कोकण हे पावसाळ्यासाठी महाराष्ट्राचं प्रवेशद्वार. इथे पाऊस कोसळतो. पण गेली काही वर्षे इथेही त्याचं येणं बेभरवशाचं झालं आहे. रोपं वरती आल्यावर पावसाने ‘ताण’ दिला तर पुन्हा पेरणी करायची वेळ येते. इथली शेती शंभर टक्के शेतीवर अवलंबून असल्याने पावसाने ताण दिला तर नुकसान होतंच. शेतातली बहुसंख्य कामं करणाऱ्या इथल्या शेतकरी स्त्रीलाही प्रतीक्षा आहे ती चांगल्या पावसाची.
नेमेचि येणाऱ्या पावसाळ्यासाठी कोकण हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार मानलं जातं. दक्षिणेकडून केरळ-कर्नाटकमार्गे गोव्याची सीमा ओलांडून पाण्याने ओथंबलेले ढग वाजत-गाजत तळकोकणात प्रवेश करतात आणि संपूर्ण राज्यासाठी आगमनाचे शुभ संकेत देतात. अर्थात इथे पाऊस पडत नाही. तो आकाशातून थेट कोसळतो आणि इथल्या लाल मातीत मिसळून लाल होऊन जातो. चहूबाजूंनी लहान-मोठे मातकट ओहोळ ओसंडून वाहू लागतात. मातीतून हिरवे अंकुर फुटू लागतात. झाडं-वेली नवा तजेला लेऊ लागतात. एकाच हिरव्या रंगाच्या अनेक छटा निसर्गातल्या पानापानांवर दिसू लागतात. इथे पडणाऱ्या पावसाला मग छान लय सापडते. सारी धरती त्यामध्ये न्हाऊन निघते, तृप्त होते.
राज्याच्या काही भागांत गंभीर दुष्काळाचे चटके बसत असताना कोकणात मात्र निसर्गाचं हे चक्र गेली अनेक र्वष अव्याहतपणे चालू आहे. त्यामुळे इथे पाऊस न झाल्यामुळे हंगाम कोरडा जाण्याचा प्रसंग आजवर आलेला नाही. मात्र अलीकडच्या काळात या पावसाची लय थोडी बिघडल्यासारखी झाली आहे. पूर्वी रोहिणी नक्षत्रापासून (२५ मे) वळीवाच्या सरींचा तडीताघात सुरू होत असे. गेल्या काही वर्षांपासून हे नक्षत्र जवळजवळ कोरडे जाऊ लागले आहे. मृग नक्षत्राचा मुहूर्त धरून बरसणंही अनिश्चित होऊ लागलं आहे. पण सुदैवाने इथल्या शेतकऱ्याला वरुणराजाने मोठा दगा दिलेला नाही, फक्त प्रतीक्षा करायला लावलं आहे.
बदलल्या काळानुसार शेतीचं तंत्र बदललं तरी पावसावरचं अवलंबित्व कमी झालेलं नाही. कोकणातल्या भातशेतीला भरपूर पाऊस हवा असतो आणि तोही, शेतीच्या वेळापत्रकानुसार पडावा लागतो. गेली काही र्वष तसं घडत नाही. पावसाची कैफियत मांडताना सुरेखा घांगुर्डे (उंबर्ले, ता. दापोली) म्हणाल्या की, गेल्या वर्षी लावणीच्या वेळी पावसाने ओढ दिली. त्यामुळे लावण्या रखडल्या. शेतीची पुढची कामंही थांबली. सध्याच्या किरकोळ सरींवर बियाणं रुजून येतं, पण पुढे पाऊस राहिला नाही तर रोप सुकतं. शेतीची बरीचशी कामं आम्हा स्त्रियांचीच, त्यामुळे या पावसावर आमचं बारीक लक्ष असतं. तो कमी-जास्त होईल तसं शेतीच्या कामांचं नियोजन करावं लागतं. सुदैवाने घाटावरच्या जिल्ह्य़ांसारखा आपल्याकडे दुष्काळ पडत नाही. पण रोप वरती आल्यावर पावसाने ‘ताण’ दिला तर पुन्हा पेरणी करायची वेळ येते. चार-पाच वर्षांपूर्वी या भागात तसा प्रसंग ओढवला होता.
पाऊस सुरू झाल्यानंतर शेतीच्या कामांची धांदल उडते, पण पावसापूर्वीचीही बरीच कामं आम्हालाच करावी लागतात. पावसाळ्यातल्या सरपणासाठी लाकडं गोळा करणं, कडधान्य सुकवणं, पावसाळ्याचे चार महिने पुरेल एवढय़ा धान्याची आणि इतर पदार्थाची साठवणूक सगळ्या गोष्टी जातीनं बघाव्या लागतात.
पावसाबद्दलच्या सुरेखाताईंच्या तक्रारीला दुजोरा देत ममता जोशी (कारवांची वाडी, ता. रत्नागिरी) म्हणाल्या की, अलीकडे दरवर्षी पावसाचं वेळापत्रक बदलतंय हे खरंय. गेल्या वर्षी सुरुवातीला चांगला पाऊस पडला, पण नंतर गायबच झाला. त्यामुळे लावण्याही लांबल्या. शेतीची कामं रेंगाळली. यंदाही पावसाचा अंदाज घेत पेरण्या केल्या आहेत. पण अजून म्हणावा तसा पाऊस सुरू झालेला नाही. कोकणातली शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाच्या वेळापत्रकानुसार शेतीच्या कामांचं नियोजन करावं लागतं. पेरणीच्या वेळी, नांगरणी आणि लावणीच्या वेळी चिखलणीसाठी घरातली पुरुष मंडळी आवश्यक असतात. पण बाकी शेतीची बरीचशी कामं आम्हीच सगळ्या जणी करत असतो.
रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात डोंगराळ भाग कमी असल्यामुळे सलग शेती मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. पण काळाच्या ओघात इथेही निसर्गाचं चक्र बिघडलं आहे. संज्योती सावंत (कुणकेरी, ता. सावंतवाडी) सांगतात, ‘‘गेली सुमारे चाळीस र्वष मी शेती करतेय. पूर्वीची शेती कुटुंबाचा संपूर्ण बोजा वाहून नेणारी होती. पण अलीकडच्या काळात बेभरवशी पाऊस, निसर्गाचं बदलतं ऋतुचक्र आणि वन्य प्राण्यांमुळे शेतीचं नुकसान होतं. शेतीची बरीचशी कामं आम्ही बायकाच करतो त्यामुळे ज्यांच्या घरात महिला जास्त त्या कुटुंबांना शेती परवडते.’’
‘‘ पावसाच्या आगमनाबाबत हवामान खात्यातर्फे पूर्वसूचना दिली जाते. पण आम्ही चातक पक्ष्याच्या आवाजावरूनच पावसाचा अंदाज घेतो. सुदैवाने पावसाने कधी दगा दिलेला नाही. पण गेल्या काही वर्षांत दोन मोठय़ा पावसांमध्ये खंड पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याचा परिणाम शेतीच्या कामांवरही होतो आणि उत्पादनावरही. पावसाळी शेतीचा व्यवसाय अशा प्रकारे बेभरवशी ठरत असल्यामुळे उन्हाळ्यात भाजीपाला आणि फळ प्रक्रियेच्या छोटय़ा उद्योगांवरही आम्ही भार देऊ लागलो आहोत. गेली सुमारे पन्नास वर्षे शेती करत असलेल्या सीताबाई पेडणेकर (वेत्ये, ता. सावंतवाडी) यांच्याही मते कुटुंब चालवण्यासाठी शेतीचा व्यवसाय पुरेसा पडेनासा झाला आहे. त्या म्हणाल्या की, शेतीमध्ये इतकी वर्षे घालवल्यामुळे या व्यवसायातील सारे चढ-उतार मी जवळून पाहिले आहेत. कोकणाला निसर्गाचं वरदान आहे, असं म्हटलं जातं, पण सध्याच्या काळातील बदललेलं हवामान आणि पावसाचं बिघडलेलं चक्र या शेतीला मारक ठरत आहे. आमच्या कुटुंबात कोणीही नोकरी धंद्याला नसल्यामुळे आम्ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहोत. पावसाने चांगली साथ दिली तर भात चांगलं पिकतं, नाही तर त्यामध्येही घट येते. म्हणून आम्ही शेतीबरोबरच उन्हाळयात विटा बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. पण यंदाच्या हंगामात शासनाच्या जाचक अटींमुळे तोही अडचणीत आला आहे.
कोकणात विस्कळीत स्वरूपात का होईना, पण पाऊस पडतो. शेतं पिकतात. त्यामुळे उपासमारीची वेळ येत नाही, हे खरं असलं तरी कुटुंबाला पुरेल इतकं भात पिकण्याची हमी नसते. कारण इथे अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांची शेती पाण्याच्या स्रोतांपासून (नदी, ओहोळ) दूर असते. विहीर खणायलासुद्धा जागा नसल्यामुळे तो पर्यायही बाद होतो. अशा शेतकरी वर्गाचं दु:ख कथन करताना प्रमिला भाडवळकर (राजवाडी, ता. संगमेश्वर) म्हणाल्या की, पाऊस भरपूर झाला, शेती चांगली पिकली म्हणून थोडंच भागतंय? घरात खायला तोंडं दहा आणि खंडीभरसुद्धा भात पिकत नसलं तर पुढल्या वर्षांपर्यंत कसे दिवस काढायचे? शिवाय आमच्यासारख्या स्वत: कसून पिकवणाऱ्यांची शेतं सुखाडीला (पाण्याच्या स्रोतांपासून दूर). त्यामुळे ऐन लावणीच्या वेळी पाऊस गेला की साराच गोंधळ. आमच्यासारख्या छोटय़ा शेतकऱ्यांकडे स्वत:ची जोतंही (बैलजोडी व नांगर) नसतात. त्यामुळे जोतं असलेल्यांच्या सोयीनुसार शेतीची सगळी कामं करावी लागतात. तशात पावसाने पुढे-मागे केलं तर कोणाला सांगणार? त्यामुळे इथे पाऊस पुरेसा असला तरी आमच्यासारख्या छोटय़ा शेतकऱ्यांना वर्षभराची सोय होण्यासाठी कुठेतरी मजुरीशिवाय पर्याय नसतो.
आपण साधारणपणे पावसाने दगा दिला तर काय हाल होतात, याची चर्चा करतो. पण सुचिता पिलणकर (फणसोप, ता. रत्नागिरी) या शेतकरी महिलेच्या दृष्टीने पाऊस वेळेवर येण्याची चिन्हंसुद्धा महिलांची धांदल उडवून देतात. कारण कोकणात शेतकरी कुटुंबांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसची सुविधा फारच कमी ठिकाणी आढळून येते. त्यामुळे पावसाळ्यात स्वयंपाकासाठी चूल पेटवण्याशिवाय पर्याय नसतो. याच चुलीवर आंघोळीचं पाणी तापतं आणि पावसात शेतीची काम करून घरी भिजून आल्यावर शेकोटीही होते. पावसाळ्यात बाजारहाट शक्य नसल्यामुळे त्याची साठवणही पावसापूर्वी करावी लागते. अलीकडे कोकणात पावसाचं वेळापत्रक बिघडलं असल्यामुळे लावणीच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ लागल्याच्या सार्वत्रिक तक्रारीला सुचिताताईंनी दुजोरा दिला. दुष्काळाचे फटके वारंवार बसणाऱ्या मराठवाडा-विदर्भासारख्या प्रदेशात शेतकरी महिलांना अस्तित्वासाठीची लढाई करावी लागते. कोकणातल्या शेतकरी महिलेची स्थिती सुदैवाने तेवढी वाईट नाही. पण पाऊस गरजेप्रमाणे पडला नाही तर निर्माण होणाऱ्या अडचणींना तिलाही तोंड द्यावं लागतं. अनेक जणींच्या शेतात पिकतं, पण तेवढय़ानं भागत नाही; त्या शेतजमिनीतून अन्य प्रकारेही हा खड्डा भरून काढता येत नाही. अशा वेळी अन्नपूर्णेची भूमिका निभावणाऱ्या कारभारणीची होणारी कसरत तीच जाणे !