‘युथ एक्स्प्रेशन’ हा माजी विद्यार्थ्यांचा गट गेली दोन-चार वर्षे भरपूर सामाजिक उपक्रम राबवतो. सायनचा एक गट ‘जग बदलायला निघालात, मग स्वत:ला बदला’ हे त्यांचं घोषवाक्य. चर्चा, आकाशदर्शन, गिरिभ्रमण याबरोबरच त्यांनी गेल्या वर्षी एका अपघातग्रस्त मुलासाठी ‘हजारो रुपये जमवून दिले.’ कोणी विक्री करून वेगळा अनुभव घेतला, तर कोणी लहान मुलांची शिबिरे घेतली. या मुलांचं कौतुक वाटलंच, मनात आलं- आपण उगाचच निराश होतो. नव्या पिढीला नाव ठेवतो..
‘फुरसतीच्या वेळात करायचा उद्योग म्हणजे शिक्षण’ अशीही एक शिक्षणाची व्याख्या केली जाते. १० वी आणि १२ वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा संपताच फुरसतीचा भरपूर वेळ मिळतोच. इतर मुलांना देखील जवळजवळ २ महिने सुटी असते. मग या फावल्या वेळात मुलं नेमकं काय करतात हे आज आपण जाणून घेऊ या.
प्रथम भेटू या सकवार, भोपोली आणि आसपासच्या अनेक शाळा किंवा आश्रमशाळांतील मुलांना. एका कार्यक्रमासाठी ४५० विद्यार्थी जमले होते. सुट्टीत काय करणार या प्रश्नाला त्यांचं सर्वाचं उत्तर एकच होतं. ‘गावी जाणार आणि मनसोक्त गप्पा मारणार. गमती सांगणार आणि ऐकणार. त्यांच्या आई-बाबांच्या परिस्थितीची त्यांना कल्पना आहे. म्हणून त्यांच्यापैकी काही शेतावर, काही वीटभट्टय़ांवर तर काही इतरत्र काम शोधतील. शाळांनी त्यांना काही लेखन-वाचनाचं काम दिलं आहे ते पण ती करतील, याबद्दल कोणाचाही तक्रारीचा सूर नव्हता. मला त्यांचं खूप कौतुक वाटलं. परिस्थितीनं त्यांना शहाणं केलं आहे. खास! त्यांना शुभेच्छा देत मी दुसरा कट्टा गाठला.
 इथं भेटल्या तनुश्री, अनेरी आणि त्यांच्या मैत्रिणी. आयजीआयसीएसई शाळेत जाणाऱ्या जुहू, मरीन लाइनला राहणाऱ्या. उच्चभ्रू घरातील या मुली. तनुश्रीची आई डॉक्टर तर अनेरीची आर्टिस्ट. त्यांनी मान्य केलं की काही वर्षांपूर्वी त्यांना वाटायचं आई फारच बोअर करते, आम्हाला सुट्टी एन्जॉय करू देत नाही, पण आता त्यांची एन्जॉयमेंटची कल्पनाच बदलली आहे. घरातील सर्वजण लाँगटूरला जातील. नातेवाईकांना भेटतील हे खरं. उठण्याची वेळ, टीव्ही बघणं यात थोडी सवलत मिळेल हेही खरं. पण तनुश्री आणि तिच्या मैत्रिणी अनेकांकडून वापरलेले ड्राईंगचे कोरे कागद गोळा करतात. ते अंध विद्यार्थ्यांना देतात. त्यांना आवडलेल्या कथा, कविता ब्रेलमध्ये लिहून त्यांना प्रेझेंट करतात. याची सुरुवात त्यांच्या आईनंच करून दिली. एका अंध मुलांच्या वसतिगृहाला भेट द्यायला ती घेऊन गेली. त्या मुलांना गोष्टी वाचून दाखवण्यापासून सुरुवात झाली. मग वेव्हलेंथ जुळली. त्यांच्यासाठी आणखी काही करावं असं वाटू लागलं, मग त्या ब्रेल शिकल्या. शिवाय त्या ग्रामीण भागात जातात. १-२ दिवसाचं हँडिक्राफ्टचं शिबीर घेतात. त्याची तयारी करण्यात पण त्यांचा छान वेळ जातो. अनेरीच्या आईला माहिती होतं की मुलांना पिअरप्रेशर खूप असतं. म्हणून तिनं प्रथम अनेरी आणि तिच्या मैत्रिणींसाठी छोटे छोटे वर्ग घ्यायला सुरुवात केली. पेंटिंगपेपर ज्वेलरी, कुकिंग इ. आता अनेरी कधी विद्यार्थी बनते तर कधी आईची मदतनीस. गॅसशिवाय विविध खाद्यपदार्थ करण्यात तिला मजा वाटते.
ममता, ऊर्जा, रश्मी, अनिकेत यांना तर सुट्टीत नवं काही शिकायचं, नवे मित्र जोडायची सवय झाली आहे. त्यांची शाळा सुटीत छंदवर्ग भरवेत. खेळाची शिबिरं भरवते. सुटीतही त्यांची शाळा गजबजलेली असते. यंदाही त्यांना हे सारं करायचं आहे. कारण घरात दुपारी खूप बोअर होतं. अनमोल, हर्षां, वर्धन यांची शाळा त्यांना रिझल्टच्या दिवशी कॉम्पिमेंटरी वाचनाची पुस्तकाची यादी देते. शिवाय प्रोजेक्ट सुटीत पूर्ण करायचे असतात. शाळेत ते सबमिट करावे लागतात. प्रेझेंटेशन द्यावं लागतं. पूरक वाचनावर परीक्षाही असते. हे करूनही भरपूर वेळ उरतो. त्यावेळी मग ही मुलं सोसायटीत मनसोक्त खेळतात. कारण एरवी सर्वाच्या शाळेच्या वेळा वेगवेगळ्या असतात.
आता मी मोर्चा वळवला एका मराठी माध्यमाच्या एसएससी बोर्डाच्या शाळेकडे. ‘अभ्यास करा. चांगले मार्क मिळवा’ असं सतत सांगणारे आणि त्यासाठी विविध टय़ुशन, क्लासेसच्या बेडय़ा मुलांच्या पायात अडकवलेले पालक या मुलांना परिचयाचे. कुणाल, स्वस्तिक, इशा, वैष्णवी, हर्षां आणि त्यांचा पूर्ण वर्गच ‘काय रे सुटीत काय करणार?’’ या प्रश्नावर अवाक् झाला. ‘काय म्हणजे मज्जा..’ माझा प्रश्न त्यांना कळला नसावा असं वाटून मी त्यांना पुन्हा विचारलं. ‘‘तुम्ही सारी पुढील वर्षी कॉलेजला जाणार. इथलं माध्यम वेगळं, विषय वेगळे, काहींना तर यापेक्षा वेगळे काही करायचं असेल. मग त्याची तयारी नाही करणार? शाळेतून असं मार्गदर्शन पण मिळालं असेल ना?’’ याही प्रश्नावर त्यांचे चेहरे होते मख्ख. केवळ प्रथमेशला कॉम्प्युटर शिकायचा होता. पण म्हणजे नेमकं काय शिकायचं होतं हे त्याला सांगता येत नव्हतं. १०वीनंतर काय? याचा विचारही त्यांनी फारसा केलेला नव्हता. सुटी म्हणजे आपल्या तारुण्यातील महत्त्वाच्या कालखंडातील ३-४ महिने आपण वाया घालवणार याची खंत नव्हती, आणि त्यांच्यापैकी काहींना डॉक्टर वा इंजिनीअर व्हायचं आहे, असं सांगताना त्यांच्यातील फोलपणा लक्षात येत नव्हता. आता मी त्याच शाळेतील शिक्षकांकडे मोर्चा वळवला. बऱ्याच जणांची मुलं शाळेत जाणाऱ्या वयाची. मी अगदी कॅज्युअल प्रश्न विचारला, ‘‘मुलांना तुम्ही सुट्टीत बिझी कसं ठेवणार?’’ प्रथम त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा पडणार की काय याची त्यांना धास्ती वाटली. मग मी खुलासा केला ‘‘तुमच्या स्वत:च्या मुलांबद्दल विचारले आहे मी’’ यावर ‘शिबिराला पाठवणार’ या एकमेव उत्तराशिवाय इतर रिस्पॉन्स होता नील. मी मनातच म्हटलं, ‘‘आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?’’
आता मी मोर्चा वळवला दुसऱ्या एका नामवंत शाळेकडे. त्यातील हुशार वर्ग आणि त्यातही स्पेको म्हणजेच स्पेशल कोचिंगच्या मुलांशी मी मनसोक्त गप्पा मारल्या. साधना, विनिता, स्नेहल, ऋचा आणि त्यांच्या मैत्रिणींकडे त्यांचे आणि त्यांच्या पालकांचे सुटीतले बेत आधीपासूनच तयार आहेत. फारसं काही त्यांच्यात दुमत नाही. ते ज्या शाळेत शिकले ती बदलली तरी मुलांना त्याच शाळेत घातलेलं. स्वतंत्र विचार करण्याची, एखादं काम जबाबदारी घेऊन पार पाडण्याची सवय लावलेली. या साऱ्या मैत्रिणींना प्रश्न पडला आहे, त्यांनी ठरवलेल्या गोष्टी करण्याला सुट्टी पुरी पडणार आहे का? सगळ्यांना किमान ८-१० दिवस बाहेरगावी तेही पालकांबरोबर जायचं आहे. गावी आजीला इथल्या गमतीजमती सांगायच्या आहेत. तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्या आठवणीत रमायचं आहे. रमाआजीला मोबाइल वापरायला शिकवणार आहे. सर्वाचे पहिले १-२ दिवस उशिरा उठणं, वह्य़ा पुस्तकांची आवराआवर यात जातील. मग मात्र याचा त्यांना कंटाळा येईल. पालकही त्यांना सोडणार नाहीत. त्यांच्यापैकी कोणाला मस्त क्लासिकल गाणी ऐकायची आहेत. ऋचाला पेटी वाजवायचा, साधनाला गाण्याचा रियाज करायचा आहे. गेले वर्षभर या साऱ्याचा टच सुटला होता. ऋचाला कॉम्प्युटरची वेगवेगळी सॉफ्टवेअर शिकायची आहेत. या सगळ्यांना भरपूर वाचन करायचे आहे. इंग्रजी आणि मराठीसुद्धा शाळेत, वर्गात शिकवताना शिक्षकांनी उल्लेख केलेली डिस्कव्हरी ऑफ इंडिया, चर्चिल आणि विवेकानंदांची भाषणे या पुस्तकांची भलीमोठी यादीच त्यांच्याकडे तयार आहे. साधनाला आत्मचरित्र वाचायला आवडतात. स्नेहल म्हणते, रामायण, महाभारत किंवा इतिहास काळातील गोष्टी आपल्याला माहीत असतात. पण त्यांच्यातील पात्रांचा सखोल अभ्यास तिला करायचा आहे. विनिताला खूप भटकंती करायची आहे. पण ती निसर्गाच्या सान्निध्यात- गर्दी, गोंगाट यापासून दूर. तिला बॅडमिंटन खेळायचं आहे. साधनाला भोसला मिलिटरी स्कूलला जायचं आहे. विनिता एकुलती एक. पण तिला मावस, मामे, चुलत अशी खूप भावंडं. साऱ्यांनी एकत्र मिळून खूप फिरायचं असं ठरवलंय. त्यांच्या पालकांनी बजावलं आहे. ‘जरूर भटका पण जपून, कितीही पैसे खर्च होऊ दे पण उधळपट्टी नको. विनिताला आणखी एक काम आवर्जून करायचं आहे. तिच्या धाकटय़ा भावंडांशी भांडणं. वर्षभर त्यांनी तिला अभ्यास करताना सतावलं. आई त्याचीच कड घेई, वर म्हणे ‘‘तू मोठी ना लक्ष देऊ नको. अभ्यास कर.’’ त्याचा वचपा तिला आता काढायचा आहे. स्नेहलला घर आवरायला खूप आवडतं. या सर्वानी कबूल केलं, सुट्टीतही आई-बाबा कामाला जातातच. शाळेत असताना घरातलं एकटेपण जाणवत नाही. पण सुट्टीत मात्र दुपारचा एकांत अंतर्मुख करतो. आई-बाबा आपल्यासाठी किती कष्ट घेतात, धडपडतात याची जाणीव होते. वाटतं, त्यांना आपण दुखवू नये. म्हणून त्यांच्यापैकी काहींनी दुपारी काही पदार्थ बनवायचे ठरवले आहेत. कदाचित घरी आल्यावर आई ओरडेल. ‘‘का पसारा घातलास गं? माझं काय वाढवून ठेवलंस.’’ पण त्यांना खात्री आहे, घरातील सारी त्यांचं याबद्दल कौतुक करतील. त्यांच्या बोलण्यात ‘युथ एक्स्प्रेशन’ हे नाव आलं. त्यांच्याच शाळेतील इंग्रजी मराठी माध्यमाच्या माजी विद्यार्थ्यांचा हा गट, मग त्यांनाही भेटावंसं वाटलं. त्यांनी तर गेली दोन-चार वर्षे भरपूर उपक्रम राबवले. असाच एक गट सायनलाही भेटला. ‘‘जग बदलायला निघालात, मग स्वत:ला बदला’’ हे त्यांचं घोषवाक्य. डिबेट, चर्चा, आकाशदर्शन, गिरिभ्रमण याबरोबरच त्यांनी गेल्या वर्षी एका अपघातग्रस्त मुलासाठी ‘हजारो रुपये जमवून दिले.’ कोणी विक्री करून वेगळा अनुभव घेतला, तर कोणी लहान मुलांची शिबिरे घेतली. त्यांच्यापैकी कोणाला ना कोणाला मोठय़ा माणसांचं मार्गदर्शन जरूर मिळालं होतं. पाल्र्यातील गटाला शोभाताईंचं तर सायनच्या गटाला या अविनाश धर्माधिकारींचं. या मुलांचं खूप कौतुक तर वाटलंच पण मनात आलं, आपण उगाचच निराश होतो. नव्या पिढीला नाव ठेवतो.

Story img Loader