-डॉ.स्मिता जोशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज भारतात स्त्रियांमध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तनाचा कर्करोग हा पहिल्या क्रमांकाचा तर गर्भपिशवी मुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कर्करोगाचा प्रतिबंध करणे शक्य आहे, परंतु तरीही या कर्करोगामुळे दर ८ मिनिटाला एक स्त्री मरण पावते. गर्भपिशवी मुखाच्या कर्करोगाचे निर्मूलन करायचे असेल तर ‘एचपीव्ही लसीकरण’ हा राष्ट्रीय कार्यक्रम होणे गरजेचे आहे. तसे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहेत.

कालच सुलोचनाताईंची एका मोठ्या रुग्णालयामध्ये गर्भपिशवी मुखाच्या कर्करोगावरची (cervical cancer) शस्त्रक्रिया करण्यात आली. खरे तर त्यांना आम्ही ५-६ वर्षांपूर्वीच लीप किंवा लेट्झ हा उपचार सांगितला होता कारण त्यांची एचपीव्हीची (Human papillomavirus) तपासणी ‘पॉझिटिव्ह’ होती आणि गर्भपिशवीच्या मुखाशी असलेल्या पेशींमध्ये काही असाधारण बदल दिसत होते. हा उपचार फक्त तेवढ्या भागाला भूल देऊनच केला जातो, परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि कर्करोगासारखा आजार जो टाळता येऊ शकतो तो शेवटी झालाच. तशाच दुसऱ्या शांताताई. त्यांचे वय अंदाजे ६२ वर्षे. काही काळ रक्तस्राव होत होता म्हणून त्या तपासणीसाठी आल्या, तेव्हा त्यांना कर्करोग झालेलाच होता. या प्रसंगांवर विचार करायला लागले की, या आणि अशा अनेक स्त्रियांचे चेहरे आणि त्यांच्या कहाण्या डोळ्यासमोरून जातात. सुलोचनाताईंमुळे परत एकदा आवर्जून वाटले की, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यक आहे.

हेही वाचा…ईतिश्री : थोडीसी बेवफाई?

भारतामध्ये २०२२ मध्ये जवळपास १,२७,५०० स्त्रियांना गर्भपिशवी मुखाच्या कर्करोगाचे निदान झाले तसेच सुमारे ८० हजार स्त्रिया या कर्करोगामुळे मृत्यू पावल्या आहेत. म्हणजेच दर ८ मिनिटाला एका स्त्रीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कर्करोगाच्या प्रतिबंधाकडे जास्तीत जास्त गांभीर्याने बघणे आणि त्यावरचा उपाय जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत पोहोचवणे तातडीचे आहे.

गर्भपिशवी मुखाचा कर्करोग हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) या विषाणूच्या दीर्घकालीन संसर्गामुळे होतो. गर्भपिशवी मुखाचा ७० ते ८० टक्के कर्करोग हा एचपीव्ही १६ आणि १८ या अतिधोकादायक असणाऱ्या जातींमुळे होतात, पण गर्भपिशवी मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करता येणे शक्य आहे आणि त्यासाठी दोन प्रभावी मार्ग आहेत.

पहिला मार्ग म्हणजे किशोरवयीन मुलींना एचपीव्हीची लस देणे. ९ ते १५ हे लशीसाठी सर्वांत योग्य वय आहे, मात्र त्यावरील म्हणजे १५ वर्षांवरील मुलीही ही लस घेऊ शकतात. एचपीव्हीची लस ही सुरक्षित आहे आणि जगभरात १३७ देशांमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात उपलब्ध आहे. या लशीमुळे एचपीव्हीपासून होणाऱ्या इतर कर्करोगापासूनही संरक्षण होते. उदा. स्त्रियांमध्ये योनीमार्गाचा कर्करोग, स्त्रीच्या बाह्य जननेंद्रियाचा, गुदद्वाराचा, तोंड आणि घशाचा कर्करोग तसेच पुरुषांमध्ये लिंगाचा, गुदद्वाराचा, तोंड आणि घशाचा कर्करोग आदी.

हेही वाचा…‘ती’ च्या भोवती : विस्तारलेल्या आईपणाचा प्रत्यय!

सिक्कीममध्ये शालेय स्तरावर किशोरवयीन मुलींना तेथील शासनाच्यावतीने ही लस मोफत दिली जाते. अलीकडे ‘सिरम इन्स्टिट्यूट’ने तयार केलेली ‘सर्वाव्हॅक’ (Cervavac) ही लस मुलग्यांनाही देता येते. या लशीमुळे एचपीव्ही १६ आणि १८ जातींमुळे होणाऱ्या कर्करोगापासून संरक्षण होते.
प्रतिबंधाचा दुसरा मार्ग म्हणजे विवाहित किंवा शरीरसंबंध आले असतील अशा ३० वर्षांपुढील सर्व स्त्रियांनी कोणताही त्रास नसला, तरी एचपीव्हीची तपासणी करणे. तपासणीमध्ये जर एचपीव्हीचा संसर्ग आहे, असे समजले, तर इतर काही तपासणी करून (उदा. कॉल्पोस्कोपी) कोणते उपचार करायचे हे आपण ठरवू शकतो. वेळीच केलेल्या उपचारामुळे कर्करोगाचा प्रतिबंध होऊ शकतो. सध्या अनेक एचपीव्हीच्या चाचण्या उपलब्ध आहेत, परंतु प्रमाणीकरण (validation) झालेल्या एचपीव्हीच्या चाचणीनेच नेहमी तपासणी करावी.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ (NFHS-५, २०१९-२१) नुसार भारतामध्ये २ टक्क्यांपेक्षाही कमी स्त्रियांच्या गर्भपिशवी मुखाच्या कर्करोगाची तपासणी होते. हे प्रमाण किमान ७० टक्क्यांपर्यंत नेणे आवश्यक आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हायला पाहिजे. स्त्रियांनी न घाबरता, न लाजता स्वत:ची तपासणी करणे आवश्यक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ९०-७०-९० धोरणानुसार, २०३० पर्यंत ९० टक्के मुलींचे एचपीव्हीचे लसीकरण व्हायला हवे. ७० टक्के स्त्रियांची एचपीव्हीची तपासणी व्हायला हवी व ९० टक्के स्त्रियांना कर्करोगपूर्व बदल किंवा कर्करोग असेल, तर उपचार मिळायला हवेत. जर हे ध्येय आपण २०३० पर्यंत गाठले, तर या शतकाच्या अखेरीस गर्भपिशवी मुखाच्या कर्करोगाचे निर्मूलन होऊ शकते.

हेही वाचा…सांधा बदलताना : पालकत्वाच्या मर्यादा

राज्यसभेच्या खासदार, ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात सरकारने या कर्करोगाच्या प्रतिबंधात्मक एचपीव्हीची लस आपल्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात उपलब्ध करून द्यावी याबद्दल विनंती केली होती. त्या म्हणाल्या की, ‘‘देशात सध्या स्त्रियांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. आपली सामाजिक-कौटुंबिक व्यवस्थाच अशी आहे की, ज्यामध्ये स्त्रियांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. या कर्करोगाच्या बाबतीत तर अनेक जणी जेव्हा रुग्णालयात पोहोचतात तेव्हा तो तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर गेलेला असतो. आपल्या कुटुंबव्यवस्थेत एखाद्या स्त्रीचे निधन झाले, तर बऱ्याचदा नवरा दुसरे लग्न करू शकतो, पण मुलांना दुसरी आई मिळत नाही. म्हणूनच या कर्करोगावर आधीच प्रतिबंधात्मक उपाय करायलाच हवेत. आज देशातल्या नऊ ते १५ वर्षं वयोगटातील मुलींना वयाच्या पुढच्या टप्प्यावर गर्भपिशवी मुखाचा कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक एचपीव्ही लस दिली जाते. या मुलींनी ही लस घेतली तर त्यांना एचपीव्हीमुळे होणाऱ्या कर्करोगापासून प्रतिबंध होईल. विशेष म्हणजे या आजारावर प्रतिबंध करणाऱ्या लशीची आज बाजारात असलेली किंमत सर्वसामान्यांना परवडेल इतकी करावी किंवा मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात यावी.’’

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही आपल्या निवडणूकपूर्व अर्थसंकल्पीय भाषणात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी देशभरातील ९ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींच्या लसीकरणाचा प्रस्ताव ठेवला. त्या दृष्टीने लवकरच मोहीम राबविली जाण्याची आशा आहे.

‘प्रयास’ ही पुण्यातील ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करणारी सेवाभावी संस्था आहे. या संस्थेमध्ये गर्भपिशवी मुखाच्या कर्करोगाची तपासणी, कॉल्पोस्कोपी, बायोप्सी आणि उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. तसेच गरीब आणि मध्यमवर्गीय स्त्रियांसाठीची शिबिरे मिळणाऱ्या देणगीमधून पुणे शहर व परिसरात केली जातात. या शिबिरांमध्ये स्त्रियांची मोफत एचपीव्हीची तपासणी आणि ‘प्रयास’मध्ये कर्करोगपूर्व बदलांवर मोफत उपचार केले जात असून अधिक माहितीसाठी प्रयास, पुणे (दूरध्वनी क्र. ९६५७६३२२२४ /०८६०५८८२६४९) येथे संपर्क साधावा.

हेही वाचा…स्वभाव – विभाव : ते असे का वागतात?

कर्करोग कोणताही असो, पण जेव्हा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाला आहे, असे निदान होते तेव्हा संपूर्ण कुटुंब हादरून जाते. मग शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी यासाठी रुग्णालयाच्या चकरा सुरू होतात. त्याबरोबरच अतोनात खर्च व मानसिक ताण आपोआपच येतो आणि म्हणूनच जर कर्करोगासारखा आजार टाळता येणार असेल, तर त्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय करायला हवेतच. आपण अनेकदा ऐकतोच, prevention is better than cure.

(लेखिका गर्भपिशवी मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी गेली अनेक वर्षे संशोधन करीत आहेत)

smita. j@prayaspune.org

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urgent need for national hpv vaccination program to combat cervical cancer in india psg