला होता. काही ठिकाणी ‘वेळ असलेल्या’ प्राध्यापकांना ‘काही तरी शिकून या’ यासाठी पाठवलं होतं. नेमकं काय होणार आहे याची स्पष्ट कल्पना देऊन जागृतपणे संघ पाठवणाऱ्या जेमतेम चार संस्था होत्या.

अशा गटाला ‘परिवर्तन-सन्मुख’ करण्याचं आव्हान आहे हे कळताच माझा शारीरिक ताप कुठच्या कुठे पळाला. ‘मन म्हणजे काय?’ पासून शिकवणं सुरू झालं. ते समोरच्यांना व्यक्तिगत पातळीवर उपयुक्त वाटू लागलं. आमच्यात मैत्रीचं वातावरण तयार होऊ लागलं. मी सांगत होतो, ‘‘त्या दिवशी रात्री, शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे गेले होते. पावनखिंड लढाई घडली त्याच्या आदली रात्र… जेवणानंतर एकत्र बसू या का रात्री, त्या आठवणी जागवत’’ असं मी सुचवलं. गेस्ट हाऊसच्या पोर्चमध्ये आम्ही सारे बसलो. बाहेर पाऊस कोसळत होता. बोलताबोलता मी महाराजांच्या मार्गाचा नकाशा, समोरच्या मोठ्या कागदावर काढत होतो. या ‘अनुभवा’नंतरच्या ‘भावनां’वर आमच्या जोरदार गप्पा झाल्या. आणि दुसऱ्या दिवशीपासून आमच्या अभ्यासाला लय मिळाली. पाचव्या दिवशी साऱ्या गटांनी त्याच्या परिसराला ‘प्रज्ञा-परिसर’ बनवण्यासाठीच्या योजना सादर केल्या. या कार्यक्रमासाठी डॉ. निपुण मुंबईहून खास उपस्थित होते. एका प्रकल्पाचा शुभारंभ तर झाला होता. पुढच्या साडेतीन वर्षांमधली आव्हानं आणि आशेचे किरण आमची वाट पाहत होते.
(पुढल्या लेखात उत्तरार्ध.)