आता हळूहळू संध्याछाया खुणावू लागल्या आहेत. वय वाढतंय, पण अजूनही आवाज शाबूत आहे, ही देवाचीच कृपा! आतासुद्धा सकाळ होते, तेव्हा आरामात मी उठते, हातात आयता मिळालेला चहाचा कप, पेपर न्याहाळत घरासमोरील बागेतली हिरवळ बघत, पक्ष्यांची किलबिल ऐकत, सूर्याची कोवळी किरण झेलीत, चहाचा घोट घेताना वाटतं हे जीवन किती सुंदर आहे!
‘उत्तररंग’च्या माध्यमातून तुमच्याशी म्हणजे वाचकांशी संवाद साधता साधता वर्ष संपतसुद्धा आलं! एसएमएस, व्हॉटसअॅप, ई-मेल आणि फोनद्वारा वाचकांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षांव केला. वाचकांनीच तर मला लेखिका ही पदवी दिली. खरं म्हणजे मी लेखिका नाहीच. पहिल्या प्रथमच वर्षभर, एवढं लिखाण मी केलं, पण ते वाचकांना एवढं आवडेल याची मी कल्पनाच केली नव्हती. खरं तर २ जानेवारी २०१६ला जेव्हा माझा पहिला लेख ‘अत्तरकुपी’ छापून आला, तेव्हा आदल्या दिवशी मी टेंशनमध्ये होते. एखाद्या परीक्षेला बसावं तसं वाटत होतं. पण २ तारखेच्या सकाळपासून जे फोन खणखणायला लागले, ते अगदी रात्रीपर्यंत! त्या वेळी वर्तमानपत्राची खरी ताकद मला कळली.
घरात एकटेच बसून आपण लिहितो आणि एका दिवसात ते लिखाण लाखो लोकांपर्यंत पोचतं हे बघून खरोखरच आश्चर्य वाटतं! स्त्री-पुरुष, म्हातारे-तरुण, गरीब-श्रीमंत, प्रसिद्ध-अनोळखी, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक अशा समाजातल्या अनेक स्तरांतून जेव्हा फोन येतात तेव्हा मन गहिवरतं! काही काही लोक तर प्रत्येक लेखाला फोन करून दाद देत होते. या लेखांमुळेच तर माझे कित्येक जणांशी जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले. अनेक जणांनी प्रेमाने चांगल्या सूचनाही केल्या. काही जणांनी माझे गाण्याचे कार्यक्रम ठरवले. आयुष्यात जे चांगले, वाईट प्रसंग घडले ते मी वाचकांसमोर ठेवले. आयुष्यात ज्यांनी ज्यांनी आनंद, समाधान दिले, त्यांची तर मी आभारी आहेच, पण ज्यांनी ज्यांनी दु:ख दिले, फसवणूक केली त्यांचीही मी आभारी आहे, कारण अशा व्यक्तींमुळेच तर मी आयुष्यात जास्त कणखर, जागरूक आणि ताकसुद्धा फुंकून प्यायला शिकले.
वर्षभर मी जे लिखाण केलं त्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया या अतिशय छान आणि वाचनीय होत्या. त्यातल्याच या काही वेगळ्या प्रतिक्रिया. ‘अत्तरकुपी’ हा माझा लेख दिग्गज कलाकारांच्या, सहवासातल्या आठवणींवर होता. अनेकांनी त्या थोर कलाकारांच्या आठवणी आणखी लिहा ना असा प्रेमळ हट्ट धरला. ‘गुरुदक्षिणा’ हा लेख व्हिक्टरी क्लासेसचे मालक म्हणजे माझे सासरे यांच्यावर होता. त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांनी, जे आता खूप वयस्कर आहेत, अशांनी त्यांच्यामुळेच आम्ही घडलो अशी कबुली फोन करून दिली. त्यातल्या दोघांनी तर असे सांगितले की, आम्ही अत्यंत गरिबीत शिक्षण घेतले, पण तुमच्या सासऱ्यांमुळे आमचं इंग्लिश अगदी पक्कं झालं. आज त्यातील एक रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे सेक्रेटरी आहेत, तर दुसरे ‘विद्यालंकार’ या प्रसिद्ध क्लासेसचे मालक. ‘धडा’ हा लेख लहानपणी आम्ही सर्व मित्र-मैत्रिणींनी केलेल्या फणसाच्या चोरीवर होता. त्यावर अनेक वाचकांनी आपणही लहानपणी कशा वेगवेगळ्या खोडय़ा केल्या होत्या ते प्रांजळपणे सांगितलं. ‘सौदा’, ‘उपरती’ व ‘चूक’ हे लेख माझ्या जमिनींच्या व्यवहाराबद्दल होते. त्यामुळे अनेकांनी आम्हीही जमिनीचे सौदे करताना आता यापुढे नक्कीच काळजी घेऊ, हे लेख वाचून खूप काही शिकता आले, असे आवर्जून सांगितले. ‘अंजन’ आणि ‘काळवेळ’ हे दोन लेख माझ्या पतीच्या निधनाबद्दल होते. जवळजवळ ३५ स्त्रियांनी फोन करून आम्हीही याच परिस्थितीतून जात असल्याचे सांगितले. त्यातल्या ३ जणींनी तर सांगितले की, तुमच्या ‘अंजन’ या लेखाने आमच्या डोळ्यांत चांगलेच अंजन घातले आहे. नवरा गेल्यापासून आमच्या डोक्यात नैराश्याने सारखे आत्महत्येचे विचार येतात. पण ते विचार तुमचा लेख वाचून आता आम्ही डोक्यातून काढून टाकले आहेत. जुलै महिन्यात एके दिवशी दुपारी साधारण १२ वाजता एक फोन आला आणि पलीकडून एक मंजुळ आवाज कानावर पडला. साक्षात लता मंगेशकर होत्या त्या! त्यांचा फोन ऐकून तर मी उडालेच. त्यांना त्यांच्यावर लिहिलेला ‘स्वरसम्राज्ञी’ हा लेख फोनवर ऐकायचा होता. तो मी त्यांना वाचून दाखवला. त्यांना लेख आवडला. जसा लतादीदींना लेख फोनवर ऐकवला तसाच आशाताईंनाही फोनवर त्यांचा लेख वाचून दाखवावा या विचाराने मी आशाताईंना फोन केला. त्यांनी तर लेख ऐकवण्यासाठी थेट घरीच यायचे आमंत्रण दिले आणि मला सुखद धक्का दिला. पंडित यशवंत देवांवरचा ‘नव्वदीतले तरुण’ हा लेख छापून आला तेव्हा मला पहिला फोन त्यांचाच आला. म्हणाले, ‘‘उत्तरा, हा लेख तू हातचे काहीही न राखता लिहिला आहेस. हा लेख तू शाईने नाही तर रक्ताने लिहिला आहेस.’’ गुरूंकडून आता यापेक्षा मोठं सर्टिफिकेट काय असणार? लोणावळ्याच्या माझ्या नवीन घराबद्दल ‘सुहृद’ हा लेख आला तेव्हा तर असंख्य लोकांनी ते घर बघण्याची इच्छा प्रकट केली. एक बाई मी नसताना तिथे जाऊन आल्या, बाहेरूनच घर बघितले आणि आमच्या तिकडच्या शेजाऱ्यांकडे जाऊन त्या माझ्यासाठी गुलाबाचा गुच्छ व चिठ्ठी ठेवून आल्या. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक मोठय़ा माणसांनी वेळोवेळी फोन केले. नाटककार सुरेश खरे, ‘वस्त्रहरण’चे लेखक गंगाराम गवाणकर, कवी ना. धों. महानोर, अभिनेत्री इला भाटे, बाबासाहेब पुरंदरे यांच्या सूनबाई चित्रलेखा पुरंदरे, माझे गुरू श्रीकांत ठाकरे यांच्या पत्नी कुंदाताई ठाकरे या सर्वानी फोन करून माझा लेखनाचा उत्साह आणखी वाढवला. आता मात्र या सर्व प्रेमळ प्रतिक्रियांना मी मुकणार आहे, याचे मला वाईट वाटते.
वयाची पानं उलटताना मी कधी पासष्टाव्या पानावर येऊन पोचले ते माझं मलाच कळलं नाही! लहानपणापासून माझ्या आईने मला गाण्याची गोडी लावली. वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घ्यायला लावला. नंतर माझे दीर विजय केळकर व संगीतकार बाळ बर्वे यांनी मला काही गाणी शिकवली. त्या नंतर मात्र मी माझ्या तीनही गुरूंकडे नियमित गाणं शिकायला लागले. लग्न झाल्यावर तर सर्वच जबाबदाऱ्या, काळज्या नवऱ्यावर सोपवून मी निर्धास्तपणे माझं करिअर करू लागले. स्वयंपाक आणि करिअर या दोनच गोष्टींत माझं आयुष्य अगदी मजेत चाललं होतं. मानसीच्या आगमनानंतर तर घरात आनंदाची बरसात झाली होती. असा २७ वर्षांचा संसार ऐन रंगात आला असतानाच एके दिवशी अचानक विश्राम आम्हाला सोडून या जगातून निघून गेला! प्रथमच मला दु:खाची, जबाबदारीची जाणीव झाली. हा अडचणींचा डोंगर कसा काय पार करायचा? विश्राम असताना बँकेची पायरीही न चढलेली मी आयुष्याचा गुंता कसा काय सोडवणार? पण मग मनाशी निश्चय केला, आता ही वाट मला एकटीनेच चालायची आहे. आयुष्याचा हा कठीण पेपर मलाच सोडवायचा आहे, त्याची उत्तरे मलाच मिळवायची आहेत. माझं जग मलाच निर्माण करायचंय आणि आनंदीही राहायचंय! जिद्द आणि ध्यास याच्या जोरावर मी कामाला लागले आणि एकटेपणा हा मी माझा अॅसेट समजायला लागले. विश्राम आजारी पडल्यावर सासरची, माहेरची माणसं माझ्या मदतीला धावून आली. विश्रामचा जिवलग मित्र डॉ. विजय कुलकर्णी हा तर मोठाच आधार होता आम्हाला! त्याने विश्रामसाठी काय केलं नाही? जवळजवळ ४/५ छोटी ऑपरेशन्स स्वत: एक पैसाही न घेता केली! विश्राम गेल्यावर तर समोर अनेक प्रश्न होते. ते प्रश्न सोडवता सोडवता माझ्या असं लक्षात आलं की जिथे जिथे अडचणी आहेत किंवा जिथे जिथे विश्रामची कमी आहे तिथे तिथे देवाने मला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या माणसांची जणू नियुक्तीच केली आहे. वर्षांनुवर्षे जिव्हाळ्याचे संबंध असलेले माझे फॅमिली डॉक्टर, वकील, सी.ए. असलेला माझा सख्खा भाऊ अविनाश, लोणावळ्याच्या घरात काही समस्या आली तर त्या सोडवायला माझा बालमित्र अजय, गाण्यामध्ये काही शंका असतील, तर त्याचं निरसन करायला अप्पा वढावकर या सर्वाचीच मला मोलाची मदत होत असते आणि होत राहील! अनेकवेळा लोकांची गाणी मेलवरून येणार असतात. त्याची सीडी बनवायची असते, कुणाला मेल करायचे असतात, कुणाला प्रोगॅ्रमसाठी फोटो पाठवायचे असतात. अशा वेळी शिकूनसुद्धा कॉम्प्युटर न आल्याने अशिक्षित आहोत असे वाटत राहते. नेमके यासाठीच जणू काही विश्रामच्या जाण्यानंतर देवाने माझ्या आयुष्यात कौस्तुभची म्हणजे माझ्या जावयाची एन्ट्री करवली. तो स्वत: साऊंड रेकॉर्डिस्ट असल्याने, तो ही कामं अगदी सहजतेने पार पाडतो! आज आमचा ‘स्वरमानस’ हा स्टुडिओ तो अगदी समर्थपणे चालवतो आहे. याशिवाय आज माझी करिअर घडली त्याचे श्रेय माझे घरातले तीन मदतनीस यांना द्यावंच लागेल. मी घरात नसेन तेव्हासुद्धा वर्षांनुवर्षे ते माझ्या घरच्या जबाबदाऱ्या समर्थपणे, अगदी आजही पेलत आहेत. तसंच जीवनात गाण्याशिवाय दुसरा आनंदाचा ठेवा म्हणजे, वेगवेगळ्या क्षेत्रातील माझ्या मैत्रिणी! या सर्व जणींमुळे माझं आयुष्य उत्साही, आनंदी आणि समृद्ध बनलंय! जिने फक्त माझ्या आयुष्यातच नव्हे तर इतरांच्याही आयुष्यात संगीत आणि समुपदेश यांची सुरेख सांगड घालत पॉझिटिव्हिटी दिली आहे ती माझी मुलगी मानसी! आपल्या हसतमुख चेहऱ्याने तिने माझ्या आयुष्यात कायमच आनंद पसरवलाय! आता कॉलेजात जाणारा नातू अक्षत, तो तर माझ्या काळजाचा तुकडा!
गेली ४४ वर्षे मी ज्या ज्या गायकांबरोबर गायले, त्या प्रत्येकाचेच मला काही ना काही वैशिष्टय़ जाणवले आहे किंवा त्या प्रत्येकाकडूनच मला काही ना काही शिकता आले आहे. संगीतकार, संगीत संयोजक, कवी, वादक, रेकॉर्डिस्ट या सर्वाचाच माझ्या छोटय़ा यशामध्ये मोठा आणि मोलाचा वाटा आहे.
आता हळूहळू संध्या छाया खुणावू लागल्या आहेत. वय वाढतंय पण अजूनही आवाज शाबूत आहे, ही देवाचीच कृपा! आतासुद्धा सकाळ होते, तेव्हा आरामात मी उठते, हातात आयता मिळालेला चहाचा कप, पेपर न्याहाळत घरासमोरील बागेतली हिरवळ बघत, पक्ष्यांची किलबिल ऐकत, सूर्याची कोवळी किरण झेलीत, चहाचा घोट घेताना वाटतं हे जीवन किती सुंदर आहे! देवाने हे कलाकाराचं आयुष्य देऊन आपल्यावर कृपाच केलेली आहे. अधूनमधून गाण्याचे कार्यक्रम तर असतातच, पण रोज सावकाश स्वयंपाक करावा, मग रियाज करून रेकॉर्डिगला जावं. ती नसतील तर बाहेरील इतर कामं करावीत, दुपारी परत येऊन नातवाची म्हणजेच अक्षतची वाट बघावी. त्याला जवळ घेऊन त्याचे लाड करावेत. संध्याकाळी गाणं शिकायला येणाऱ्या मुलींनी घर गजबजून जातं. सुरांनी सर्व घर पवित्र होऊन जातं! अशा सुरेल वातावरणातच मग रात्र होते आणि परमेश्वराप्रती मन कृतज्ञ होतं! बालपणात मायेची पाखर घालणारी माझी माणसं, लहानपणचे ते मंतरलेले दिवस मनात रुंजी घालतात. आज हयात नसणारी माझी जवळची माणसं, त्यांचे चेहरे, डोळ्यासमोर तरळत राहतात. आयुष्यात पुढे मिळालेला थोरामोठय़ांचा सहवास, अनेक परदेश प्रवास, रेकॉर्डिगच्या निमित्तानं सहवासात आलेली कलाकार माणसं, प्रेम करणारी चाहते मंडळी, शिष्य परिवार आणि हो, आता प्रेम करणारे वाचकसुद्धा! आयुष्यात अजून काय हवं? हे सर्वच क्षण म्हणजे माझ्या आनंदाचा ठेवा आहेत.
प्रिय वाचकहो, उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे, नवीन वर्षांतला प्रत्येक दिवस तुम्हाला सुख, समाधान, समृद्धी आणि शांती घेऊन येवो, हीच परमेश्वराजवळ प्रार्थना, या शुभेच्छा देऊन माझं लेखन थांबवते. नमस्कार!
मोबाइल क्रमांक – ९८२१०७४१७३
uttarakelkar63@gmail.com
(सदर समाप्त)