मी अगदी नवोदित गायिका असताना आणि अण्णा म्हणजे सी. रामचंद्र एक दिग्गज, प्रसिद्ध कलावंत असताना, त्यांनी माझ्या हातात न केलेल्या कार्यक्रमाचे पैसे कोंबले आणि नंतरच्या आयुष्यात प्रसिद्ध असताना, माझं काम चोख करूनसुद्धा काही फसवणाऱ्या मंडळींनी माझे पैसे अगदी सहजपणे बुडवण्याचा प्रयत्न केला.. या विसंगतीचं मात्र मला राहून राहून आश्चर्य वाटत राहतं!

बऱ्याच लोकांचा चित्रपटसृष्टीबद्दल असा समज असतो की या झगमगत्या दुनियेत कित्येक कलाकारांना कित्येक वेळा अगदी सहज फसवले जाते किंवा पैशांना डुबवले जाते. काही प्रमाणात ते खरेही असते. पण माझ्याबद्दल बोलायचं झालं तर गेल्या पंचेचाळीस वर्षांच्या कारकीर्दीत असे प्रसंग क्वचितच आले. म्हणजे साधारण पाच/सहा वेळा! म्हणजे हे प्रमाण अगदी नगण्यच म्हणावे लागेल. काही लोकांनी पैसे बुडवले, पण त्या गेलेल्या पैशांच्या दु:खापेक्षाही, आपण फसवले गेलो, ही भावना जास्त दु:ख देणारी होती. विशेष म्हणजे ही ‘डुबवणारी’ माणसं असतात, त्यांना जराही पश्चात्ताप, खंत वगैरे नसते. अगदी उजळ माथ्याने ते समाजात बिनधास्तपणे वावरत असतात. अशाच या काही पैसे बुडव्यांच्या कथा!

Aakhil bharatiya chitrapat mahamandal meeting held peacefully Kolhapur news
कोल्हापूर: चित्रपट महामंडळाची बैठक खेळीमेळीत झाल्याचा दावा; बाहेर गोंधळ आत शांतता
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…

साधारण नव्वदच्या दशकात, एक तरुण संगीतकार पुण्याहून रेकॉर्डिगसाठी मुंबईला यायचा. त्याचं नाव होतं जीवन आपटे! त्यावेळी जास्त करून तो जिंगल्स म्हणजे जाहिरातींची रेकॉर्डिग्ज करायचा. रेकॉर्डिग पूर्ण झाल्यावर आम्हा कलाकारांचे पैसेही वेळेवर द्यायचा. एकदा त्याने मला रेकॉर्डिगला बोलावलं. गायला मी एकटीच होते. गाऊन झाल्यावर त्याने मला चेक दिला. दोन दिवसांनी मी तो चेक बँकेत टाकला. पण तो बाऊन्स झाला. मी जीवनला त्याबद्दल सांगितलं. त्यावर तो म्हणाला, ‘‘सॉरी हं उत्तराताई, मी लवकरच कॅश आणून देतो.’’ पण तो काही आला नाही. दोन तीनदा मी फोनवरून त्याला पैसे देण्यासाठी आठवण करून दिली. पण छे! त्याचे पैसे काही आले नाहीत. दीड-दोन वर्षांने तो मला अचानक एका स्टुडिओत भेटला. मी जरा चिडूनच त्याला म्हटलं, ‘‘काय जीवनजी, इतक्या वेळा आठवण करूनसुद्धा तुमचे पैसे मला मिळाले नाहीत. दुसऱ्याचं नुकसान करायला तुम्हाला काहीच वाटत नाही का? असं कसं तुम्ही दुसऱ्याला फसवू शकता?’’ यावरसुद्धा तो गप्पच! आजतागायत त्याचे पैसे मला मिळालेले नाहीत. माझ्या एका सहकाऱ्यानेही त्याला माझे पैसे देण्यासाठी सांगितले. पण व्यर्थ! आता त्याला थोडं फार नाव मिळालंय. त्यानं जरूर मोठं व्हावं, पण इतरांना फसवून मात्र नाही. हा जीवन समाजात मोठमोठय़ा कलाकारांत वावरतो. वेगवेगळ्या चॅनेल्सच्या कार्यक्रमांमध्ये दिग्गजांच्या मांडीला मांडी लावून बसतो. इतकंच काय भारताबाहेरसुद्धा मराठी चित्रपटसृष्टीचे जे कार्यक्रम होतात, तिथेसुद्धा तो हटकून दिसतोच. आता तर समोरून आला तर फसवल्याची अपराधीपणाची भावना त्याच्या चेहऱ्यावर जरासुद्धा दिसत नाही.

असाच एक निर्माता माधव सरदेशपांडे! त्याचे वडील हे मोठे निर्माते. त्यांच्या बऱ्याच चित्रपटांत मी गायले आहे. माधव निर्माता झाल्यावरही त्याच्याकडे गायले आहे. खूप वर्षांपूर्वी सुरेश कलमाडींनी पुणे फेस्टिव्हल सुरू केला होता. त्यात बरेच मोठ मोठे कलावंत गायचे. तो फेस्टिव्हल सुरू झाल्यानंतर म्हणजे साधारण चार/पाच वर्षांनी, माधवने मला त्या फेस्टिव्हलमध्ये गाण्यासाठी बोलावले. सुरेश कलमाडींनी काही संगीत कार्यक्रमांचं आयोजन माधवला दिलं होतं. माधवची आणि माझी याच्या वडिलांपासून ओळख! त्यामुळे त्याच्याशी मी कार्यक्रमाच्या मानधनाचे जरूर बोलणे केले, पण आगाऊ रक्कम मात्र घेतली नाही. कार्यक्रम छान पार पडला. निघायच्या वेळी मी वाट बघून त्याच्याकडे पैसे मागितले, तो म्हणाला की, ‘‘पुढच्याच आठवडय़ात मी मुंबईला येतोय, तेव्हा तुमचे पैसे देतो.’’ मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आठवडा उलटून गेला तरी त्याचा पत्ता नाही. शेवटी दोन/चार वेळा मी त्याला फोन करून पैशांची विचारणा केली. कारण माझ्यासाठी ती रक्कम नक्कीच मोठी होती. पण प्रत्येक वेळी तो टोलवाटोलवीची उत्तरे देत होता. शेवटी कंटाळून मी त्याला फोन करण्याचेही बंद केले. क्वचित कुठे तो कार्यक्रमांना दिसायचा. पण त्याला माझ्या नजरेला नजर देण्याचंही धाडस व्हायचं नाही. पण मी मात्र ही गोष्ट अजिबात विसरले नव्हते. कधी ना कधीतरी याला माझे पैसे द्यायला लावीनच ही इच्छा मी मनात धरून होते आणि लवकरच तो योग आला!

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात एक मोठा कार्यक्रम होता. कलमाडी त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. माझ्या घरापासून सावरकर स्मारक अगदी पाच मिनिटांवर! त्यामुळे मी कलमाडींची भेट घ्यायचे ठरवले. तिकडे जाऊन बघते तो हॉल खचाखच भरलेला, सुरेश कलमाडी स्टेजवर! आता इतक्या गर्दीतून मी कशी काय पोहोचणार त्यांच्यापर्यंत? तेवढय़ात बाजूला एका गाडीजवळ पोलीस बघितले. लक्षात आलं की हीच त्यांची गाडी असावी. त्या गाडीजवळच थांबले. भाषण संपता क्षणीच ते स्टेजवरून खाली उतरले आणि गाडीच्या दिशेने जाऊ लागले. त्यांच्या मागोमाग पोलीस आणि बरीच लोकंही! गाडीपाशी येताच मी गर्दीमधूनच त्यांना खूण केली आणि पोलिसांनी मला त्यांच्यापर्यंत जायची वाट मोकळी करून दिली. कलमाडींना मी म्हटलं, ‘‘मी गायिका उत्तरा केळकर. मला माहित्येय की तुम्ही खूप घाईत आहात, फक्त मी लिहिलेली ही चिठ्ठी वेळ मिळाल्यावर जरूर वाचा आणि मला न्याय मिळवून द्या!’’ त्यांनीही मनापासून हो म्हटलं. त्या चिठ्ठीत मी माधवकडून कशी फसवली गेलेय हे सविस्तरपणे लिहिलं. तसंच पुणे फेस्टिव्हल हा किती मानाचा, प्रतिष्ठेचा फेस्टिव्हल आहे याबद्दल लिहिले आणि माधवसारख्या फसवणाऱ्या व्यक्तींमुळे पुणे फेस्टिव्हलचे आणि पर्यायाने कलमाडींचे नाव किती बदनाम होते आहे, हेही लिहायला विसरले नाही. त्याचा योग्य तो परिणाम झाला. सुरेश कलमाडींनी माझ्या चिठ्ठीची दखल घेतली होती.

३/४ दिवसांनीच त्यांच्या सेक्रेटरीचा मला फोन आला, त्यांनी सांगितलं, ‘‘माधवला आम्ही आमच्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलंय, तुमची माफी मागण्यासाठी आणि लवकरच तुमच्या पत्त्यावर आम्ही तुम्हाला कार्यक्रमाच्या मानधनाचा चेक पाठवतोय.’’ त्यांनी असं सांगितल्यानंतर माधवने माझी माफी मागितली. विशेष म्हणजे चार/पाच दिवसांतच मला चेक मिळालासुद्धा. एवढय़ा प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलावर माझी माफी मागण्याची नामुष्की ओढवावी! आज माधव हयात नाही. पण जाण्याच्या अगोदर तो चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष होता आणि मोठय़ा अभिमानाने ते अध्यक्षपद तो सगळीकडे मिरवत होता. आहे की नाही कमाल?

असेच आणखी एक पुण्यामधलेच कलावंत! माझ्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते. विविध प्रकारची तालवाद्य ते अगदी कुशलतेने वाजवत. पुण्यात त्यांच्या खूप मोठय़ा मोठय़ा ओळखी असल्याने मुंबईच्या बऱ्याच कलावंतांचे ते कार्यक्रम ठरवीत. मलाही ते अनेक वेळा कार्यक्रमांसाठी बोलवीत. कार्यक्रम संपल्यावर मानधनही देत. पण प्रत्येक वेळी एक-दोन हजार कमी देत. केवळ त्यांची ज्येष्ठता आणि त्यांच्या कलेकडे बघून मी या गोष्टींकडे दुर्लक्ष करी. त्यांचा मुलगा तर त्यांच्याही वरताण! लहानपणापासून तो वडिलांबरोबर असे. कसलंही शिक्षण वा कला अंगात नसताना, आम्हा कलावंतांबरोबर तो अगदी बिनधास्तपणे गप्पा मारी. एकदा तो लहान असताना चितळेंची बर्फी आणण्यासाठी त्याला पैसे दिले. तेही त्याने हडप केले. पुढे वडील गेल्यावर हा कार्यक्रम ठरवायला लागला. वाटलं, आता तरी हा सुधारला असेल. पण कसलं काय? एका कार्यक्रमात मी,

रवींद्र साठे व त्यागराज खाडिलकर गायला होतो. कार्यक्रम संपल्यावर आम्हाला मानधनातले प्रत्येकी पाच हजार रुपये त्याने कमी दिले. लवकरच देतो, असं सांगितलं. पण आजपर्यंत ते पैसे मिळालेले नाहीत.

वरील उल्लेख केलेल्या तीनही व्यक्ती पुण्याच्याच होत्या, हा निव्वळ एक योगायोग! पुण्याची कित्येक माणसं माझ्या ओळखीची आहेत, की जी व्यक्ती म्हणून आणि कलाकार म्हणूनही खूप मोठी आणि दिलदार आहेत. व्यवहाराच्या बाबतीत ही सर्व मंडळी अत्यंत चोख आहेत. वर्षांनुवर्षे मी त्यांच्याकडे आनंदाने गात आहे.

वर लिहिलेल्या अनुभवांच्या अगदी विरुद्ध टोकाचा विसंगत असा एक अनुभव मला आला. संगीतकार सी. रामचंद्र (अण्णा) यांचा. मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातलं एक मोठं नाव! आपल्या असंख्य गोड गाण्यांनी, त्यांनी एक जमाना अक्षरश: गाजवला, जवळपास ३५-३६ वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्याकडे विशेष चित्रपट नव्हते, तेव्हा त्यांनी ‘गीत गोपाल’ नावाचा एक कार्यक्रम बसवला होता. त्यात तू गाशील का असं अण्णांनी मला विचारलं. पण तेव्हा माझी मुलगी अगदीच लहान असल्यामुळे, शिवाय कार्यक्रमासाठी बाहेरगावी जायला जमणार नसल्याने, अगदी संकोचून मी एवढय़ा मोठय़ा माणसाला नाही म्हटले. पण मनात रुखरुख होतीच. शेवटी एकदा धीर करून मी त्यांना फोनवर विचारलं, ‘‘अण्णा! ‘गीत गोपाल’मध्ये तर मी गाऊ शकत नाही. पण तुम्ही माझ्या एवढय़ा जवळ राहता तर तुमची अजरामर झालेली काही हिंदी चित्रपटगीतं मला शिकवाल का?’’ त्यांनी ताबडतोब ‘हो’ म्हटले आणि काही महिने त्यांनी ती गाणी मला आनंदाने शिकवलीसुद्धा. त्यानंतर ‘दूरदर्शन’वरील एका कार्यक्रमासाठी त्यांनी माझे गाणे रेकॉर्ड केले. मग एकदा शिवाजीपार्कवरील एका मोठय़ा कार्यक्रमासाठी विचारले. त्यावेळी मात्र कार्यक्रम जवळच असल्याने मी ताबडतोब होकार दिला. कार्यक्रमासाठी मी तीन/चार तालमी केल्या. अखेर कार्यक्रमाचा दिवस उजाडला. संध्याकाळी ठरलेल्या वेळी आम्ही कलावंत शिवाजी पार्कवर हजर झालो. जवळजवळ दोन तास वाट पाहून झाली. पण आमचा कार्यक्रम काही सुरू होईना. अण्णा आयोजकांवर भयंकर संतापले. ढिसाळ नियोजन आणि आणखी उशीर होणार हे समजल्यावर अण्णांनी कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला. आम्हा सर्व कलाकारांच्या हातात मानधनाची पाकिटे ठेवली. आम्ही सारेच खजील! मी अण्णांना म्हटलं, ‘‘अण्णा! न गाताच कसे घ्यायचे पैसे?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘उत्तरा, तू कार्यक्रमाच्या व्यवस्थित तालमी केल्या आहेस. इथे वेळेवर आली आहेस. शिवाय भरपूर वाटही बघितली आहेस. त्यामुळे तुला आणि सगळ्यांनाच पैसे घ्यायला संकोच वाटायला नको!’’ हा त्यांचा दिलदारपणा पाहून आम्ही सर्वच अवाक्  झालो.

या प्रसंगावरून मला विसंगती एकाच गोष्टीची वाटते, की मी अगदी नवोदित गायिका असताना आणि सी. रामचंद्र एक दिग्गज, प्रसिद्ध असे कलावंत असताना, त्यांनी माझ्या हातात न केलेल्या कार्यक्रमाचे पैसे कोंबले आणि नंतरच्या आयुष्यात प्रसिद्ध असताना माझं काम चोख करूनसुद्धा वरील फसवणाऱ्या माझ्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या मंडळींनी माझे पैसे अगदी सहजपणे बुडवण्याचा प्रयत्न केला! या विसंगतीचं मात्र मला खरंच आश्चर्य वाटत राहतं!

(लेखातील काही व्यक्तींची नावे बदललेली आहेत.)

मोबाइल क्रमांक – ९८२१०७४१७३

uttarakelkar4@gmail.com

 

Story img Loader