खूप र्वष झाली या गोष्टीला. एके दिवशी सकाळी प्रो. मल्हार साठे यांचा मला
औरंगाबादहून फोन आला. खरं तर ते माझ्या फार परिचयाचे नव्हते. पण त्यांची बायको सुनंदा साठे माझ्या चांगली ओळखीची होती. तोच धागा पकडून, त्यांनी मला फोन केला होता. साठय़ांची औरंगाबादमध्ये वडिलोपार्जित बरीच जमीन होती. उंच धिप्पाड शरीरयष्टी, अतिशय बारीक डोळे, अगदी दोन रेषाच म्हणा ना! चेहऱ्यावर सतत स्मित, उसनं हसूच वाटायचं ते! चेहऱ्यावर हास्य आलं की मूळचे बारीक डोळे आणखीनच बारीक व्हायचे. हा माणूस खरा असेल ना, अशी उगीचच शंका यायची. फोनवर माझी विचारपूस केल्यावर त्यांनी सांगितलं की, औरंगाबादमध्ये त्यांनी त्यांच्या जमिनीचे एन. ए. प्लॉट केले आहेत आणि आता त्यांना ते विकायचे आहेत.
त्यातला एखादा प्लॉट मला घेण्यात रस आहे का? माझ्या पतीच्या सल्ल्याने मी त्यांच्याकडील पाच हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट घेण्याचं ठरवलं. प्लानवर जागा बघितली. सर्व सोपस्कार झाले. तशा बेताच्याच किमतीचा प्लॉट होता तो. औरंगाबाद शहरात होता तो. एक चांगली गुंतवणूकही होईल आणि लांब असला तरी साठय़ांचं लक्षही राहील या हेतूने मी तो प्लॉट विकत घेतला. दर दोन-तीन वर्षांतून एखाद्या वेळी त्यांचा फोन येई. जमिनीचा कर भरण्यासाठी! मग मी त्यांना चेक पाठवे. तो ते औरंगाबाद नगरपालिकेत भरत. एकदा औरंगाबादला कार्यक्रमासाठी गेले असता, त्यांनी स्वत: मला तो प्लॉट दाखवलासुद्धा!
अशी जवळजवळ १६ र्वष गेली. २००० चं वर्ष होतं. त्यांचा मला फोन आला. म्हणाले, ‘‘उत्तराताई! आता मी औरंगाबाद सोडणार आहे, मग मी गेल्यावर तुमच्या प्लॉटकडे कोण बघणार? शिवाय तुमच्या जमिनीवर अतिक्रमण म्हणजेच झोपडपट्टीही होऊ शकते. कदाचित ती झालीही असेल! एवढय़ा वर्षांत प्लॉटची किंमत मात्र काही विशेष वाढली नाही. मग मलाच तो प्लॉट विका ना, म्हणजे तुमच्या डोक्याला काही ताप नको!’’ मी विचार केला, विकायला काही हरकत नाही पण त्यांनी सांगितलेली किंमत अगदीच कमी होती आणि प्लॉट त्यांना विकायचा म्हणजे तो ते चढय़ा किमतीने दुसऱ्याला विकणार आणि स्वत: नफा कमवणार.
मी म्हटलं, ‘‘१६ वर्षांत प्लॉटची किंमत काहीच वाढली नसेल तर राहू दे प्लॉट आणखी काही र्वष तसाच! सावकाश विकेन, मला काही घाई नाही.’’ माझं बोलणं ऐकून ते थोडे निराश झाले.
त्यांचा फोन झाल्यावर मी मात्र सावध झाले आणि लगेचच त्या प्लॉटची माहिती मिळवायला लागले. त्या वेळी माझी आतेबहीण अनुराधा ठाकूर स्टेट बँकेत मोठय़ा पदावर होती. ती म्हणाली, ‘‘काही काळजी करू नकोस! औरंगाबाद स्टेट बँकमध्ये ऑफिशियल एजंट्स आहेत. ते तुझा प्लॉट बघून येतील आणि विकून योग्य ती किंमत तुला देतील.’’
औरंगाबादच्या स्टेट बँकेत फोन करून त्याबाबतीत लक्ष घालण्याची विनंती तिनं केली. चार-पाच दिवसांतच तिथून मला एका एजंटचा फोन आला की ‘‘तुमच्या प्लॉटवर झोपडपट्टी वगैरे काही नाही आणि प्लॉटची किंमत भरपूर वाढलेली आहे. एका महिन्याच्या आतच तुम्हाला तुमचा प्लॉट विकून देतो.’’ हे ऐकून तर मी चक्रावलेच. प्रो. साठय़ांच्या अगदी विरुद्ध माहिती हा एजंट मला देत होता.
बरोबर एक महिन्याच्या आतच दिलेल्या शब्दाप्रमाणे मला एजंटने तो प्लॉट विकून दिला. ठाकूर मॅडममुळे त्याने माझी चोख व्यवस्था ठेवली. औरंगाबादला आल्यावर मला घ्यायला येऊन रजिस्ट्रारच्या ऑफिसममध्ये नेऊन, सर्व सोपस्कार पूर्ण करून मी प्लॉट घेतला त्यापेक्षा २५ पट अधिक रकमेचा चेक एजंटने माझ्या हातावर ठेवला आणि समाधानाने मी मुंबईला परतले. साठय़ांना काहीही न सांगता हा सौदा मी पूर्ण केला.
प्लॉट विकल्यावर, साधारण महिन्याभराने साठय़ांचा मला परत फोन आला. ‘‘उत्तराताई! प्लॉट विकण्याबद्दल काही विचार केला का? मागच्या वेळी मी तुम्हांला म्हटलं होतं ना, की प्लॉटवर झोपडपट्टी होऊ शकते, अहो काय सांगू तुम्हाला! आता तर तुमच्या प्लॉटवर बऱ्याच झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या आहेत. त्रासदायक होणार आहे हे सर्व तुम्हांला! त्यापेक्षा विकून टाका ना प्लॉट!’’ हे ऐकून मी मनातल्या मनात हसले आणि त्यांना म्हणाले, ‘‘साठे, धन्यवाद. बघते काय करायचं ते हं!’’ असं म्हणून मी फोन ठेवला.
विचार आला, काय माणूस आहे हा! स्वार्थापोटी इतका श्रीमंत माणूस इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो? त्यांच्या डोळ्यांनी मला ती धोक्याची घंटा खरं तर कधीच दिली होती. मी सावध झाले म्हणून निभावलं!
(साठे यांचं नाव बदललेलं आहे.)

– उत्तरा केळकर
uttarakelkar63@gmail.com

Story img Loader