कधी काळी इंटर्न म्हणून रुजू झालेली उर्सुला बर्न्स आज ‘झेरॉक्स कॉर्पोरेशन’ या नावाने विख्यात असलेल्या बहुराष्ट्रीय आणि विशालकाय कंपनीची पहिली आफ्रिकी अमेरिकी महिला सीईओ आहे. ‘फॉर्च्यून फाइव्ह हंड्रेड’ बिरुदावली कमावणाऱ्या या कंपनीत उर्सुला बर्न्स पहिली ‘ब्लॅक’ स्त्री आहे. ‘‘स्वप्ने सत्यात येतात; पण इतरांचे सहकार्य हवेच असते. उत्तम शिक्षण, उच्च कोटीची नतिक मूल्ये आणि कधी कधी झुकण्याची तयारीदेखील हवी!’’ असं उर्सुला सांगते. तिच्याविषयी..
‘झे रॉक्स’ हा शब्द आपल्याला अगदी न कळत्या वयापासून परिचित होऊ लागतो. खरे तर या कंपनीचे कार्यक्षेत्र गगनाला गवसणी घालणारे आहे; पण ‘फोटो कॉपी’ची सेवा देणाऱ्या प्रिंटिंग मशीन्स बनवणारी झेरॉक्स ही कंपनी अशी या कंपनीची ढोबळमानाने ओळख सर्वसामान्यांना आहे. आपण भारतीय कागदपत्रांच्या कुठल्याही फोटो प्रती काढताना त्यांच्या ‘झेरॉक्स’ काढल्या, असे म्हणतो इतका हा शब्द सर्वसामान्य जनतेला परिचित झाला आहे.
व्यवसायाने पेटंट अटर्नी असलेल्या चेस्टर कार्लसन यांनी झेरॉक्सोग्राफीचा शोध १९३८ साली लावला आणि न्यूयॉर्कमध्ये त्यांनी झेरॉक्स कंपनीचे कार्यालय उघडले. आजच्या सूचना आणि प्रसारणाच्या अत्याधुनिक युगात माहितीची घेवाण सुलभपणे करता यावी यासाठी हे अतिशय महत्त्वाचे तंत्रज्ञान होते आणि आजही आहे. इंटरनेट तंत्रज्ञानाचा पाया घालण्यातही ‘झेरॉक्स’चे मोठेच योगदान आहे. ५००० हून शास्त्रज्ञांच्या सहकार्याने ही कंपनी आजही या क्षेत्रात अग्रगणी आहे.
अधिक महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीत कधी काळी इंटर्न म्हणून रुजू झालेली उर्सुला बर्न्स आज ‘झेरॉक्स कॉर्पोरेशन’ या नावाने विख्यात असलेल्या या बहुराष्ट्रीय आणि विशालकाय कंपनीची पहिली आफ्रिकी अमेरिकी महिला सीईओ आहे. ‘फॉर्च्यून फाइव्ह हंड्रेड’ ही बिरुदावली कमावणाऱ्या या कंपनीत उर्सुला बर्न्स पहिली ‘ब्लॅक’ स्त्री आहे. ‘‘स्वप्ने सत्यात येतात; पण इतरांचे सहकार्य हवेच असते. उत्तम शिक्षण, उच्च कोटीची नतिक मूल्ये आणि कधी कधी झुकण्याची तयारीदेखील हवी!’’ उर्सुला बर्न्स यांचे हे विधान त्यांच्या आयुष्यातील वाटचालीवर एक नजर टाकल्यास अधिकच स्पष्टपणे जाणवत राहते.
मॅनहटन शहराच्या बाहेरील एका बरुच हाऊसेस नावाच्या बकाल हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये तीन भावंडांसोबत वाढलेली ही मुलगी! तिचे आईवडील दोघेही पनामोनिया या आफ्रिकी देशातून स्थलांतरित झालेले होते. उर्सुलाची आई तिच्या वडिलांपासून विभक्त झाली होती. उपजीविकेकरिता उर्सुलाची आई ‘डे केअर सेंटर’ चालवीत असे आणि लोकांचे कपडे इस्त्री करून देण्याचे कामही करीत असे. आजूबाजूला सदैव गुन्हेगारी, व्यसने, मारामाऱ्या आणि श्वेत-कृष्णवर्णीयांशी संघर्ष पाहातच ती मोठी झाली.
‘‘मला अनेक जण माझ्या भवितव्याबद्दल सावध करत. त्यांच्या दृष्टीने माझ्या बाबतीत ज्या तीन गोष्टी माझ्याविरुद्ध जात होत्या त्या म्हणजे मी कृष्णवर्णीय होते, मी मुलगी होते आणि मी गरीब होते. थोडक्यात, मला स्वप्ने पाहण्याचा अधिकार नाही असे त्यांना सुचवायचे असावे.’’
पण उर्सुलाच्या आईला ते पटत नसावं. ती नेहमी म्हणायची की, तुम्ही पूर्वी कुठे होतात यावर तुम्ही कोण आहात हे ठरत नाही. मुलांनी आपले शिक्षण पूर्ण करण्यावर तिचा भर होता. शिक्षण घेतले तरच या परिस्थितीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे, असे तिचे मत होते.
उर्सुला सांगते, ‘‘आपल्या तुटपुंज्या कमाईतूनही मला तिने चांगल्या कॅथलिक शाळेत घातले.’’
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर उर्सुलापुढे तीन पर्याय होते. नन, टीचर किंवा नर्स यापकी काही तरी एक बनण्याचे. खरं तर उर्सुलाला यापकी कुठलाही पर्याय पसंत नव्हता. यापकी एक काही तर बनून एका सुनिश्चित भवितव्याकडे मी सहज वळू शकले असते; पण माझे मन मला रोखत असे, तर कधी बंड करून उठत असे.’’
तिला खरे तर इंजिनीयर व्हायचे होते. ब्रुकलीन पोलिटेक्निकमध्ये तिला प्रवेश तर मिळाला; पण उर्सुला चिंतित होती. ही शाळा न्यूयॉर्कच्या एका लांबच्या उपनगरात होती. तिथली मुले आपल्यापेक्षा नक्कीच चटपटीत आणि हुशार असणार (श्वेतवर्णीय असल्याने) आणि आपले तिथे कसे निभेल असे उर्सुलाला वाटत असे. श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्यातील संघर्षांच्या, श्वेतवर्णीयांच्या उच्च-नीचतेच्या कल्पनांचा लहानपणापासून तिला परिचय झालेला होताच!
‘‘माझा स्वत:वर काडीइतकाही विश्वास नव्हता. स्वत:च्या क्षमतांबद्दल मी सदैव साशंक असे,’’ असे ती सांगते. इंजिनीयिरगच्या प्रवेशाबद्दल उर्सुला सांगते, ‘‘माझी आई आणि कॅथ्रेडल स्कूलमधील माझे शिक्षक यांनी मला खूप समजावले. माझी भीती काही प्रमाणात दूर झाली आणि मेकॅनिकल इंजिनीयिरगचा अभ्यासक्रम सुरू झाला.’’ १९८० मध्ये तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीयिरगची पदवी मिळवली आणि लगेचच पुढील दोन वर्षांत ‘मास्टर्स’ (पदव्युत्तर) ही पूर्ण केले. १९८० मध्येच तिला ‘समर इंटर्न’ (विद्यार्थ्यांसाठी असलेले प्रशिक्षण) म्हणून ‘झेरॉक्स’ या कंपनीत जॉब मिळाला.
पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर याच कंपनीत तिला कायम स्वरूपाची नोकरी मिळाली. वयाची जेमतेम तिशीही उलटली नव्हती तोवर ‘प्रॉडक्ट डेव्हलपमेन्ट अँड प्लॅिनग’ विभागातील बहुतेक सर्व पदांवरील विविध जबाबदाऱ्या तिने सांभाळल्या. १९९० मध्ये तिच्या करियरला एक वेगळेच वळण लागले. वेल्यांड हिक्स नावाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने तिला आपली ‘एक्झिक्युटिव्ह असिस्टंट’ होण्याची ऑफर दिली. तिने ती स्वीकारली; पण केवळ नऊ महिने तिने या पदावर काम केले, कारण उर्सुलाचा विवाह लॉईड बीन नावाच्या तिच्याच कंपनीतील सहकाऱ्याशी ठरला होता आणि तिला तिच्या मूळ गावी जायचे होते आणि त्यासाठी तिला मोठी रजा हवी होती.
हनिमून आटोपून हे जोडपे १९९१ ला परत कामावर रुजू झाले तेव्हा एक नवीन असाइनमेंट तिची वाट पाहात होती. तत्कालीन ‘झेरॉक्स’चे सीईओ आणि चेअरमन पॉल अलेर यांनी त्यांची ‘एक्झिक्युटीव्ह असिस्टंट’ म्हणून तिची नियुक्ती केली. उर्सुलाचा प्रचंड परिश्रम घ्यायचा स्वभाव, सर्वाना सांभाळून घेत पुढे जाण्याचे तिचे कसब, यामुळे १९९९ पर्यंत तिची झेप ‘व्हाइस प्रेसिडेंट फॉर ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग’ पर्यंत पोहोचली. २००० साली ‘सीनिअर व्हाइस प्रेसिडेंट’ म्हणून पदावर असताना तिला लवकरच सीईओपदी नियुक्त होणाऱ्या अॅन मुल्काही या महिलेबरोबर काम करण्याची संधी मिळाली. या दोन सर्वोच्च पदांवरील महिलांची ‘झेरॉक्स’मधली नऊ वर्षांची कारकीर्द म्हणजे ‘ट्र पार्टनरशिप’ मानली जाते. २००९ मध्ये अॅन मुल्काही यांची झेरॉक्सच्या चेअरपर्सन म्हणून नियुक्ती होऊन त्यांच्या जागी उर्सुलाला पदोन्नती मिळाली. ज्या काळी महिला सीईओ अस्तित्वातही नव्हत्या तिथे कृष्णवर्णीय महिला सीईओ ही कल्पनातीत गोष्ट होती.
अमेरिकन एक्स्प्रेस कॉर्पोरेशन आणि एक्सोन मोबिलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणूनही उर्सुला काम पाहाते. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांना तसेच एमआयटी, यू.एस. ऑलिम्पिक कमिटी तसेच अमेरिकेतील ज्या संस्था विज्ञान तंत्रज्ञान, गणित आदी क्षेत्रांत काम करतात त्यांना तिचे मार्गदर्शन लाभते. ‘चेंज द इक्वेशन’ या संस्थेची ती संस्थापक संचालिका आहे.
जेव्हा तिच्या दिमाखदार करियरचे गमक काय, असा प्रश्न तिला विचारला गेला तेव्हा तिने मजेशीर, पण स्वत:च्या अनुभवाशी निगडित उत्तरे दिली. करियरमध्ये खूप पुढे जायचे असेल, तर आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठय़ा पुरुषाशी लग्न करा. ‘‘लॉईड माझ्यापेक्षा वीस वर्षांनी मोठा आहे. जेव्हा माझे करियर एका अशा बिंदूवर होते, की मी घर, मुले यांची काळजी घेण्यास असमर्थ होते. तेव्हा लॉईड निवृत्त झाल्यामुळे मुले तो सांभाळीत असे. याचा मोठाच फायदा झाला मला,’’ ती मिस्कीलपणे सांगते. तसेच स्त्रियांनी कुटुंब आणि करियर यांचे संतुलन सांभाळण्याचा सतत प्रयत्न करू नये. ते सदैव शक्य नसते, असेही ती म्हणते.
स्त्रियांनी कधी कधी स्वार्थी बनावे; स्वत:च्या आरोग्याकडे, स्वत:च्या मानसिक शांतीकडे अधिक लक्ष दिल्यास स्त्रिया खूप कार्यक्षमतेने पुढे जाऊ शकतात, असे तिला वाटते. कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्याचा अपराधगंड मनातून काढून टाका, असेही ती सांगते.
उर्सुलासारख्या स्त्रिया अशा सर्वोच्च पदावर आज कार्यरत नाहीत असे नाही; पण ज्या परिस्थितीतून आणि संघर्षांतून तिने आपले स्थान निर्माण केले आहे ते अतिशय प्रशंसनीय आहे. कृष्णवर्णीय असूनही तिचे या पदापर्यंत पोहोचणे इतिहास घडवण्यासारखे आहे; परंतु तिने इतिहास घडवला, असे म्हणण्यापेक्षाही तिने स्त्रियांबद्दलच्या समाजाच्या ठाशीव विचारसरणीत जे परिवर्तन आणले आहे ते अधिक व्यापक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा