आपल्या घरातील कचरा किती उत्पादक आहे आणि थोडय़ाशा प्रयत्नातून, चिकाटीतून आपल्या कुटुंबाची, परिसराची भाजी-फळांची गरज कशी भागवता येते हे दाखवणारा, मुंबईतील उंच इमारतींच्या गच्च्या-गॅलऱ्यांमध्ये रुजत फोफावलेला ‘अर्बन लीव्हज्’चा एक हिरवा प्रवास..!
ऐनवेळी चार पाहुणे जेवायला आले तर परसात लावलेल्या वांग्याच्या रोपावरची चार वांगी तोडून त्याची भाजी करण्याची सोय शहरातील ‘टु बीएचके’वाल्यांना नाही. चुलीवरील गरम कांद्या पोह्य़ांवर अंगणात उगवलेली ताजी कोवळी कोथिंबीर घालण्याचे सुखही त्यांच्या नशिबी नाही. ही मुलं संगणकावर लुटुपुटुची शेती ‘फार्म विले’ खेळता-खेळता करतात आणि त्यामुळेच ‘आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले. एका बीजापोटी तरू कोटी’ हा अनुभवही शहरवासीयांना फक्त कवितेत वाचता येतो. या समजुतीत जगत असताना एका मित्राने उल्लेख केला प्रीती पाटील आणि तिच्या ‘अर्बन लीव्हज्’चा आणि डोळय़ापुढे एक हिरवा प्रवास उलगडत गेला.. मुंबईतील उंच इमारतींच्या गच्च्या-गॅलऱ्यांमध्ये रुजत फोफावलेला!
‘अर्बन लीव्हज्’चा शोध घेताना त्यासोबत पहिले नाव येते ते प्रीती पाटीलचे, पण त्यासोबत कंसात, अव्यक्त अशी अनेक नावे आहेत. जी या संस्थेच्या जन्मापासून तिच्याशी जोडली गेली आहेत. ‘अर्बन लीव्हज्’ हे नाव जिने सुचवले ती सॅब्रिना, ‘शहरी अन्न आणि शाश्वत शेती’ या चळवळीत अमेरिकेत अतिशय सक्रिय असलेली पण आता भारतात परतलेली देवी आणि अतिशय प्रेमाने, हौशीने घराच्या गच्चीवर, गॅलरीत बाग फुलवत असलेली ज्योती असा समविचारी मैत्रिणीचा गोतावळा जमला आणि बघता-बघता शहरी शेतीचे छोटे प्रयोग सुरू झाले.
आयुष्य बदलवणारं वळण
आयुष्य जगताना अनेक अडचणी, अनेक आव्हानं कमी-अधिक गंभीरपणे समोर ठाकतच असतात. पण काही वेळा आयुष्य तिथंच थांबतं, साचून राहातं. अशा वेळी त्यातून बाहेर कसं पडायचं, हा यक्षप्रश्न निर्माण होतो. पण त्याही प्रश्नाचं उत्तर मिळवता येतं, एक भलं मोठं वळण घेऊन, एक यू-टर्न घेऊन! आम्हाला प्रतीक्षा आहे वाचकांकडून येणाऱ्या अशा ‘यू-टर्न’च्या अनुभवांची. ते निर्णय वा परिस्थिती ज्यांनी तुमचं आयुष्य आमूलाग्र बदलून टाकलं, काय होता तो अनुभव? (अधिक माहितीसाठी पहा चतुरंगचा ९ नोव्हेंबरचा अंक)
अनुभव पाठवताना पाकिटावर किंवा ई-मेलवर सब्जेक्टमध्ये –
चतुरंग, ‘यू-टर्न अनुभव’ असा उल्लेख गरजेचा.
आमचा पत्ता- ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा मेल करा.
arati.kadam@expressindia.com
chaturang@expressindia.com.
प्रीती ही १९९२पासून मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये केटरिंग ऑफिसर म्हणून काम करते. हजार-दोन हजार कर्मचाऱ्यांचे अन्न शिजवता-शिजवता त्यातील ओला कचरा आणि वाया जाणारे अन्न जेव्हा कचऱ्याच्या गाडीतून रवाना होत असे तेव्हा त्याच्या पुढील वाटचालीचे विषण्ण करणारे चित्र तिच्या डोळय़ापुढे येत असे. २००० साली डॉ.डी.टी. दोशी यांच्या गच्चीवरील बागेने तिला एक नवा दृष्टिकोन दिला. तो होता कचऱ्याकडे संसाधन म्हणून बघण्याचा. रोज ट्रकमध्ये भरून डम्पिंग यार्डकडे रवाना होणारा हा कचरा किती उत्पादक आहे याचे प्रात्यक्षिकच जणू तिच्यासमोर उभे होते. त्यातून प्रेरणा घेत तिने आधी स्वत:च्या घरातील गच्चीवर आणि गॅलरीत हा प्रयोग सुरू केला. या प्रयोगाने तिला कचऱ्याच्या प्रश्नावर ‘हिरवे उत्तर’ तर मिळाले, पण अनेक शंकाही निर्माण झाल्या. एक मात्र नक्की, बी रुजले होते. वाट बघत होते तरतरीत सूर्यप्रकाश आणि पोषणाची! ते मिळाले दीपक सुचदे आणि श्रीपाद दाभोळकर यांच्याकडून. त्यांनी तिला कमीत कमी जागेत, उपलब्ध साधनसामग्रीत (तुटलेली बादली, बाटली, प्लॅस्टिक गोण्या वगैरे!) कशी शेती करता येते हे सांगताना ‘अमृत माती’ तयार करण्याचा मंत्र दिला आणि प्रीतीने पोर्ट ट्रस्टच्या इमारतीच्या भल्या मोठय़ा गच्चीवर शेती करण्याचा प्रयोग हाती घेतला. कार्यालयातील सर्व भंगार, तुटक्या-मोडक्या वस्तूंचे ओझे मांडीवर घेऊन जगणाऱ्या या गच्चीत बघता-बघता भाज्यांचे वाफे, फळझाडे आणि अगदी नारळापासून तांदूळ लागवडीपर्यंतचे प्रयोग सुरू झाले आणि या प्रयोगाच्या चर्चेच्या निमित्ताने समविचारी मित्र-मैत्रिणींचे मोहोळ प्रीतीभोवती जमू लागले. ‘अर्बन लीव्हज्’चे बीज या भेटीगाठीतून रुजत होते. विशेषत: ‘अमृत माती’ बनवण्याच्या कार्यशाळांमधून या स्वप्नाला आकार येत गेला.
आपल्या घरातील कचरा किती उत्पादक आहे आणि थोडय़ाशा प्रयत्नातून, चिकाटी दाखवल्यास त्यातून आपल्या कुटुंबाची, परिसराची भाजी-फळांची गरज कशी भागवता येते हे लोकांना पटवून देण्यासाठी तसा प्रयोग प्रत्यक्ष उभा करण्याची गरज होती. त्यासाठी पार्कचे उपसंचालक अविनाश कुबल यांनी पार्कमधील काही जागा या गटाला दिली आणि त्यातून हा गट फोफावत गेला. आपल्या घरातील कचरा डम्पिंग यार्डपर्यंत वाहून नेण्यात किती प्रचंड ऊर्जा खर्च होते, हा कचरा जाळणे ही किती धोकादायक बाब आहे हे ज्यांना मनोमन पटले होते, पण त्या प्रश्नावर उत्तर मिळत नव्हते अशी अनेक मंडळी या हिरव्या वाटेकडे वळली. घराच्या छोटय़ाशा गॅलरीतील कुंडय़ामधून कोथिंबीर, पुदिना लावण्याचे प्रयोग, मग घराच्या गच्चीवर भेंडी, भोपळे किंवा चिक्कू, सीताफळ लागवडीइतके उत्सुक आणि आग्रही होऊ लागले.
अर्थात, केवळ घरातील विघटनशील कचऱ्याचा उत्पादन वापर एवढाच मर्यादित हेतू ‘अर्बन लीव्हज्’च्या जन्मामागे नाही. तो थेट आपल्या जीवनशैलीशी आणि निरोगी राहण्याशीही जोडलेला आहे. आज बाजारात येणाऱ्या आणि सदासर्वकाळ रसरशीत दिसणाऱ्या भाज्यांच्या आरोग्याचे (की अनारोग्याचे?) रहस्य त्यावर मारल्या जाणाऱ्या घातक कीटकनाशकांमध्ये आहे. आत्ता-आत्तापर्यंत ज्या मोसमी भाज्या व फळं ज्या विशिष्ट हंगामात मिळत त्या आता जणू बारमाही झाल्यागत बाजारात दिसतात. या गोष्टींचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय हे लक्षात घ्यावे. यावर उपाय म्हणून आपल्या स्वयंपूर्णतेचा विचार करावा. असे सांगणारी ‘अर्बन लीव्हज्’ संदेश देते. Reap what you sow and eat what you grow k ‘अर्बन लीव्हज्’ प्राधान्याने, गेल्या चार वर्षांपासून शहरी शेती करू इच्छिणाऱ्या व्यक्ती आणि गटांशी विविध निमित्ताने जोडले गेले आहे. त्यातील एक निमित्त आहे. प्रशिक्षण कार्यशाळा. ‘अमृत माती’ बनवण्याचे आणि घराची गच्ची-गॅलरी अशा कमी जागेतही झाडे कशी वाढवता-जोपासता येतील याचे प्रशिक्षण संस्थेतर्फे दिले जाते. संस्थेच्या स्थापनेपासून गेल्या चार वर्षांत समविचारी स्वयंसेवकांची जी एक गजबज ‘अर्बन लीव्हज्’मध्ये झाली आहे. त्यात या विषयात चांगला अनुभव आणि अधिकार असलेली अनेक मंडळी आहेत. शाश्वत शेतीचे नियोजन कसे करायचे याची जाणकारी असलेल्या क्लिआ चांदमल, औषधी वनस्पतींमधील तज्ज्ञ कुसुम दहिवेलकर, कोणता व कसा आहार घेणे आरोग्यदायी या विषयात अधिकार असणाऱ्या अंजू वेंकट या आणि अशा अनेक मैत्रिणींचा आणि मित्रांचाही सहभाग या प्रशिक्षणामध्ये असतो. या प्रशिक्षणांमधून हिरवाईचे महत्त्व तरुण वर्गाला समजावे यासाठी सतत प्रयत्न केले जातात.
फेसबुकसारख्या माध्यमातून मुंबईतील असंख्य बागवेडय़ांशी ‘अर्बन लीव्हज्’ जोडलेली आहेच आणि त्या माध्यमातून झाड, लागवड, त्याची जोपासना, त्यांचा हंगाम, त्यातील प्रश्न याची तर चर्चा व अनुभवांची देवाण-घेवाण होतेच. पण गच्चीवर उगवणाऱ्या, आपल्या हातांनी वाढवलेल्या ताज्या फळे व भाज्यांच्या आरोग्यदायी पाककृतींची देवाणघेवाणही या माध्यमातून होते. हे शहरी शेतकरी विविध निमित्ताने एकत्र भेटतात तेव्हा याच ‘चविष्ट चर्चा’ रंगतात.
पण याखेरीज, ‘अर्बन लीव्हज्’ सध्या शहरात पाच कम्युनिटी फार्मस्च्या जोपासनेचा प्रयोग करीत आहे. बाबुलनाथच्या इस्कॉॅन मंदिराच्या गच्चीवर, माटुंग्यातील डॉन बॉस्को शाळेच्या गच्चीवर, अंधेरीत भवन्सच्या प्रांगणात, बोरिवलीच्या गोपाल गार्डन शाळेत ‘अर्बन लीव्हज्’चे स्वयंसेवक कम्युनिटी फार्मिग करीत आहेत. कॉटन ग्रीन या उपनगरातील एका मुलींच्या अनाथाश्रमात जेव्हा हा प्रयोग सुरू करण्याचे ठरवले तेव्हा त्यांना जाणवले की या अनाथाश्रमात राहणाऱ्या शंभर मुलींना पुरेसे पाणीच येथे नाही मग शेतासाठी पाणी अधिक पुढची बाब आहे. मग या गटातर्फे आधी पावसाच्या पाण्याच्या शेतीचा प्रयोग करून पाण्याची सोय केली गेली आणि मग गच्चीवरील शेतीचा प्रयोग हाती घेतला गेला.
हा प्रयोग फोफावत गेला तो त्यातील यश आणि मौज याचा अनुभव घेतल्यावर! घरातील ओला कचरा बघता-बघता मऊ काळय़ाभोर मातीत बदलत जाताना बघणे आणि या मातीतून फुटणारा कोवळा पोपटी अंकुर ताज्या, रसरशीत भाजीचे रूप घेताना बघतो तेव्हा सर्जनाची एक जिवंत प्रक्रिया आपल्या समोर उलगडत जाते. त्या झाडाच्या कोवळ्या रोपांशी जिव्हाळय़ाचे नाते जडते आणि हे हिरवे वेड तुमच्या मानगुटीवरच बसते! पोर्ट ट्रस्टच्या इमारतीच्या गच्चीवरील बागेत सहा-सात डझन चिक्कू, नऊ-दहा किलो पपया, ३०-४० सीताफळ लागलेली आहेत, असं अभिमानाने प्रीती सांगते तेव्हा असा ‘चमत्कार’ तुमच्या घराच्या गच्चीवरही घडू शकतो असं आश्वासन त्यामागे असतेच आणि अशी बाग किंवा अशी शेती करण्याचा प्रयोग जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा आपल्याही नकळत आपण निसर्गाच्या एका चक्राशी जोडले जातो.
vratre@gmail.com